Opinion
समृद्ध भारत, नया भारत!
मीडिया लाईन
पशुधनाच्या चाऱ्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून दलित महिलेस अल्पवयीन मुलासह फरफटत आणत, निर्घृणपणे मारहाण केल्याची घटना नुकतीच माण तालुक्यातील पानवण गावात घडली. महाराष्ट्रासारख्या शाहू-फुले-आंबेडकर यांच्या नावांचा सकाळ-संध्याकाळ गजर करणाऱ्या राज्यात अशा घटना घडत आहेत, याला काय म्हणावे? अलिकडे जयपूर-मुंबई रेल्वेगाडीत रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने चारजणांचे हकनाक बळी घेतले. त्या सर्वांना त्याने एकापाठोपाठ एक गोळ्या घातल्या. या देशात राहायचे असेल, तर मोदी, योगी आणि ठाकरे ही तीन नावे घेतलीच पहिजेत, असे उद्गार त्याने काढल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे.
तो पोलीस मनोरुग्ण असू शकतो. परंतु त्याने ज्यांना मारले, त्यात तीन जण, त्यातही वेगवेगळ्या डब्यांमध्ये बसलेले मुस्लिमधर्मीय होते. म्हणजेच त्याच्या हिंसक कृतीमागे एक निश्चित असा विचार होता. मुस्लिमधर्मीयांविरुद्धचा त्याचा राग हिंसेतून व्यक्त झाला. ज्यांना त्याने मारले, ते केवळ मुस्लिम होते, एवढाच त्यांचा ‘गुन्हा’! नाशिकजवळ गोमांस वाहून नेत असल्याच्या संशयावरून एकाची हत्या झाली. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या खासगी शाळेत एका मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. शाळेतील शिक्षिका तृप्ता त्यागीने इतर मुलांकरवी एका मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण करवली. संबंधित विद्यार्थ्याला शिस्त लावण्याच्या नावाखाली त्याच्या कानाखाली आवाज काढण्यासाठी अन्य विद्यार्थ्यांना तिने प्रवृत्त केले. मी अपंग आहे, म्हणून इतर काही मुलांना त्याला चापट मारायला लावली, असा खुलासा या शिक्षिकेने नंतर केला. आपण कोणताही धार्मिक भेदाभेद करत नाही, असे आरोपी श्रीमती त्यागीने म्हटले असले, तरी तिने मुस्लिम विद्यार्थ्यांविषयी द्वेषमूलक वक्तव्य केल्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत.
भारताचे रूपांतर पाकिस्तानसारख्याच कट्टरतावादी देशात करण्याचे ध्येय अनेकांनी उराशी बाळगलेले दिसते.
दुसरीकडे, देशात ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चे निघत आहेत. ‘वंदे मातरम्’ म्हणण्याची सक्ती करून जाणीवपूर्वक पेटवापेटवीचे उद्योग सुरू आहेत. इतकी वर्षे पाकिस्तान विरुद्धच्या घोषणा देऊन भारतात वातावरण बिघडवण्याचे उद्योग चालू होते. आता पाकिस्तान हा देशच विनाशाच्या उंबरठ्यावर असून, तो स्वतःलाच वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. अशावेळी भारताचे रूपांतर पाकिस्तानसारख्याच कट्टरतावादी देशात करण्याचे ध्येय अनेकांनी उराशी बाळगलेले दिसते. राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचा अपवाद वगळता, भारतातील बिगर भाजप पक्षांनी आणि खास करून पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणाऱ्या पक्षांनी जहाल धर्मवाद्यांचा मुकाबलाच करण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे भारतात विविध भागांत शिवकाशीप्रमाणे धार्मिक द्वेषाच्या फॅक्टऱ्या तयार झाल्या.
दिल्ली, हरियाणा, मणिपूर अशा जेथे जेथे दंगली झाल्या, तेथे तेथे हिंदुत्ववादी सत्ताधाऱ्यांची त्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फूस होती. दिल्लीतील दंगलीत भाजपचे काही नेते उघड उघड सहभागी झाले होते. पूर्वी जातीय दंगे होत, तेव्हा सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप नसे. आम्ही दोन्ही बाजूच्या दंगलखोरांना अटक करायचो, बळाचा वापर करायचो आणि बळी पडलेल्यांच्या मृतदेहांचे प्रदर्शन केले जाऊ नये याची काळजी घ्यायचो, असे निवृत्त पोलीस आयुक्त रिबेरो यांनी म्हटले आहे. हरियाणात नूह इथे विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धार्मिक मिरवणुकीत सहभागी व्हा, असे आवाहन बजरंग दलचा गुंड मोनू मानेसर याने केले होते. काही दिवसांपूर्वी वास्कोजवळच्या मुस्लिम परिसरात काही हिंदूंनी धार्मिक मिरवणूक काढून मुस्लिमांना भडकावले. गोव्यासारखे शांत राज्यही अशांत करण्याचा डाव दिसतो. २०१९ मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत ३७ टक्के मते आणि ३०३ जागा मिळाल्या. २०२४ मध्ये इतक्या जागा मिळणार नाहीत, कारण अँटि इन्कम्बन्सी प्रबळ आहे, हे माहीत असल्यामुळेच धार्मिक ध्रुवीकरण केले जात आहे.
मणिपूरच्या दंगलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली, तेव्हाचा त्यांचा स्वर हा अत्यंत अधीर आणि रागीट असा होता. मणिपूरच्या घटना उर्वरित देशापासून झाकून ठेवता न आल्यामुळे ते चिडले होते. मणिपूरमधील जे गुन्हेगार ७० दिवस सापडत नव्हते, ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र लगेच सापडले...मणिपूरकांडानंतर, हा माझा भारत नव्हे. ही आमची सभ्यतामूल्ये नव्हेत. वो हमारी बेटियाँ हैं...वगैरे शाब्दिक कारंजी मोदींनी उडवली. खरे तर इथे सभ्यता वगैरेचा काहीही संबंध नाही. तसेच अकारण नातेसंबंध जोडण्याचेही कारण नव्हते. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची अप्रतिष्ठा केली असेल, तर आरोपी व्यक्तीला तात्काळ शासन होईल, हे बघण्याची जबाबदारी सरकारची असते. 'संस्कृती’, ‘सौजन्य’, ‘सभ्यता’ असे शब्द वापरून प्रत्यक्षात मात्र काही न करणे, हाच मुळात गुन्हा आहे.
भाजपने मणिपूरमध्ये बहुसंख्याकवादाला वैधता दिली आणि वांशिक दहशत माजवली. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात मणिपूरमधील वातावरण आता सुधारत आहे, असा निर्वाळा मोदींनी दिला. वास्तविक तेव्हाही मणिपूर जळतच होते. २००२ मध्ये गुजरातेत दंगे होत असताना, राज्यातील परिस्थिती निवळली आहे आणि सर्वत्र शांतता व सुव्यवस्था नांदत आहे, असेच तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या मोदीनी म्हटले होते. गुजरातप्रमाणेच मणिपूरमध्येही पोलीस यंत्रणेपासून ते प्रशासन व मानवी हक्क आयोगापर्यंत सर्व यंत्रणा सरकारच्या बटीक बनल्या. उलट मणिपूरमधील संबंधित घटनांच्या प्रसारणासाठी ट्विटरला तसेच प्रसारमाध्यमांना जबाबदार धरण्यात आले. हरियाणात तेथील भाजपप्रणीत खट्टर सरकारनेच गोरक्षा दल स्थापले. गोरक्षणाचा कारभार ज्यांच्या हाती आहे, त्यांच्यावर संघाचे वर्चस्व आहे. तेथील प्रशासन व पोलिसांतही हिंदुराष्ट्रवाद्यांची बहुसंख्या आहे. समाजात हिंसा इतकी ठासून भरली आहे की ज्याचे नाव ते.
मध्यंतरी मुंबईतील रेल्वे स्टेशनात एका पुरुषाचा स्त्रीला धक्का लागला. त्यानंतर त्या स्त्रीने व तिच्या पतीने मिळून त्या पुरुषाला फलाटावरून ढकलून दिले. समोरून रेल्वेगाडी येत होती, तरी त्याला वर चढू देण्यात आले नाही आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ धक्का लागला वा दिला, यामुळे एखादा माणूस मारला जावा, असे वाटण्याइतपत क्रौर्य कुठून येते? २००० साली गुजरातमध्ये बाबू बजरंगीने धर्मवाद जोपासला. दुर्गावाहिनी, बजरंग दल आणि गोरक्षक समित्यांमार्फत समाजात विष पसरवण्यात आले. पूर्वी इंदिरा गांधींचे व्यक्तिस्तोम माजवले जात आहे, अशी टीका करणारे भाजपवाले, आता नळाला पाणी येण्यापासून ते चांद्र मोहिमेपर्त सर्वकाही केवळ मोदींमुळेच घडत आहे, असे सांगत फिरत आहेत...धार्मिक बहुसंख्याकवाद आणि व्यक्तिपूजा यांचे डेडली कॉम्बिनेशन तयार झाले आहे. नवीन संसद भवनाच्या सोहळ्यात साधू-बैराग्यांच्या हिंदुत्वाचे प्रदर्शन मांडण्यात आले. जणू काही तो लोकशाहीचा नव्हे, तर हिंदुत्वाचा उत्सव होता. या मंडळींचा हिंदू धर्म विवेकानंद व गांधींचा नव्हे, तर तो मनुवादी हिंदुत्वाच्या धाटणीचा आहे.
२०२४ची निवडणूक ही मनुवाद विरुद्ध संविधानवाद अशी असणार आहे.
२०२४ची निवडणूक ही मनुवाद विरुद्ध संविधानवाद अशी असणार आहे. बजरंग दलाची स्थापना १९८४ साली झाली. त्या दशकातच या दलात बंदुकीचा वापर सुरू झाला. १९९६ साली मकबूल फिदा हुसैन यांच्या आर्ट गॅलरीवर अहमदाबाद इथे हल्ला करण्यात आला. १९९८ साली ‘सीतेची सुटका’ या चित्रात सीतेच्या अंगावरील कपडे कमी दाखवले, असा आरोप करून मुंबईत हुसैनच्या घरावर याच मंडळींनी हल्ला केला. त्यानंतर हुसैनने देशच सोडला. दीपा मेहता यांच्या ‘फायर’ मध्ये लेस्बियन स्त्रियांचा विषय हाताळण्यात आल्यामुळे, बजरंग दलाने या चित्रपटाविरुद्ध आंदोलन केले. या चित्रपटाचे समर्थन केल्याची शिक्षा म्हणून अभिनेते दिलीपकुमार यांच्या घरासमोर बजरंग दलाने चड्डी-बनियान आंदोलन केले. दीपाच्याच ‘वॉटर’ या चित्रपटात हिंदू विधवा स्त्रियांवरील निर्बंधांचा विषय हाताळण्यात आला होता. परंतु वाराणसी येथील या चित्रपटाचा सेटच उद्ध्वस्त करण्यात आला. एकूण, २१व्या शतकातील समृद्ध भारताची ही वाटचाल आहे...