Opinion

प्रसिद्धी हाच मोदींचा श्वास!

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

लहानपणी नरेंद्र मोदी नाटकात काम करत. त्यावेळी त्यांना नेहमी मुख्य रोल हवा असे. छोटी मोठी भूमिका ते स्वीकारत नसत. शिवाय सर्वांचे लक्ष वेधून घेणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे, हा त्यांचा स्वभाव होता, अशी माहिती मोदी यांचे चरित्रकार नीलांजन मुखोपाध्याय यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे. गेल्या दहा वर्षांचा काळ जरी बघितला, तरी मोदी यांचा विचारविनिमय, परस्परसंवाद, देवाण-घेवाण, सहमती यावर विश्वास नाही. तो त्यांचा मूळ स्वभावच नाही, हे लक्षात येते. गुजरातमध्ये मोदी हे मुळात प्रथम रा. स्व. संघात होते. परंतु स्वतःकडे राजकीय शक्ती आणि अधिकार हवे असतील, तर तिथे लाठ्याकाठ्या फिरवत बसण्यात अर्थ नाही, त्यापेक्षा भाजपमध्ये सक्रिय होणे आवश्यक आहे, याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे १९८७ साली संधी आल्याबरोबर ते भाजपमध्ये गेले आणि तेथे गुजरातचे संघटनात्मक चिटणीस म्हणून काम करू लागले. संघ आणि भाजप यांच्यात समन्वय साधणे, मागे राहून संघटनात्मक कामे करणे ही त्यांची जबाबदारी होती. त्यावेळी गुजरातमध्ये भाजप झपाट्याने वाढत होता.

१९८५ मध्ये गुजरात विधानसभेत भाजपच्या ११ जागा होत्या. त्या दशकभरातच १२१ वर जाऊन पोहोचल्या. त्यावेळी केशुभाई पटेल आणि शंकरसिंह वाघेला हे दोन भाजपचे बडे नेते होते. दोघांनीही गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले होते. मोदी आल्यानंतर त्याचे तिसरे शक्ती केंद्र उदयास आले. विधानसभा व लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारांची निवड करणे, आघाड्या करणे, यामध्ये मोदी लक्ष घालू लागले. त्याच काळात १९८५ मध्ये गुजरातेत जातीय दंगल होऊन, २०८ जणांचा मृत्यू झाला. १९९० मध्ये २७९ आणि १९९२ साली ४४१ लोक दंग्यात मृत्यू पावले. दंगे झाले, की भाजपचा विस्तार होतो, हा सार्वत्रिक अनुभव आहे.

गुजरातचे हिंदुत्वीकरण सुरू झाले होते. १९८७ साली ‘न्याययात्रा’ आणि १९८९ मध्ये ‘लोकशक्ती रथयात्रा’ काढण्यात मोदी यांचाही रोल होता. १९९० साली तत्कालीन भाजप अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्या रथयात्रा सुरू केली आणि त्यानंतरच्या काळात बाबरी मशिदीचा ढाचा उध्वस्त करण्यात आला. ही यात्रा गुजरातमधील सोमनाथ मंदिरापासून सुरू झाली होती आणि यात्रेच्या पहिल्या टप्प्यात मोदी यांचा ठळक सहभाग होता. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी हे भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी तामिळनाडू ते श्रीनगर अशी एकता यात्रा काढली. एकता यात्रेचा मार्ग ठरवणे, ठिकठिकाणी सभा किंवा मेळावे आयोजित करणे याची आखणी मोदी यांनी केली होती. परंतु मोदी हे सर्व कामे आपल्या मनाप्रमाणे करत आणि जोशी यांच्या सूचनांचे पालन करत नसत. सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र भोजन करावे, अशी जोशी यांची सूचना होती. परंतु जेवणाची वेळ झाली, की मोदी अचानकपणे अदृश्य होत...

 

खरे तर संघ आणि भाजप यांच्यात संवादसेतू बांधणे ही मोदी यांची जबाबदारी होती.

 

जेव्हा यात्रा बंगळुरूमध्ये गेली, तेव्हा कर्नाटकमधील नेते अनंतकुमार आणि मोदी दोघेही गायब झाले. कार्यकर्त्यांबरोबर मोदी भोजन करत नाहीत, हे सातत्याने दिसून आल्यामुळे जोशी संतापले. दुसऱ्या दिवशी जोशी यांनी सर्वांच्या समक्ष मोदी यांची खरडपट्टी काढली. शिस्त म्हणजे शिस्त आणि कोणीही ती मोडता कामा नये, असा आदेश त्यांनी दिला. मोदी हे किती व्यक्तिवादी होते व आहेत, हे या प्रसंगावरून समजते. परंतु या यात्रेहून मोदी जेव्हा गुजरातचा परतले, तेव्हा तर ते अधिकच मनमानी करू लागले. त्यामुळे मोदी यांच्यापेक्षा दहा वर्षे सीनियर असलेल्या शंकरसिंह वाघेलांबरोबर त्यांच्या चकमकी होऊ लागल्या. त्यावेळी भाजपमध्ये वाघेलांची सद्दी सुरू होती. ते पक्षासाठी निधी गोळा करून आणत आणि छोट्या छोट्या पक्षांबरोबर वाटाघाटी करून त्यांची भाजपशी आघाडी घडवून आणत असत. याबाबतीत केशुभाईंनी वाघेलांनाही मागे टाकले आणि आता सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री होतील असे दिसू लागले.

खरे तर संघ आणि भाजप यांच्यात संवादसेतू बांधणे ही मोदी यांची जबाबदारी होती. परंतु मोदी यांचा स्वभाव आदेश देण्याचा होता आणि आपल्याला वाटेल तसे ते वागत. त्यामुळे अन्य भाजप नेत्यांशी त्यांचा सतत संघर्ष होत असे. मोदी हे अत्यंत कष्टाळू कार्यकर्ते असले, तरी मागे राहून शांतपणे काम करणे, लो प्रोफाइल असणे, हा त्यांचा स्वभावच नाही. संघटना सचिवाने प्रकाशझोतात असणे अपेक्षित नसते. परंतु मोदींना सतत प्रसिद्धीचा झोत स्वतःवर राहणे आवडत असे. आपण वाघेला आणि केशुभाई यांच्याबरोबरचे स्थान आपल्याला असावे, असे मोदींना वाटत असे. ते भाजपच्या दैनंदिन कामकाजातही ढवळाढवळ करू लागले आणि ही गोष्ट तेव्हा प्रदेशाध्यक्ष असलेल्या वाघेला यांना आवडत नव्हती.

१९९५ च्या निवडणुकीच्या अगोदर मोदी वाघेला आणि पटेल यांनी मिळून संघ, विश्व हिंदू परिषद आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यामधून दीड लाख कार्यकर्त्यांची निवड केली आणि त्यांना प्रशिक्षण दिले. त्याचा उपयोग होऊन, भाजपला विधानसभेत १९२ सदस्यीय विधानसभेत भाजपला १२१ जागा मिळाल्या. अगोदर त्यांच्या ६७ जागा होत्या. तर काँग्रेसला केवळ ४५ जागा मिळाल्या. पक्षाने केशुबाईंना मुख्यमंत्रीपदी बसवले. त्यावेळी मोदी सतत केशुभाईंबरोबर असत आणि त्यामुळे वाघेला आणि त्यांच्यात अंतर निर्माण झाले. मोदी रोज केशुभाईंबरोबर सकाळचे जेवण घेत आणि रात्रीचेदेखील. ते सतत त्यांच्या कानाला लागलेले असत. वाघेला हे तुमच्या विरोधात बंड करणार आहेत, अशा काड्या ते केशुभाईंपाशी करत असल्याचा आरोप नंतर वाघेला यांनी जाहीरपणे केला होता. त्यानुसार लवकरच वाघेला यांनी भाजपचे निम्मे आमदार घेऊन मध्य प्रदेशला पलायन केले आणि केशुभाईंचे सरकार पाडण्याचा इशारा दिला. केशुभाईंना हाकला, नाहीतर आम्ही बंड करू, असे त्यांनी श्रेष्ठींना स्पष्टपणे सुनावले. त्यावेळी वाजपेयी अहमदाबादमध्ये आले आणि त्यांनी केशुभाईंना बाजूला करून तडजोडीचा उमेदवार म्हणून सुरेश मेहता यांना मुख्यमंत्रिपदी बसवले. या सर्व प्रकरणात मोदी यांनी कलागती लावण्याचा उद्योग केल्यामुळे, शिक्षा म्हणून त्यांना दिल्लीला भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून धाडण्यात आले. त्यावेळी मोदींकडे पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड आणि जम्मू काश्मीरची जबाबदारी होती. परंतु मोदी यांनी या ‘शिक्षे’चा उपयोग करून घेतला.

 

 केशुभाई फक्त विकासात रस घेत आहेत, हिंदुत्वाशी त्यांना काही देणे-घेणे नाही, हे मोदींचे गाऱ्हाणे होते.

 

१९९६च्या लोकसभा निवडणुकांत वाघेला यांचा पराभव झाला आणि त्याबदद्ल त्यांनी संघ, मोदी आणि केशुभाई यांना दोष दिला. वाघेला भाजपमधून बाहेर पडले व त्यांनी नवा पक्ष स्थापन केला. काँग्रेसच्या मदतीने ते मुख्यमंत्री झाले. वाघेलांच्या बंडामुळे मोदींचे महत्त्व आणखीच वाढले. वाघेलांबद्दल मी तुम्हाला अगोदरपासूनच सांगत होतो, असे श्रेष्ठींना सांगून ते स्वतःचे महत्त्व वाढवून घेत होते. १९९८ मध्ये वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे घेण्यापूर्वी मोदींना संघटनेच्या राष्ट्रीय पातळीवर आणखी बढती मिळाली. त्यापूर्वी संघटनेचे सचिव हे प्रसारमाध्यमांसमोर कधीही येत नसत. परंतु मोदींना सतत स्पॉटलाइट हवा असे. मात्र १९९९ च्या कारगिल युद्धावेळी आणि पाकिस्तानबरोबरील आग्रा शिखर परिषदेच्या प्रसंगी मोदी सतत पत्रकार परिषदा घेऊ लागले आणि टीव्हीवर चमकू लागले. त्यांच्या बोलण्यातून राष्ट्रवादाचा उन्माद जाणवत असे. एका टीव्ही चर्चेत पाकिस्तानच्या कुरापतींना कसे उत्तर द्यायचे, अशी पृच्छा करता, ‘चिकन बिर्यानी नहीं, बुलेट का जवाब बाँब से दिया जाएगा’, असा फिल्मी डायलॉग त्यांनी मारला.

दरम्यान गुजरातेत वाघेला सरकार कोसळून केशुभाई मुख्यमंत्री झाले होते. संजय जोशी, हरेन पंड्या, गोर्धन झाडाफिया हे त्रिकूट केशुभाईंभोवती असे. परंतु केशुभाईच्या नेतृत्वाखाली २००१ साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपचा पराभव झाला. कच्छमध्ये भूकंप झाला, तेव्हा केशुभाईंनी पुनर्वसनाचे काम धड केले नाही, अशा प्रचार मोदींनी दिल्लीत बसून करण्यास सुरुवात केली. केशुभाई फक्त विकासात रस घेत आहेत, हिंदुत्वाशी त्यांना काही देणे-घेणे नाही, हे मोदींचे गाऱ्हाणे होते. त्यानंतर अचानक वाजपेयी यांनी मोदींना बोलावले आणि ते मोदींना म्हणाले, ‘पंजाबी फूड खाऊन खाऊन तुम्ही स्थूल झाला आहात. आता दिल्ली सोडून गुजरातमध्ये जा. तुम्हाला तिथे मुख्यमंत्री म्हणून जायचे आहे’. परतुं खरे तर, यासाठी मोदींनी अगोदरपासूनच लॉबिंग सुरू केले होते. दिल्लीतील काही पत्रकारांना हाताशी धरून त्यांनी केशुभाईंची बदनामी सुरू केली होती. एक दिवस मोदी अनेक कागदपत्रे घेऊन केशुभाईंच्या भानगडी संगण्यासाठी माझ्याकडे आले होते, अशी आठवण ‘आउटलुक’चे संपादक विनोद मेहता यांनीदेखील लिहून ठेवलेली आहे.

गुजरातला गेल्यावर आमदारांनी आपल्याला विरोध करू नये, म्हणून मोदींनी धूर्तपणे आपल्याबरोबर भाजपचे माजी अध्यक्ष कुशाभाऊ टाकरे आणि ज्येष्ठ नेते मदनलाल खुराना यांना नेले होते. मी येथे वन डे मॅच खेळण्यासाठी आलो आहे. त्यामुळे मला पटापट स्कोअर करणे आवश्यक आहे, असे उद्गार मोदींनी पत्रकार परिषदेत काढले होते. त्यानंतर मोदी सलग तेरा वर्षे (२००१ ते २०१४) गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. आता सलग तीन टर्म पंतप्रधानपदी निवड होण्याच्या नेहरूंच्या विक्रमाची बरोबरी त्यांनी केली आहे. परतुं नेहरूंची उंची आणि मोदींची उंची यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, हे विसरता कामा नये. शिवाय मोदी हे प्रसिद्धीचे वेडे आहेत. तर नेहरूंना प्रसिद्धीशी काडीचेही देणेघेणे नव्हते!