Opinion

‘राजकारण नको’ म्हणण्याचे राजकारण

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

महाराष्ट्राला लागलेला कलंक धुऊन काढण्यासाठी आणि महायुती सरकार उलथवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना केले आहे. या सरकारविरोधात महाविकास आघाडी रविवारी ‘जोडे मारो’ आंदोलनही हाती घेणार आहे. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा सर्वत्र धिक्कार केला जाताच, पुतळ्याच्या घटनेचे राजकारण करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राजकोट किल्ल्यावरील घटनास्थळास भेट देण्यास आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार प्रभृती गेले असता, या मंडळींना बाहेरून इथे येण्याचे कारण काय, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे उन्मत्त कुलदीपक नीलेश राणे यांना पडला. मविआचे नेते तेथे येणार, हे समजल्यानंतरच घाईगडबडीने राणे तेथे पोहोचले. आपण घटनास्थळी न गेल्यास छिःथू होईल, असे त्यांना वाटले असावे. 'एकेकाला घरात घुसून खेचून मारून टाकीन...' असे नारायण राणे परवाच राजकोट किल्ल्यावर म्हणाले. शिवराय असते, तर या माजुर्डेपणाची कोणती शिक्षा त्यांनी दिली असती?

राणे यांनी कोणत्या मार्गाने लोकसभा निवडणूक जिंकली, हे स्थानिक लोकांना माहीत आहे. त्यांच्या विरोधात पराभूत झालेले शिवसेनेचे विनायक राऊत यांनी निकालास कोर्टात आव्हान दिले आहे. राणे यांनी राजकोट येथे पोलिसांशी आणि विरोधकांशी ज्याप्रकारचे वर्तन केले, ते आक्षपार्ह होतेच. पण राणे करतात ते राजकारण नाही, असे फडणवीसांना वाटत असावे. राणे नेहमीच आक्रमक बोलतात, पण ते धमक्या देत नाहीत, असे सांगून फडणवीस यांनी राणे यांच्या चुकांवर पाघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीस, राणे प्रभृती जे करतात, ते राजकारण नाही आणि विरोधक जे करतात ते मात्र राजकारण असते, असा त्यांचा सिद्धांत आहे.

बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारानंतर तेथे नागरिकांनी उत्स्फूर्त आंदोलन केले. नंतर विरोधी पक्षांनी हा विषय लावून धरला. त्यावेळी आंदोलनस्थळी ठाकरेसेनेचे कार्यकर्ते व अन्य लोक घुसले, त्यांनी राजकारण केले, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी केला. निर्भयाकांडाच्या वेळी भाजपने सोनिया गांधींच्या घरावर मोर्चा काढला होता. बदलापूर प्रकरणी विरोधी पक्षांनी जाहीर केलेला बंद न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आणि शिंदे-फडणवीस यांनी या गोष्टीचे समर्थन केले. परंतु भाजपने पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्काराच्या निषेधार्थ बंद पुकारला, त्याबाबत शिंदे-फडणवीसांनी एक शब्दही काढला नाही. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे तिजोरीवर येणारा असह्य भार, योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी दाखवण्यास सुरुवात करताच, विरोधकांना या योजनेची पोटदुखी झाली आहे, अशी टीका शिंदे-फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली. राजकारण्यांनी लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे आवश्यकच असते. पण महाराष्ट्रातील सरकारमधील ‘त्रिदेव’ विरोधकांना राजकारण करूच नका, असे म्हणतात. मग त्यांनी मंदिरात जाऊन भजन-कीर्तन करावे, अशी अपेक्षा आहे का? असो...

 

पिंपरी चिंचवड, पुणे, नवी मुंबई, ठाणे महानगरपालिका सत्पुरुषांच्या हाती असून, तेथे नीतीतत्त्वांच्या आधारावर कारभार चालतो, असे देवेंद्रजींना वाटते का?

 

मागे भारताच्या चांद्रमोहिमेची दखल घेताना शरद पवार यांनी वैज्ञानिकांचे कौतुक केले आणि नेहरूंचाही उल्लेख केला. पण त्यांनी मोदींचा मात्र उल्लेख केला नाही, म्हणून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी साहेबांना स्मृतिभ्रंश झाला असावा, असे मत व्यक्त केले आहे. प्रसादभाऊ हे आरोग्यतज्ज्ञ आहेत, हे सारे जग जाणते! निदान कोणाची साथ केव्हा सोडावी आणि कोणत्या नेत्याची व पक्षाची साथ नव्याने धरावी, कोणाचे लाड पुरवावेत आणि सर्वांचे 'आरोग्य' उत्तम ठेवावे, याचे त्यांना चांगले ज्ञान आहे. देवेंद्रभाऊंनाही याची नीट कल्पना आहे. परंतु जगद्विख्यात अशा डॉ. प्रसादभाऊंनी अथवा त्यांच्या भाजपमधील बहुतेक सहकाऱ्यांनी चांद्रमोहिमेचे स्वप्न पाहणाऱ्या अटलजींचा उल्लेखदेखील केलेला नाही. मग हे तरी कसे काय घडले? हे कोणते राजकारण?

गेल्या वर्षी मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांची कॅगतर्फे चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. परंतु पिंपरी चिंचवड, पुणे, नवी मुंबई, ठाणे महानगरपालिका सत्पुरुषांच्या हाती असून, तेथे नीतीतत्त्वांच्या आधारावर कारभार चालतो, असे देवेंद्रजींना वाटते का? पिंपरी चिंचवड स्थायी समितीच्या अध्यक्षाला तर अँटीकरप्शनने अटक केली होती. एकनाथ शिंदेंचे ठाणे व गणेश नाईकांची नवी मुंबई ही स्वच्छ कारभारासाठी जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे, असे आपण गृहीत धरून गप्प बसायचे का? मग हे कोणते राजकारण?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीने घेतलेल्या तीन एकर जमिनीचे खूप जुने पुराने प्रकरण बाहेर काढून त्यांच्यावर खटला भरण्यास राज्यपालांनी परवानगी दिली आहे. विरोधी पक्षांचे सरकार असले की सूक्ष्मदर्शक भिंग लावायचे ही भाजपची पद्धत आहे. या प्रकरणापेक्षा देवस्थानच्या जमिनी हडप करणे, उद्योगपतींना सवलतीत जमिनी बहाल करणे, रस्त्यांमधून स्वतःची समृद्धी करून घेणे, सिंचनामधून ७० हजार कोटींचे अर्थ सिंचन घडवणे ही प्रकरणे भाजपाला महत्त्वाची वाटत नाहीत. याला दुटप्पीपणा म्हणायचे नाही तर काय?

 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चार ते पाच वर्षे चालेल, असे भविष्य भरत गोगावले यांनी दोन वर्षांपूर्वीच वर्तवले होते.

 

'मी तिथे असतो, तर  कानाखालीच वाजवली असती', अशा आशयाचे नारायण राणे यांचे उद्गार महाराष्ट्रातच काय, देशभर प्रसिद्ध झाले आहेत... भाजपचे शिरोमणी हे उद्गार काढत असताना, त्यांच्या शेजारी बसलेले मुंबै बँकेचे मुकुटमणी प्रवीण दरेकर त्यांना हसून दाद देत होते. या दरेकरांना त्यांच्या मुंबै बँकेसाठी सरकारने भूखंड बहाल केला आहे. हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे? परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिकडे नितीन गडकरी यांनी  नागपुरात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना स्वातंत्र्यदिनासंदर्भात 'सुवर्णमहोत्सव' हा शब्द वापरला होता, त्याची क्लिप तेव्हा फिरत होती. अर्थातच त्यांनी हा शब्द चुकून  वापरला होता. पण 'गडकरी यांनी देशद्रोह केला असून, त्यांच्या कानाखाली वाजवली पाहिजे’, असे उद्गार काही राणे यांनी काढले नाहीत. 

गाईचे राजकारण करून गेल्या डिसेंबरात बुलंदशहरामध्ये हिंदुत्ववाद्यांनी आग पेटवली. ती शांत करण्यासाठी हस्तक्षेप करणाऱ्या इन्स्पेक्टर सुबोधकुमार सिंग यांची जमावाने हत्या केली. या हत्येत ज्या आरोपींना अटक झाली, त्यांची नंतर सुटका झाली. अर्थात जामिनावर! त्यामध्ये एक बजरंग दलाचा व दुसरा भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता व नेता होता. बाहेर येताच या मंडळींचे 'जय श्रीराम'च्या घोषणा देऊन स्वागत करण्यात आले. एका पोलीस इन्स्पेक्टरला ठार मारण्याचा आरोप असलेल्या नालायक गुंडांचे जयघोषात स्वागत करणे, हे योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात घडते. अशा घटना तेथे वारंवार घडतात. राजकारणाची ही कोणती तऱ्हा? परदेशात जाऊन फक्त विरोधकांना बदनाम करणे आणि स्वतःच्या टिमकी वाजवणे यातच गुंतलेल्या प्रधानसेवकांना याबद्दल काहीही वाटत नाही? भ्रष्टाचार वाईटच, पण त्यापेक्षा धार्मिक द्वेष आणि उन्माद हा अधिक वाईट आणि भयावह असतो. हे देशातील आधुनिक काळातील 'धृतराष्ट्रां"नी लक्षात घेतले पाहिजे!

नाइटलाइफ गॅंगने जे पब कल्चर प्रमोट केले, त्याने सुशांतचा बळी घेतला, अशा आशयाचे ट्विट भाजपच्या वतीने खिंड लढवणार्‍या ‘आशीष शेलार'मामांनी केला होता. त्यांना आदित्य ठाकरेंकडे बोट दाखवायचे होते आणि 'आम्ही कुठे त्यांचे नाव घेतले?' असे म्हणत राजकारणही करायचे असते. आणि तरीही 'आम्ही राजकारण करत नाही,' असा आवही आणायचा आहे! सुशांत व दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन तीरंदाजी करणे, हे फडणवीसांच्या भाजपचे राजकारण नव्हते का?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चार ते पाच वर्षे चालेल, असे भविष्य राजज्योतिषी भरतशेठ गोगावले यांनी दोन वर्षांपूर्वीच वर्तवले होते. इतका सॉलिड कॉन्फिडन्स असल्यामुळे, निवडणूक आयोगातही आपल्यालाच यश मिळणार आहे, असे देखील भाकित त्यांनी केले होते. खरे तर या ज्योतिषाचार्यांची नेमणूक न्यायव्यवस्थेत सर्वोच्च स्थानी झाल्यास देशाचे आणि महाराष्ट्राचे भले होईल. मंत्रीपद मिळाले नसले तरी काय झाले, भरतशेठ भरतखंड पादाक्रांत करू शकतील, एवढी महाशक्ती त्यांच्यापाशी आहे! हे कोणत्या थाटाचे राजकारण म्हणावे?