Opinion
सदर: डीपफेकचे जनक!
मीडिया लाईन सदर

आरक्षण हटवणार असल्याचा खोटा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. धार्मिक आधारावर मुस्लिमांसाठी असलेले आरक्षण काढून टाकण्यासंबंधी मी बोलत होतो. प्रत्यक्षात सर्वच आरक्षणे काढण्यासाठी मी बोलत असल्याचा व्हिडिओ डीपफेक तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आला, असा आरोप शहा यांनी केला. त्यासंबंधात काही काँग्रेस कार्यकर्त्यांना अटकही झाली आहे. बोगस व्हिडिओ बनवणे चूकच असून, त्याचे समर्थन करण्याचे कारण नाही. परंतु याप्रकारे बोगस व्हिडिओ तयार करून, सोनिया गांधी, राहुल गांधी प्रभृतींची बदनामी करणे, नेहरूंचे चारित्र्यहनन करणे, इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांच्यावर चिखलफेक करणे, समाजमाध्यमांचा वापर करून दंगली घडवणे, विचारवंतांना आणि विरोधकांना ट्रोल करणे या गोष्टींची सुरुवात कोणी केली? त्यामुळे प्रथम शहा यांनी स्वतःचा चेहरा आरशात पाहिला पाहिजे. यासंदर्भात आतापर्यंत सत्ताधारी पक्षाच्या किती लोकांना अटक झाली आहे? भाजपच्या समाजमाध्यम विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी तर आतापर्यंत केलेले उद्योग वेळोवेळी समोर आलेले आहेत. एका टीव्ही चर्चेत सहभागी असताना, मी तोंडही उघडलेले नसताना. भाजपे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मला ‘उपटसुंभ’ ही पदवी प्रदान केली. कदाचित वरिष्ठांनी कानउघाडणी केल्यामुळे की काय, माहीत नाही. परंतु नंतर फोन करून त्यांनी माझी माफीही मागितली...आता पुन्हा शहा यांच्याबद्दल.
राज्यपाल असताना सत्यपाल मलिक त्या त्या विषयांवर (पुलवामा, जम्मू-काश्मीरमधील भ्रष्टाचार) का बोलले नाहीत, असा सवाल शहा यांनी दिलेल्या एका मुलाखतीत विचारला होता. तो मूळ प्रश्नांना बगल देणारा आहे. त्यावेळी बोलले नाहीत, म्हणून आता बोलायचेच नाही, असे थोडेच आहे?' मी टू 'चळवळीच्या वेळी देखील 'स्त्रियांनी त्याचवेळी अन्याय चव्हाट्यावर का आणला नाही?' असा सवाल उपस्थित केला गेला. त्याला महिलांनी चोख उत्तर दिले होते. परंतु माझ्या आठवणीप्रमाणे न्यायालयाने अन्य प्रकरणांत देखील, 'अमुकतमुक प्रश्न त्याचवेळी का मांडला नाही?' या युक्तिवादास महत्त्व न देता, उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नांस थेट भिडणेच पसंत केले आहे. तेव्हा गृहमंत्रीसाहेब, अशी चलाखी करू नका. मलिकसाहेबांच्या मुद्द्यांना व आरोपांना उत्तरे द्या! मलिकसाहेबांचे संरक्षणही कमी करण्यात आले आहे. काँग्रेसवर वा अन्य विरोधी पक्षांवर बेलगाम आरोप करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांची पद्धत इतर नेत्यांनीही आत्मसात केली आहे.
काँग्रेसवर वा अन्य विरोधी पक्षांवर बेलगाम आरोप करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांची पद्धत इतर नेत्यांनीही आत्मसात केली आहे.
गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांनी म्हणे श्रीराम आणि हनुमानाचा अपमान केला, असा आरोप राणा दाम्पत्याने केला. हा अपमान त्यांनी कधी नि कुठे केला? आपल्या बेताल, बेछूट आणि फिल्मी इव्हेंटबाजीमुळे या दोघांनी समस्त जनतेचा अपमान केला होता, त्याचे काय! कोरोनाचा मुकाबला, लसीकरण, औषधे व लसींचे राज्यांना वाटप, लसींची आयात यासंबंधात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि डॉ मनमोहन सिंग यांनी अत्यंत उपयुक्त सूचना केल्या होत्या. या सूचनांबद्दल त्यांची टवाळी करणारे सत्तेत बसलेले नेते, हे अत्यंत संकुचित मनाचे आणि विषारी वृत्तीचे आहेत, असेच म्हणायला हवे. प्रादेशिक आणि स्वतःची अस्मिता व स्वाभिमान जपणाऱ्या पक्षांबद्दल भाजपच्या मनात पूर्वग्रङ आङेतच.
एफएसएसआय, म्हणजे भारत सरकारचा फूड सेफ्टी रेग्युलेटर होय. 'कर्ड'ला 'दही' असे संबोधावे आणि तसे वेष्टनावर छापावे, असा फतवा त्याने काढला होता. परंतु कर्नाटकामधून त्यास कडवा विरोध झाल्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला. देशात सर्वत्र हिंदी भाषा लादण्यास, खास करून दक्षिणेतून तीव्र विरोध होतो. प्रादेशिक अस्मिता चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास ते कुठेही सहन केले जात नाही. म्हणूनच कर्नाटकात 'अमूल' ब्रँडला स्थानिक 'नंदिनी' या सरकारी दुधाच्या ब्रँडविरोधात उभे करण्याचा प्रयत्न होत आहे, असे दिसताच कर्नाटकातून त्यास विरोध झाला होता. भाजप हा प्रादेशिक अस्मितेस कस्पटासमान लेखत असल्याचा आरोप करण्यात आला. महाराष्ट्रातही 'बाळासाहेब ठाकरे' हा ब्रँड लहान करून 'मोदी' हा ब्रँड मोठा करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नावही पळवण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले. २०१४ मध्ये शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवूनही ६३ जागा मिळवल्या आणि २०२० मध्ये भाजपसमवेत निवडणुका लढवल्यानंतर त्यास विधानसभेत ५६ जागा मिळाल्या. त्यावरून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मराठी अस्मितेची शक्ती दिसली. आणि त्याचवेळी राष्ट्रीय पक्षाच्या ताकदीची मर्यादाही दिसून आली.
तामिळनाडूत आटोकाट धडपड करूनही भाजपला प्रादेशिक अस्मितेवर मात करता आलेली नाही.
तामिळनाडूत आटोकाट धडपड करूनही भाजपला प्रादेशिक अस्मितेवर मात करता आलेली नाही. महाराष्ट्रात देखील मराठी माणसांच्या सुखदुःखांशी, जाणिवांशी एकरूप झालेल्या ठाकरे कुटुंबाच्या शिवसेनेला लोळवण्याची, नष्ट करण्याची भाषा अमित शहा व नड्डांनी केली. लोकांना हे आवडलेले नाही. शिंदे सरकारच्या प्रत्येक जाहिरातीत मोदी यांचा फोटो असतो आणि 'आम्ही तुमचीच माणसे आहोत', असे शिंदेंनी मोदींना सार्वजनिकरीत्या सांगितले आहे. भाजपशी युती असतानाही बाळासाहेब ठाकरे वा उद्धवजींनी कधीही अशी लाचारी केली नव्हती, उलट वेळोवेळी भाजपला सुनावलेही होते. राज ठाकरे यांनी देखील 'महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत' या यशवंतराव चव्हाण यांच्या वक्तव्याबद्दल ( अर्थात त्यांची त्यामागे एक व्यापक भूमिका होती, हा भाग वेगळा) शरद पवार यांना त्यांच्या मुलाखतीत मागे आठवणीने प्रश्न विचारला होता. शेवटी केंद्रीय सत्तेपुढे लोटांगण घालून, स्वतःची ओळख पुसून टाकणारे लोक आणि त्यांचे पक्ष हे जनतेला आवडत नाहीत, हे ध्यानात ठेवले पाहिजे. प्रादेशिक अस्मितेचे राजकारण करणार्या सर्वच पक्षांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, दिल्लीपुढे लोटांगण घालणारे वा ईडीच्या भयामुळे त्यासमोर नरम पडणारे, दिल्लीची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे चापलुसी करणारे नेते वा पक्षांना मराठी माणूस स्वीकारत नाही!
माजी खासदार किरीट सोमैया यांच्या गाडीवर दगडफेक करणे, घराबाहेर घोषणाबाजी करणे या मागे झालेल्या प्रकारांचा निषेधच करावा लागेल. परंतु रोजच्या रोज 'माफिया सेना', 'गुंडांची सेना' असा उल्लेख करणे आणि इतरांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणे, त्यांना 'बिनकामाचा' म्हणणे, हे कोणीही सहन करणार नाही. परंतु 'संजय पांडे हे उद्धव ठाकरे यांच्या चपराशासारखे वागत आहेत' अशी बेलगाम टीका करणारे सोमय्या, रश्मी शुक्ला या देवेंद्र यांच्या काळात कशाप्रकारे वागत होत्या, याबद्दल काहीही बोलले नव्हते! आता तर सोमैयांनी ज्यांच्यावर आरोप केलेले आहेत, अशा नारायण राणे, सुनील तटकरे, यामिनी जाधव, रवींद्र वायकर, सुनेत्रा पवार प्रभृतींना महायुतीने लोकसभेचेच तिकीट दिले आहे. मात्र याबाबत पक्षाचा निषेध करून भाजपचा त्याग करावा, असे काही नीतिमान सोमैया यांना वाटले नाही.
हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर होण्यापूर्वी, १९२३ साली जॉर्ज व्हिअरेक या अमेरिकन कवीने त्याची मुलाखत घेतली होती. त्याच्या उत्तरांमधून जगावर राज्य करण्याची त्याची इच्छा दिसत होती. प्रसिद्ध नट अक्षय कुमारने २०१९ साली लोकसभा निवडणुकांपूर्वी चौकीदाराची जी चापलुसी करणारी मुलाखत घेतली. कितीही टीका झाली, तरी 'मला राग येतच नाही, मी पॉझिटिव्ह वृत्तीचा आहे' असे सांगणार्या मोदींच्या मनातील विरोधकांच्या प्रती असलेली सूडभावना का जात नाही? नेहरू-गांधी घराण्याबद्दलची द्वेषभावना का नष्ट होत नाही? असे प्रश्न तेव्हा मनात आले होते. आज तर लोकसभेच्या प्रचारसभांतून बोलणारे मोदी सूडभावनेने अधिकच पेटलेले दिसतात. काँग्रेसला देशाची फाळणी करायची आहे, दलित, ओबीसी, आदिवासींचे आरक्षण काढून ते मुसलमानांना दिले जाणार आहे, तुमची मंगळसूत्रे, जमिनी, फ्लॅट्स जप्त करून, ती मुसलमानांना वाटून दिली जाणार आहेत, असा अत्यंत खोटा प्रचार मोदी यांनी सुरू केला आहे. सत्ता जाणार अशी भीती वाटल्यामुळेच की काय, ते अनाबशनाब बोलायला लागले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या काँग्रेसबद्दल एकाही शब्दाची कृतज्ञता व्यक्त न करता, काँग्रेसने देश उद्ध्वस्त केला आहे, असा आरोप मोदींनी केला. मोदी म्हणजे अपप्रचाराची गॅरंटी...डीपफेकचे जनक तेच आहेत.