Opinion

जाहिरातजीवी सरकार

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारने आपल्या विविध योजनांच्या जाहिरातींसाठी २७० कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ज्येष्ठांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन व वयोश्री अशा विविध योजनांच्या जाहिराती वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमांतून केल्या जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीतील तिन्ही पक्षांच्या लाडक्या भावाबहिणींना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी लत्ताप्रहार केल्यास, सत्तेतून बाहेर जावे लागेल आणि ‘रेस्ट इन होम’ची पाळी येईल. हे माहीत असल्यामुळेच प्रसिद्धीचा सपाटा लावला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या इमेज बिल्डिंगसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अथवा स्वतःच्या खिशातून नरेश अरोरा नामक व्यक्तीच्या कंपनीस दोनशे कोटी रुपये देण्याचे कंत्राट केले असल्याचे सांगण्यात येते. हे कंत्राट देण्यासाठीदेखील त्यांना एखादा मराठी माणूस मिळत नाही, ही आश्चर्याची बाब आहे. खोके प्रयोग करून महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर, शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्या सात महिन्यांतच जाहिरातबाजीवर ४२ कोटी रुपये खर्च केले असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. जाहिरातबाजीवर सरकारचा वीस लाख रुपये खर्च होत असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. ‘अब की बार चारसौ पार’चा नारा देऊन, पुन्हा सत्तेत येण्याचा आत्मविश्वास बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने जानेवारी ते मार्च २०२४ या काळातच ऑनलाइन जाहिरातींवर ३८ कोटी रुपये खर्च केले होते.

भाजप हा जगातील सर्वात मोठा आणि भारतातील सर्वात धनवंत पक्ष आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक रोखे व अन्य मार्गाने कशा प्रकारे पैसे मिळवले, याच्या कहाण्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. भाजपचा आणि विश्वमित्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर्श समोर असल्यामुळे, मुख्यमंत्री होताच, एकनाथ शिंदे यांनी तुफान जाहिरातबाजी सुरू केली. गोविंदा, गणपती, नवरात्र, दिवाळी अशा प्रत्येक वेळी ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले. बसस्टॉपवर तसेच बसगाड्यांवर महाराष्ट्र शासनाच्या जाहिराती झळकावण्यात आल्या. आमचे सरकार येताच हिंदू सणांवरील संक्रांत संपली, अशा आशयाचा पुकारा या जाहिरातींतून करण्यात आला. भाजप, अजितदादांचा पक्ष अथवा शिंदेसेना यांनी पक्षाच्या वतीने जो काही खर्च करायचा तो ते करोत. वेगवेगळ्या उत्सव मंडळांना, विशेष करून एकनाथ शिंदे यांचा पक्ष, लाखो-करोडोंच्या देणग्या देत आहे. उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी तसेच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संभाळण्यासाठी ते हा खरेच करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रभावाखालील मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही आमिषे दाखवण्यात आली. परंतु जेव्हा महायुती सरकार करदात्यांचा पैसा अक्षरशः उधळते, तेव्हा त्यास आक्षेप घ्यावा लागतो.

 

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची जहिरात करण्यासाठी गेल्या वर्षी माहिती व जनसंपर्क विभागाने ५३ कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली होती.

 

‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची जहिरात करण्यासाठी गेल्या वर्षी माहिती व जनसंपर्क विभागाने ५३ कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली होती. एवढ्या प्रमाणात प्रसिद्धीवर यापूर्वी कधीही खर्च झालेला नाही. पूर्वीदेखील राज्य सरकारकडून अनेक उपक्रम व योजना जाहीर केल्या जात होत्या. पण त्यांची फारशी जाहिरात केली जात नव्हती. परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून, हा खर्च प्रचंड वाढला. फडणवीस सरकार सत्तेत असताना, २०१७-१८ मध्ये, जाहिरातींवर दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर २०१९-२० मध्ये हा खर्च बारा कोटींवर गेला. सत्तांतरानंतर करोना काळात महाविकास आघाडीचा खर्च दोन वर्षांत अनुकमे २० आणि २२ कोटी रुपये असा झाला. हातात कारभाराची सूत्रे घेताच, शिंदे सरकारने २८ कोटी रुपयांचा चुराडा केला आणि नवे आर्थिक वर्ष सुरू झाल्याबरोबर ५५ कोटींची तरतूद केली. आता तर केवळ काही योजनांच्या जाहिरातींवर खर्च करण्यासाठी २७० कोटी रुपयांची तरतूद झाली जाणार आहे. याखेरीज, अन्य बाबींवरील सरकारी प्रसिद्धीचा  खर्च वेगळा.

महाराष्ट्र सरकार कर्जबाजारी असताना पै-पैचा खर्च विचारपूर्वक केला पाहिजे. परंतु मोदी मॉडेल समोर असल्यामुळे, इव्हेंटबाजी म्हणजेच लोकहिताचे कार्य, अशी शिंदे सरकारची समजूत झालेली दिसते. मुख्यमंत्री झाल्यावर शिंदे यांनी कारमधून प्रवास करताना आपण अधिकाऱ्यांना कसे आदेश देत आहोत, याचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यानंतर, मी कसा लोकांमध्ये फिरणारा मुख्यमंत्री आहे, अशी इमेज त्यांनी तयार केली. एवढेच नव्हे, तर आपल्या इमेज बिल्डिंगसाठी ‘धर्मवीर-१’ आणि ‘धर्मवीर-२’ हे चित्रपट काढले. या चित्रपटांद्वारे त्यांनी एक फेक नॅरेटिव्ह तयार केले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भ्रामक समजुती पसरवणे हा शिंदे यांचा एककलमी कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे हे घरात बसलेले असतात, असा आरोप करणारे शिंदे हे धृतराष्ट्र आहेत का? ठाकरे यांचे सतत दौरे सुरू असतात. मुख्यमंत्री असतानाही आपत्तिग्रस्तांना ते भेटत होते. इरशाळगडाची दुर्घटना घडली, तेव्हादेखील केवळ शिंदेच तथे गेले, असे नाही. तर उद्धव ठाकरेही गेले होते.

 

महाराष्ट्रभरातील शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते तसेच अन्य पक्षांचे नेतेही उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर जात असतात.

 

महाराष्ट्रभरातील शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते तसेच अन्य पक्षांचे नेतेही उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर जात असतात. ‘मातोश्री’ हे त्यांना मंदिर वाटते. कारण तेथे शिवसेनाप्रमुखांचे वास्तव्य होते. म्हणून सामान्य शिवसैनिकांना ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वरच जायचे असते. अन्य पक्षांतून आलेले लोकही ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रवेश घेतात. अरविंद केजरीवाल असोत वा ममता बॅनर्जी, यासारखे अनेक नेते उद्धव ठाकरेंना ‘मातोश्री’वर भेटत असतात. ‘मातोश्री’ हे त्यांचे निवासस्थान असले, तरी ऑफिसप्रमाणेच तेथून कामकाज चालते. म्हणजेच उद्धव ठाकरेंनी घरी बसणे, याचा अर्थ ते तेथे काम करत असतात, असा होतो. शिवाय सेनाभवनात व ‘शिवालया’तही त्यांच्या पत्रकार परिषदा व अन्य कार्यक्रम होत असतात. परंतु शिंदेसेना व भाजपमधील किरकोळ नेतेदेखील त्यांच्याबद्दल फेक नॅरेटिव्ह पसरवत असतात. एकप्रकारे ही खोटी जाहिरताबाजीच म्हणावी लागेल.

शिंदेसेनेचे नवे कोरे खासदार नरेशराव म्हस्के हे हल्ली खूपच संयमाने आणि सभ्य सुसंस्कृतपणे बोलू लागले आहेत, हे पाहून खूप बरे वाटते... कदाचित सुसंस्कृत पक्षाशी दिल्लीत अधिक संबंध येत असल्यामुळे, नरेशराव जाकीटबिकीट घालून 'हे उचित नाही' वगैरे भाषेत बोलू लागले आहेत... आता लवकरच ते पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघात जाऊन किंवा ठाण्याच्या तलावपाळीवर जाऊन, ज्येष्ठांबरोबर 'हा समाज चालला आहे तरी कुठे?' अशी चर्चा करू लागतील.. अथवा एखाद्या मासिकात 'राजकारणातील नीतिमूल्ये' याविषयी लेख लिहितील की काय, असे वाटू लागले आहे... असो. पण नरेशराव यांची ही गतिमान सुसंस्कृत प्रगती आणि विनयशील भाषा ऐकून परमसंतोष होतो. कदाचित तेही इमेज बिल्डिंगसाठी सल्ला घेत असतील!

विश्वसेवकास राखी बांधणाऱ्या ईडीमुक्त वैदर्भी भगिनी भावनाताईंनी मध्यंतरी आमदारकीची शपथ घेताना 'जय एकनाथ' असा नारा दिला. त्यांची ही निष्ठा आणि भक्तिभाव बघून अनेकजण भावुक आणि काहीजण सद्गदित झाले... यापुढे भाजपवाल्यांनी 'जऽऽय श्रीराम' केले, तर शिंदेसेनेचे समर्पित भावनेने काम करणारे नेते आणि कार्यकर्ते 'जऽऽय एकनाथ' म्हणतील, यात शंका नाही... जऽऽय एकनाथ! हेही एकप्रकारे इमेज मेकिंगच.

आता इतरांवर फेक नॅरेटिव्हचा आरोप करणारे भाजपवाले स्वतः काय करतात ते बघा. तीन वर्षांपूर्वी मोदी सरकारने ‘पेगॅसस’ विकत घेतले आहे की नाही आणि त्या माध्यमातून हेरगिरी केली आहे की नाही, या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी, 'राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे वाटोळे केले असून, त्यांच्यावर कोण हेरगिरी करणार? त्याचा फायदा काय? ते आपला फोन तपासणीसाठी का देत नाहीत? ते पोलिसांत तक्रार का दाखल करत नाहीत?' असे सवाल भाजपचे उर्मट प्रवक्ते संबित पात्रा यांनी उपस्थित केले. मूळ विषयाला बगल देत, भलतीकडेच लक्ष वेधण्याचा हा प्रकार त्यांच्या व भाजपच्या वतीने नेहमीच सुरू असतो. वेगळे नॅरेटिव्ह तयार करण्याचाच हा उद्योग. राहुल यांच्याबद्दल मतभेद व्यक्त करणे, टीका करणे वेगळे आणि त्यांच्यासंबंधी या प्रकारच्या कमेंट्स करणे वेगळे. या सगळ्यावरून हे पात्रा नावाचे गृहस्थ रविशंकर प्रसाद यांच्यापेक्षाही अधिक उर्मट, मुजोर आणि कमालीच्या विखारी वृत्तीचे आहेत, असेच स्पष्टपणे दिसून आले.

भविष्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ होणारच नाही असे मी सांगू शकत नाही, असे उद्गार चंद्रकांतदादा पाटील यांनी पूर्वी काढले होते. हे ऑपरेशन यशस्वी झाल्यावर, 'भाजपची तत्त्वे आणि सिद्धांत मान्य असल्यामुळे कोणी जर येत असेल, तर त्याला आम्ही काय करणार! याला फोडाफोडी म्हणत नाहीत' असा रेडिमेड युक्तिवाद केला गेला. नॅरेटिव्ह, नॅरेटिव्हची बकवास करणारे लोक किती चलाख आहेत, ते पाहा.