India

एमआयटी शाळेची मनमानी फीवाढ, पालकांच्या तीव्र प्रतिक्रिया

कोथरूडमधील ही महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा आभ्यासक्रम राबवणारी पुण्यातील आघाडीची शाळा आहे.

Credit : Representative Image

एमायटी विश्वशांती गुरूकूल शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना परस्परच थेट शाळा सोडल्याचा दाखला पोस्टाने पाठवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळेनं सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला तिथल्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विरोध सुरू असतानाच शाळेच्या मॅनेजमेंककडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ९०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोथरूडमधील एमआयटी विश्वशांती गुरूकूल ही महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा आभ्यासक्रम राबवणारी पुण्यातील आघाडीची शाळा आहे. मात्र, विद्यार्थी आणि पालकांशी संगनमत न करताच एसएससीचा अभ्यासक्रम बंद करून सीबीएसई बोर्डानुसार अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय मॅनेजमेंटकडून घेण्यात आल्याचा आरोप इथल्या पालकांनी केला आहे. "शाळेतील सोयीसुविधा, शिक्षक आणि स्टाफ तोच कायम असताना निव्वळ फीस वाढवता यावी आणि पैसे उकळता यावेत, यासाठीच सीबीएससीचा अभ्यासक्रम थोपवण्यात येत आहे," अशी प्रतिक्रिया पालक कृती समितीचे सदस्य संजय जोशी यांनी इंडी जर्नलला दिली. 

"शाळेकडून सध्या असलेली २५ हजाराची फीस वाढवून ७५ हजार करण्यात आलेली आहे. आम्ही आमच्या पाल्याला महाराष्ट्र बोर्डात घालण्याच्या उद्देशाने प्रवेश घेतला होता. मात्र सीबीएसईचा निर्णय आमच्यावर बळजबरीने थोपवण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही अद्याप ऑनलाइन क्लासेसला सुरूवात झालेली नाही. आणि आता अचानक आमच्या पाल्याला पोस्टाने लिव्हींग सर्टीफिकेट पाठवण्यात आलंय. त्यामळे आता आमच्या मुलांचं शैक्षणिक वर्षच वाया जाणार काय?" असा संतप्त सवाल पालक गजेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.

शाळेचं प्रशासान आणि पालकांमधील हा वाद मागच्या दोन वर्षांपासून सुरु आहे. आमच्या पाल्याला एसएससी बोर्डात शिकवण्याच्या हेतूनं आम्ही प्रवेश घेतलेला असताना सीबीएससीचा अभ्यासक्रम आमच्या मुलांवर थोपवण्याचा प्रकार प्रशासन करू शकत नाही, अशी पालकांची भूमिका आहे तर मुलांच्या फायद्यांसाठीच भविष्यातील स्पर्धात्मकता लक्षात घेऊन सीबीएससी अभ्यासक्रम आम्ही राबवत असल्याचा दावा शाळेने केलेला आहे. यासबंधी इथल्या पालक कृती समितीनं शाळेला सीबीएससी अभ्यासक्रम राबवण्याची दिलेली परवानगी नाकारण्याचं आश्वासन राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडूंकडून मिळवलं होतं. मात्र, यानंतर सरकार आणि संबंधित खात्यांकडून पुढील कारवाई करण्यात आली नाही.

"पहिलीत प्रवेश करणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना सीबीएसईची काही अडचण नाही. पण चौथीपर्यंत एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम शिकलेल्या आमच्या पाल्यांना अचानक सीबीएससीत टाकल्यावर त्यांना हा अभ्यासक्रम झेपणार आहे का?" अशी चिंता पालक व्यक्त करत आहेत. प्रशासन आणि पालकांमधील या वादावर तोडगा निघत नसल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. यावर एमायटी प्रशासनाची बाजू काय आहे यासंबंधी आम्ही चौकशीचा प्रयत्न केला असता कोणतीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.