Opinion

भाजपचाही 'व्होट जिहादच'!

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

बुधवार, २० नोव्हेंबर रोजी २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे मतदान आहे. १८ नोव्हेंबर रोजी प्रचार समाप्त होत असतानाच, एका प्रमुख वृत्तवाहिनीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत झाली. चित्रपटाचा क्लायमॅक्स महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे प्रचाराचा क्लायमॅक्सदेखील लोकांच्या लक्षात राहतो हे माहीत असल्यामुळे, हा स्पॉट आपल्यालाच हवा, असा आग्रह फडणवीसांनी धरला असणार आणि तो मान्य करणे वृत्तवाहिनीला भाग पडले असणार, हे स्पष्ट आहे. मुस्लिम धर्मगुरू नोमानी यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीकडे काही मागण्या केल्या आहेत आणि तो ‘व्होट जिहाद’ आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. वास्तविक नोमानी यांचा संबंधित व्हिडिओ कितपत खरा-खोटा, हे तपासावे लागेल. तसेच काँग्रेसने त्यांच्या मागण्या (ज्यात अतिरेक्यांना सोडण्याचीही मागणी आहे) मान्य केल्या आहेत, असे फडणवीसांनी ठोकून दिले आहे. फडणवीस व भाजपवर कोणाचाही विश्वास नाही. उलट भाजपला आसाम आणि गुजरातमधील निवडणुकांमध्ये उलेमा आणि मौलवींनी खुला पाठिंबा दिला होता, याकडे अखिल भारतीय काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी लक्ष वेधले आहे.

१९७७ साली नवी दिल्लीच्या शाही इमाम बुखारी यांनी जनता पक्षाला आपला पाठिंबा दिला होता. या जनता पक्षात जनसंघ विलीन झाला होता. त्याचप्रमाणे १९८९ साली व्ही. पी. सिंग सरकारलादेखील बुखारींनी समर्थन दिले होते. या सरकारला भाजपने बाहेरून आपला पाठिंबा दिला होता. ज्या पक्षाला व आघाडीला इमाम बुखारी यांनी पाठिंबा दिला होता, त्या पक्ष वा आघाडीतून भाजप बाहेर का पडला नाही? अथवा त्यांनी आपले समर्थन काढून का घेतले नाही? असेही प्रश्न विचारता येतील.

 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने ‘मोदीमित्र’ म्हणून असंख्य मुस्लिमांची नोंद करून घेतली.

 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने ‘मोदीमित्र’ म्हणून असंख्य मुस्लिमांची नोंद करून घेतली. मित्रमंडळींच्या लग्नात किंवा त्यांच्याकडे चहापानासाठी जाऊन भाजपने हिंदूंप्रमाणे मुसलमानांसाठीही कशा कल्याणकारी योजना राबवल्या आहेत, हे सांगण्याचे काम या ‘मित्रांनी’ केले. देशात असे किमान २५ हजार मुस्लिम ‘मोदीमित्र’ बनले होते. भाजपने मुसलमानांपर्यंत पोहोचण्यासाठी मुस्लिम आउटरीच स्ट्रॅटेजी बनवली होती त्यासाठी ६५ कळीच्या मतदारसंघांत मोदी सरकारची आर्थिक कामगिरी मुसलमानांपर्यंत पोहोचवण्यात आली. भारतात २० कोटी मुसलमान असून, त्यांची मते मिळवण्यासाठी भाजपने पद्धतशीर मोहिमा राबवल्या होत्या. अहमदाबादजवळ एका मुस्लिम ट्रस्टने इस्पितळ उभारले होते. दहा नोव्हेंबर २०१३ रोजी त्याच्या उद्घाटन समारंभात भाजपतर्फे पंतप्रधानपदासाठी निवडलेले उमेदवार नरेंद्र मोदी हे गेले होते. तेव्हा मुस्लिम धर्मगुरूंकडून मोदींचा आदर सत्कार झाल्याचा फोटो उपलब्ध आहे.

जेव्हा मोदी मुस्लिम मौलवींना भेटतात, त्यांच्या मशिदीत जातात किंवा इस्लामी देशात जाऊन त्यांच्या सुलतानांना जादू की झप्पी मारतात, तेव्हा ते लांगुलचालन नसते. मात्र हेच काँग्रेसच्या अथवा विरोधी पक्षांच्या पुढाऱ्यांनी केले, की ते मात्र मुस्लिमांचे तळवे चाटणे असते. पसमंदा मुसलमानांना आकर्षित करून घेण्यासाठी भाजपने ‘सूफी संवाद महाअभियान’ हाती घेतले होते. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी भाजपच्या मायनॉरिटी मोर्चाने लखनऊ येथे १०० दर्ग्यांमधील २०० सूफींना तेथे एकत्र आणले होते.

गुजरात दंगलीनंतर मुसलमान भाजपपासून आणखी दूर गेले. तेव्हा २००९ ते २०१४ या काळात भाजपने गुजरातमध्ये सुन्नी मुस्लिमांना आपल्या दिशेने खेचण्यासाठी ‘सद्भावना मिशन’ हाती घेतले होते. २०१३ मध्ये ‘जमायत उलेमा ए हिंद’चे महमूद मदानी यांनी मोदींची प्रशंसा करण्यास सुरुवात केली. आधी ते मोदींचे टीकाकार होते.

२०१४ साली भाजपच्या मुस्लिम सदस्यांची संख्या सव्वा लाख होती. आज ती दोन लाख ३५ हजारांच्या वर गेली आहे. यामध्ये सर्वाधिक सदस्य हे उत्तर प्रदेशातील असून, त्यांची संख्या ८१ हजार आहे. देशभरातील मुसलमानांचे मदरसे आणि दर्ग्यांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून, ही सदस्यसंख्या वाढवली जात आहे. त्यासाठी जमायत उलेमा ए हिंद आणि उलेमा फाउंडेशनची मदत घेतली जात आहे. मोदी सरकारच्या व भाजपशासित राज्य सरकारांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करताना, अमुक व्यक्ती मुस्लिम धर्माचा आहे, म्हणून त्यास लाभ दिला जात नाही. असे आम्ही करत नसल्याचा युक्तिवाद भाजपतर्फे नेहमीच केला जातो. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच पद्धतीने बोलत असतात. मात्र जात व धर्माच्या आधारावर असा भेदाभेद करता येत नाही. त्यामुळे त्यात सरकार मुसलमानांवर काही उपकार करत आहे, असे मानण्याचे कारण नाही!

 

गेल्यावर्षी भाजपने ‘मोदी भाईजान’ प्रचारमोहीम हाती घेऊन, मुसलमानांमधील मोदींची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला.

 

लोकनीती-सीएसडीएसच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या पाहणीनुसार, मुस्लिम मतांमधील काँग्रेसचा वाटा कुंठितावस्थेत राहिला होता. तर भाजपचा वाटा २००९ मध्ये चार टक्के होता, तो २०१४ साली नऊ टक्के झाला. काँग्रेसचा वाटा २००९ मध्ये ३८ टक्के होता आणि २०१४ मध्येही हा आकडा तेवढाच होता. २०२१ मधील प्यू रिसर्च सेंटरच्या पाहणीनुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत १९ टक्के मुसलमानांनी भाजपला मत दिले होते. केरळमध्ये मलप्पुरम येथील एम. अब्दुल सालेम यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपचे लोकसभा निवडणुकांतील एकमेव मुस्लिम उमेदवार होते. तर पक्षाचे आमदार आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू तारीक मन्सूर यांना भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीवर घेण्यात आले.

गेल्यावर्षी भाजपने ‘मोदी भाईजान’ प्रचारमोहीम हाती घेऊन, मुसलमानांमधील मोदींची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला. २३ लोकसभा मतदारसंघांतील चार हजार १०० गावांमध्ये ‘कौमी चौपाल’चे आयोजन करण्यात आले. तसेच उत्तर प्रदेशातील २७ जिल्ह्यांमध्ये भाजपने पसमंदा मुस्लिम मतदारांना पक्षाच्या जवळ आणण्यासाठी ‘स्नेहयात्रा’ आयोजित केल्या. २०२३ साली उत्तर प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपने ३९५ मुस्लिम उमेदवार उभे केले होते. आसाममध्ये भाजपने मुस्लिम अनुनय सुरू केला आहे, अशी जाहीर टीका भाजपचेच तेथील माजी प्रदेशाध्यक्ष आणि चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले माजी केंद्रीय मंत्री राजेन गोहेन यांनीदेखील अलीकडेच केली होती.

मुसलमानांनी भाजपला मतदान केल्यास, मुस्लिम व्यक्तीला खासदार किंवा मंत्री केले जाईल, असे उद्गार नुकतेच पुण्याच्या दौऱ्यात केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याकमंत्री किरण रिजिजू यांनी काढले आहेत. म्हणजेच मुसलमानांनी भाजपला मतदान केले नाही, तर त्यांना सत्तेत संधी मिळणार नाही, असा अप्रत्यक्ष दमच त्यांनी भरला आहे.

 

भाजप आतापर्यंत मुस्लिमांकडे पूर्ण दुर्लक्ष करत होता.

 

तारीक मन्सूर हे अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू असतानाच रा. स्व. संघाशी जोडले गेले होते. दारा शिकोहच्या कामगिरीचा शोध घेण्याची संकल्पना त्यांनीच मांडली. त्यांची संकल्पना भाजपाला आवडली आणि त्यामुळेच त्यांचा संघटनेत समावेश करण्यात आला. त्यांच्या कुलगुरुपदाच्या काळात अलीगढ मुस्लिम विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात निदर्शने झाली होती. त्यानंतर प्रथमच पोलीस या विद्यापीठाच्या परिसरात आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे न राहिल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. परंतु त्यामुळे ते भाजपच्या पसंतीस उतरले. मुख्तार अन्सारी आणि शहानवाज हुसैन यांच्यानंतर भाजपला आणखी एका मुस्लिम लोकप्रतिनिधीची गरज होती. पसमंदा मुस्लिमांमध्ये पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी मन्सूर काम करतील, अशी अपेक्षा आहे.

भाजप आतापर्यंत मुस्लिमांकडे पूर्ण दुर्लक्ष करत होता. पण आता हळूहळू मुस्लिमांमध्येही चंचुप्रवेश करण्याचा त्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. केरळमधील अब्दुल्ला कुट्टी यांनाही भाजपच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. केरळमध्ये जनाधार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी नकवी यांनाही ते उत्तर प्रदेशात शिया मते खेचून आणतील, या अपेक्षेनेच कार्यकारिणीत घेण्यात आले होते. नकवी यांनी एकदा रामपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली. परंतु तेव्हा संघ आणि विहींपने सर्व हिंदू मते त्यांच्या बाजूने जावीत, यासाठी खूप मेहनत घेतली होती.

सरसंघचालक मोहन भागवत मध्यंतरी नवी दिल्लीत मशीद आणि मदरसे अशा दोन्ही ठिकाणी गेले होते. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तर, मला ‘आशीष कुरेशी’ असे म्हटले तरी चालेल, असे उद्गार मुसलमानांना दृढालिंगन दिल्यानंतर काढले होते. थोडक्यात, आम्ही काहीही केले तरी चालते. परंतु विरोधकांनी तेच केले, तर  ‘कॅरेक्टर ढीला आहे’ असे म्हणायचे, हा भाजपचा अव्वल दर्जाचा ढोंगीपणाच आहे.