Opinion
आम्ही म्हणू, तोच हिंदुत्ववादी!
मीडिया लाईन सदर
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दलचा निर्णय कोणत्याही क्षणी येऊ शकतो. या संपूर्ण प्रकरणात माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकांविषयी सरन्यायाधीशांनी अगोदरच ताशेरे ओढले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी तो उपद्व्याप केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही, उद्धवजींनी बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले, अशी पोकळ आरोळी ठोकून शिवसेनेशी गद्दारी केली आणि भाजपची गुलामी स्वीकारून सरकार स्थापन केले. आमचे हे हिंदुत्ववादी सरकार आहे, असे शिंदे-फडणवीस म्हणतात. मग अगोदरचे सरकार काय औरंगजेबाचे होते का, असा रोखठोक सवाल विधान परिषदेत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच विचारला. तेव्हा सरकार पक्षातील नेत्यांचे चेहरे गोरेमोरे झाले...हिंदू सणांवरील संक्रांत संपली, अशी जाहिरातबाजी सुरू होती. त्याचवेळी करोनामुळे सण सामुदायिकरीत्या साजरे करण्यावर निर्बंध लावणे भाग पडले होते. राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, हिंदू सण साजरेच होत होते, असे मी तेव्हा जाहीररीत्या म्हटले होते. असो.
राहुल गांधी असोत की मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री असताना कमलनाथ यांनी हिंदू धर्माबद्दलचे आपले प्रेम लपवलेले नव्हते. हिंदुत्व आणि धार्मिकता अथवा हिंदू धर्माचे प्रेम या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हिंदुत्वाचे राजकारण मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्याबद्दल शत्रुभाव ठेवून चालते. हे राजकारण संघपरिवार आणि भाजप करतो काँग्रेस नव्हे. मी जानवेधारी ब्राह्मण आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. वास्तविक ही अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट मुळीच नाही. उलट मी ब्राह्मण असलो, तरी मी चातुर्वर्ण्याचा धिक्कार करतो. मी जातपात मानत नाही. फक्त जन्माने मी ब्राह्मण आहे. ही वस्तुस्थिती नमूद करत आहे, असे त्यांनी म्हणायला हवे होते. मी कौल ब्राह्मण आणि माझे दत्तात्रेय गोत्र असल्याचेही ते म्हणाले होते. तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री असताना आपण एक हजार गोशाळा बांधणार असल्याचे कमलनाथ यांनी जाहीर केले होते. हिंदुत्वाच्या राजकारणात आपल्याला सारखे सारखे कोंडीत पकडले जात आहे, या कारणाने केजरीवाल, कमलनाथ आणि राहुल गांधींनी शिवभक्त, हनुमानभक्त असल्याच्या घोषणा केल्या होत्या.
मराठीच्या मुद्द्यातून राज्यव्यापी पक्ष विस्तार होत नाही, हे लक्षात आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व अंगीकारले.
मराठीच्या मुद्द्यातून राज्यव्यापी पक्ष विस्तार होत नाही, हे लक्षात आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व अंगीकारले. त्यानंतर विलेपार्ले येथील १९८७ च्या पोटनिवडणुकीत ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ अशी घोषणा देऊन त्यांनी लोकप्रियता संपादन केली. माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशीद पाडली असेल, तर त्याचा अभिमान आहे, असे उद्गार काढून आणि १९९२-९३च्या दंगलीत आक्रमक भूमिका घेऊन, बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली. उद्धव यांनी मात्र कधी मुसलमान, कधी मद्रासी, तर कधी गुजराती-मारवाडी यांना शत्रुस्थानी ठेवून मतांचे राजकारण करण्याचे टाळले. २०१४ साली भाजपला १२२ जागा विधानसभेत मिळाल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेला ६३ तर भाजपला १०५ जागा प्राप्त झाल्या होत्या. या दोन्ही पक्षांनी तेव्हा स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. २०१९ मध्ये शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपचा मतांमधील टक्का २५% शिवसेनेचा १५% होता. याचा अर्थ हिंदुत्वाची व्होट बँक कमीत कमी ४०-४१ टक्क्यांची आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरेदेखील हिंदुत्वाकडे पाठ फिरू शकत नाहीत. फक्त त्यांनी एक चांगला बदल केला आहे. तो म्हणजे, आम्ही कोणत्याही अन्यधर्मीय वा पंथांचा किंवा प्रांतीयांचा द्वेष करत नाही. तसेच आम्ही प्रबोधनकारांचा पुरोगामी विचार मानतो. शेंडी जानव्याचे हिंदुत्व आम्ही मानत नाही, जातींमधील उच्च-नीचता अजिबातच मानत नाही, हे उद्धवजी ठासून सांगत असतात आणि ते अत्यंत स्वागतार्ह आहे.
बाबरी मशिदीच्या पतनानंतर नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा लोकसभा निवडणुकांत पराभव झाला होता. खरे तर उदारीकरणामुळे मध्यमवर्गाचा खूप फायदा झाला होता. देशातील उद्योजकता वाढली होती आणि आर्थिक प्रगतीही झाली होती. परंतु तरीही धर्माने विकासावर मात केली होती. राम मंदिराचा विषय काँग्रेसने योग्य पद्धतीने हाताळला नाही. अनेक चुका केल्या. ज्याप्रमाणे अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबाबतही यूपीए सरकारच्या बऱ्याच चुका झाल्या, असे दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोकळेपणाने मान्य केले होते. याउलट महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस हे ‘आता प्रत्येक सण जोरात’, असे म्हणत असून, महाविकास आघाडी सरकारने जणू काही जाणीवपूर्वक हिंदू सणांवर बंदी आणली होती, असे दाखवण्याचा खोटा प्रचार करत आहेत. कोरोना काळात जनतेचा वाईटपणा पत्करून उद्धवजींनी मंदिरे, जत्रा आणि धार्मिक सणसमारंभांवर बंधने आणली होती. ती बंधने आणली नसती, तर करोना वाढला असता आणि त्यात केवळ अन्याधर्मीयांचेच नव्हे, तर हजारो हिंदूंचेही बळी पडले असते. अशावेळी शिंदे-फडणवीस यांना ते चालले असते का? हा प्रश्न कोणीतरी विचारला पाहिजे.
कोण नेता कोणकोणत्या देवांचे दर्शन घेऊन आला याला आहे, हा लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा नाहीच.
केवळ उद्धवजीच नव्हेत, तर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हेदेखील अयोध्येला जाऊन आले. खरे तर, कोण नेता कोणकोणत्या देवांचे दर्शन घेऊन आला याला आहे, हा लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा नाहीच. काही विषयांचे धार्मिक राजकारण करून, उद्धव ठाकरे कसे हिंदू हिंदुत्वाला विसरून काँग्रेस राष्ट्रवादीच्या कच्छपी लागले आहेत, हे ठसवण्याचे काम सुरू आहे.
महाविकास सरकार असताना, तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम आरक्षण सरकार लागू करण्यात असल्याची घोषणा केली. त्याबरोबर भाजपने बोंबाबोंब सुरू केली. याचा फटका बसेल हे लक्षात येताच, असा कोणताही विचार नसल्याचे उद्धवजींनी सांगून टाकले. नागालँडमध्ये एनडीडीपी व भाजप यांनी मिळून विधानसभेच्या ६० पैकी ३७ जागा जिंकल्या आहेत. त्यांना कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही. परंतु सात जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यासाठी कोणत्याही अटी घालण्यात आल्या नसल्या, तरी तुम्ही भ्रष्टवादी आहात. भ्रष्टवादी राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्हाला पाठिंबा नको आहे. तुम्हाला आम्ही बहिष्कृत मानत आहोत, असे भाजपने बाणेदारपणे अजिबात सांगितले नाही. काँग्रेस आणि भाजप यांची विचारसरणी वेगवेगळी असली, तरी एकमेकांना शत्रू समजण्याचे कारण नाही. तसेच शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी मैत्री करणे म्हणजे शत्रू राष्ट्राशी दोस्ती करणे नव्हे, हे भाजपने लक्षात ठेवले पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजप इतकेच देशावर प्रेम करणारे पक्ष आहेत.
१९८४ च्या दंगली. (सौजन्य: बीबीसी)
इंदिरा गांधी यांना बांगलादेश युद्ध झाल्यानंतर झालेल्या निवडणुकांत संघाने मदत केली होती. त्याच दशकात जम्मू-काश्मीरमध्येही इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. १९८४ साली इंदिराजींची हत्या झाल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांत संघाने काँग्रेसला आतून मदत केली होती. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्लीत तीन दिवसांची एक परिषद भरवली होती. त्यावेळी संघाने आम्ही राज्यघटना मानतो, असे म्हटले होते. अर्थात हे त्यांना मुद्दामहून सांगावे लागले होते. तसेच हिंदुराष्ट्राच्या संकल्पनेत मुसलमानांना स्थान नाही असे मानू नये, असे स्पष्टीकरण दिले होते. पण मुसलमान व अन्य धर्मीयांकडे संघ बरोबरीच्या नात्याने बघतो, की त्यांना आपल्या आश्रयदाते मानतो, हे बघावे लागेल. २०१५ मध्ये महंमद अखलाकची गोमांस बाळगल्याच्या संशयाकडून हत्या झाली. तेव्हा गोमातेची हत्या करणाऱ्या पाप्याला देहान्त प्रायश्चित्त दिले जाते, असे विधान संघाच्या मोठ्या नेत्याने केले होते. अखलाकची हत्या करणाऱ्यांच्या कृत्याचा परिवाराने जोरदार निषेध केलेला नव्हचा. तसेच कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश, दाभोलकर यांच्या हत्यांचाही जसा निषेध करायला पाहिजे, तसा परिवाराकडून निषेध झालेला नाही. पाच वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या परिषदेत संघाने कुठल्यातरी संदर्भात काँग्रेसचे कौतुकही केले होते. मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली, त्याबाबत सरसंघचालकांनी नापसंती व्यक्त केली होती. निदान मोदी व फडणवीस यांनी यापुढे तरी काँग्रेसमुक्त अथवा मातोश्रीमुक्त शिवसेनेची स्वप्ने बघू नयेत. विरोधकांना संपवणे, नष्ट करणे, त्यांचा तिरस्कार करणे, हे भारतीय संस्कृतीत बसत नाही, हे भाजपने ध्यानात ठेवले पाहिजे.