Opinion

ढोकळा गाठिया सरकारचं करायचं काय?

मीडिया लाईन

Credit : Indie Journal

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचे कर्णधार आहेत आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री तेच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा दावा ठाण्याचे खासदार आणि शिंदेंचे खासमखास नरेश म्हस्के यांनी केला आहे. स्वत:चे १०५ आमदार असतानाही भाजपने आम्हाला मुख्यमंत्रीपद दिले. आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत, म्हणून आमचा रुबाब आहे. साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असे जर आपल्याला वाटत असेल, तर महायुतीचा उमेदवार ज्या कुठल्या पक्षाचा असेल, त्याचे काम करा, असे पोटतिडकीचे आवाहनही म्हस्के यांनी केले. कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत बोलताना त्यांनी हा दावा केला असला, तरी देखील यापूर्वी शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीनंतर आमचे नेतेच मुख्यमंत्री होतील, अशी शेखी मिरवली आहे...असो.

राजदीप सरदेसाई यांच्या नव्या पुस्तकात ईडी मुक्ततेसाठी महायुतीत प्रवेश केल्याची कबुली छगन भुजबळांनी दिली आहे. यात नवीन काही नसले, तरी 'अजून ही प्रकरणे बंद केलेली नाहीत', 'सर्व काही ईडी ही स्वायत्त यंत्रणा ठरवते आहे, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही' वगैरे बकवास देवेंद्र फडणवीसांपासून भुजबळ व प्रवीण दरेकरांपर्यंत सर्व युतीवाले इतके दिवस करत होते. 'ओबीसी असल्यामुळे मला त्रास दिला' असा आरोपही भुजबळांनी केला. मग अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, अजितदादांपासून अनेकांमागे तपास यंत्रणा लागल्या होत्या, त्यांची जात कोणती? धर्म कोणता? त्यांना त्रास देण्यात आला नाही का? असो. मात्र भुजबळांच्या कबुलीमुळे 'कर नाही, त्याला डर कशाला'? 'दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ दे ना' अशी फालतू बडबड करणाऱ्या भाजपवाल्यांच्या खोटारडेपणावर प्रकाश पडला आहे. तरीही भुजबळांनी गेली वर्ष, दोन वर्षे फडणवीसांवर स्तुतिसुमने उधळली होती, हे विसरता येणार नाही. आता निवडणुकांनंतर महायुतीची सत्ता येईल की नाही, याची शंका असल्यामुळे, नाशिकच्या या नटसम्राटाने महाविकास आघाडीच्या दिशेने पोल व्हॉल्टचा बादशहा सर्गे बुब्काप्रमाणे उडी मारण्याच्या दृष्टीने, स्टार्ट घ्यायला सुरुवात केलेली दिसते..! मात्र पवारसाहेब त्यांच्या नाटकाचा पाचवा अंक (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राकाँ अजित पवार गट) आपल्या अंगणात सुरू करू देतील, याची सुतराम शक्यता वाटत नाही! असो.

 

'ओबीसी असल्यामुळे मला त्रास दिला' असा आरोपही भुजबळांनी केला.

 

तिकडे भाजपने राज्यात विधानसभेसाठी १४८ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट हा महायुतीत आल्यामुळे, भाजपला जागावाटपात अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या, तरी भाजपने महायुतीतील मित्रपक्षांकडून आपले १७ उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना शिंदे पक्षाला १२, अजितदादा पक्षाला चार, तर आरपीआय आठवले गटाला एक उमेदवार भाजपने पुरवला आहे...२०१९ मध्ये भाजप-शिवसेना महायुतीत भाजपने १६४ जागा लढवल्या होत्या. त्यात यंदा १६ जागांची घट झाली असली तरी मित्रपक्षांना १७ उमेदवार देऊन भाजपने अप्रत्यक्षपणे आपली १६५ माणसे विधानसभेच्या रिंगणात असतील, याची सोय केली आहे! विशेष म्हणजे, मित्रपक्षांना १७ उमेदवार देताना, भाजपने आपल्या मित्रांकडून एकही उमेदवार आयात केलेला नाही! निलेश राणे, संजना जाधव-दानवे, राजेंद्र गावित, विलास तरे, संतोष शेट्टी, मुरजी पटेल, शायना एनसी, अमोल खताळ, अजित पिंगळे, दिग्विजय बागल, विठ्ठल लंघे, बळीराम शिरसकर आदी १२ भाजप उमेदवार शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवत आहेत. तर राजकुमार बडोले, प्रताप पाटील-चिखलीकर, निशिकांत पाटील, आणि संजयकाका पाटील हे चारजण राष्ट्रवादी दादा गटाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष अमरजीत सिंह हे आरपीआयच्या आठवले गटाकडून मुंबईच्या कलिना मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. अमरजीत हे कट्टर संघवाले आहेत. म्हणजे भीमशक्ती आणि संघशक्तीचे हा अपूर्व संगमच म्हणावा लागेल...

भाजपने एकनाथ शिंदे आणि अजितदादा या दोघांनाही गुडघ्यावर आणले आहे. मुख्यमंत्री शिंदे असले, तरीदेखील आम्ही सांगू तेच त्यांना ऐकावे लागेल, हे भाजपने सिद्ध करून दाखवले आहे. भाजपच्या सर्व निवडणूक प्रचार-जाहिरातींतून ‘भाजप महायुती’ असा उल्लेख असतो. म्हणजेच भाजपकडे नेतृत्व आहे, हे अधोरेखित करण्यात येत आहे. उलट शिंदे हे भाजपपेक्षाही मोठ्या प्रमाणात आपल्याच पक्षाची जाहिरातबाजी करत आहेत. त्यांच्याकडे उदंड पैसा आहे. भाजपच्या तोडीस तोड किंवा कदाचित जास्तच जाहिरात शिंदे गट करत आहे. शिंदे यांना सोन्याची खाण सापडलेली दिसते. भाजपकडे अदानी आहेतच, पण शिंदेंकडे त्यांचे लाडके बिल्डर अशर हेसुद्धा आहेत. ते दुबईतून सर्व सूत्रे हलवतात असे सांगण्यात येते. खरे-खोटे शिंदे यांचे कुलदीपक वैद्यकमहर्षी खासदार श्रीकांत शिंदे यांनाच काय ते ठाऊक!

 

उद्धवजींच्या करोना काळातील कामाचेदेखील शिंदे यांनी कौतुक केले होते.

 

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वासाठी आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपबरोबर गेलो, असे शिंदे म्हणत असतात. परंतु उद्धवजींनी हिंदुत्वाशी कोणतीही तडजोड केलेली नाही, असे शिंदेंनी स्वतःच एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितल्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. तसेच उद्धवजींचे सरकार उत्तमपणे काम करत असल्याची ग्वाहीही महाविकास सरकार असताना त्यांनी दिलेल्या मुलाखतीत दिली होती. उद्धवजींच्या करोना काळातील कामाचेदेखील शिंदे यांनी कौतुक केले होते. याचा अर्थ त्यांनी केवळ खोक्यासाठी गद्दारी केली, हे उघड आहे. प्रत्येक आमदाराला ५० कोटी, याचा अर्थ दोन हजार कोटी रुपयांचा सौदा झाला असावा. या कमाईखेरीज मुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्याचे अधिकार त्यांना मिळाले. अब्जावधी रुपयांची कंत्राटे त्यांनी दिली. त्यामुळे भाजपने दिलेले हे खोके काहीच नाहीत. आता शिंदे यांच्याकडे इतकी समृद्धी आली आहे की, ते भाजपच्या लोकांनाच खोके देऊ शकतात...

देवेंद्रजी उर्फ देवाभाऊ हे अजितदादांचे लाडके. साखर कारखान्याच्या विक्रीव्यवहारामुळे अजितदादा अडचणीत आले होते. या कारखान्यात सगळ्यात जास्त भागभांडवल दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे होते. सुनेत्राताईंना अटक होऊ शकते, असे सांगण्यात आले, म्हणून दादांना घाम फुटला, असे बोलले जाते. जरंडेश्वर प्रकरणात व अन्य काही बाबतीत माझ्या कुटुंबीयांची व बहिणींची चौकशी करून त्यांना त्रास देण्यात आला आहे, असे स्वतः दादांनीच महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री असताना म्हटले होते. परंतु दादांचे लाडके फडणवीस यांनी यातून त्यांना वाचवले. २०१४ ते २०१९ या काळात दादा विरोधी बाकावर असताना गुपचुप होते. कारण जास्त बडबड केली, तर जेलयात्रा होईल, हे त्यांना ठाऊक होते. शिंदे व त्यांच्या साथीदारांवर अनेक आरोप होते आणि यंत्रणांच्या कारवाया सुरू होत्या. शिंदे यांचे सचिव सचिन जोशी यांचीही चौकशी झाल्याच्या बातम्या होत्या.

मात्र बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ असल्यामुळे मी उद्धवजींची साथ सोडली, या शिंदे यांच्या युक्तिवादाचे स्क्रिप्ट देवाभाऊंनीच लिहिले होते. बघता बघता शिंदे हे ‘मराठ्यांचे नेते’ बनले. तर भुजबळ हे स्वतःला ‘एकविसाव्या शतकातील ज्योतिबा फुले’ समजू लागले. अजितदादांनी सत्तेशिवाय विकास होत नाही, म्हणून सतत सत्तेबरोबर राहायला हवे, असा सिद्धांत मांडला. राजकारणात कधी कधी विचारसरणीला मुरड घालावी लागते आणि म्हणून आम्हाला दादांबरोबर तडजोड करावी लागली, अशी ‘देववाणी’ यापूर्वी ऐकायला मिळाली होती. हवे तेव्हा हव्या त्या लोकांवर आरोप करायचे, ब्लॅकमेलिंग करायचे आणि मग ते आरोप पोटात घ्यायचे आणि वर विकासासाठी सर्व करावे लागते, अशी मांडणी करण्याची भाजपची पद्धत आहे. भ्रष्टतत्त्व आणि भ्रष्टकृती यांच्या या 'त्रिदेवी संगमातून' महाराष्ट्राची माती झाली आहे. 

 

काँग्रेसच्या चुका झाल्या नाहीत, असे नाही. परंतु आज महाराष्ट्र इतरांच्या तुलनेत उंच स्थानावर उभा आहे, त्याचे श्रेय मुख्यतः काँग्रेसचे आहे.

 

या पार्श्वभूमीवर, थोडे इतिहासात डोकावू. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र समितीने पहिली निवडणूक लढवली होती. निवडणुकीच्या दिवशी, म्हणजे ११ मार्च १९५७ रोजी ‘मराठा’च्या अंकात पहिल्याच पानावर समितीने मोठ्या माणसांचे आशीर्वाद मागितले होते. आशीर्वाद देताना सेनापती बापटांनी महाराष्ट्राच्या शिवशक्तीला तुमच्या मतांचे बिल्वपत्र वाहा, असे आवाहन मतदारांना केले होते. तर डॉ. बाबासाहेब जयकर यांनी आचार्य अत्रे यांना आशीर्वाद देताना, आपण भरघोस मतांनी निवडून या, अशी शुभेच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी आचार्य अत्रे, डॉक्टर नरवणे, कॉम्रेड पाटकर, एसएम जोशी प्रभृती विजयी झाले. सुलोचनाबाई मोदी यांचा दहा हजार मतांनी पराभव करून अत्रे निवडून आले. त्यांच्या अभिनंदनार्थ लोकांनी जंगी मिरवणूक काढली. चंदारामजी गर्ल्स हायस्कूल या मतमोजणी केंद्रापासून कोळीवाडी, फणसवाडी येथील गिरगाव निवडणूक समितीच्या कचेरीपर्यंत ही मिरवणूक वाजतगाजत नेण्यात आली.

मिरवणूक जात असताना ठिकठिकाणी सुवासिनींनी अत्रे यांना पंचारतीने ओवाळले आणि गुलाल उधळला. त्यात अत्रे अक्षरशः माखून निघाले. गिरगावात झालेल्या सत्काराला उत्तर देताना अत्रे म्हणाले, ‘आजचे हे माझे यश नसून, समितीचे यश आहे. काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला कदापि मिळणार नाही, असे उद्गार मोरारजी देसाई यांनी काढले. पण आम्ही त्यांना बजावून सांगतो की, आता मुंबईत आणि महाराष्ट्रात तुम्हाला यश मिळणार नाही’. १९५७ची निवडणूक हा एक अभूतपूर्व चमत्कारच होता. मुंबई-महाराष्ट्रातील मर्द मराठी मतदारांनी आपल्या हाती असलेल्या सार्वभौम सत्तेचे अस्त्र सोडून, सत्ताधाऱ्यांचा पराभव केला आणि संयुक्त महाराष्ट्र समितीला भरघोस यश मिळवून दिले. त्यावेळी मोरारजींच्या काँग्रेसच्या विरोधात अवघा महाराष्ट्र उभा राहिला होता. मात्र १९६० नंतर काँग्रेसने आपल्या परीने महाराष्ट्राच्या विकासासाठी ठोस पावले उचलली. काँग्रेसच्या चुका झाल्या नाहीत, असे नाही. परंतु उद्योग, प्रशासन, शिक्षण या सर्व बाबतींत आज महाराष्ट्र इतरांच्या तुलनेत उंच स्थानावर उभा आहे. त्याचे श्रेय मुख्यतः काँग्रेसचे आहे. आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या समवेत काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीत भक्कमपणे उभा आहे. आज काँग्रेसने पूर्णपणे महाराष्ट्रवादी भूमिका घेतलेली आहे. उलट मोरारजींच्या काळात काँग्रेसची जी भूमिका होती, ती आज मोदी-शहा यांची आहे. फडणवीस, शिंदे आणि अजित दादा यांना गुजराती भायांच्या अधीन राहावे लागत आहे. त्यामुळे या महाराष्ट्रद्रोही ढोकळा गाठिया सरकारला गाडायलाच हवे!