Opinion

भाजपची स्क्रिप्ट!

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

संविधान बदलाची चर्चा करणे हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे, असे उद्गार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काढले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा मिळवून भाजपला संविधान बदलायचे आहे, अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे. त्यामुळे विशेषतः दलित समाजात अत्यंत अस्वस्थता निर्माण झाली आहे. संविधानाला धोका अगोदरच निर्माण झाल्याचे अनेक दाखले देता येतील. मुळात लोकशाही आणि संविधान यांचा मूळ गाभा लक्षात घेऊन मोदी सरकार काम करत असल्यचे गेल्या दहा वर्षांत दिसून आलेले नाही. म्हणून संविधानात बदल केला जाणार, अशी आशंका व्यक्त कली जात असून, त्याबद्दलच जाब विचारणे, हे आठवले यांना शोभून दिसणारे नाही. परंतु भाजपची गुलामी स्वीकारल्यामुळे ते याप्रकारे बोलत आहेत. या संदर्भात पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांनी खुलासे करूनही उपयोग होत नाही, असे बघून भाजपने लगेच आठवले यांना पुढे केले आहे.

हिंदू महिलांचे मंगळसूत्रदेखील काँग्रेस हिसकावून घेईल आणि जास्त अपत्ये जन्माला घालणाऱ्यांना, म्हणजेच मुसलमानांना ते देईल, असे उद्गार प्रचारसभेत काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटारडेपणा केला आणि प्रचाराची पातळी खाली आणली. साक्षीमहाराज, साध्वी प्राची वगैरे मंडळी ज्या शैलीत बोलतात, तसेच मोदी आता बोलू लागले आहेत. दलित आणि आदिवासींचे आरक्षण हिरावून घेऊन, ते मुसलमानांना दिले जाईल, अशी आवईही मोदींनी उठवली. धर्म आणि जातीवरून देशाचा पंतप्रधानच भांडणे लावत आहे.

दुसरीकडे, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत प्रचार करता येऊ नये, यासाठी आरोपांच्या चक्रात अडकवून तुरुंगात टाकण्यात आले आहे. केजरीवाल यांनी तुरुंगात आपल्याला इन्सुलिन दिले जात नसल्याची तक्रार केली होती. रक्तातील साखर वाढवण्यासाठी ते जेलमध्ये मुद्दाम आंबा आणि मिठाई खात आहेत, त्यामुळे प्रकृती बिघडून जामीन मिळावा, असा त्यांचा हेतू असल्याचा भन्नाट आरोप ईडीने न्यायालयात केला. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचारगीतात असलेले हिंदू आणि भवानी हे दोन शब्द काढून टाकण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. एकूण विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई आणि सत्ताधाऱ्यांच्या विद्वेषी प्रचाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष, असे सर्व सुरू आहे. राज्यघटनेबद्दलचा सत्ताधाऱ्यांचा हा आदर म्हणायचा का? राजकारणाची एकूण पातळीच कमालीची घसरत चालली आहे.

‘दुनिया वेड्यांचा बाजार, झांजिबार झांजिबार झांजिबार’ हे गाणे आज आठवले. 'पेडगावचे शहाणे' मध्ये हे गाणे आहे आणि ते गदिमांनी लिहिलेले आहे. हे गीत मला आठवण्याचे कारण काय? - तर 'खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे', असे उद्गार जळगावचे जादूगार गिरीश महाजन यांनी मध्यंतरी काढले होते. आता हे खडसेच भाजपत गेल्यामुळे महाजनांची पंचाईथ झाली आहे... सत्ता गेल्यानंतरही आणि त्यांच्या स्वतःच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न अजून पूर्ण व्हायचे असूनदेखील, देवेंद्रजींचे हे शिष्योत्तम उत्तम मनस्वास्थ्य बाळगून आहेत. यापूर्वी संजय राऊत यांच्यापासून ते चंद्रकांतदादापर्यंत आणि गोपीचंद पडळकर यांच्यापासून ते नानाभाऊ पटोले यांच्यापर्यंत कोणाकोणाबद्दल कोणीकोणी, कोणकोणती वक्तव्ये केली होती, ते एकदा आठवा! त्या सगळ्यांचा मिळून हिशोब केला, तर जवळजवळ सगळ्याच नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याबद्दल त्यांच्या त्यांच्या विरोधातील नेत्यांनी आरोप केल्याचे आढळते! अशा सर्व कथित 'असंतुलित' नेत्यांनी मिळून जनतेला शहाणपण शिकवण्याचा वसा घेतला आहे, हे कित्ती कित्ती छान ना! दुनिया.. झांजिबार झांजिबार झांजिबार...

 

ठाकरे सरकार असताना आलेल्या अहवालात, ज्या राज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, त्यात महाराष्ट्राचाही समावेश होता.

 

महाविकास आघाडी होण्यात पडद्याआडून व पडद्यापुढून खासदार संजय राऊत यांनी उत्तम जबाबदारी पार पाडली होती. त्याचप्रमाणे मविआ फुटू नये म्हणून 'सामना'मधून आणि पत्रकार परिषदांद्वारे त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम पार पाडले. परंतु अनेकदा ते मर्यादा ओलांडतात, हेही नाकारता येणार नाही. अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना ‘नाची’ असे संबोधून त्यांनी समस्त महिलांचाच अपमान केला. आपल्या पक्षात ऊर्मिला मातोंडकर होत्या, हेदेखील त्यांना आठवले नाही. नवनीत किंवा ऊर्मिला असोत, या कलाकार आहेत. कलाकारांबद्दल तुच्छतायुक्त उद्गार काढणे, हे चुकीचे आहे. भाजपचे अनेक नेते सौजन्याने बोलल्यचा आव आणतात, परंतु त्यांचा गर्व अधूनमधून डोकावत असतो.

फक्त मलाच उत्तमपणे राज्य चालवता येते, असे श्रीमान गर्वेंद्र ऊर्फ देवेंद्र फडणवीस भले म्हणोत किंवा मुख्यमंत्रिपद समर्थपणे केवळ मीच सांभाळू शकत होतो, असा दावा श्रीमान सूक्ष्मजीवी नारायण राणे हे करत असत. महाविकास सरकारने एकही काम केलेच नाही, असे महाप्रवीण नेता, म्हणजेच आमदार प्रवीण दरेकर रोजच्या रोज सांगत होते. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री म्हणून कर्तृत्व काय, असा सवाल काही दिवासांपूर्वी फडणवीस यांनी केला होता. परंतु तज्ज्ञांचे मत वेगळेच आहे! स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी ठाकरे सरकार असताना सादर केलेल्या अहवालात, ज्या राज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, त्यात महाराष्ट्राचाही समावेश केला होता. तेव्हा देशाच्या तुलनेत ज्या राज्यांच्या जीडीपीची वाढ अधिक होती, त्यामध्ये देखील महाराष्ट्राचा समावेश होता. महाराष्ट्राने सवंग आर्थिक धोरणे राबवलेली नाहीत. राजस्थान आणि पश्चिम बंगाल या विरोधी पक्षांच्या हातात असलेल्या राज्यांची जीडीपी वाढही चांगली आहे. म्हणजे केवळ जगातील सर्वात मोठ्या 'सुसंस्कारी' पक्षाच्या हाती सत्ता असली, तरच विकास होतो, असा कितीही प्रचार केला, तरी वस्तुस्थिती निराळी होती व आहे!

मात्र ही मंडळी सातत्याने असत्य बोलत असतात. उदाहरणार्थ, बेकायदेशीररीत्या मला स्थानबद्ध केले नि माझा छळ करण्यात आला, असा आरोप मागे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केला होता. तो ट्रायल कोर्टाने तसेच हायकोर्टानेच फेटाळून लावला होता, कटू असले, तरी हे वास्तव आहे. बाबरी मशिदीचा ढाचा मीच पाडला, असेही राष्ट्रभक्त साध्वी अभिमानाने म्हणाल्या. पण तेव्हा त्या केवळ चार वर्षांच्या होत्या. बघा, बालवयापासून साध्वीजींचे राष्ट्रकार्य कसे सुरू होते ते! मूर्ती लहान, पण कीर्ती महान!

बालाकोट हल्ल्याचे श्रेय घेण्यात आणि सैनिकांच्या नावावर मते मागण्यात पंतप्रधानांची काहीच चूक नसल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. आधी हे लोक म्हणत होते की, आम्ही श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही. दोन्हीतले खरे काय? या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यात ही मंडळी बघा कशी तरबेज आहेत!

 

भाजपकडे इतके बदाबदा पैसे आले कुठून हे मीडिया का विचारत नाही?

 

मी जे बोलतोय ते खरं तर मीडियाने बोलायला पाहिजे... भाजपकडे इतके बदाबदा पैसे आले कुठून हे मीडिया का विचारत नाही? 'आज साहित्यिक गप्प का?' असा रोखठोक सवाल पाच वर्षांपूर्वी मुलाखतीत राज ठाकरे यांनी केला होता. आज मात्र ते त्याच भाजपबरोबर गेले असून, मोदीस्तुती करत आहेत... काळानुसार नेत्यांची भाषा कशी बदलते, ते बघा. बारामतीची लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी असल्याचा सिद्धांत देवेंद्रजींनी मांडला. आणि आता भाजपने आखून दिलेल्या त्याच लाइननुसार राष्ट्रवादी सिंचन गटाचे सर्व नेते आता तीच भाषा बोलत आहेत... बारामतीच्या लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांनी तशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. भाजपच्या इशार्‍यानुसार शिंदे यांचा समृद्धी गट आणि दादांचा सिंचन गट यांना वागावे आणि बोलावे लागत आहे. त्यांना स्वतःचे मत नाही, अस्तित्वही नाही!

राहुल गांधी हे क:पदार्थ आहेत, असे भाजपचे मोदींपासून ते ग्रामपंचायत पातळीवरच्या नेत्यांपर्यंत सर्वजण दाखवत असतात. मग अचानक बारामतीमध्येच ते राहुल गांधींना महत्त्व का देत आहेत? बारामतीत राहुलजी किंवा काँग्रेसचा उमेदवार उभा आहे का? पवार विविध पवार या लढाईत काकांपुढे आपली शून्य किंमत आहे, हे महायुतीच्या नेत्यांना ठाऊक आहे. म्हणूनच काकांचे नावच घ्यायचे नाही! त्यांची सहानुभूती वाढायला नको! म्हणून राहुल गांधींचे नाव पुढे करायचे, अशी ही कपटनीती आहे. मात्र ही नीती बारामतीकर नीटपणे ओळखून आहेत! आता शरद पवार आणि दाऊद, हा विषय अजितदादांनीच काढला असल्यची बातमी असून, महाशक्तीच्या स्क्रिप्टनुसारच सर्व सुरू आहे. आता एक जुना किस्सा.

भाजपचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांनी जेव्हा ते खासदार नव्हते, तेव्हा देखील एक बंगला स्वतःच्या ताब्यात ठेवला होता. तसेच संबित पात्रा हे देखील अधिकार नसताना अशाच पद्धतीने एका बंगल्यात राहत होते, अशा आशयाची आरोपवजा माहिती साकेत गोखले यांनी माहिती अधिकाराच्या कक्षेत २०२० मध्ये मिळवली होती. मध्य प्रदेशमधील भाजपची सत्ता गेल्यानंतरही काही नेते मिळालेले सरकारी बंगले सोडता सोडत नव्हते. तेव्हा काँग्रेसचे कमलनाथ हे मुख्यमंत्री झाले होते. पण मध्य प्रदेशमधील काही भाजप नेत्यांना घर सोडण्याची नोटीस मिळताच, त्यांनी आपल्या गृहस्वातंत्र्यावर आघात होत असल्याचा टाहो फोडला होता! पूर्वीच्या काळात काँग्रेस व इतर पक्षाच्या नेत्यांनी बेकायदेशीरपणे घरे ताब्यात ठेवली होती. पण भाजप सोडून इतर सारे पक्ष हे सरतेशेवटी नीतिभ्रष्ट पक्ष... मात्र चारित्र्यसंपन्न अशा भाजपवाल्यांकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर, राहुल गांधी यांनी मात्र आपला सरकारी बंगला रिकामा केला. त्यावेळी मोदी सरकारने लबाडी करून त्यांचे खासदारपद घालवण्याचा प्रयत्न केला होता. राहुलजींना बंगल्यातून बाहेर हुसकावण्याचा विकृत आनंद त्यांना घ्यायचा होता. अर्थात दुर्दैवाने त्यांचा तो आनंद तात्पुरताच ठरला आणि राहुलजींना बंगला वगैरे कोणताही मोह नाही. तरीही मोदीजी रोजच्या रोज त्यांची बदनामी आणि टिंगलटवाळी करण्यात मग्न आहेत...