Opinion

‘बॉम्बे हाऊस’मधले टाटा

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

वृत्तपत्रात काम करत असताना टाटांच्या ‘बॉम्बे हाऊस’ मध्ये जाण्याचा मला अनेकदा योग आला होता. तेथे या समूहाचे आर्थिक सल्लागार डॉ. द. रा. पेंडसे यांनाही भेटायला जात असे. ते अर्थातच संपूर्णपणे उजव्या विचारांचे व भांडवलशाहीचे पुरस्कर्ते होते. याखेरीज, वेगवेगळ्या पत्रकार परिषदा, कार्यक्रम, खास मुलाखती याकरितादेखील ‘बॉम्बे हाऊस’मध्ये जाणे झाले. अनेकदा तेथील जनसंपर्क विभागातील बहुधा लाड नावाचे अधिकारी फोन करत असत. त्यावेळी रूसी मोदी, दरबारी सेठ, नानी पालखीवाला, जे. जे. इराणी यांच्यासारखे लोक वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रमुखपदी होते. मला आठवते, त्यावेळी जे. आर. डी. टाटादेखील येऊन बसत आणि आपल्या समूहाच्या एकूण कामगिरीबद्दल थोडक्यात बोलत आणि देशाच्या आर्थिक धोरणांवर भाष्य करत. जाता जाता ते हसत हसत कोट्याही करत असत. त्यांना व्यक्तिशः भेटायचाही योग आला होता. त्याचप्रमाणे बाकीच्या या बड्या बड्या व्यक्तींनाही. मात्र त्यातही, जेआरडी यांचा मिस्किलपणा आणि त्यांचे देखणे व्यक्तिमत्त्व लक्षात राहिले.

जेआरडी यांनी आम्हा काही आर्थिक संपादकांचा रतन टाटा यांच्याशी परिचय करून दिल्याचे आजही आठवते. त्यावेळी राजीव गांधी पर्व सुरू झाले होते आणि त्याचवेळी संगणक, दूरसंचार, कंझ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांतील उदारीकरणास आरंभ झाला होता. ‘पिंक पेपर्स’नी कम्प्युटरवर स्वतंत्र पानही सुरू केले होते. त्यावेळी टीसीएस किंवा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एफ. सी. कोहली यांनाही काही वेळा भेटलो होतो. देशामध्ये अर्थकारणाबद्दल नवा विचार सुरू होत असतानाच, उद्योग क्षेत्रात नेतृत्वपदी रतन टाटा यांचे आगमन झाले.

राजकारणात राजीव गांधींच्या बरोबर एक नवी पिढी आली. त्याचप्रमाणे रतन टाटांसमवेतही नव्या नेतृत्वाची फळी तयार झाली. ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल समाजात आदरभाव आहे, अशा मोजक्या व्यक्तिमत्त्वांत शंतनुराव किर्लोस्कर आणि जेआरडी टाटा यांचा समावेश होतो. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी कारखान्याचा पाया घातला आणि त्यावर बुलंद इमारत शंतनुरावांनी उभे केली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर, तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने जर्मनी व पश्चिम युरोपला भेट देण्यासाठी भारतीय कारखानदारांचे जे शिष्टमंडळ पाठवले होते, त्यात शंतनुरावांचा समावेश होता. जर्मनी उध्वस्त झालेली त्यांनी पाहिली आणि तिचा कायापालटदेखील. या गोष्टीचा शंतनुरावांवर प्रभाव पडला होता.

 

महाराष्ट्रात व देशात सर्वत्र कारखानदारी विस्तारावी आणि शेती अत्याधुनिक व्हावी, यासाठी शंतनुरावांनी स्वतः प्रयत्न केले.

 

महाराष्ट्रात व देशात सर्वत्र कारखानदारी विस्तारावी आणि शेती अत्याधुनिक व्हावी, यासाठी शंतनुरावांनी स्वतः प्रयत्न केले आणि इतर उद्योजकांनाही त्यासाठी प्रोत्साहन दिले. पुणे परिसरातील कित्येक लघुउद्योजकांना त्यांनी मदत केली होती. कोयना धरणाच्या संदर्भात ज्या परिषदा होत असत, त्यात शंतनुराव आणि शंकरराव किर्लोस्कर हे दोन्ही भाऊ सहभाग घेत असत. कोयनेची वीज पश्चिम महाराष्ट्राच्या कारखानदारीसाठी आवश्यक आहे, हे त्यांनी जाणले होते आणि म्हणूनच या धरणाचा पुरस्कार केला होता. शंतनुरावांनी केवळ स्वतःच्या कंपन्यांचाच नाही, तर राज्याचा आणि देशाचाही विकास व्हावा याची काळजी घेतली. महाराष्ट्रातील प्रामाणिक उद्योगपतींमध्ये शंतनुरावांचा समावेश होतो.

जेआरडींनी टाटा समूहाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा दुसरे महायुद्ध नुकतेच सुरू झाले होते. त्यामुळे नव्या अडचणी उभ्या राहिल्या होत्या. १९३० साली इंग्लंडहून भारतापर्यंत त्यांनी विमान उड्डाण केले होते.  यातूनच पुढे प्रथम कराची ते मुंबई हवाई टपाल सेवा सुरू झाली आणि नंतर एअर इंडिया ही कंपनीदेखील. टाटांची ही कंपनी नंतर सरकारने आपल्या ताब्यात घेतली. मात्र चेअरमनपदी जेआरडींनाच नेमले होते. ते अध्यक्ष होते, तेव्हा एअर इंडियाचा सर्वत्र लौकिक होता. एअर इंडियातील स्वच्छतागृहे कशी आहेत याची ते स्वतः पाहणी करत तसेच हवाई सुंदरींचे कपडे, मेकअप नीटनेटका आहेत का, हेही पाहत. डॉ. मथाई, सुमंत मुळगावकर, रूसी मोदी, नानी पालखीवाला, चोकशी अशा कितीतरी बुद्धिमान व्यक्तींवर त्यांनी कंपनीतील जबाबदाऱ्या सोपवल्या आणि त्यांना स्वातंत्र्य दिले. टीआयएफआरसारख्या संस्था उभ्या केल्या. दुसरे महायुद्ध संपत असताना, काही कारखानदारांनी एकत्र येऊन एक विकासयोजना तयार केली, ती जेआरडींच्या नेतृत्वाखाली. यालाच ‘मुंबई योजना’.

असे म्हणतात जेआरडींचा साधेपणा, निर्मलपणा, सामान्य माणसांबद्दलची आस्था आणि निगर्वी स्वभाव हे सर्व गुण रतन टाटा यांच्यात आले. नारायणमूर्ती आणि सुधा मूर्ती हे जेव्हा मुंबईत नोकरी करत होते, तेव्हा सुधाताईंना घेऊनच घरी जायचे, हा नारायणमूर्तींचा प्रघात होता. एकदा सुधाताई त्यांची प्रतीक्षा करत रस्त्यावर उभ्या असताना, जेआरडींनी त्यांना पाहिले आणि विचारले की, इथे कशासाठी उभी आहेस? तेव्हा पती नारायणमूर्तींची वाट पाहत आहे, असे त्यांनी सांगितले. थोड्या वेळातच मूर्ती तेथे आले, तेव्हा पत्नीला अशा प्रकारे ठेवून तिष्ठत ठेवू नकोस, तिची काळजी घे, ताकीदवजा सूचनाही जीआरडींनी केली... रतनदेखील टाटा मोटर्सच्या कामगारांबरोबर कॅन्टीनमध्ये एकत्र जेवत असत. स्वतःचे ताट स्वतः पुसण्यासरख्या छोट्या छोट्या गोष्टींमधून रतन यांचा साधेपणा डोकावत असे. रतन यांनी शॉप फ्लोअरपासून कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे साधेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग होता. साधेपणाचे प्रदर्शन ते कधी मांडत नसत. आपल्या संपत्तीतील ६० टक्के वाटा ते सामाजिक कार्यासाठी देत असत.

 

रतन टाटा जेव्हा टाटा समूहाच्या प्रमुखपदी आले, तेव्हाच उदारीकरणाचा अध्याय मनमोहन सिंग यांनी सुरू केला होता.

 

रतन टाटा जेव्हा टाटा समूहाच्या प्रमुखपदी आले, तेव्हाच उदारीकरणाचा अध्याय मनमोहन सिंग यांनी सुरू केला होता. आता जागतिकीकरणास तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, हे रतन यांनी जाणले आणि त्याप्रमाणे पावले टाकण्यास सुरुवात केली. टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा टी या कंपन्यांना त्यादृष्टीने त्यांनी तयार केले. जग्वार, लँड रोव्हर्स, कोरस, टेटली या कंपन्या त्यांनी ताब्यात घेतल्या. अर्थात कोरसचा प्रयोग अयशस्वी ठरला. टाटा स्टीलचे माजी व्यवस्थापकीय संचालक जे. जे. इराणी यांनी, ती आपली चूक झाली असे मान्य केले. दूरसंचार क्षेत्रातही फारसे यश मिळाले नाही. टाटांचा नॅनो हा प्रकल्प व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी ठरला नाही. ‘पीपल्स कार’ म्हणून नॅनो प्रसिद्ध असली, तरीदेखील तिचा खप घटत गेला. सायरस मिस्त्री यांची टाटा समूहातून झालेली हकालपट्टी हादेखील वादाचा विषय ठरला.

कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग, सेमिकंडक्टर अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत रतन टाटांनी प्रवेश करण्याचा योग्य निर्णय घेतला. एन. चंद्रशेखरन यांनी मिस्त्रींची जागा अगोदरच घेतली आहे. रतन टाटा यांनी समूहातील ज्येष्ठांना वानप्रस्थाश्रमात पाठवले. समूहातील कंपन्यांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. मिठापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत विविध क्षेत्रांत समूह कार्यरत असणे गरजेचे आहे. परंतु तरीदेखील समूहाचे म्हणून एकसंध धोरण असणे आवश्यक आहे, हे त्यांनी जाणले. सर्व कंपन्यांवर टाटा सन्से होल्डिंग कंपनीचे नियंत्रण असेल, याची दक्षता घेतली. तसेच एक ब्रँड म्हणून टाटांचा दबदबा वाढेल आणि त्याचा आर्थिक फायदा होईल, असे धोरण ठेवले. जे उद्योग-,व्यवसाय भागधारकांच्या दृष्टीने फायद्याचे ठरत नाहीत, ते त्यांनी बंद केले. खते पायाभूत सेवा यासारख्या क्षेत्रांत सरकारी धोरणांवर विसंबावे लागते. अशा व्यवसायांतून अंग काढून घेतले. कमॉडिटीजपेक्षा कन्झ्युमर ब्रँड्स आणि जागतिक निर्यातीततून अधिकाधिक उत्पन्न मिळावे, अशी नीती अवलंबली. आपल्या प्रामाणिक व्यवहाराने ग्राहक आणि भागधारकांचा विश्वास त्यांनी संपादन केला. कामगारांवर त्यांनी खूप प्रेम केले आणि कामगारांनीही त्यांच्यावर. नवी दिल्लीत जाऊन राजकीय नेत्यांशी संधाने बांधणे आणि फायदे उपटणे, हे त्यांनी केले नाही. अर्थात नीरा राडिया टेप्समधून काही गोष्टी बाहेर आल्या, हे वेगळे. परंतु तोही अपवाद होता.

 

 

आज टीसीएस, टाटा मोटर्स आणि टायटन या मूल्यांकनाच्या दृष्टीने देशातील बड्या तीन कंपन्या आहेत. ‘टीसीएस’ ही भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. तिचा ९५ टक्के महसूल निर्यातीमधून येतो. टाटा मोटर्स ही व्यापारी वाहने बनवणारी अग्रगण्य कंपनी असली, तरी तिच्या विक्रीत प्रवासी कार, एसयूव्हीज आणि लक्झरी व्हेइकल्सचा वाटा मोठा आहे. टायटन ही कंपनी ज्वेलरी, घड्याळे, आयवेअर असे अनेक उत्पादने विकते आणि ती ग्राहकांत लोकप्रिय आहेत. ट्रेंट ही एफएमसीजी क्षेत्रातील बडी कंपनी आहे. व्होल्टास कंपनी होम अप्लायन्सेसमध्ये नाव कमावून आहे. टायटनचे बाजारमूल्य हे टाटा स्टीलच्या दीडपट आहे, हे पारसे कोणालाही माहीत नसेल. तसेच ते टाटा पॉवरच्या दुप्पट आणि टाटा केमिकल्सच्या दसपट इतके आहे. या कंपन्या आज दिमाखात उभेया आहेत, त्या रतन टाटा यांच्या व्यवस्थापकीय कौशल्याच्या बळावर.

पंधरा वर्षांपूर्वी एकदा मी कम्प्युटर घेण्यासाठी मुंबईतील हॉर्निमान सर्कलच्या दुकानात कम्प्युटर बघत असताना, अचानक दुकानात धावपळ सुरू झाली. कारण तिथे रतन टाटा येऊन दाखल झाले होते. मात्र कोणताही बडेजाव नाही, बरोबर कोणीही नाही, साधे कपडे, आपण मालक आहोत आणि दुकानातले कर्मचारी आपले नोकर आहेत, असा भाव नाही. अत्यंत अनौपचारिक शैलीत व हळू आवाजात बोलणे..  त्या काळात कॉर्पोरेट जगत जवळून पाहताना, पोशाखीपणा, कृत्रिमता आणि आंग्लाळलेपण खूप पाहायला मिळे. अनेक उद्योगपती व कंपनी एक्झिक्युटिव्ह्जमध्ये सामान्य गरीब व मध्यमवर्गीय लोकांबद्दल प्रचंड तुच्छताभाव असल्याचे पाहायला मिळत होते. परंतु रतन टाटा यांच्या ‘बॉम्बे हाऊस’मध्ये ही संस्कृती नव्हती. एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे ‘बॉम्बे हाऊस’मधील लिफ्टपाशी उभे राहिलेले किंवा एअरपोर्टवरदेखील रांगेत शांतपणे उभे असलेले रतन टाटा मी पाहिले आहेत. उद्योगपतींमधला हा सामान्य माणूस होता. म्हणूनच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोक उत्स्फूर्तपणे जमले होते. अलविदा, रतन टाटा!