Opinion

दहा हजार वर्षांत असा पंतप्रधान झालाच नाही...

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

द्वेषाचे जहर ओकल्यानंतर, आता विश्वपुजारी कन्याकुमारीस जाऊन राष्ट्रीय एकात्मतेसाठी ध्यान-चिंतन करणार आहेत..! या निवडणुकीत इंडिया आघाडी मुस्लिम मतपेढीसाठी मुजरा आणि गुलामी करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मुस्लिम मतपेढीसाठी इंडिया आघाडी मुजरा करत  असेल, तर हिंदू मतपेढीसाठी नागपुरी गँग भरतनाट्यम करते की कथ्थक? शीख मतपेढीसाठी ईश्वरी अवतार आणि त्याचे शिष्य भांगडा नि ख्रिश्चन मतपेढीसाठी ही मंडळी क्लब डान्स करतात का? आणि हो, अवतारी पुरुषास काय म्हणायचंय काय, मतपेढी फक्त मुस्लिमांचीच असते?... कुंभकर्ण आयोग काय करतोय काय? आता तर, तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील न्याय यंत्रणेवर दबाव आणत असून, व्होट जिहादींना उत्तेजन देत आहे, असा थेट आरोप मोदी यांनी केला आहे.

वास्तविक न्यायव्यवस्थेवर आजवर मोदी यांनी सातत्याने दडपण आणले आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. उलट, कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि लगोलग भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली. तामलुक लोकसभा मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. आपल्या प्रचारात न्या. गंगोपाध्याय यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरले. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना एक दिवसाची प्रचारबंदीही केली होती. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना मोदी सरकारने राज्यसभेची खासदारकी बहाल केली. न्या. गोगई यांनी राम मंदिरासंबंधीचा निवाडा केला होता. राफेल प्रकरणही त्यांनीच हाताळले होते. तसेच मोदी सरकारने ३७०वे कलम रद्द केल्यानंतर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी त्याचप्रमाणे कायद्याचा विद्यार्थी मोहम्मद सैयद यांनी जे दोन हेबियस कॉर्पसचे अर्ज दाखल केले होते, ते गोगोई यांनी वादग्रस्त पद्धतीने हाताळले. येचुरी यांनी आपल्या पक्षाच्या माजी आमदाराला समोर उभे करण्यासंबंधी अर्ज केला होता. तर सैयदने आपल्या पालकांना अनंतनाग येथे बेकायदेशीरपणे स्थानबद्ध करून ठेवल्याचा आरोप केला होता. तेव्हा गोगोई हे भाजपच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे व उपयुक्त सरन्यायाधीश असल्याचे दिसून आल्यामुळेच त्यांना निवृत्तीनंतर राज्यसभेत बढती दिली गेली.

तेव्हा न्यायालयावर भाजपचाच दबाव असून, 'चोर कोतवाल को डाँटे', अशी आताची परिस्थिती आहे. त्यामुळे ममतादीदी वा अन्य विरोधी पक्षांवर न्यायव्यवस्थेवर दबाव आणल्याचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही. बिहारमध्ये प्रचारसभेत भाषण करताना, मोदी यांनी सूचकपणे सांगितले की, निवडणूक संपल्यानंतर नोकरी घोटाळा करणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना आपण तुरुंगात टाकू. वास्तविक कथित घोटाळा होऊन बराच काळ लोटला आहे. तेव्हा निवडणूक पूर्ण होण्याची वाट पाहण्याचे कारण काय होते? तसेच तपास यंत्रणा स्वायत्त आहेत, अशा बाता मारणारे मोदी अटक करण्याच्या धमक्या का देत आहेत? ते काम ईडी वा सीबीआयचे आहे... मुद्दा आहे, तो पंतप्रधान देशापुढील मूळ समस्यांपासून जनतेला दुसरीकडेच नेत आहेत, हा.

 

रिझर्व्ह बँकेच्या खजिन्यावर वारंवार डल्ला मारणाऱ्या या मोदी राजवटीत महागाईचा वारू सुसाट धावतोय...

 

महागाई  तर अगदी आ वासून उभी आहे. मुळात आज बाजारात शेपू ५० रुपये आणि कोथिंबिरीची जोडी ३५ रुपयावर गेली आहे... रिझर्व्ह बँकेच्या खजिन्यावर वारंवार डल्ला मारणाऱ्या या मोदी राजवटीत महागाईचा वारू सुसाट धावतोय... मोदी पर्वात गॅस सिलिंडरमध्ये किमान पाचशे रुपयांची वाढ झाली. पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे किमान ४० रुपयांची वाढ झाली. खाद्यतेल लिटरमागे शंभर रुपयांनी वाढले. डाळीदेखील किलोमागे शंभर रुपयांनी वाढल्या. तांदूळ किलोमागे ४० रुपये, गव्हाचे पीठ किलोमागे १५ रुपये, मुलाबाळांच्या वह्यापुस्तकांत दरवर्षी दोन हजार रुपये, चप्पलबूट सरासरी ४०० रुपयांनी, एक जोड कपडे सरासरी ५०० रुपयांनी महागले. त्याच्या बदल्यात सरकारने पाच किलो गहू-तांदूळ दिला. शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले. परंतु काही सवलती कमी केल्या.

एका हिशोबानुसार, दर वर्षाला किमान ९६ हजार रुपयांची खिसेकापूगिरी सरकारने केली आणि बदल्यात केवळ सात हजार रुपयांच्या सवलती लोकांना दिल्या. या सवलतींचा विचार करता, दरवर्षी ८९ हजार रुपये सामान्य लोकांकडून लुबाडले. लुटणे हीच मोदी यांची गॅरंटी आहे! उद्योगपतींचे खिसे भरा आणि सामान्यांना लुटा! बदल्यात उद्योगपतींकडून 'वसुली' करा आणि सामान्य लोकांनी, हजारो कोटी रुपये खर्च करून केलेल्या मोदींच्या जाहिराती पाहून आणि ते जगातले कसे महान नेते आहेत हे वाचून, आपले पोट भरले आहे, असे समजावे! यूपीए काळात सिलिंडर घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या स्मृती इराणी आता देशात चहूकडे स्वस्ताई आहे, असे मानत आनंदाने रात्री घरी आपल्याच जुन्या सीरियल्स बघत आहेत... त्यांच्या दृष्टीने रामराज्य आलेच आहे!

मोदी यांच्या पक्षाचे लोक ताळतंत्र सोडून बोलत असतात. उदाहरणार्थ, 'शरद पवारांचे वाईट दिवस सुरू झाले आहेत'... 'हातावर हात देऊन बसाल, तर तुमच्या लेकीबाळींवर हिजाब घालण्याची वेळ येईल'... 'अन्यथा गटविकास अधिकाऱ्याला फटके मारू'... असे वादग्रस्त उद्गार भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी वेळोवेळी काढले होते. नाना पटोले यांचा पंजा छाटला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच नायब तहसीलदारांना शिवीगाळ आणि मारहाण केल्यावरून त्यांना शिक्षाही झाली होती. नितेश राणे, नीलेश राणे, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील यांनी पातळी सोडून वक्तव्ये केली आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी तर, ‘लॉर्ड जगन्नाथ हे मोदीजींचे भक्त आहेत’, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर गदारोळ उठला, तेव्हा दिलगिरी प्रदर्शित करून, तीन दिवस तप करण्याची भाषा केली. मोदी यांनीदेखील देशातील मुसलमानांना ‘घुसखोर’ असे संबोधले. मांस, मटण हे शब्द वापरून मुस्लिमद्वेष पसरवला. मात्र इतरांनी याचा उल्लेख करताच, ‘असं मी कधी बोललो असेन, तर मीच मला माफ करू शकणार नाही’ असा पवित्राही धारण केला. करून करून 'भागले आणि देवपूजेला लागले', या म्हणीची आजकाल सतत का आठवण होते, ते कळत नाही... गेल्या निवडणुकीनंतर मोदी केदारनाथला गुहेत तप करण्यासाठी गेले होते.

त्रिखंडात ज्यांचे नाव दुमदुमत आहे, अशा या भाषणजीवी नेत्याने २०१४ नंतरच्या पहिल्या ४१ महिन्यांतच त्यांनी ७७५ भाषणे ठोकली होती, हे नक्की. म्हणजे जवळपास पहिल्या साडेतीन वर्षांत एवढी भाषणे, तर नंतरच्या तेवढ्याच काळात आणखी ७७५ भाषणे नक्कीच ऐकवली असतील. एका वेबसाइटने केलेल्या अभ्यासानुसार, २०१४ ते १९ या काळात विश्वगुरूंनी केलेले ४३ दावे हे खरे नव्हते. म्हणजे ते असत्यच होते. निवृत्तीनंतर कदाचित 'माझे असत्याचे प्रयोग' अशी आत्मकहाणी ते लिहिण्याच्या विचारात आहेत, अशी वदंता आहे. लवकरात लवकर ते प्रसिद्ध झाले, तर इतरांनाही त्यामधून मार्गदर्शक विचार मिळतील आणि संबंधितांची राजकीय वाटचालही सुलभ होईल, असे वाटते. शम्मी कपूरचा 'ब्लफमास्टर' हा चित्रपट आला होता. त्यानंतर अभिषेक बच्चनचा आला. ते अवास्तव आणि फिल्मी चित्रपट होते. आता वास्तववादी स्वरूपाचा नवा 'ब्लफमास्टर' कोणीतरी काढायला हवा. प्रमुख भूमिकेसाठी रेडीमेड नटसम्राट उपलब्ध आहेतच!

लाल किल्ल्यावरून सर्वात प्रदीर्घ भाषण करण्याचा विक्रमही त्यांनी नोंदवला आहे. असा बोलघेवडा पंतप्रधान मिळणे ही १४० कोटी भारतीयांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आचार्य अत्रेंच्या शैलीत सांगायचे तर, ‘दहा हजार वर्षांत असा पंतप्रधान झाला नाही'!