Opinion
शिवतीर्थावरून ठाकरेंनी पाजले शिंदेंना तीर्थ!
मीडिया लाईन सदर
२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लोकांच्या भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न होतील. समाजात फूट पाडणाऱ्या अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. विजयादशमीच्या निमित्ताने केलेल्या भाषणात भागवत यांनी हे प्रकट चिंतन केले. जनतेच्या भावना कोण भडकवते, समाजात फूट कोण पाडते, हे लोकांना बरोबर माहिती आहे. ज्यांनी या गोष्टी केल्या, तेच आता याविषयी प्रवचन ठोकू लागले आहेत ही एक गंमतच आहे...
‘या दिवाळीत चिवडे दोन’ अशी एका कंपनीची प्रसिद्ध जाहिरात आहे. त्याच पद्धतीने, गेल्या वर्षी आणि यंदाही ‘या दसऱ्याला मेळावे दोन’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र या दोन्ही मेळाव्यांत जमीन अस्मानाचा फरक होता. मुंबईत आझाद मैदानावर झालेला शिंदे गटाचा मेळावा हा पंचतारांकित होता. त्यासाठी शेकडो बसेस व गाड्यांची व्यवस्था त्या त्या भागातील शिंदे गटाच्या पैसेवाल्या पुढार्यांनी केली. मुंबई महापालिकेची सर्व यंत्रणा आणि अधिकाऱ्यांना राबविण्यात आले. आठ दहा लाख मिनरल वॉटरच्या बाटल्या, तीन तीन लाख वडापाव वाटण्यात आले. केवळ कॉटन ग्रीन जवळील पोर्ट ट्रस्टच्या मैदानात अनेकांची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे ६,००० मोबाईल टॉयलेट उभारण्यात आली होती. सर्व वर्तमानपत्रांतून जॅकेट जाहिरात करण्यात आली होती. प्रचार व जाहिरातीवर तुफान पैसा खर्च करण्यात आला. उलट शिवाजी पार्क किंवा शिवतीर्थावर जे शिवसैनिक आले होते, ते बहुसंख्य गोरगरीब वर्गातील होते. ते उत्स्फूर्तपणे आणि आपल्या पक्षाच्या व पक्षनेत्यावरील प्रेमापोटी आले होते. स्वतःची भाजी भाकरी घेऊन ते शिवाजी पार्कमध्ये दुपारी उन्हात खात होते, हे प्रत्यक्ष पाहायला मिळाले. भाड्याने आणलेली माणसे आणि स्वयंस्फूर्तीने आलेली माणसे, यांच्यातील फरक सहज ओळखू येतो.
गेल्या वर्षी आणि यंदाही ‘या दसऱ्याला मेळावे दोन’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून गेल्या वर्षी प्रचंड वाद झाला होता. शिवाजी पार्क किंवा शिवतीर्थावरून आम्हीच दसरा मेळावा घेणार, असा आग्रह एकनाथ शिंदे गटाने धरल्यावर उद्धव ठाकरे गटानेदेखील आक्रमक भूमिका घेतली. यावर्षीही दोन्ही गटांत यावरून वाद सुरू झाला होता. परंतु सुदैवाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही माघार घेतली, हे बरे झाले. शिवतीर्थावर सभा घेण्याचा रिवाज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केला. या सभांशी ठाकरे घराण्याचा संबंध ज्या पद्धतीने जोडला जातो, त्याप्रमाणे इतरांचा जोडला जात नाही. शिवाय हे शिंदे वर्षानुवर्षे ठाण्यातील शिवसेनेचे नेतृत्व करत होते. त्यामुळे शिवतीर्थाशी त्यांचा तसा संबंधही नाही. म्हणून निवडणूक आयोगाने जरी त्यांना धनुष्यबाण व शिवसेना हे नाव दिले असले, तरीदेखील दसरा मेळाव्याचा परंपरेशी अधिक संबंध आहे आणि ठाकरे घराणे व शिवसैनिक या भावनिक नात्याचे ते प्रतीक आहे.
म्हणूनच यापुढे देखील सर्वोच्च न्यायालयात निकाल काहीही लागो, दसरा मेळाव्यावरून शिंदे गटाने लहान मुलांप्रमाणे भांडण उकरून काढू नये, अशी अपेक्षा आहे. २०२२ मध्ये न्यायालयात धाव घेत, शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी ठाकरे गटाने मिळवली. त्यावेळी शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात पार पडला. यावेळी शिंदे गटाचा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात झाला. ‘शिवसेनेला आझाद करण्याचं आणि धनुष्यबाण वाचवण्याचं काम आम्ही केलं आहे, म्हणून हा मेळावा आझाद मैदानात घेत आहोत’ असा युक्तिवाद करण्यात आला. शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी झाला. शिवसेनेच्या स्थापनेनंतरचा हा पहिलाच मेळावा होता. त्यावेळी वर्तमानपत्रांनी या मेळाव्याची फारशी पूर्वप्रसिद्धी केली नव्हती आणि तेव्हा शिवसेनेपाशी ‘सामना’ही नव्हता. परंतु ‘मार्मिक’ हे साप्ताहिक या संघटनेच्या पठीशी उभे होतेच.
या मेळाव्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय‘ आणि ‘शिवसेनेचा जयजयकार असो’, अशा घोषणा देत, मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतील कार्यकर्ते शिवतीर्थाकडे आले होते. त्यावेळी शिवसेना मुंबईपुरतीच मर्यादित असल्यामुळे अन्य शहरांतून कार्यकर्ते येण्याचा संभवच नव्हता. व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार स्वतः हजर होते. त्यांच्या सोबत श्रीकांत ठाकरे, तसेच प्राध्यापक स.अ. रानडे आणि ॲडव्होकेट बळवंत मंत्री हे बाळासाहेबांचे सहकारीही उपस्थित होते. विशेष म्हणजे, व्यासपीठावर काँग्रेसचे नेते आणि पुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले रामराव आदिक हेही होते. त्यावेळी आदिकदेखील मराठी तरुणांसाठी स्वतंत्रपणे काम करत होते.
या पहिल्या मेळाव्यात शाहीर साबळ्यांनी आपल्या गगनभेदी आवाजात महाराष्ट्रगीत म्हटले होते. आपल्या भाषणात बाळासाहेबांनी ‘मराठी माणूस जागा झाला असून, तो यापुढे कोणताही अन्याय सहन करणार नाही. राज्य सरकारला मराठी तरुणांची दखल घ्यावीच लागेल’, असा स्पष्ट इशारा दिला. महाराष्ट्राला आज खरी गरज राजकारणापेक्षा समाजकारणाची अधिक आहे. महाराष्ट्रवाद जागवला पाहिजे, असेही बाळासाहेब त्यावेळी म्हणाले होते. तर ‘मराठी रक्त भ्रष्ट नाही, मराठी माणूस हा अन्यायाशी झगडायला तयार आहे, हे आज तुम्ही दाखवून दिलं आहे. मराठी माणसाने आपापसात भांडू नये’, असे प्रतिपादन आपल्या भाषणात प्रबोधनकारांनी केले होते. इतके दिवस हा बाळ ठाकरे कुटुंबीयांचा होता, आज हा बाळ मी तुम्हाला दिला, असे भावपूर्ण उद्गार प्रबोधनकारांनी काढले, तेव्हा ‘शिवसेना झिंदाबाद’, अशा घोषणांनी तेव्हा मैदान तेव्हा दणाणून गेले होते. त्यानंतर सातत्याने दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर आपले विचार मांडले आणि भूमिकाही स्पष्ट केली. बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी दरवर्षी शिवसैनिकांचे थवेच्या थवे शिवतीर्थावर लोटत असत. या सभांमधील विचारांनी प्रभावित होऊन हजारो शिवसैनिक तयार झाले आणि पुढे राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सत्ताही आली. असो.
भाषण थांबवून शिवरायांना वंदन, भर मंचावर मराठा आरक्षणाची शपथ
— ABP माझा (@abpmajhatv) October 24, 2023
#eknathshinde #marathareservation #abpmajha pic.twitter.com/Rk8IBMDuYq
मराठा आरक्षणावरून जाती जातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न काही पक्ष करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात केला. वास्तविक मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण त्यांना ज्यूस पाजून समाप्त करताना, महिन्याभरात आरक्षण देतो असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी विदर्भात ओबीसी नेते मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमकपणे बोलू लागले. तेथेही ओबीसींचे उपोषण सुरू झाले आणि कुठल्याही परिस्थितीत तुमच्या वाट्याचे आरक्षण काढून ते मराठ्यांना दिले जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ओबीसींना कोण उचकवत होते व आहे हे स्पष्ट आहे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपणच लावून द्यायचा आणि पुन्हा उलट्या बोंबा मारून विरोधकांवर आरोप करायचे, हेच सध्या सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाऊन नतमस्तक होऊन ‘मी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देईन’ असे आश्वासन शिंदे यांनी दिले. परंतु हे आश्वासन देणे त्यांच्या अधिकारकक्षेत्रातच येत नाही. म्हणजे असे की, ५०%च्या पुढे आरक्षण जाऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यासाठी जशी आर्थिक आरक्षणासाठी ही मर्यादा ओलांडण्यात आली, त्याचप्रमाणे नवा कायदा करून ५० टक्क्यांच्या वर्षी आरक्षण देणे, हे केंद्र सरकारच करू शकते. शिंदे हे फक्त केंद्राला विनंती करू शकतात. जर नरेंद्र मोदी सरकारने हे केले, तर त्रिशूल सरकारला लोकसभा आणि विधानसभेत त्याचा खूप मोठा फायदा मिळेल.
रक्ताचे नाते सांगणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गळा घोटला आहे, असा आरोप शिंदे यांनी केला.
रक्ताचे नाते सांगणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गळा घोटला आहे. त्यांची बांधीलकी फक्त पैशाशी आहे, असा आरोप शिंदे यांनी केला. वास्तविक शिंदे यांनी आपल्या सत्ता काळात मुख्यतः नगरविकासमंत्री म्हणून समृद्धी कशी आणली, त्यासाठी आपल्या पसंतीच्या अधिकाऱ्यांचीच नेमणूक विविध महानगरपालिकांवर आणि प्राधिकरणांवर व्हावी यासाठी आग्रह कसा धरला, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या काही बदल्यांना विरोध कसा केला, याची माहिती सर्वांना आहे.
ईडीचे शिंदेंच्याही सुख-समृद्धीकडे लक्ष गेल्यामुळेच त्यांना अचानक बाळासाहेबांचे हिंदुत्व आठवले आणि ते भाजपकडे पळाले...
चिन्ह आमच्याकडे आल्यानंतर उद्धवजींनी बँकेकडे ५० कोटी रुपये जे ठेव म्हणून होते, ते मागितले आणि आम्ही ते दिले. म्हणजेच आम्हाला पैशाचा मोह नाही, तो त्यांना आहे, अशी मांडणी शिंदे यांनी सभेत केली. आमदार-खासदार यांच्या बहुमताद्वारे निवडणूक आयोगाने काहीही निर्णय घेतला असला, तरी पक्ष संघटना उद्धवजींकडे आहे आणि म्हणून पक्षाच्या खात्यातील निधी उद्धवजींच्या शिवसेनेला मिळायलाच हवा. त्यामुळे आपण आधुनिक कर्णाचा अवतार आहोत, असे शिंदेंनी मानायचे कारण नाही. त्या पैशावर उद्धवजींच्या शिवसेनेचाच अधिकार होता. उद्धवना मुख्यमंत्री कसे व्हायचे होते याबद्दलचे आरोप करताना शिंदेंना गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांची साक्ष काढली. उंदराला मांजराची साक्ष अशावी, तशातलाच हा प्रकार.
वास्तविक शरद पवार यांच्या आग्रहामुळेच उद्धवजी मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांना सत्तेचा मोह होता आणि मी मात्र निर्मोही आहे, असा बोगस दावा शिंदे यांनी केला आहे. आम्ही उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडलो, सत्तेला लाथ मारली, असे उद्गार एकनाथ शिंदे वारंवार काढत असतात. परंतु दुसऱ्या बाजूला महाशक्ती असल्यामुळे आपली सत्ता येणार, हे शिंदेंना माहीत असल्यामुळेच त्यांनी सत्तेला लाथ मारली. खरे तर, उद्धव ठाकरे यांच्याशी केलेली शुद्ध दगाबाजी होती. उद्धवजींनी त्यांना प्रचंड सत्ता आणि अधिकार दिले. त्या सत्तेच्या माध्यमातून अमर्याद समृद्धी मिळवून, त्या आधारे ५० जणांचा पाठिंबा मिळवूनच शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सत्ता मिळवली. उद्धवजींनी हिंदुत्वाशी बेईमानी केली, हे शिंदे यांचे पालुपद सुरूच आहे. काँग्रेसशी त्यांनी दोस्ती केली, याचा अर्थ राष्ट्रद्रोह केला, असे चित्र ते निर्माण करत आहेत. काँग्रेसला देश नष्ट करायचा आहे, असे मध्यंतरी मोदी म्हणाले. ज्या पक्षाच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलन झाले, त्या काँग्रेसला देशद्रोही म्हणण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे. शिंदे हे संपूर्णपणे भाजपची भाषा बोलत आहेत. शिंदेसेना भाजपची मांडलिक झालेली आहे.
उद्धव ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र .. #UddhavThackeray #BJP #DasaraMelava #MTCard pic.twitter.com/SK3A0ONMSa
— Mumbai Tak (@mumbaitak) October 24, 2023
उलट शिवाजी पार्कवरील मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी, 'क्रांतिकारकांनी बलिदान देऊन स्वतंत्र केलेल्या भारतमातेची लोकशाही टिकणार की नाही?' असा सवाल उपस्थित केला. भाजप किंवा जनसंघाचा कुठल्याही लढ्याशी संबंध नव्हता. स्वातंत्र्यलढ्यात ते नव्हते. मराठवाडा मुक्ती संग्रामात त्यांचे नाव ऐकले नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते इथे नव्हते. संयुक्त महाराष्ट्र समितीत ते आले, पण आयते अन्न शिजतेय, चला हात मारू, म्हणून आले. सगळ्यात शेवटी आले आणि सर्वात आधी बाहेर पडले. जागा वाटपाचे भांडण त्यांनी त्यावेळी केले होते. हा विघ्नोसंतोषीपणाच होता. जनता पक्षातही त्यांनी दुहेरी निष्ठा ठेवली. जिथे जाते, तिथे ही अवलाद सत्यानाश करते, असा थेट भाजपवर हल्लाबोल केला. दुसऱ्याची घरे पेटवून त्यावर आमची पोळी भाजतो, हेच भाजपचे धोरण आहे, असे टीकेचे प्रहार केले. धारावीचे कंत्राट अदानींना देण्यात आले असून, यातून मिळणारा दीडशे एफएसआय दक्षिण मुंबईत वापरण्याचा डाव आहे. अदानींवर हल्ला करण्याची हिम्मत उद्धवजींनी दाखवली आणि धारावीवरून रस्त्यावर उतरण्याची भाषाही केली. पी.एम केअर फंडाचीही चौकशी करा, असेही ते म्हणाले. सरकारच्या बेजबाबदारपणामुळे पुलवामा हल्ल्यात ४० जवान शहीद झाले याकडेही उद्धवजींनी लक्ष वेधले लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात मी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असल्याचे सांगणारे मोदींचा उल्लेख उद्धवजींनी उपहासाने केला.
राक्षसी बहुमत असलेले मोदी यांच्यासारखे सरकार हे हिटलरशाही आणते, याकडे उद्धवजींनी बोट दाखवले.
नरसिंह राव किंवा मनमोहन सिंग सरकार ही प्रचंड बहुमत असलेली सरकारी नव्हती. थोडक्यात, राक्षसी बहुमत असलेले मोदी यांच्यासारखे सरकार हे हिटलरशाही आणते, याकडे उद्धवजींनी बोट दाखवले. ही दोन्हीही काँग्रेस सरकारे होती. एक प्रकारे यापुढे माझी शिवसेना ही कधीही भाजपच्या वाटेने जाणार नाही, आणि सर्वसमावेशकता मांडणाऱ्या काँग्रेससारख्या पक्षांनाच आपले मित्र मानणार, हे उद्धवजींनी अधोरेखित केले आहे. भ्रष्टाचारांना उलटे टांगू, असे म्हणणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्धवजींनी टिंगल केली. कारण अनेक भ्रष्टाचाऱ्यांनाच त्यांनी महाराष्ट्र व अन्य ठिकाणी आपल्या सरकारात सामील करून घेतले आहे. उद्धवजींना काँग्रेसी ठरवून हिंदुत्वाची मतपेढी भाजपसह आपल्याकडे घ्यायची, हे शिंदे यांचे धोरण आहे. प्रत्यक्षात शिंदे सेनेतील अनेक नेते हे कमालीचे भ्रष्ट असून, हिंदुत्वाशी त्यांचा काहीही संबंध नाही.
दुसरीकडे, उद्धवजींना हिंदुत्व न सोडता हिंदुत्वाची नवी व्याख्या करायची आहे. द्वेषाधारित हिंदुत्व त्यांना मान्य नाही. त्यांचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे नाही. मनुस्मृतिवादी नाही. त्यांना प्रबोधनकारी हिंदुत्व अभिप्रेत आहे. काँग्रेसची दोस्ती म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे बिलकुल नव्हे. भाजपचे संकुचित, कपटी आणि स्वार्थी हिंदुत्व मला नको आहे. मी सर्व जाती-धर्माच्या माणसांना जवळ करू पाहतो आहे, हाच संदेश उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पुन्हा एकदा दिला. महाराष्ट्राच्या अस्मितेचे राजकारण मी करणार. एकनाथ शिंदे अथवा अजितदादा पवार यांच्यासारखे लोटांगणवादी राजकारण करणार नाही, हेच उद्धवजी लोकांना सांगू पाहत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल.