Opinion
राम का नाम बदनाम न करो...
मीडिया लाईन हे सदर.
अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभारले जात आहे, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. अयोध्येतील रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद अवघ्या देशाने एकत्रितपणे साजरा केला, ही चांगलीच बाब आहे. परंतु या निमित्ताने राजकीय पक्षांनी जाहिरातबाजी, इव्हेंटबाजी करून मोटरसायकल व जीपगाड्यांतून ‘जय श्रीराम’च्या घोषणा ज्या उन्मादाने दिल्या, त्यास नक्कीच आक्षेप घ्यावा लागेल. राजकारण हे जनतेच्या प्रश्नांसाठी करायचे असते. एकप्रकारे ते समाजकारण असते. परंतु राजकारण हे जेव्हा धर्मांधता पसरवण्यासाठी केले जाते, तेव्हा त्यास आक्षेप घ्यावा लागतो.
१९९०च्या दशकात रथयात्रा आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त करणे, हे काम काही राजकीय पक्ष संघटना आणि कारसेवकांमार्फत केले जात होते. परंतु हा धार्मिक उन्माद आता मुख्य प्रवाहात आला आहे. चॅनेलवाल्यांच्याही अंगात आले असून, या उन्मादात भर घालण्याचे कामच ते करत आहेत. ज्या प्रसारमाध्यमांनी लोकांना भानावर आणायचे, तीच माध्यमे आता बेभान होत चालली आहेत, हे अक्षरशः दुर्दैव आहे.
या विषयाच्या निमित्ताने आठवण झाली, ती महात्मा गांधीजींची. रामनामाविषयी गांधीजींच्या विचारांचा एक संग्रह आहे. आचार्य विनोबा भावे यांनी हा संग्रह वाचून ‘सर्वोदय’मध्ये त्यासंबंधीचे प्रकट चिंतन केले. नंतर ‘सेवक’ या मासिकातून त्याविषयी हिंदी लिखाण केले आणि त्याचे एक छोटेखानी पुस्तकही तयार झाले. त्यात विनोबा म्हणतात, ‘राम पवित्र लोकांच्या हृदयात नेहमी असतो. रामनामाला भिऊन वागाल, तर तुम्हाला जगात इतर कोणाला भिण्याची गरज राहणार नाही. ईश्वरावर जर तुमची श्रद्धा असेल, तर कोणाची छाती आहे तुमच्या स्त्रियांच्या आणि मुलींच्या अब्रूला हात लावण्याची? तुम्ही भय सोडून द्याल अशी मला उमेद आहे. जरूर तर शूर पुरुष आणि स्त्रियांप्रमाणे अब्रूचे रक्षण करता करता मृत्यूला कवाटाळले पाहिजे.’ पुढे विनोबा असेही म्हणतात की, तोंडाने ईश्वराचे नाव घ्यायचे आणि हाताने बांधवांची कत्तल करायची, हा क्रम मधल्या काळात इतका चालला, की काही सज्जन ईश्वराच्या नावालाच कंटाळले. मी त्यांना म्हणतो, अशी हार खाऊ नका. जे हृदयात प्रेम राखू इच्छितात, रामनाम त्यांचेच शस्त्र आहे. मनुष्यद्वेष्ट्यांचे शस्त्र नाही. मंदिर पाडून तेथे मशीद उभारण्यात आली, हे निंद्य कृत्यच होते, यात शंका नाही. असो.
सरकारने धार्मिक बाबतीत लक्ष घालू नये, त्याचे बरे-वाईट परिणाम होऊ शकतात, असे नेहरूंना वाटत असणार.
२५ सप्टेबर १९९० रोजी लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ मंदिरापासून आपली रथयात्रा सुरू केली तेव्हा त्यांच्या समवेत नरेंद्र मोदी, प्रमोद महाजन, सिकंदरबख्त, राजमाता विजयाराजे शिंदे प्रभृती उपस्थित होते. या रथयात्रेनंतर आणि पुढे बाबरी मशीद जेव्हा पाडण्यात आली, तेव्हा देशात धार्मिक विद्वेष पसरून दंगली झाल्या आणि त्यात असंख्य निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. जे मृत्युमुखी पडले, त्यात सर्व जातिधर्माचे लोक होते.
सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारास महात्मी गांधी, सरदार पटेल, राजेंद्रप्रसाद प्रभृती काँग्रेस नेत्यांचाच आशीर्वाद होता. पटेल राजाजी आणि कन्हैयालाल मुन्शी यांनी पुढाकार घेऊन सोमनाथ मंदिरातील शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरवले होते. ही प्राणप्रतिष्ठा पटेलांच्या हस्ते होणार होती. परंतु त्यांचे निधन झाल्यावर ही जबाबादारी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यावर टाकण्यात आली. नेहरूंना राष्ट्रपतींनी अशा प्रकारे धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे पसंत नव्हते. परंतु कोणत्याही परिस्थितीत आपण जाणारच. जरूर तर त्यासाठी राष्ट्रपतिपदाचा राजीनामा देऊ, असा पवित्रा राजेंद्रबाबूंनी घेतला. एकदा राष्ट्रपती वा पंतप्रधान अशा कार्यक्रमांना जायला लागले, तर त्याला धरबंध राहणार नाही आणि अन्य धर्मीयांच्याही कार्यक्रमास जावे लागेल. सरकारने धार्मिक बाबतीत लक्ष घालू नये, त्याचे बरे-वाईट परिणाम होऊ शकतात, असे नेहरूंना वाटत असणार. परंतु त्यामुळे भारताच्या विविधतापूर्ण संस्कृतीचा ध्यास व अभ्यास असणाऱ्या नेहरूंना हिंदुविरोधी रंगात रंगवणे हिंदुत्ववाद्यांना सोपे गेले.
२९ सप्टेंबर १९५१ रोजी नेहरूंनी शिक्षणमंत्री संपूर्णानंद यांना ‘नॅशनल हेरॉल्ड’ या वृत्तपत्रातील एक कात्रण पाठवले होते. त्यात म्हटले होते की, ‘इयत्ता आठवीसाठी नेमलेल्या पाठ्यपुस्तकात ‘देव माझ्या मंदिरात राहतो आणि तुझ्या मशिदीत सैतान राहतो,’ अशा अर्थाचे एक हिंदी वाक्य आहे’. नेहरूंनी या संदर्भात म्हटले होते की, अशा तऱ्हेचा मजकूर पाठ्यपुस्तकात असणे गैर होते. ६ सप्टेंबर १९५१ रोजी दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीपुढे भाषण करताना नेहरूंनी म्हटले होते की, लोकांना ‘हिंदुराष्ट्र’ ही संकल्पना ऐकून बरे वाटते. पण त्यामुळे पाकिस्तानही, सर्व जगाला सांगू शकेल की भारतही आमच्यासारखेच धर्माधिष्ठित राष्ट्र आहे. हिंदुराष्ट्र याचा अर्थच असा होतो की, सर्व नवे विचार बाजूला ठेवून जुन्या विचारांची कास धरणे आणि भारताचे विघटन करणे. जे हिंदू नाहीत, त्यांचे स्थान दुय्यम करणे. आमच्या राज्यघटनेनुसार या देशात प्रत्येक नागरिकाला – तो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असला तरी एकसारखेच अधिकार असतील. मात्र ही सर्व तात्त्विक भूमिका योग्य असली, तरीदेखील काँग्रेसला आजच्या वर्तमान काळानुसार, हिंदू धर्माच्या बाबतीत आम्ही असंवेदनशील नाही. आम्ही त्यांच्याही आस्था व श्रद्धेचा आदर करतो, अशा प्रकारचा संदेश देणे आवश्यक बनले आहे.
साने गुरुजींनी ज्या प्रकारे भारतीय संस्कृतीतील आणि हिंदू धर्मातील विविध प्रतीकांचा आणि प्रथांचा यथायोग्य अन्वयार्थ लावला, तशा प्रकारची मांडणी करणे आवश्यक आहे.
साने गुरुजींनी ज्या प्रकारे भारतीय संस्कृतीतील आणि हिंदू धर्मातील विविध प्रतीकांचा आणि प्रथांचा यथायोग्य अन्वयार्थ लावला, तशा प्रकारची मांडणी करणे आवश्यक आहे. आम्हाला हिंदुत्ववाद मान्य नाही, परंतु हिंदू धर्मातील सहिष्णुता, सखोलता आणि सहृदयता यांचा आम्ही आदरच करतो, हे लोकांना सांगितले पाहिजे. पंतप्रधान इंदिरा गांधींनी विश्व हिंदू परिषदेच्या एकात्मता यात्रेला अस्पष्ट स्वरूपात समर्थन दिलेच होते. १ फेब्रुवारी १९८६ रोजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी वादग्रस्त बाबरी मशिदीची दारे रामलल्लाच्या दर्शनासाठी उघडली. अयोध्येचे रूपांतर व्हॅटिकन सिटी पद्धतीने केंद्रशासित प्रदेशात करावे, असा विचार पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी केला होता. तशा वटहुकुमाचा मसुदाही त्यांनी तयार केला होता. अर्थात प्रत्यक्षात तो जारी करण्यात आला नाही, हा भाग वेगळा. १९९१च्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे वचन देण्यात आले होते. १९९२ साली बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर, तेथेच मंदिर उभारण्यासाठी राव यांनी एक ट्रस्टही स्थापन केला होता. १९९५ साली या ट्रस्टची नोंदणीही करण्यात आली होती. परंतु मग अचानकपणे त्यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतरच राम मंदिर उभारू, असे ठरवले. मात्र निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला.
१९८९ साली भाजपने पालमपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राम मंदिर उभारण्यासंबंधीचा ठराव संमत केला. अडवाणींच्या रथयात्रेमुळे हिंदुत्ववादाचा प्रसार झाला आणि वाजपेयी सत्तेवर येऊ शकले. परंतु त्यावेळी जहाल विचाराच्या अडवाणींचे नाव पंतप्रधानपदासाठी आले असते, तर विविध घटक पक्षांचा पाठिंबा मिळाला नसता. आज मात्र भाजपबरोबर असलेले मोजके घटक पक्ष हे स्वतःची कोणतीही भूमिका नसलेले आहेत. भाजपचे लांगुलचालन करणे, एवढी एकच त्यांची विचारसरणी आहे... धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेची टिंगल करायची, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वरपांगी आदर दाखवून प्रत्यक्षात मात्र संविधानातील मूल्यांचा अपमान करायचा, राजघाटावर जाऊन नतमस्तक व्हायचे आणि गांधीजींच्या द्वेषविरहित रामराज्याच्या संकल्पनेच्या विपरीत वागायचे, असे सर्व सुरू आहे.
काँग्रेसने एक पक्ष म्हणून राम मंदिरासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केलीच नाही.
तर दुसरीकडे, २२ जानेवारीच्या अयोध्येतील सोहळ्यास जायचे की जायचे नाही, यावर काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद होते. अखेरीस न जाण्याचा निर्णय झाला. काँग्रेस नेते तेथे उपस्थित राहिले असते, तर कदाचित त्यांची हुर्यो उडवण्यास काही प्रवृत्ती पुढे आल्या असत्या. परंतु गैरहजर राहूनही काही फायदा झाला असे दिसत नाही. उलट काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष हे मंदिरविरोधी व हिंदुविरोधी असल्याचे आरोप करण्याची संधीच हिंदुत्ववादयांना मिळाली आहे. मात्र आम्ही अयोध्येस २२ तारखेनंतर जाणार आहोत, असे शरद पवारांप्रमाणे काँग्रेसवाल्यांनाही सांगता आले असते.
उत्तर प्रदेशातील काँग्रेस नेत्यांनी शरयूत स्नान केले. पुण्यातील काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यंनी आपल्या हिंदमाता प्रतिष्ठानतर्फे प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा आपल्या परीने साजरा केला. परंतु काँग्रेसने एक पक्ष म्हणून राम मंदिरासंबंधी आपली भूमिका स्पष्ट केलीच नाही. अयोध्येतील राम मंदिर हे सत्यवचनी व न्यायी रामाप्रमाणेच राष्ट्रीय एकात्मतेचे एक प्रतीक बनावे, अशी भूमिका मांडणे काँग्रेसला शक्य होते. मात्र काँग्रेसमध्ये सध्या बौद्धिक दिवाळखोरी इतकी आहे, की कोणीही सैद्धांतिक मांडणीच करत नाही आणि पक्षाला योग्य दिशा दाखवत नाही. त्यामुळे पक्षातील प्रत्येकजण आपल्याला हव्या त्या पद्धतीने व्यक्त होतो आणि कृती करतो. केवळ भाजप आणि मोदींच्या कृतीवर रिअॅक्ट होण्यापलीकडे काँग्रेस काहीही करत नाही, हे दुर्दैव आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही स्वागतार्ह असली, तरी ते अयोध्येतून निर्माण झालेल्या राजकीय आव्हानास उत्तर होऊ शकत नाही.