Opinion

सीताराम येचुरी - एक दिलखुलास कॉम्रेड!

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

२६ डिसेंबर २०२४ रोजी भारतातील कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेस ९९ वर्षे पूर्ण होत असून, तो शंभरीत प्रवेश करणार आहे. रा. स्व. संघाचेही पुढील वर्षी शताब्दी वर्ष आहे. त्या अगोदरच तीन महिने आधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. देशासमोर संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. सध्या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष हे सर्वजण पक्षपाती पद्धतीने वागत आहेत. एवढेच नव्हे, तर निवडणूक आयोग हा भाजपचा बटीक बनला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीच्या आरतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले. त्यामुळे न्यायव्यवस्थेबद्दलचा जो काही आदर होता, त्यालाही तडा गेला आहे. अनेक नेत्यांना महिनोन महिने तुरुंगात ठेवले जाते आणि जामीन दिला जात नाही. महाराष्ट्रात महायुती सरकारने कित्येक महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ दिलेल्या दिलेल्या नाहीत. तेथे नगरसेवक नाहीत, म्हणजे लोकांचे प्रतिनिधी नाहीत. सर्व कारभार राज्य सरकार सांगेल, त्याप्रमाणे महानगरपालिकेचे प्रशासक हाकत आहेत आणि या सर्व महानगरपालिकांचे बजेट एकनाथ शिंदे सरकारच्या हातात आले आहे. एकप्रकारे महानगरपालिकांमध्ये लोकशाही नसून, प्रशासकशाही आहे. संविधानाला धोका निर्माण झाला आहे. त्याची ही ढळढळीत उदाहरणे आहेत. लोकशाही, घटनात्मक मूल्ये, औद्योगिक घराण्याची दादागिरी, विषमता, धर्मांधता, बेरोजगारी, महागाईत भरडून जाणारी गरीब जनता याबद्दल आयुष्यभर आवाज उठवणारे येचुरी, अशा या महत्त्वाच्या काळात आपल्यातून निघून जाणे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

बी. टी. रणदिवे यांच्याप्रमाणेच येचुरी हे अत्यंत निष्ठावान मार्क्सवादी होते. रणदिवे हे कॉलेजातील अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून नावाजलेले होते. परंतु ते कम्युनिस्ट चळवळीत सामील झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राजकारणात डांगे आणि रणदिवे ही नावे अत्यंत महत्त्वाची. डांगे हे समाजकारण, साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान यात, तर रणदिवे हे मार्क्सवादाच्या तात्त्विक चर्चेत अधिक लक्ष घालणारे. कम्युनिस्ट पक्ष एकसंध होता, तेव्हादेखील डांगे यांची लोकप्रियता अधिक होती आणि ती पक्षाबाहेरच्या समाजातही होती. उलट रणदिवे हे जहाल गटाचे नेते म्हणून नावाजले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे नेहरू सरकार भारतात आले, ते भांडवलवादी असून, लोकांनी बंड करून ते उलथून टाकले पाहिजे, असा विचार आणि कार्यक्रम तेव्हा कम्युनिस्ट पक्षाने स्वीकारला होता. ती लाईन मुख्यतः रणदिवे यांची होती. परंतु केवळ रशियाचा अनुनय न करता भारताच्या संदर्भात राजकारण केले पाहिजे, हा विषय बळावला आणि रणदिवे यांचे राजकारण मागे पडत गेले. अजय घोष प्रभृती नेते अधिक पुढे आले. रणदिवे यांनी चिनी आक्रमणाच्या वेळी चीनची बाजू घेऊन घोडचूक केली. या व अन्य कारणांमुळे कम्युनिस्ट पक्ष फुटला आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली.

 

सीताराम येचुरी यांच्या व्यक्तिमत्त्वात पोथीनिष्ठा नव्हती व बंदिस्तपणाही नव्हता.

 

रशियापेक्षा माओ आणि चीन यांना मानणारा हा माकप होता. गोर्बाचोव्ह यांनी ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरिस्त्रोइका’ आणले, तेव्हा ही धोरणे मार्क्सवादाच्या विरोधातील आहेत, अशी भूमिका नंबूद्रीपाद यांनी घेतली. त्यानंतर चीनमधील तियानानमेन चौकात जे तरुणांचे शिरकाण करण्यात आले, त्याचे समर्थन त्याकाळच्या भारतीय मार्क्सवाद्यांनी केले होते. शीतयुद्ध समाप्त झाले, जागतिक पातळीवर लिबरल विचारांची लाट आली आणि त्यांची खोलवर चिकित्सा करण्याची गरज होती. परंतु ते टाळण्यात आले.

सीताराम येचुरी यांच्या व्यक्तिमत्त्वात पोथीनिष्ठा नव्हती व बंदिस्तपणाही नव्हता. म्हणूनच काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला पाठिंबा देण्यासाठी माकपचे सरचिटणीस हरकिशनसिंह सुरजीत यांनी पुढाकार घेतला, तेव्हा त्यास येचुरी यांचे समर्थन होते. येचुरी हे डाव्यांमधील लिबरल होतेच, परंतु त्यांनी आणीबाणीलादेखील प्रखर विरोध केला. अवघ्या तिशीत पक्षाच्या मध्यवर्ती समितीत नियुक्ती होणे, हे सोपे काम नव्हे. मात्र १९९६ साली ज्योती बसू यांना संयुक्त आघाडी सरकारचे पंतप्रधानपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली, तेव्हा त्यास विरोध करण्यात करात यांच्याप्रमाणे येचुरीदेखील होते. खुद्द केवळ ज्योती बसूच नव्हे, तर इतर अनेक विचारवंतांनी माकपची ही घोडचूक असल्याचे म्हटले होते. येचुरींचे मित्र सर्व पक्षांमध्ये होते आणि आपल्याच कोशात राहणे, हा त्यांचा स्वभाव नव्हता.

ते नवी दिल्ली येथील प्रख्यात सेंट स्टीफन कॉलेजचे अर्थशास्त्राचे विद्यार्थी. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण त्यांनी जेएनयूमध्ये घेतले आणि १९७४ पासून जेएनयूमध्ये असतानाच ते ‘एसएफआय’चे काम करू लागले. आणीबाणीत ते भूमिगत राहिले आणि नंतर त्यांना अटक झाली. जेएनयूत असताना, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विरोधात त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा घेऊन जाणाऱ्या येचुरी यांचा वर्तमानपत्रातला फोटो अजूनही आठवतो... आणीबाणी उठवली गेल्यानंतर, लोकसभा निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. म्हणून आता तुम्ही जेएनयूच्या चॅन्सेलरपदाचा राजीनामा द्या, अशी मागणी करण्यासाठी हा मोर्चा निघाला होता. जेएनयूमध्ये प्रकाश करातही होते. परंतु दोघांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये फरक होता.

 

अणुकरारावरून यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला, तरीदेखील काँग्रेसशी सहकार्य करत राहावे, अशी येचुरी यांची भूमिका होती.

 

माकपमध्ये असताना नंबूद्रीपाद, बसवपुनय्या आणि सुरजीत यांच्या समवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. पक्षाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख म्हणूनदेखील त्यांनी काम केले होते. परराष्ट्र धोरण असो अथवा अर्थकारण, याविषयी येचुरींचे भाष्य उल्लेखनीय असे. वर्तमानपत्रांतील त्यांचे लेखन वाचणे ही वैचारिक मेजवानी असे. त्याचप्रमाणे गोदी मीडियापूर्व काळात त्यांची टेलिव्हिजनवरील डिबेट्स ऐकणे हा आनंद होता.

१९९६ साली काँग्रेसला लोकसभेत बहुमत मिळाले नाही, तेव्हा संयुक्त आघाडी सरकारचा प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग साकारण्यात सुरजीत यांना येचुरी यांची मोठीच मदत झाली. त्यावेळी तामिळ मनिला काँग्रेसमध्ये असलेले पी. चिदंबरम यांच्या समवेत येचुरी यांनी किमान समान कार्यक्रम तयार केला होता. गोरगरिबांच्या कल्याणाचा विचार करणारा हा कार्यक्रम होता. देवेगौडा सरकार कोसळल्यावर मार्क्सवादी प्रभावाखालील इंदरकुमार गुजराल यांना पंतप्रधान बनवण्यात इतरांप्रमाणे येचुरी यांचाही खारीचा वाटा होता. मनमोहन सिंग सरकारला डाव्या आघाडीने बाहेरून पाठिंबा दिला, तेव्हाही किमान समान कार्यक्रमाचा आग्रह करात-येचुरी यांनी धरला होता. काँग्रेस व भाजपला समान अंतरावर ठेवण्याची माकपची भूमिका बदलण्याची गरज आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसशी सहकार्य केले पाहिजे, अशी येचुरी यांची भूमिका होती. अमेरिकेबरोबरच्या अणुकरारावरून डाव्यांनी यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला, तरीदेखील काँग्रेसशी सहकार्य करत राहावे, अशी येचुरी यांची भूमिका होती.

२०२३ मध्ये इंडिया आघाडीची मोट बांधण्यात येचुरी यांचा लक्षणीय सहभाग होता. मात्र करात यांच्या नेतृत्वाखालील माकपच्या केरळ शाखेचा काँग्रेसला विरोध राहिला. तर पश्चिम बंगालमधील माकपने येचुरी यांची ही लाईन उचलून धरली होती. २००५ ते २०१५ या काळातील करात यांची टर्म संपल्यानंतर येचुरी पक्षाचे सरचिटणीस बनले. मात्र येचुरी यांच्या काळात प. बंगालमध्ये पक्षाची आणखी दारुण अवस्था झाली आणि त्रिपुरातील सत्ताही माकपच्या हातात राहिली नाही. अर्थात यास संपूर्ण पक्षसंघटनेसच जबाबदार धरावे लागेल. येचुरी पक्षात सर्वोच्च पदावर असूनही, २०१७ साली त्यांना राज्यसभेची आणखी एक टर्म देण्यास पक्षाने विरोध दर्शवला होता. कोणालाही दोनच टर्म देण्याचा नियम केरळच्या नेतृत्वाने पुढे केला! येचुरी यांच्यासारख्या संसदीय नैपुण्य सिद्ध केलेल्या नेत्याला आणखी एक तरी टर्म मिळणे आवश्यक होते. बंदिस्तपणाची हीच ती चौकट...

 

भारतापुढील खरे संकट हे रा. स्व. संघाचेच आहे, याची पूर्वीपासून जाणीव असलेला नेता म्हणजे सीताराम येचुरी.

 

मागील लोकसभा निवडणुकीत प. बंगालमध्ये काँग्रेसशी युती करू नये, अशी करात यांची सूचना पक्षाने स्वीकारली आणि एकप्रकारे येचुरी यांच्या धोरणाचा पराभवच झाला. २०१४ मध्ये माकपच्या लोकसभेत ९ जागा होत्या. ते संख्याबळ २०१९ मध्ये तीनवर आले. आजही लोकसभेतील माकपची ताकद कमीच आहे. भारतापुढील खरे संकट हे रा. स्व. संघाचेच आहे, याची पूर्वीपासून जाणीव असलेला नेता म्हणजे सीताराम येचुरी. संघाची देशाला एका साच्यात बसवणारी विचारसरणी अत्यंत धोकादायक आहे आणि म्हणून संघाशी राजकीय व सांस्कृतिक अशा दोन्ही आघाड्यांवर लढाई लढणे आवश्यक असल्याचे येचुरी यांचे स्पष्ट मत होते.

राहुल गांधी यांच्यावर येचुरी यांचा प्रभाव जाणवतो. खरे तर, राहुल हे काँग्रेसमधील कम्युनिस्टच आहेत आणि येचुरी हे कम्युनिस्टांमधील काँगेसी होते, असेही एका अर्थाने म्हणता येईल. एकेकाळी नेहरू हे मार्क्सवादाने प्रभावित झाले होते आणि इंदिरा गांधी तर डाव्यांच्या खूप जवळ गेलेल्या होत्या. आज संघ-भाजपच्या विचारांचा पराभव करण्यासाठी वैचारिक बैठक असलेले नेतृत्व हवे आहे. काँग्रेसमध्येही वैचारिक दिवाळखोरी ठिकठिकाणी पाहायला मिळते. म्हणूनच अनेक काँग्रेस नेते हे सबगोलंकारी भाषेत बोलत असतात. कम्युनिस्ट नेते अशा ढोबळ, अजागळ आणि भंपक पद्धतीने कधीच मांडणी करत नाहीत. परंतु अन्य काहींप्रमाणे येचुरी हे विचाराचे पक्के असले, तरी तर्ककर्कश वा तर्ककठोर वाटले नाहीत.

येचुरी यांना तेलुगूप्रमाणेच तामिळ, मल्याळी, बंगाली, उर्दू, हिंदी या भाषाही उत्तम अवगत होत्या. बॅडमिंटन खेळणे ही त्यांची आवड होती आणि हिंदी चित्रपट व त्यांचे संगीत हा त्यांच्या जगण्यातला आनंद होता. मुकेश आणि महम्मद रफीची गाणी त्यांच्या ओठावर असत. ‘दिल का भँवर करे पुकार’ हे गाणे इमारतीचे जिने उतरत असताना ते म्हणत असल्याचा एक व्हिडिओ नुकताच माझ्या पाहण्यात आला. देशात विद्वेषाचे जहर पसरवले जात असतानाच, राहुल गांधींनी ‘मोहब्बत की दुकान’ म्हणणे आणि सदैव प्रसन्न व हसतमुख असणाऱ्या येचुरी यांनी ‘प्यार का राग सुनो’ अशी साद घालणे, याला महत्त्व आहे. सीताराम येचुरी या कृतिशील विचारवंत कॉम्रेडला लाल सलाम!