Opinion

दो हंसों का नया जोडा!

उद्या २२ जुलै रोजी, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही वाढदिवस आहे.

Credit : Indie Journal

 

महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यातील मैत्री गाजली होती. उभयतांना ‘दो हंसों का जोडा’ म्हणून ओळखले जात असे. जेव्हा जेव्हा नागपूरला हिवाळी अधिवेशन असे, तेव्हा दोघेही एकत्र जात. सुरेश भटांच्या गझला, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकरांच्या कविता, सिनेमातली गाणी या विषयांवर गप्पा व्हायच्या.

२००३ मध्ये आकस्मिकरीत्या विलासरावांचे मुख्यमंत्रिपद गेले आणि त्यांचया जागी सुशीलकुमार शिंदे यांना आणले गेले. पण तरीही त्यांच्यातील मैत्री कायम राहिली. पुढे सुशीलकुमार यांच्यानंतर पुन्हा एकदा विलासराव मुख्यमंत्रिपदी आले, तेव्हा त्यांच्या नावाचा प्रस्ताव सुशीलकुमारजींनीच मांडला होता. सुशीलकुमार यांची नियुक्ती आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून झाली, तेव्हा त्यांना तेथे सोडण्यासाठी विलासरावांनी खास विमानाची व्यवस्था केली होती.

या सगळ्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे, आज महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री, म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यात अशीच मैत्री असून, या दोघांचा वाढदिवस योगायोगाने एकाच दिवशी आहे. २२ जुलै रोजी दोघांचाही वाढदिवस असतो. ‘दो हंसों का नया जोडा’, असेच यांना म्हणावे लागेल. गंमत म्हणजे, शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस एकाच दिवशी, म्हणजे १२ डिसेंबरला असतो. शरद पवार हे अजितदादांचे काका, तर मुंडे हे देवेंद्रजींचे राजकारणातले एक प्रकारे गुरूच.

 

शरद पवार हे अजितदादांचे काका, तर मुंडे हे देवेंद्रजींचे राजकारणातले एक प्रकारे गुरूच.

 

देवेंद्रजी अगोदर गोपीनाथ मुंडे गटातच होते. याचा अर्थ, ते नितीन ग़डकरी गटात कधीही नव्हते. त्यावेळी महाराष्ट्र भाजपात हे दोन गट प्रमुख होते. तरीही आमच्या पक्षात गटबाजी नसते, राष्ट्रभक्ती हाच आमचा गट, असे सांगायची पद्धत असते! अजितदादा हे अर्थातच देवंद्रजींपेक्षा वयाने ज्येष्ठ असून, १९९१ मध्ये ते बारामतीचे खासदार बनले. त्या आधीपासून ते राजकारणात होतेच. तर देवेंद्र १९९२ मध्ये कायद्याचे पदवीधर झाले आणि त्याच वर्षी नागपूरमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर ते नागपूरचे महापौरही झाले.

१९९९ साली, म्हणजे २४ वर्षांपूर्वी देवेंद्रजी प्रथम आमदार म्हणून निवडून आले. परंतु त्यापूर्वीच अजितदादा महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्यांना राज्यमंत्रिपदाचाही अनुभव मिळालेला होता. १९९९ साली दादा हे प्रथम काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकशाही आघाडी सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री झाले आणि जलसंपदा खाते सांभाळू लागले. त्यानंतर दादांनी वेगवेगळी खाती समर्थपणे सांभाळली आणि उत्तम प्रशासक व तडफदार नेता म्हणून मान्यता प्राप्त केली. तर देवेंद्रजी हे विरोधी पक्षात असल्यामुळे, विदर्भ व मराठवाड्याच्या बॅकलॉगच्या विषयावरून ते तत्कालीन विलासराव देशमुख अथवा सुशीलकुमार शिंदे सरकारवर टीका करायचे.

अजितदादांवरदेखील देवेंद्रजी तेव्हा टीका करत असले, तरी त्याला व्यक्तिगत स्वरूप कधीही आलेले नव्हते. दादा आणि देवेंद्रजी यांच्यातील संबंध उत्तमच होते. देवेंद्र जे जे मुद्दे उपस्थित करत, त्याकडे दादा बारकाईने लक्ष देत असत. परंतु हळूहळू लोकशाही आघाडी सरकारबाबत अँटि इन्कम्बन्सीची हवा तयार होऊ लागली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे मनमोहन सिंग सरकारबद्दल प्रतिकूल जनमत तयार होऊ लागले. देशभर भ्रष्टाचारविरोधाचे आंदोलन पेटले आणि महाराष्ट्रातही आदर्श घोटाळा गाजला.

 

अजितदादांवरदेखील देवेंद्रजी टीका करत असले, तरी त्याला व्यक्तिगत स्वरूप कधीही आलेले नव्हते.

 

पृथ्वीराजबाबा चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर, त्यांचे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे बिलकुल जमत नव्हते. बाबांची प्रतिमा स्वच्छ, तर दादांची प्रतिमा कलंकित बनण्यास सुरुवात झाली होती. ७० हजार कोटी रुपये खर्च होऊनही, महाराष्ट्रतील सिंचनक्षेत्र एक टक्क्यानेदेखील वाढलेले नाही. हा मुद्दा राजकारणाच्या केंद्रभागी आला. शिखर बँकेतील तसेच सिंचनक्षेत्रातील गैरव्यवहार बाबांच्याही नजरेत आला होता. २०१२ साली दादांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आणि या संदर्भात श्वेतपत्रिका बाहेर आल्यामुळे एकच गदारोळ उठला.

२०१३ मध्ये देवेंद्रजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन त्यांनी दादांविरुद्ध आघाडीच उघडली. बैलगाडीभर पुरावेही सादर केले. अखेर अजितदादांनी आपल्या पदाचाच राजीनामा दिला. २०१४ मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, तेव्हा अजितदादा उद्या चक्की पिसिंग करतील, या तुम्ही केलेल्या गर्जनेचे काय झाले, असे मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्रजींना पत्रकार विचारू लागले. परंतु सलग पाच वर्षे सत्ता असूनही देवेंद्रजींनी केवळ चौकशीच्या नोटिसा देण्यापलीकडे दादांविरुद्ध काहीएक केले नाही.

या काळात धनुभाऊ, म्हणजेच धनंजय मुंडे हे देवेंद्रजींच्या अधिक जवळ आले. धनुभाऊ हे दादाचे निकटवर्तीय. योगायोगाने त्याचवेळी पंकजा मुंडे यांचे चिक्की प्रकरण बाहेर आले आणि त्याची कागदपत्रे सरकारमधूनच विरोधकांकडे ‘योगायोगानेच’ पोहोचवण्यात आली, असा संशय व्यक्त करण्यात आला. छगन भुजबळांना तुरुंगवास झाला. परंतु दादा व त्यांचे जवळचे मित्र आणि ज्यांनी जलसंपदा खाते सांभाळले होते त्या सुनील तटकरे यांच्या विरुद्धही कोणती करवाई झाली नाही.

देवेंद्रजी निर्वेधपणे कारभार करू शकले, याचे कारण अजितदादा असोत वा धनंजय मुंडे, त्यांनी विधिमंडळात वा बाहेर भाजपविरोधी भूमिका समर्थपणे निभावलीच नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारविरोधी काढलेल्या संघर्षयात्रेला काहीही प्रतिसाद मिळाला नव्हता. कारण मुळात ती मनापासून काढण्यातच आली नव्हती. एकूण दादांसारख्या नेत्यांचे देवेंद्रजींशी आतून संगनमतच होते.

 

म्हणूनच २०१९ मध्ये देवेंद्रजींबरोबर त्यांनी ऐन सकाळी सरकार स्थापन केले.

 

म्हणूनच २०१९ मध्ये देवेंद्रजींबरोबर त्यांनी ऐन सकाळी सरकार स्थापन केले. मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजितदादांचे भाषण सुरू असताना, ‘महाराष्ट्रातही कुणीतरी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईल’, असा शेरा सुधीर मुनगंटीवार यांनी मारला होता. तेव्हा ‘महाविकास आघाडीत कोणीही ज्योतिरादित्य होणार नाही, तुमच्या बाजूलाच कोणीतरी होईल. मी जे करतो ते लपून छपून करत नाही. जो करतो ते समोर करतो’, असे प्रत्युत्तर दादांनी दिले होते.

वास्तविक अजितादादांनी २०१९ मध्ये सकाळी जो शपथविधी घेतला, तो लपूनछपूनच आणि काही दिवसांपूर्वी काकाशी गद्दारी केली, तीही गुपचुपपणेच. देवेंद्रजींनी लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यातही दादांनी मागे त्यांची मुक्तकंठे प्रशंसा केली होती. ‘मी राष्ट्रवादीशी युती करणार नाही, नाही, नाही’, असे देवेंद्रजींनी त्रिवार सांगूनही आपला शब्द दोनवेळा फिरवला. तसेच ‘मी राष्ट्रवादी कधीही सोडणार नाही असे प्रतिज्ञापत्र करून देऊ का’, असा सवाल पत्रकारांना विचारणाऱ्या दादांनी राष्ट्रवादी फोडून देवेंद्रजींशी दोस्ती केली. काकांना दगा देण्यापूर्वी, मला राष्ट्रवादी पक्षाच्या संघटनेत काम करायचे आहे, अशी इच्छा दादांनी व्यक्त केली होती. पक्ष बगलेत मारण्यासाठीच ही व्यूहरचना होती. ‘मी विरोधी पक्षनेता म्हणून प्रभावीपणे काम करत नाही, अशी टीका करता. मग मी काय सत्ताधाऱ्याची गचांडी पकडू का’, असा सवाल दादांनी केला होता.

 

विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी कधी देवेंद्रजींवर वा पंतप्रधान मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली नाही.

 

परंतु गेले किमान वर्षभर तरी ते देवेंद्रजींशी संधान बांधून होते आणि म्हणूनच महाविकास आघाडीशी बेईमानी करत होते. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी कधी देवेंद्रजींवर वा पंतप्रधान मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली नाही. टीका केली, ती फक्त मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यावर. आपला स्वतःचा पक्ष आणि आघाडीशी उघड उघड द्रोह करणे, हे खरे म्हणजे अत्यंत भयंकर पाप आहे. शिवाय ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच पावन करून घेण्याचे पाप मोदी-देवेंद्रजींनी महाराष्ट्रात केले आहे. ‘एकनाथ शिंदेंशी युती ही भावनिक आहे आणि राष्ट्रवादीसी युती ही राजकीय आहे’, असे तत्त्वचिंतन देवेंद्रजींनी केले आहे. ‘राजकारणात अनैतिकता करावी लागते, बदलाही घ्यावा लागतो’, असेही देवेंद्रजी म्हणाले आहेत.

अजितदादा आणि देवेंद्रजी या दोघांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे पुरते वाटोळे केले आहे, एवढे सगळे करूनही, राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर दादांना नव्हे, तर शरद पवार यांनाच सर्वसामान्य मतदारांकडून प्रचंड सहानुभूती मिळत असल्याचा निष्कर्ष ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीतून समोर आला आहे. अजितदादा पवार भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या ६२ टक्के मतदारांना पटलेला नाही. म्हणूनच दादा, प्रफुल्ल पटेल प्रभृती साहेबांच्या मिनतवार्या करू लागले आहेत.  शिवसेनेच्या उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, लवकरच दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतीलही. परंतु २०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतर विश्वासार्हता गमावलेल्या दादांचे व देवेंद्रजींचे स्थान नेमके किती खालावलेले असेल, याचा आपण केवळ अंदाजच बांधू शकतो. उद्या २२ जुलै रोजी, अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही वाढदिवस आहे. दोघांचया मैत्रीला सलाम आणि दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा.