Opinion
हिंदुत्वाचे महाराष्ट्रातील ठेकेदार आम्हीच!
मीडिया लाईन सदर
काँग्रेस नेते राहुल गांधी हे परदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. राहुल यांनी परदेशातील अनेक कार्यक्रमात भाषणे दिली, मुलाखती दिल्या आणि ब्रिटिश संसदेतही त्यांनी आपल्या शैलीत ठामपणे मांडणी केली तसेच भारतातील लोकशाहीबद्दल चिंता प्रकट केली. परंतु केवळ राहुल यांनीच नव्हे, तर खुद्द मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत अगणित वेळा आपल्या विदेश दौऱ्यात काँग्रेस तसेच विरोधकांवर जहरी टीका केली आहे. एवढेच नव्हे, तर २०१४ पूर्वी आपण भारतात कशासाठी जन्मलो, असा पश्चाताप परदेशातील भारतीयांना होत असे, असे उद्गारही त्यांनी काढले होते. ७० वर्षांत काँग्रेसने देशासाठी काहीही केले नाही, उलट देशाला लुटले, असेही ते वारंवार म्हणाले होते.
‘टाइम’ नियतकालिकाने जेव्हा मोदींचा गौरव केला, तेव्हा त्याची भाजपने भरपूर जाहिरात केली. कोरोना काळात भारत आणि जगाला लसींचा पुरवठा केला, त्याचे श्रेय खासगी उत्पादकांचे होते. पण मोदींनी ते स्वतःकडे घेतले. कोरोना काळातील मोदी सरकारच्या तथाकथित कामगिरीबद्दल ज्या परदेशी संस्थानी व नेत्यांनी मोदींची प्रशंसा केली, त्याचे ढोल पिटण्यात आले. परंतु जेव्हा बीबीसीने गुजरात दंगलीवर लघुपट बनवला, तेव्हा त्यावर मात्र सरकारने बंदी घातली. एवढेच नव्हे, तर बीबीसी इंडियावर छापे टाकण्यात आले. जॉर्ज सोरोस या जगद्विख्यात दानशूराने भारतातील लोकशाहीबद्दल काळजी व्यक्त केली, तेव्हा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर अत्यंत आक्रस्ताळ्या शैलीत टीका केली. ट्विटर हे समाजमाध्यम असल्यामुळे त्यावरील एखादे खाते कायमचे किंवा तात्पुरते बंद होण्याची कारवाई कोणीतरी तक्रार केली की मगच होते.
खुद्द मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत अगणित वेळा आपल्या विदेश दौऱ्यात काँग्रेस तसेच विरोधकांवर जहरी टीका केली आहे.
१६ डिसेंबर २०१७ म्हणजे, बांगलादेश विजयदिनानिमित्त केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलेल्या ट्विटवर तक्रार करण्यात आली. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द फोनोग्राफी इंडस्ट्री या जागतिक महासंघाने सोनी म्युझिक एंटरटेनमेंट कंपनी या सदस्य कंपनीच्या वतीने ही तक्रार केली होती. ज्या गाण्यावर त्या अमेरिकी कंपनीचा स्वामित्व हक्क आहे, ते ‘माँ तुझे सलाम’ या गाण्यासह सैनिकांचे व्हिडिओ वापरून, प्रसाद यांनी केलेले ते ट्विट होते. अमेरिकेचा स्वामित्व हक्कभंग विषयक जो कायदा आहे, त्यानुसार ही तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे ट्विटरने प्रसाद यांचे खाते तात्पुरते गोठवले. प्रसाद यांनी नियमभंग करणारे ते ट्विट मागे घेतल्यानंतर ती कारवाई लगेच मागेही घेण्यात आली. परंतु ही कारवाई करताच प्रसाद यांनी आपली तीव्र नाराजी प्रकट केली. आम्ही सर्वच समाजमाध्यम कंपन्यांना भारतीय कायदा पाळायला लावू, असा दमही त्यांनी दिला.
खरे तर अमेरिकी कायद्याअंतर्गत झालेल्या तक्रारीनुसार काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यावरही अशीच कारवाई झाली होती. तेव्हा थरूर यांनी त्याबद्दल एक शब्दही काढला नव्हता. कारण आपली चूक त्यांना मान्य असावी. परंतु आपण दूरसंचार कायदा आणि माहिती तंत्रज्ञान या खात्याचे केंद्रीय मंत्री असूनही, आपला अपमान झाला म्हणून प्रसाद यांनी अकांडतांडव केले. आपल्यावर टीका करणारे, कारवाई करणारे किंवा आपल्या विरोधात असलेले लोक किंवा पक्ष हे शत्रू आहेत असे समजून, मोदी पर्वात शत्रुभावी राजकारण केले जात आहे. हेच राजकारण महाराष्ट्रातही होत असून, विरोधकांमधील काहींनी बराच त्रास दिला असला, तरी त्यांना आधीच माफ केले आहे. कोणतीही कटुता उरलेली नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी धुळवडीच्या दिवशी दिली. परंतु फडणवीस यांनी मोदींचा पॅटर्न राबवला असून, यापूर्वी जेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षावर बदला घेतला असे म्हटले, तेव्हा त्याचे असे कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नव्हते. राज ठाकरे यांनीही पूर्वी मोदी आणि फडणवीसांवर कडाडून टीका केली होती परंतु त्यांनी आपली भूमिका बदलताच फडणवीस आणि त्यांच्या मैत्रीचे पर्व सुरू झाले...मग फडणवीस त्यांच्याकडे भोजनासाठीही गेले होते. उद्धवजींनी जर भाजप समोर लोटांगण घातले असते, तर त्यांचाही बदला घेण्यात आला नसता. परंतु उद्धवजींनी स्वाभिमानी राजकारण करण्याचा निर्धार केला असून देशातील लोकशाही वाचवण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना मोदी किंवा फडणवीस कधीही माफ करतील अशी शक्यता नाही. म्हणूनच विरोधी पक्षातील काही नेते वर्षभर शिमगा करीत असतात. या नेत्यांनी सभ्यपणाने राहावे, असा दम देण्यासही फडणवीस विसरलेले नाहीत.
शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही, असे उद्धवज सातत्याने सांगत आहेत.
भाजपशी काडीमोड घेतल्यामुळे विरोधी पक्षांनी हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली आहे, असा आरोप मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप पक्षाध्यक्ष अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यापासून ते फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत सर्वजण करत असतात. उलट शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही, असे उद्धवजी सातत्याने सांगत आहेत. गंमत अशी की, महाविकास आघाडीत गेल्यामुळे केवळ उद्धवजींच्या शिवसेनेने नाईलाजाने आपले धोरण बदललेले नाही, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही बदलले, हे लक्षात घेतली पाहिजे अगोदर शिवसेनेबरोबर जाण्यास काँग्रेसही तयार नव्हती. परंतु परिस्थितीच अशी निर्माण झाली की, या तीन पक्षांना एकत्र यावे लागले. मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येस भेट देऊन राम मंदिराच्या नवनिर्माणास आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट संकेत दिले. म्हणजेच आपण हिंदुत्ववादीच होतो आहोत व राहू, असेच ते सांगू पाहत होते.
उद्धवजींच्या अयोध्या भेटीस काँग्रेस-राष्ट्रवादीने तेव्हा विरोध केला नव्हता, ते लक्षात घेतले पाहिजे. लोकसभेत सीएए किंवा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या बाजूने शिवसेना आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. परंतु याबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आणि शरद पवारांनीही वैचारिक मार्गदर्शन केल्यानंतर शिवसेनेने राज्यसभेत आपली भूमिका बदलली. पण एवढे होऊनसुद्धा सीएएला आमचे समर्थन असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते, तेव्हा दोन्ही काँग्रेसने तोंडातून एक शब्दही काढला नव्हता. एनपीआर किंवा राष्ट्रीय लोकसंख्या सूचीस अर्थातच काँग्रेस व राष्ट्रवादीचा टोकाचा विरोध होता. मग शिवसेनेने एनपीआरबाबत आपली समर्थनाची भूमिका थोडी सौम्य केली. महाविकास आघाडी सरकार याबाबत सहा मंत्र्यांचा एक अभ्यास गट स्थापन करेल, असे उद्धवजींनी जाहीर केले. म्हणजे या मुद्द्यावरून आघाडीतील तणाव वाढू नये, अशी दक्षता घेतली.
उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष मवाळ आणि जाती व धर्मनिरपेक्ष बनवला असून, हाणामाऱ्यांचे राजकारण त्यांना पसंत नाही, ही अतिशय चांगली अतिशय चांगली गोष्ट आहे. परंतु आपण सेक्युलर बनलो याची जाहिरात केली तर भाजपवाले टपलेले आहेत, हे उद्धवजींना बरोबर माहीत असल्यामुळे ते अतिशय सावधपणे पावले टाकत होते आणि आहेत. ज्या काँग्रेसला भाजप नावे ठेवत असते, त्या काँग्रेसनेदेखील उद्धवजींच्या अयोध्या दौऱ्याचे स्वागतच केले होते शिवाय राम मंदिराचा शिलान्यास करण्यासाठी वादग्रस्त स्थळाचे दरवाजे उघडण्याचे काम राजीव गांधी यांनीच केले होते. नरसिंह राव यांनीही आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत राम मंदिर आंदोलनाबाबत मवाळ भूमिका घेतली होती, हे लक्षात घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्येस गेले, तेव्हा किरीट सोमय्या यांचे लाडके लक्ष्य असलेले असे हसन मुश्रीफ यांनी उद्धवजींचे त्याबद्दल कौतुकही केले होते. तेव्हा गेल्या काही वर्षात राम मंदिराबाबत काँग्रेसनेही आपली राष्ट्रीय स्तरावरील भूमिका बदलली असून, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनीही शिवसेनेला समजावून घेतले पाहिजे, असेच ठरवले आहे. तेव्हा भाजपाला वाटते त्याप्रमाणे हिंदू धर्माची ठेकेदारी त्यांना बहाल करण्यात आलेली नाही. भाजप सोडून इतर सर्व पक्षांचे लोक हिंदूच आहेत. मात्र ते हिंदुत्वाचे विद्वेषी राजकारण करत नाहीत, हा फरक आहे. आपल्याला हिंदुत्वविरोधी ठरवून खिंडीत गाठले जाईल आणि त्याचा निवडणुकीत फटका बसेल, हे लक्षात घेऊन अरविंद केजरीवाल यांनीही हनुमान चालीसाचे राजकारण केले.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षास हिंदुत्वविरोधी ठरवून बाद करायचे. तो पक्ष नष्ट झाला, की नंतर शिंदे यांचा गट भाजपयुक्त करायचा आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरंजामदारी शिलेदारांना व वारसांना जवळ करून, धुलाई यंत्रातून स्वच्छ करायचे, ही भाजपची व्यूहरचना आहे. जवळपास विरोधी पक्षमुक्त महाराष्ट्र झाला, की लोकशाही ही केवळ या अमृतकालानंतरच चिरविश्रांती घेईल...