Opinion
हास्याचा गोवर्धन!
मीडिया लाईन सदर
कुठला कोण राजस्थानचा गोवर्धन असरानी... तिथून सिनेमात कारकीर्द करण्यासाठी मुंबईला येतो आणि तिथे प्रशिक्षण घेण्याचा सल्ला मिळाल्यानंतर पुण्याला येतो. पुण्यात शिकतो आणि त्याच फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतोदेखील. चित्रपटांत काम मिळण्यासाठी प्रचंड संघर्ष करतो. कधीही निराश होत नाही. वैतागून आपल्या गावी परत जात नाही...
असा हा असरानी शांतपणे मृत्यूला सामोरे गेला. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपली अंत्ययात्रा देखील जंगी व्हावी, अशी अनेकांची इच्छा असू शकेल. परंतु कोणालाही न सांगता, गर्दी न जमवता, आपल्याला या जगाचा निरोप घ्यायचा आहे, असे असरानीने कुटुंबीयांना सांगून ठेवलेले होते, असे कानी आले. जगाला हसवणाऱ्या असरानीला, आपला निश्चेष्ट देह पाहून चाहते शोकाकुल होतील याची कल्पना होती... 'छोटी सी बात', 'रफूचक्कर', 'पती पत्नी और वो', 'आज की ताजा खबर', 'चुपके चुपके', 'छोटी सी बात', 'शोले' अशा अनेक चित्रपटांमुळे असरानी करोडो लोकांच्या कायम स्मरणात राहील...
'छोटी सी बात', 'रफूचक्कर', 'पती पत्नी और वो', 'आज की ताजा खबर', 'चुपके चुपके', 'छोटी सी बात', 'शोले' अशा अनेक चित्रपटांमुळे असरानी करोडो लोकांच्या कायम स्मरणात राहील...
असरानीला यश खूप उशिरा मिळाले. १९६० ते ६२ असे दोन वर्ष तो जयपूरमध्येच अभिनयाचे धडे गिरवत होता आणि त्याचवेळी तो ऑल इंडिया रेडिओमध्ये व्हॉइस आर्टिस्ट म्हणूनही काम करत होता. त्या पैशातून त्याने स्वतःच्या शिक्षणाचा खर्च केला. मुंबईत करिअर करण्यासाठी तो गेला आणि किशोर साहू व ऋषिकेश मुखर्जी या दिग्दर्शकांना भेटला. त्यांनी त्याला अभिनयाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. १९६४ साली असरानीने फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि १९६६ पर्यंत हा कोर्स पूर्ण केला. फिल्म इन्स्टिट्यूटची स्थापना १९६० साली झाली आणि चार वर्षांनीच असरानी त्या संस्थेत गेला. मी त्याला 'उजाला' या शम्मी कपूरच्या चित्रपटातील प्रार्थनागीतात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून प्रथम पाहिले. परंतु १९६७ साली 'हरे कांच की चूडियाँ' या चित्रपटात नायक विश्वजीतच्या मित्राची भूमिका त्याने केली होती. त्याच वर्षी एका गुजराती चित्रपटात नायक होण्याची त्याला संधी मिळाली. १९६७ ते १९६९ या काळात असरानीने गुजराती चित्रपटांतच काम केले.
'उमंग' या सुभाष घई नायक असलेल्या चित्रपटात देखील असरानी होता. मात्र १९७१ हे वर्ष असरानीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यावर्षी मेरे अपने, गुड्डी आणि सत्यकाम हे त्याचे तीन चित्रपट आले. 'गुड्डी' मध्ये चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या असफल स्ट्रगलरचे काम असरानीने अत्यंत वास्तव पद्धतीने केले. खरे तर या चित्रपटाच्या शीर्षक भूमिकेसाठी हृषिदा पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी असरानी उत्सुक होता. आपल्याला त्यांनी रोल द्यावा अशी त्याची इच्छा होती. परंतु हृषिदांनी 'जया भादुरी कोण आहे?' असे असरानीलाच विचारले. तेव्हा आपण कसे खट्टू झालो होतो, याची गमतीदार आठवणही त्याने सांगितली होती...
'सत्यकाम' या चित्रपटात 'जिंदगी है क्या बोलो जिंदगी है क्या?' या गाण्यात असरानीला पुरेपूर संधी देण्यात आली आहे. त्यात त्याने जबरदस्त एक्सप्रेशन्स दिली आहेत. 'मेरे अपने'त शत्रुघ्न सिन्हा, डॅनी, पेंटल, असरानी हे सर्व फिल्म इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी होते. हा इंद्र मित्र यांच्या कथेवरचा चित्रपट आणि तपन सिन्हा यांच्या 'आपनजन' या बंगाली चित्रपटावर आधारलेला होता. मात्र त्यातील पोरसवदा विद्यार्थ्यांचे काम असरानीने प्रभावीपणे केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सारे फिल्म इन्स्टिट्यूटवाले एकत्र राहिले आहेत आणि आपण मात्र बाजूला पडलो आहोत, अशी विनोद खन्नाची भावना झाली होती... 'बावर्ची', 'अभिमान', 'जुर्माना', 'चुपके चुपके' अशा हृषिदांच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात असरानीसाठी चांगला रोल राखीव असे.
मुळात असरानीला वाचनाचा आणि पटकथा लेखनाचा शौक होता.
'शोले' मधील जेलरच्या रोलसाठी असरानीने हिटलरच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि भाषणांचा चांगला अभ्यास केला होता. मुळात असरानीला वाचनाचा आणि पटकथा लेखनाचा शौक होता. अलीकडच्या काळातही तो वाचत असे. 'व्हाॅट्सअप' नावाचे विश्वविद्यापीठ आहे हे देखील त्याच्या गावी नव्हते... राजेश खन्नाबरोबर त्याची जोडी जमली आणि उभयतांनी पंचवीस एक चित्रपटांत काम केले. असरानीने डी.रामा नायडू, बी.आर चोप्रा, के.बापय्या, दासरी नारायणराव, राघवेंद्र राव, शक्ती सामंता, बासू चटर्जी अशा नामवंत दिग्दर्शकांच्या चित्रपटांत काम केले.
मात्र १९६४ पासून सलग सहा वर्षे असरानी पुण्याहून डेक्कन क्वीनने मुंबईला जाऊन सिनेमात काय मिळते का, हे पाहण्याचा प्रयत्न करत होता. या काळात त्याने फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक म्हणून देखील काम केले. त्यावेळी डेक्कन क्वीनचे तिकीट सहा रुपये आणि सहा आणे होते!
हृषिदांच्या चित्रपटांतील असरानी हाच त्याच्या अन्य चित्रपटांच्या तुलनेत सर्वाधिक लक्षात राहणारा आहे. कारण तशा प्रकारची चांगली कॅरेक्टर्स त्यांनी त्याला दिली. मी स्वतः हृषिदांना भेटलो आहे आणि माझ्याजवळ देखील त्यांनी असरानीचे कौतुक केले होते. शेवटच्या काळात हृषिदांना भेटण्यासाठी असरानी गेला होता, तेव्हा एका चिठ्ठीवर हृषिदांनी 'असरानी मुखर्जी' असे लिहून ती चिठ्ठी त्याच्या हातात दिली. त्याचा अर्थ 'तू मला माझ्या मुलासारखा आहेस', असा होता...
'बावर्ची'च्या सेटवर असरानीची राजेश खन्नाशी ओळख झाली. त्यावेळी त्याच्याभोवती लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि पत्रकारांचा गराडा असे. त्यानंतर 'नमकहराम' चित्रपटात असरानीने राजेश व अमिताभबरोबर काम केले. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी राजेश खन्ना आपण फार मोठे सुपरस्टार आहोत, अशा थाटात वावरत होता. आणि तो व अमिताभ यांच्यात एक प्रकारचा तणाव होता, अशी आठवण असरानीने एकदा सांगितली होती. हृषिदांनी माझ्याशी बोलताना देखील त्याचा उल्लेख केला होता. या चित्रपटात राजेश खन्नाचा मृत्यू होतो, त्यामुळे त्याला सहानुभूती मिळेल असे वाटून अमिताभ नाराज झाला होता... मात्र 'नमकहराम'मध्ये राजेश खन्नाला-सोमूला मारहाण केली जाते, तेव्हा अमिताभने प्रचंड संताप व्यक्त करणारे जे दृश्य दिले होते, त्यामुळेच राजेशपेक्षा अमिताभच गाजला आणि त्याला 'जंजीर' मिळाला.
त्यानंतर 'अनुरोध" या चित्रपटात असरानीने राजेश खन्ना बरोबर काम केले, तेव्हा त्याचे नैराश्य असरानीने जवळून पाहिले. जया ही इन्स्टिट्यूटपासून असरानीची मैत्रीण. मुंबईत असरानी आणि जया एकाच इमारतीत राहत असत. अमिताभच्या आधी जयाचे नाव झाले होते. परंतु जयाने कधीही त्याच्या नावाची कुठे शिफारस केली नाही आणि अमिताभनेही तशी इच्छा बाळगली नसल्याचे असरानी सांगत असे. अमिताभ आणि जयाच्या लग्नात तिचे मानलेले भाऊ म्हणून असरानी, गुलजार, रमेश बहल व तिचा एक चुलत भाऊ हे हजर होते. खरे तर असरानी हा जयाचा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षकही होता. '
शोले'मध्ये 'हम अंग्रेजों के जमाने के जेलर है' असे म्हटल्यानंतर असरानी 'हा हा' करतो ही स्टाईल त्याने जॅक लेमनच्या 'द ग्रेट रेस' या चित्रपटातील भूमिकेवरून उचलली होती
शोले'मध्ये 'हम अंग्रेजों के जमाने के जेलर है' असे म्हटल्यानंतर असरानी 'हा हा' करतो ही स्टाईल त्याने जॅक लेमनच्या 'द ग्रेट रेस' या चित्रपटातील भूमिकेवरून उचलली होती, हे फार कमी लोकांना माहिती आहे. असरानी आणि किशोरकुमार यांचे मैत्र होते. कोलकत्ता येथील किशोरकुमार नाइटमध्ये असरानीने अँकर म्हणून कामगिरी बजावली होती. १९७४मध्ये एक गुजराती चित्रपट त्याने दिग्दर्शित केला आणि त्यात कामही केले होते. त्यातले पार्श्वगायन किशोरकुमारने केले होते. १९७७ साली असरानीने 'चला मुरारी हिरो बनने' हा चित्रपट दिग्दर्शित केला. तो चित्रपट मी पुण्यात प्रभात चित्रपटगृहात पाहिला होता आणि त्यात फक्त मी आणि आणखीन दोघेजण हजर होते! या चित्रपटाची पटकथा घेऊन असरानी त्याकाळचे प्रसिद्ध निर्माते गुलशन राय यांच्याकडे गेला होता. तेव्हा, 'तू या भानगडीत पडू नकोस', असा त्यांनी सल्ला दिला याचे कारण आय एस जोहर, मेहमूद, जॉनी वॉकर, देवेन वर्मा यांनी जेव्हा दिग्दर्शक बनण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कलाकार म्हणून त्यांची विश्वासार्हता संपली, असे राय यांचे मत होते. तरी देखील त्याने आणखी काही सिनेमे काढले आणि ते पडले देखील! त्याची पत्नी मंजू अभिनेत्री म्हणून यशस्वी झाली नाही.
'कोशिश' मधील असरानीचा भावाचा रोल हा नकारात्मक आहे आणि तो त्याने फार छान पद्धतीने रेखाटला. एल व्ही प्रसाद यांच्या 'बिदाई' मध्ये एक हिप्पी आणि एक खेडवळ माणूस असा डबल रोल त्याने केला. हृषिदांच्या 'चैताली' या चित्रपटात सतत बिडी पिणारा असरानी बघायला मिळाला. तो रोलही वेगळा होता. बी.आर. चोप्रा यांच्या 'निकाह' या चित्रपटात असरानीने पूर्वीचा प्रसिद्ध अभिनेता याकूब याच्या शैलीत कव्वाली सादर केली आहे.
पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अतिथी व्याख्याते म्हणून अव्वल अभिनेता मोतीलाल येत असे. एकदा असरानीचे काम पाहून त्याने त्याला विचारले की, असरानी, तू सतत चित्रपट बघतोस का? तेव्हा असरानी 'हो' म्हणाला. त्यावेळी मोतीलाल म्हणाला की, तू राजेंद्रकुमारचे सिनेमे बघून त्याची नक्कल करतो आहेस. ते ऐकून असरानीला धक्का बसला. 'जे काय करायचं असेल, ते तू तुझे स्वतःचे कर' असा सल्ला मोतीलालने दिला आणि मग तो त्याने अमलात आणला. हृषिदा, गुलजार आणि बासू चटर्जी यांनी असरानीच्या अभिनयास पैलू पाडले. नैसर्गिक अभिनय कसा करायचा ते त्याला या दिग्दर्शकांच्या छायेत अधिक उमगले. असरानीने प्रियदर्शनच्या चित्रपटांत छोटे छोटे रोल्स केलेत, ते देखील खूप भारी आहेत.
नैसर्गिक अभिनय कसा करायचा ते त्याला या दिग्दर्शकांच्या छायेत अधिक उमगले.
'खून पसीना' सारख्या चित्रपटात असरानीने गंभीर भूमिका केली. 'हमारे तुम्हारे' मधील 'अच्छा चलो जी बाबा माफ कर दो' हे किशोर कुमारचे गाणे असरानीवर चित्रित झाले. 'मन्नूभाई मोटर चली पम पम पम' हे गाणे असरानीने किशोरसोबत म्हटले आहे आणि ते ऋषी कपूर आणि त्याच्यावर 'फूल खिले हे गुलशन गुलशन' या चित्रपटासाठी चित्रित झाले आहे. हमारी बहू अलका, एक भूल, अगर तुम ना होते अशा त्याच्या अनेक चित्रपटांचा उल्लेख करता येईल.
असरानीने दिनेश हिंगू आणि हरीश पटेलसमवेत एक गुजराती नाटक कंपनी काढली होती. १९८८ ते १९९३ या काळात असरानी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटचा संचालक होता. सात वर्षांपूर्वी 'परमनंट रूममेट्स' या वेब सिरीजमध्ये असरानीने काम केले होते. 'पार्टनर्स 'ट्रबल हो गई डबल' या सिरीयलमध्ये असरानीने पोलीस महासंचालकाचे काम केले होते 'नटखट नारद' या दूरदर्शन मालिकेत असरानीने नारदाची भूमिका केली होती. कॉमेडियन हा मनात दुःखी असतो वगैरे सर्व थोतांड आहे, असे असरानीचे ठाम मत होते. तो एकदम दिलखुलास आणि हसमुख होता. काही दिवसांपूर्वीच असरानीच्या मृत्यूची अफवा पसरली होती. तेव्हा, 'अशा अफवांमुळे माझे आयुष्य उलट वाढेलच', असे उद्गार त्याने काढले होते.
दुर्दैवाने तसे मात्र घडले नाही...हे फार वाईट घडले. असरानीला आदरांजली!