Opinion

भाजपचे शत्रुभावी राजकारण

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आधी मी आमदार झालो, पण ते दोघेही माझ्या मागून पुढे गेले, अशी टिप्पणी नुकतीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे. आमदार घेऊन आल्यावर शिंदे यांना मुख्यमंत्री करणार, असे सांगितले, तसे मला सांगितले असते तर अख्खा पक्षच घेऊन आलो असतो, असेही ते ठाण्यात बोलताना म्हणाले. हसत हसत का  होईना, पण आपल्या मनातील वेदना त्यांनी बोलून दाखवली. शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदरपासून आपण राजकारणात आहोत. तसेच त्यांच्या आधीपासून सत्तेवर होतो. पण ते माझ्या पुढे गेले, माझ्या अगोदर मुख्यमंत्री झाले. मी मात्र पाच पाच वेळा उपमुख्यमंत्री होत, तिथेच थांबलो आहे, अशी व्यथाही अजितदादांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. निमित्त होते, शिंदे यांच्या जीवनावरील ‘योद्धा कर्मयोगी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. वास्तविक शिंदे यांना ‘योद्धा’ म्हणणे म्हणजे गंमतच आहे...

देशात पक्षांतरे होऊ नयेत, म्हणून पक्षांतरविरोधी कायदा आला. त्यात दुरुस्त्याही झाल्या. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. काँग्रेसनेदेखील आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या पक्षांची सरकारे पाडली, फोडाफोडी केली. परंतु भारतीय जनता पक्षाच्या काळात या सगळ्या गोष्टीला प्रतिष्ठा मिळाली आहे. किंवा सरकारे ही पाडली जातातच, पक्षही फोडले जातात. आमदार इकडून तिकडे जातात त्यात विशेष ते काय? लोकांची कामे करायची, तर विरोधी पक्षात राहून उपयोग नाही, सत्तेतच जावे लागते, अशा विचारांची नवीन संस्कृती रुजवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. गमतीने का होईना, पण 'अख्खा पक्षच मी तुमच्याकडे घेऊन आलो असतो', असे अजितदादांनी म्हणणे, हे खरे तर दांभिकतेचेच प्रदर्शन आहे. तसेच 'मी कसा करेक्ट कार्यक्रम करतो, हे महाराष्ट्राला माहिती आहे', असे जेव्हा एकनाथ शिंदे म्हणतात, तेव्हा त्यालादेखील दांभिकताच म्हणा लागेल. जणू काही आपण स्वातंत्र्य चळवळीतच भाग घेत होतो, असा आभास ते उत्पन्न करीत आहेत. तर विरोधी पक्षाबरोबर जायचे आणि मग सत्ता स्थापन करायची, ही हिंमत शिंदे यांनी दाखवली, हेच खऱ्या अर्थाने त्यांना एका पुस्तकाचा नायक बनवते, अशी प्रशंसा फडणवीस यांनी त्या समारंभात केली. निष्ठा सोडलेल्यांनाच मखरात बसवण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या पाच वर्षात चोथा करण्यास मुख्यतः फडणवीस हेच जबाबदार आहेत.

शिवसेनेचा भगवा काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये विलीन झाला आहे, सेनेचे हिंदुत्व संपले आहे, अशी टीका नोव्हेंबर २०२० मध्ये देवेंद्रजींनी केली होती. नोव्हेंबर २०२० मध्येच कोल्हापुरात असताना शिवसेनेच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी राज्यमंत्री शंभूराज देसाई तेथे आले होते. त्यावेळी पत्रकारांनी देवेंद्रजींनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, विरोधी पक्षनेत्यास असे बोलावे लागते, पण त्यात काही तथ्य नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच निधी वाटपाबाबत कोणावरही अन्याय न करता, तिन्ही पक्षांना योग्यपणे सांभाळत उद्धवजी उत्तम प्रकारे राज्यकारभार करत आहेत, असे सर्टिफिकेटही देसाईंनी देऊन टाकले होते. परंतु दीड वर्षातच शंभूराजांची भूमिका बदलली आणि ते देवेंद्रजी व एकनाथजींची तारीफ करत, उद्धवजींवर टीकास्त्र सोडू लागले... आदित्य यांनी पाटणमध्ये गर्दी जमवत सभा तुफान यशस्वी करताच, शंभूराज अस्वस्थ झाले. यापेक्षा दुप्पट गर्दी मी जमवू शकेन, अशी गर्जनाही त्यांनी केली! माणसाने इतका त्रास कशासाठी करून घ्यावा? आदित्यने गर्दी जमवली, तुम्हीही जमवा. परंतु दादांप्रमाणेच शूंभूराजसुद्धा अस्वस्थ असतात...

मविआ आघाडीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 'भंगार' म्हणाले. पण सर्व पक्षांतील भंगार पडेल भावात भाजपनेच विकत घेतलंय की!

 

भाजपने महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये सुशांतचा पद्धतशीर उपयोग केला.

 

गेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी पाटण्यात दाखल झालेले मिस्टर ड्रायक्लीन उर्फ आपले देवेंद्रभैया म्हणाले होते की, 'सुशांत सिंग राजपूत या विषयाचा आम्ही राजकारणासाठी उपयोग करणार नाही'. परंतु 'बोले तैसा चाले' हेच मंजूर नसल्यामुळे, भाजपने महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये सुशांतचा पद्धतशीर उपयोग केला. महाराष्ट्रात शिवसेनेस अडचणी आणण्यासाठी आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी! सुशांतचा फोटो टाकून 'ना भुलेंगे ना भूलने देंगे' असे घोषवाक्य छापलेले मास्क आणि स्टिकर्स भाजपने वाटण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या बिहारच्या प्रदेशाध्यक्षांनीच ही मोहीम सुरू केली व त्याचे समर्थनही केले आहे. पार्टी विथ अ लॉट ऑफ डिफरन्स! आतादेखील सुशात व दिशा सॅलियनचे प्रकरण उकरून काढले जात आहे, कारण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत.

भविष्यात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणारच नाही असे मी सांगू शकत नाही, असे उद्गार चंद्रकांदादा पाटील यांनी दोन-तीन वर्षांपूर्वी काढले होते. हे ऑपरेशन यशस्वी झाले, तर 'भाजपची तत्त्वे आणि सिद्धांत मान्य असल्यामुळे कोणी जर येत असेल, तर त्याला आम्ही काय करणार! याला फोडाफोडी म्हणत नाहीत' असा रेडिमेड युक्तिवाद करण्याचेही ठरले होते. आणि चंद्रकांतदादा व देवेंद्रजींनी हे करून दाखवले...आणि काही दिवसांपूर्वी देवेंद्रजींनी काय काय गोष्टी करायला सांगितल्या, याचा गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्यानंतर, बावनकुळे म्हणाले की, विरोधकांनी संभ्रम निर्माण न करता, राज्याच्या विकासाचा विचार केला पाहिजे...

भाजपवाल्यांची एक गंमत असते. मविआ सरकार असताना गुन्हा झाला, तर ते सगळे नेते रस्त्यावर उतरून, टीव्हीवर येऊन दिवसभर आरडाओरड करत… आता त्यांचे सरकार आणि कार्यक्षम गृहमंत्री असताना उरणमध्ये एका तरुणीचा खून झाला, तरी विरोधी पक्ष गप्पे  आणि भाजपचेच नितेश राणेपासून दरेकर ते रुपाली चाकणकरपर्यंत लव्ह जिहादचा आरडाओरड करत आहेत. या घटनेचा मुस्लीमविरोधी प्रचारासाठी व्हॉट्सपवर केला जात आहे, कारण गुन्हेगार मुस्लिम आहे आणि या खून झालेल्या मुलीच्या तक्रारीवरून आरोपी यापूर्वीच तुरुंगात जाऊन आला होता व बाहेर आल्याबरोबर त्याने विटंबना करुन वाईट प्रकारे तिचा खून केलाय. वास्तविक यासाठी विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांना धारेवर धरले पाहिजे, तर इथे उलटच होतंय. खरे तर विरोधी पक्षांनी त्यांची शिकवणीच लावली पाहिजे!

 

मागे संभाजी भिडेंवरून विधानसभेत विरोधकांनी घेरल्यानंतर 'हे मतांचे राजकारण आहे' असे संतप्त उद्गार देवेंद्रजींनी काढले.

 

आत्मनिर्भर भारताचे नेते नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले की, त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्याची मुख्य संधी परनिर्भर एकनाथजींना मिळते आणि ते त्या संधीचा पुरेपूर फायदा उठवतात. त्यामुळे नाईलाजाने उपमुख्यमंत्री बनलेल्या विकासपुरुषाची मात्र कधीकधी ही संधी हुकते. त्यांचे दुःख आपण समजून घेतले पाहिजे...

तीन वर्षांपूर्वी 'एक धक्का और दो, शिवसेना भवन गिरा दो!' अशा आशयाची घोषणा देऊन, त्यानंतर  'मी असे म्हणालोच नव्हतो' असा खुलासा करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांना ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी 'डिमॉलिशन मॅन' (खैरनारांचा काळ आता मागे पडला) हा पुरस्कार देऊन त्यांचा सार्वजनिक सत्कार करावा, असे काहीजणांचे सरकारला कळकळीचे आवाहन होते. संस्कृतिपूजक पक्षातील ही नवी  संस्कृती पाहून, जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उर अगदी भरून येत असेल, नाही का? याच भाजपचे काही नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्या दिल्ली दौऱ्यानंतर, त्यांनी सोनिया गांधींपुढे लोटांगण घातले, वगैरे आरोप करत होते. उद्धवजी हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि आघाडीतील दुसऱ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्यास लाचारी असे कसे म्हणता येईल?

मागे संभाजी भिडेंवरून विधानसभेत विरोधकांनी घेरल्यानंतर 'हे मतांचे राजकारण आहे' असे संतप्त उद्गार देवेंद्रजींनी काढले. महापुरुषांबद्दल गलिच्छ बोलणे व धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांबद्दल प्रश्न विचारणे, म्हणजे मतांचे राजकारण? मग भाजपचे हिंदुत्वाचे राजकारण म्हणजे दुसरे काय आहे? आपण करतो ते दानधर्माचे, पुण्यवान राजकारण आणि इतरांचे तेवढे मताचे राजकारण का? किती हा गर्व! विरोधकांबद्दल किती हा शत्रुभाव!