Opinion

नागपुरी नीती!

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिला असून, ही आनंदाचीच बाब आहे. त्याबद्दल महायुती सरकारचे अभिनंदन! महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे सरकार होते, तेव्हा राज्यात २२ लक्ष ७७ हजार ३३५ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित झाली होती... देशातील अन्य कोणत्याही राज्यांपेक्षा ही गुंतवणूक अधिक होती.

२०२०-२१ मध्ये २९६ प्रकल्पांत ४४,१८८ कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित झाली आणि २०२२-२३ मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत ३५,८७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली. २०२२-२३ च्या जुलै महिन्यापासून शिंदे सरकारची सत्ता होती. त्याआधी अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांचेच सरकार होते. या तिन्ही वर्षांत मिळून कर्नाटक व गुजरातपेक्षा महाराष्ट्रात गुंतवणूक जास्त होती. आणि या तीन वर्षांपैकी दोन वर्षे तरी ठाकरे यांची सत्ता होती. कोरोना काळात देखील ठाकरे सरकारने गुंतवणुकीचे ७८० प्रकल्प मंजूर केले आणि हा देशातील एक विक्रम होता, असे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे.

परंतु ठाकरे सरकारच्या काळात भारतात कर्नाटक व गुजरात यांच्या तुलनेत कमी विदेशी गुंतवणूक आली याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे, त्याचा फायदा अर्थातच त्या पक्षाच्या राज्यांमधील सरकारला मिळाला व मिळतो. त्यामुळे आम्ही परदेशी गुंतवणुकीत नंबर वन आहोत, असे फडणवीस गर्वाने, नाक फुगून जरूर सांगू शकतात. परंतु ठाकरे सरकार असताना त्यास केंद्र सरकार कोणतेही सहकार्य करत नव्हते, हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आम्हीच फक्त गुंतवणूक आणू शकतो आणि आमचे विरोधक सत्तेवर असल्यास ते महाराष्ट्राला खड्ड्यात घालतात, हे फडणवीसांचे फेक नॅरेटिव्ह आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण देशांतर्गत गुंतवणुकीत ठाकरे सरकार संपूर्ण देशात पहिल्या नंबरवर होते आणि ते देखील केंद्राचे कोणतेही सहकार्य मिळत नसताना! जनतेसमोर फेक नॅरेटिव्ह कोण ठेवत आहे, हे लोकांनी जरूर लक्षात ठेवावे.

मनमोहन सिंग सरकार विरोधात २जीबाबत खोटेनाटे आरोप करून, भाजपने केंद्रात सत्ता मिळवली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला ‘महाभकास’ व ‘महावसुली’ सरकार असे म्हणून भाजपने बदनामी केली आणि आताचे ‘त्रिशूल’ सरकार किंवा ‘त्रिदेव’ सरकार करोडो रुपयांची कंत्राटे देऊन आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मुदतवाढ देऊन, कशी खंडणीखोरी करत आहे, हे लोकांना माहीत आहे. महाविकास सरकारच्या भ्रष्टाचाराचा कोणताही पुरावा सादर न करता त्यांची बदनामी करायची आणि आपण मात्र कर्नाटकच्या बोम्मई सरकारचा, म्हणजे ‘पेसीएम’ सरकारचा पॅटर्न समोर ठेवून, आपापल्या अंगणात सिंचन-समृद्धी आणून ‘कमवा आणि मजा करा’, ही योजना राबवायची, असे सर्व सुरू आहे.

 

दोन वर्षांपूर्वी 'आपलं सरकार आलं, हिंदू सणांवरचे विघ्न टळलं' अशी पोस्टर्स भाजपतर्फे लावण्यात आली.

 

महायुतीच्या लबाड्या लोकांना आता ठाऊक झाल्या आहेत. गेल्या वर्षी मुंबईतील 'इंडिया'च्या बैठकीवरून लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी 'एक देश एक निवडणुकी'ची चर्चा सुरू करून द्यायची... राहुल गांधी अदानींवर बोलणार हे लक्षात येताच, 'सावरकर' हा मुद्दा घेऊन निदर्शने करायची... हे भाजपचे तंत्र सर्वज्ञात आहे.

दोन वर्षांपूर्वी 'आपलं सरकार आलं, हिंदू सणांवरचे विघ्न टळलं' अशी पोस्टर्स भाजपतर्फे लावण्यात आली. त्यावर भाजपच्या प्रमुख नेत्यांची छायाचित्रे होती. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने कोरोनामुळे आलेल्या संकटाचा विचार करून हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख अशा सर्व धर्मांतील लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही रास्त निर्बंध लावले. आणि त्याचे पालन अन्य धर्मीयांप्रमाणेच हिंदूंनीदेखील केले. काही लबाड पक्ष व राजकारण्यांखेरीज, हिंदूंसह कोणीही त्याबद्दल आक्षेप घेतला नव्हता. सणांवर निर्बंध नव्हते, तर गर्दी करण्यावर निर्बंध होते. तरीदेखील अगोदरच्या, म्हणजेच महाविकास सरकारच्या काळात हिंदू सणांवर घाला घालण्यात येत होता, असे सूचित करणारा खोटारडा प्रचार भाजपच्या पोस्टरबाजीद्वारे करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने सर्वशक्तिनिशी अवश्य प्रयत्न करावेत. पण त्यासाठी धर्माला वेठीला धरण्याचे कारण काय होते?

गोवारी हत्याकांडाबाबतची तत्कालीन शरद पवार सरकारची जबाबदारी कोणीही नाकारत नाही. त्यांच्याकडून झालेली ती चूकच होती. परंतु त्यावेळी  मुख्यमंत्री पवार यांनी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांचा राजीनामाही घेतला होता. मात्र जालना येथे मराठा समाजातील आंदोलकांवर निर्दयपणे लाठीमार झाल्यानंतर, पवारांनी त्यावर टीका केल्यावर लगेच, 'मग गोवारीकांडाचं काय?' असा सवाल देवेंद्रजींनी केला आहे. मोदीजींवर कोणी कधीही टीका केली, की लगेच 'मग काँग्रेसच्या काळात जे झाले, त्याबद्दल काय?' असा सवाल ते विचारतात. मोदी हे देवेंद्रजींचे परात्पर गुरु असल्यामुळे, ते त्यांची एक्झॅक्ट कॉपी करत असतात. हा लाठीमार झाल्यानंतर व पवारांची प्रतिक्रिया आल्यानंतर, लगेच देवेंद्रजी गोवारींचा विषय काढतील, हे मी अगोदरच अनेकांजवळ प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते. आणि माझा अंदाज चुकला नाही! याशिवाय, 'आपले सहकारी सोडून गेल्यामुळे पवारसाहेब नैराश्यग्रस्त झाले आहेत' अशा आशयाची प्रतिक्रियाही देवेंद्रजींनी व्यक्त केली होती. परंतु लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील निकाल पाहता, फडणवीसांनीच निराशाग्रस्त होऊन, ‘मी राजीनीमा देतो’, असे पक्षश्रेष्ठींना  सांगून पाहिले...

यापुढे पवारसाहेब अथवा विरोधकांतील कोणीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की, देवेंद्रजी हे कधीही चुकत नाहीत. त्यांचे नेहमी बरोबरच असते! शिवाय विरोधकांना कुठल्याही गोष्टीबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाही. कारण त्यांनी ३०-४० वर्षांपूर्वी चुका करून ठेवल्या आहेत. मी दिलेले मराठा आरक्षण परफेक्ट आहे, असा दावा देवेंद्रजींनी केला होता. परंतु तो न्यायालयात टिकला नाही. तरीही तेच बरोबर! वारकऱ्यांवर लाठीमार झाला, तरी तेच बरोबर! त्यांनी पक्ष फोडले, तरी 'राजकारणात कधी कधी दीर्घकालीन भल्यासाठी नैतिकतेशी तडजोड करावी लागते' असा युक्तिवाद करणारे देवेंद्रजीच बरोबर! मीच परफेक्ट, मीच सर्वोत्तम, मीच सर्वगुणसंपन्न असा पवित्रा असणारे देवेंद्रजी, उद्या मोदींनंतर पंतप्रधान बनणार याबद्दल माझ्या मनात काहीही शंका नाही...

 

परिवर्तनवादी चळवळींना तेव्हा वृत्तपत्रांचा आधार होता.

 

पुण्यात अनेक वर्षांपूर्वी 'राष्ट्रीय एकात्मता परिषद' भरली होती, तेव्हा पु ल देशपांडे हे त्या परिषदेचे उद्घाटक होते. हिंदुत्ववाद्यांनी त्यावेळी 'आम्ही हिंदू आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे', अशा घोषणा तेथे येऊन दिल्या. तर पुरोगामी चळवळीतील लोकांनी 'आम्ही भारतीय आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे' अशा घोषणा दिल्या. या परिषदेचे वार्तांकन करताना, पुरोगाम्यांच्या भारतीयत्वाच्या घोषणेला 'सकाळ'ने जाणीवपूर्वक पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली, अशी आठवण बाबा आढाव सांगतात. परिवर्तनवादी चळवळींना तेव्हा वृत्तपत्रांचा आधार होता. आता मात्र बहुसंख्या मीडिया हा  व्यापारी वृत्तीचा आणि लाचार बनला असून, तत्त्वेबित्त्वे आणि पुरोगामित्व वगैरे त्याने केव्हाच खुंटीला बांधून ठेवले आहे!

राज्यातील सर्व समाजघटकांना आणि शेतकऱ्यांना सुखसमृद्धी लाभो, अशी आपण गणपतीबाप्पाकडे प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब व धर्मवीरांच्या विचारांचे पाईक आणि त्यासाठी ठाकरे सरकारमधील सत्तादेखील लाथाडणारे, अनाथांचे नाथ असलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे याही वर्षी देतील, यात शंका नाही. पंढरपूरला, शिर्डीला, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला वा तुळजापूरला कुठेही गेले, तरी आपले राजकीय नेते नेहमी हेच सांगतात! प्रत्यक्षात देवाकडे ते काय मागतात, की फक्त स्वत:साठीच प्रार्थना करतात, हे कोणाला ठाऊक... शिवाय बाप्पा यांचे थोडेच ऐकायला बसलाय!.. मुळात कुठल्यातरी लाभासाठी जे पक्ष फोडून राज्यातील मोठे पद पटकावतात आणि पुन्हा गंभीर चेहरा करून देवाला साकडे घालून आपले मागणीपत्र सादर करतात, त्यांची आपण महाआरती करायची का? की निवडणुकीत अशांची पूजा बांधायची, हे शेवटी जनतेनेच ठरवायचे आहे.

२०१९च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याचा विषय उपस्थित केला होता. नंतर ते घोटाळेबाज लोकच महायुतीत येऊन बसले....

दोन वर्षांपूर्वी कोकणवासीयांना गणपतीसाठी गावी जाण्याकरिता खास 'मोदी रेल्वे' सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा मराठवाड्याचे थोर सुपुत्र, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. मोदी रेल्वेच्या आयडियाची कल्पना छानच आहे! यापुढील टप्प्यात मोदी एअरसेवा, मोदी बोटसेवा किंवा जलयान, मोदी यष्टी बसेस या सेवाही सुरू करता येतील... बाय द वे, पुण्यात अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असा 'मोदी गणपती' आहे. पण त्याचा विश्वगुरुंशी काहीही संबंध नाही. पुण्यातच मोदींचे मंदिर उभारण्यात आले होते, मात्र ते न बघवणार्‍यांचा मोर्चा येण्यापूर्वीच, तेथे 'देव देव्हाऱ्यात नाही' अशी परिस्थिती उद्भवली!

 

जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांनी आवाज उठवलाच पाहिजे.

 

काही वर्षांपूर्वी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दिल्लीत काँग्रेसने महागाईविरोधी मोठी सभा घेतली. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राजवर्धन सिंग राठोड यांनी ही सभा आणि हे आंदोलन म्हणजे राहुलजींच्या रिलाँचिंगचा कार्यक्रम आहे, असे उद्गार काढले. महागाईबद्दल जेव्हा २०१४ पूर्वी मोदी मनमोहन सिंग सरकारविरुद्ध आवाज उठवत होते, तेव्हा त्यांचे ते रिलाँचिंग नव्हते. पण राहुल बोलले, तर ते मात्र त्यांचे रिलाँचिंग! राहुलजींनी काही केले नाही, तर 'ते निष्क्रिय आहेत' असे म्हणायचे आणि आंदोलन केले की त्यांना नावे ठेवायची, हा भाजपचा दोन कलमी कार्यक्रम आहे. जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांनी आवाज उठवलाच पाहिजे. मात्र राहुल यांना लाखोली वाहिली की पक्षात प्रमोशन मिळते, हे ठाऊक असल्यामुळेच राठोड याप्रकारची वक्तव्ये करत आहेत! फडणवीसदेखील राहुल गांधींना कोणी गंभीरपणे घेत नाही, असे पूर्वी म्हणाले होते. परंतु आता मोदींसह अवघ्या पक्षालाच राहुलजींना गंभीरपणे घेणे भाग पडले आहे.

'भाजपचे सरदार' अशी प्रशंसा करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची पूर्वी महाआरती केली. त्याची परतफेड करताना महाराष्ट्रात कधीच कोणी जी कामे करून दाखवली नाहीत, ती देवेंद्रने करून दाखवली, अशा आशयाचे उद्गार 'सरदार' शहा यांनी काढले. शहा यांनीच पवारांना ‘भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार’ असे म्हटले. नरेंद्र मोदी यांनी पवारांना ‘भटकती आत्मा’ असे म्हटले होते. उलट शरद पवारांसारखा मराठी माणूस पंतप्रधान झाला, तर आम्हाला आवडेल. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते. ‘आम्हाला बाळासाहेब हे वंदनीय आहेत’, असे म्हणायचे आणि बाळासाहेबांचे पवारांबाबतचे मत मात्र सोयीस्करपणे बाजूला ठेवायचे, ही महायुतीची कुटिलनीती आहे आणि या नीतीचा प्रणेता अर्थातच ‘नागपूरकर’ आहे!