Opinion

महायुतीचे महाभ्रष्ट (?) सरकार

मीडिया लाईन सदर

Credit : Indie Journal

 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे मिळून बनलेले महाविकास आघाडी सरकार हे महावसुली सरकार आहे, असा आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पालखी सदैव उचलणारी भोई हे करत होते. परंतु आज त्या सरकारमधील एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे नेते आणि त्यांचे सहकारी महायुती सरकारमध्ये आहेत. म्हणजे 'महावसुली' सरकारमधील दोन प्रमुख नेते महायुती सरकारमध्ये आहेत. या सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत, तर या सरकारच्या तिजोरीच्या चाव्या या अजितदादा यांच्याकडे आहेत. ही तिजोरी वाटेल तशी लुटण्याचे प्लॅन्स आखण्यात आलेले दिसतात. सरकारच्या डोक्यावर वाटेल तेवढे कर्ज असले तरी आपले काय जाते, अशी एकूण वृत्ती आहे. त्यामुळे अतिरिक्त अर्थसंकल्प मंजूर होताच अल्पावधीतच ९५ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात आल्या. त्या ताबडतोब मंजूर करण्याची घाई अजितदादांना झाली होती. केंद्र आणि राज्यांच्या विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी शिंदे सरकारने ५० हजार युवकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे केवळ प्रसिद्धीचे ढोल वाजवण्यासाठी करोडो रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मुळात या सरकारने असे काय तीर मारले आहेत? असो.

सुरत, गुवाहाटीमार्गे गोव्याला आलेले आणि नंतर मुंबईत येणार असलेले जे लोक आहेत, त्यामध्ये कोकणातील एक सद्गृहस्थ आहेत. 'उद्धवजींबद्दल फार वाईट वाटते,' असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले होते. आपल्या नेत्याशी गद्दारी करूनदेखील, घटनेची सखोल वैचारिक मीमांसा करायची आणि ज्याला नाइलाजाने(!) देश, धर्म आणि हिंदुत्ववादासाठी दगा दिला, त्याच्याबद्दल अपार सहानुभूती कशी व्यक्त करायची, याचा कित्ता कोकणच्या या वैचारिक 'दीप'काने घालून दिला आहे. राडेबाजी करणाऱ्यांपेक्षा, कोकणदीपाच्या या सुसंस्कृत आणि संस्कारी  राजकारणाबद्दल, आपण सर्वांनीच आदरभाव बाळगायला पाहिजे. या पक्षातून त्या पक्षात आणि तिथून आणखी कोणा 'सुसंस्कृत" मंडळींच्या जवळ जाणारा अनुभवसमृद्ध असा हा थोर, द्रष्टा विचारवंत म्हणजे महाराष्ट्राचा वैचारिक 'दीप'स्तंभच आहे. त्याला सलाम!

प्रधानसेवकाने ज्यांचा 'तपस्वी' व 'महापुरूष' म्हणून गौरव केला, ते सांगलीचे गुरूजी वदले होते- 'वारी होत नसल्याने कोरोना वाढतोय, तेव्हा वारीला परवानगी द्या!' स्वातंत्र्याला दळभद्री म्हणणाऱ्या, स्त्रियांना गुलामीत ठेवू पाहणार्‍या या 'आंबे'वाल्या गुर्जीचं करायचं काय? तरीही पुण्यातील सदाशिव-नारायण, ठाणे-डोंबिवली, विलेपार्ले पूर्व वगैरेंचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने गुर्जी हे वंदनीय आहेत. 

 

या कुटे यांनीच देवेंद्रजींचे वर्णन 'त्यागमूर्ती' या शब्दात केले होत.

 

हिंदुत्वाच्या एकमेव ध्येयाने प्रेरित झालेले, सत्तेची मुळीच लालसा नसलेले, नि:स्वार्थपरायण आणि राष्ट्रभक्त नेते २०२२च्या मध्यास गोव्याहून मुंबईला येत होते. संजय कुटे हा देवेंद्रजींचा हनुमान या मंडळींच्या सेवेस हजर होता. या कुटे यांनीच देवेंद्रजींचे वर्णन 'त्यागमूर्ती' या शब्दात केले होत. हिंदुत्वाचे नवे आयकॉन अडवाणी नव्हेत, तर ठेक्यांचा प्रसाद मिळवणारे 'लाड'-वाणी (भौंच्या भोवती गोड बोलत पिंगा घालणारे) बरें! जो वर्ग आज देवेंद्रजींच्या 'बुद्धिचातुर्या'चे कौतुक करत आहे, तोच वर्ग काँग्रेसच्या पक्षफोडू वृत्तीमुळे, आयाराम गयाराम संस्कृतीमुळे आणि भजनलाल प्रयोगामुळे राजकारणाचे कसे घोर अध:पतन झाले आहे, म्हणून ठाण्यातील तलाव पाळीवर, मुंबईत शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर किंवा पुण्यात रूपाली अथवा वैशालीत बसून वर्षोनुवर्षे चिंता व्यक्त करत असे! त्यांनी केले तर 'बदमाषी', यांनी केले तर 'चतुर चाणक्यनीती', या काळ्या टोपीखाली दडलंय काय?

६ जुलै रोजी ‘षण्मुखानंद’ हॉलमध्ये दादा, शिंदे हे भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत होते. मंचावर राणे, भुजबळ, अडसूळ इ. महास्वच्छ नेतेही हजर होतो! तेव्हा महायुतीचे कॅरेक्टर कसे आहे, ते लक्षात घ्या! हे लोकच फेक नॅरेटिव्ह तयार करत असतात. पीक विमा देण्यात महाराष्ट्र नंबर वन, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हवाला देऊन फडणवीस म्हणाले. परंतु ही आकडेवारी २०१८-१९ ते २०२२-२३ अशी मिळून असल्याची माहिती मी काढली आहे. म्हणजे हे श्रेय महाविकास आघाडीचे देखील आहे! आता अप्रत्यक्षपणे फेक नॅरेटिव्ह कोण तयार करत आहे? आम्ही विकास करतो, दुसरे लोक करत नाहीत, हेच यांचे फेक नॅरेटिव्ह! 

दोन वर्षांपूर्वी शिंदे गद्दारी करून मुख्यमंत्री झाले, तेव्हा 'एकनाथराव, तुम्ही कानात सांगितले असते, तर तुम्हाला उद्धवजींना सांगून सीएम केले असते', असे अजितदादा म्हणाले होते. त्यानंतर वर्षभरात दादाच महायुतीत सामील झाले!

म्हणजे बघा. 'वसुली', 'भ्रष्टाचार', 'घोटाळे' हे शब्द ज्यांनी आयुष्यात ऐकलेदेखील नाहीत, त्या कृपाशंकर सिंह यांच्यावरही भाजपची कृपा झाली. त्यांना लोकसभेचे तिकीटही मिळाले. पण उत्तर प्रदेशातील जौनपूरवासीयांनी त्याना निवडणुकीत आडवे केले. आता पुन्हा  हे महाशय महाराष्ट्रावर कृपा करण्यास आले नाहीत, म्हणजे मिळवली. या सज्जन पुरुषाच्या कोकणात अनेक जमिनी आहेत, असे म्हणतात. कृपाशंकर यांचा प्रवेश एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नव्हे, तर तो विचारधारेचा प्रवास आहे, असा जागतिक दर्जाचा शोध देवेंद्रभौंनी लावला आहे. 

 

काँग्रेसच्या 'अशोक'वनात असताना, ते सेक्युलॅरिझमवर प्रवचने देत असत.

 

अशोक चव्हाण यांचे काँग्रेसमधील कट्टर समर्थक अब्दुल सत्तार यांनी पक्षाचे वाईट दिवस येताच काँग्रेस पक्ष सोडला. काँग्रेसच्या 'अशोक'वनात असताना, ते सेक्युलॅरिझमवर प्रवचने देत असत. नंतर सत्तारभाईंनी भाजपत जाण्याचा विचार केला आणि देवेंद्रजींची भेटही घेतली. परंतु स्थानिक पातळीवर विरोध होताच, 'ही सदिच्छा भेट होती' असा खुलासा त्यांनी केला! त्यानंतर शिवसेनेचे दिवस बरे आहेत असे लक्षात येताच, सत्तारभाईंनी सेनेत प्रवेश केला आणि ते उद्धव स्तवन करू लागले. उद्धवजींचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येताच भाईंनी 'एकनाथी' भारूड गायला सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी ते म्हणाले होते की, 'महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या मतदारसंघाचे काम दोन तासांत करून टाकले'. चार दिवसांपूर्वीच जे मुख्यमंत्री झाले होते , ते तेव्हा सत्तारभाईंच्या हिशोबात लगेच 'लोकप्रिय'ही झाले! दोन आठवड्यांपूर्वी सत्तारभाई म्हणाले की, शिंदेसेनेशी माझा तात्पुरताच करार होता. 

'हे लोकांच्या मनातील सरकार नसून दगाफटका करून निर्माण झालेले सरकार आहे', असे अजितदादा शिंदे-फडणवीस सकारला उद्देशून मुंबईतील वज्रमूठ सभेत म्हणाले होते. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये स्वत: दादाच दगाफटका करून सामील झाले! आणि आता, 'महायुती सरकार हे तीन पक्षांचे त्रिशूल सरकार आहे आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत,' असे दादा सांगू लागले आहेत आणि सिद्धिविनायकाकडे आशीर्वाद मागू लागले आहेत! 

ठाकरे सरकारवर वॉच ठेवण्यासाठी मनसेने मार्च २०२० मध्ये शॅडो कॅबिनेट जाहीर केले होते. 'ठाकरे सरकारने काहीच केले नाही' असे विरोधक अहोरात्र सांगत होते. असो. पण शॅडो कॅबिनेटने कोणते काम केले, हे लोकांपुढे ठेवले गेलच नाही. शिंदे सरकार आल्यावर मात्र शॅडो कॅबिनेटची गरज वाटली नाही. उलट शिंदे-फडणवीस यांच्या छायेत मनसे वावरू लागली. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्य इशाऱ्यानुसार, मनसेच्या हालचाली होत आहेत, असे बोलले जाते. 

 

'ठाकरे सरकारने काहीच केले नाही' असे विरोधक अहोरात्र सांगत होते.

 

दुसरीकडे, पुणे हिट अँड न प्रकरणात अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे यांनी बिल्डरपुत्र वेदान्त अगरवालला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला, असा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर हाच आरोप अजितदादांवरही झाला. वरळी येथे शिवसेना उपनेते राजेश शहा यांचा दिवटा मिहिर शहा याच्याही आलिशान मोटरगाडीने कावेरी नाखवा या महिलेस चिरडले आणि फरपटत नेले. त्यालाही पळून जाण्यासाठी बापानेच मदत केली. वेदान्तप्रमाणेच मिहिरनेदेखील दारू ढोसली होती. रक्ताच्या नमुन्यात दारूचा अंश आढळू नये, यसाठी मिहिरला अटक करण्यास वेळ लावण्यात आला, असा आरोप आहे.

थोडक्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता असल्यामुळेच मिहिरचे संरक्षण करण्याचा प्रयत्न झाला. मिलिंद देवरा यांना जेव्हा शिंदेसेनेत प्रवेश देण्यात आला, त्यावेळी त्यांच्याबरोबर दक्षिण मुंबईतील अनेक व्यापारी व उद्योजकही पक्षात आले. तेव्हा देवरांसमवेत लक्ष्मीही आमच्या पक्षाबरोबर आली आहे, असे उद्गार शिंदे यांनी काढले होते. आता महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे तीन हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. समृद्धी महामार्गाच्या उभारणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. या कामातच मोपलवार यांनी तुफान भ्रष्टाचार केल्याचा आरोप रोहित यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाची आखणी झाली आणि तेव्हा मंत्री या नात्याने शिंदे यांच्याकडे त्याची जबाबदारी होती. महाविकास आघाडीतही शिंदे नगरविकासमंत्री होते आणि तेव्हा समृद्धी प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्यावरच होती. एक अधिकारीच जर समृद्धीमध्ये एवढा हात मारतो, तर भाजप तसेच एकनाथ शिंद हे केवळ विचारांच्या समृद्धीवर समाधानी झाले असतील, असे मानणे हा भाबडेपणा झाला. थोडक्यात, महायुतीचे सरकार हे महाभ्रष्ट आहे.