India

इस्लाम, मूलतत्त्ववाद आणि युरोपियन सभ्यतेचा (वर्णद्वेषी) चष्मा

फ्रान्समध्ये नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे इस्लाममधील मूलतत्ववाद आणि दहशतवादाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Credit : Shubham Patil

"ग्राहम फुलर हा अमेरिकन लेखक त्याच्या 'अ वर्ल्ड विथाऊट इस्लाम' या आपल्या पुस्तकात फार महत्त्वाचा प्रश्र्न उपस्थित करतो. जर इस्लाम या धर्माचं अस्तित्वच नसलं असतं तर या जगात हिंसा झालीच नसती का? याचं सरळ उत्तर नाही असं आहे. या जगातील प्रत्येक धर्माच्या नावानं हिंसा झालेली आहे. पण प्रत्येक धर्मात काही प्रमाणात चांगल्या गोष्टीही आहेतंच. पण धार्मिक मूलतत्ववाद आणि त्यातून उपजणाऱ्या हिंसेचा विषय निघाला की आपल्याला नेमकी इस्लामचीच आठवण का होते? याचं उत्तर इस्लामची काहीही माहिती नसलेल्या बुद्धीजीवींनी इस्लामच्या केलेल्या प्रचारात आहे," इस्लामचे जेष्ठ अभ्यासक आणि 'इस्लाम ज्ञात आणि अज्ञात' पुस्तकाचे लेखक अब्दुल कादर मुकादम इंडी जर्नलशी बोलताना सांगत होते.

फ्रान्समध्ये नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे इस्लाममधील मूलतत्ववाद आणि दहशतवादाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आलेला असला तरी मॅक्रोनप्रणित फ्रेंच सरकारकडून या हल्ल्यावरची प्रतिक्रिया म्हणून जी पावलं उचलण्यात येत आहेत, त्याविषयी वेगवेगळ्या स्तरातून टोकाची मतं पाहायला मिळतायेत. पाश्चात्य लिबरल माध्यमांमधून या घटनांच्या निमित्तानं युरोपीयन लोकशाहीप्रणीत धर्मनिरपेक्षता व अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध इस्लाम असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.

"खरंतर पैगंबराचं व्यंगचित्र काढल्यामुळे कोणीतरी एक सणकी मुसलमान दुखावला आणि त्यानं अल्लाहचं नाव घेत काही लोकांची हत्या केली. याचा परिणाम म्हणून या सणकी मुसलमानाच्या वतीने माझ्यासारख्या शांतताप्रिय इस्लामचं पालन करणाऱ्या मुसलमानानं माफीचा सूर आणत निषेध नोंदवावा, या अपेक्षेच्या ओझ्याची आता आम्हाला सवय झालीये,"  इस्लामचा अभ्यासक व पत्रकार कलीम अजीमची ही हतबल प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते.

"मूळात इथल्या भारतातल्या बहुतांश मुसलमानांचे प्रश्नच वेगळे आहेत. रोजच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्‍नातच ते इतके गुरफटलेले आहेत की कोण्या दुसऱ्या देशात कोणीतरी पैगंबराचा अपमान केला म्हणून कोणाचीतरी हत्या केली. आणि तो हत्या करणारा मुसलमान होता. त्यामुळे या घटनेचे सामाजिक पैलू लक्षात घेऊन तिचा निषेध नोंदवावा, इतकी राजकीय समज सामान्यतः भारतीय मुसलमानाकडे असेलच, ही अपेक्षा अवाजवी आहे. रोजच्या जगण्याच्या प्रश्नात गुरफटलेल्या एखाद्या हिंदू, ख्रिश्चन किंवा शीख माणसाला अराजकीय असण्याची जितकी सूट आहे तितकीच सूट भारतीय मुसलमानाला का नाही?" असा प्रश्न अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते सरफराज अहमद यांनी उपस्थित केला. 

पैगंबराचं चित्र काढणं किंवा त्याचं रेखाटन करणं याला इस्लाममध्ये विरोध आहे. पण या विरोधामागची पार्श्वभूमी मात्र इस्लामला सरसकट जिहादी म्हणणाऱ्यांना माहित नसते. मूळात मूर्तीपूजेचं थोतांड माजवू नये म्हणून इस्लाममध्ये पैगंबरांच्या मूर्त्या बनवणं किंवा चित्र काढणं हे चुकीचं मानलं गेलेलं आहे. पण तरी कुणी पैगंबरांचं चित्र काढलंच तर त्याच्या हत्येची परवानगी कुराण देत नाही. याहीपुढे जाऊन कोण्या एका माणसाची हत्या करणं म्हणजे सगळ्या माणुसकीची हत्या करणं होय. आणि कोण्या एका माणसाचा जीव वाचवणं म्हणजे सगळ्या माणुसकीला वाचवणं होय, अशी स्पष्ट शिकवण कुरानमधून देण्यात आलेली आहे.

फ्रान्समधील या घटनेवर भारतात उमटलेल्या पडसादांवर समीर दिलावर शेख हा तरुण पत्रकार म्हणाला, "आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठलीही अशी घटना घडली की त्यावर नेमकं कसं व्यक्त व्हावं, असा प्रश्र्न माझ्यासारख्या माणसाला पडतो. मॅक्रॉन आणि शार्ली हेब्दो विरोधात भारतात व्यक्त केला जाणारा निषेध हा फक्त पैगंबरांची खिल्ली उडवल्याबद्दल आहे. याचा सोयीस्कर अर्थ भारतीय मुस्लीमांचं या दहशतवादी हल्ल्याला समर्थन आहे, असा काढला जातोय. प्रत्यक्षात या हल्ल्याचा निषेध करण्याइतकी राजकीय समज सामान्य मुस्लीम भारतीयांमध्ये असेलंच असं नाही. त्यामुळे मुस्लीम धर्मातील मूलतत्ववादाची चिकित्सा करण्याची जबाबदारी मुस्लीम बुद्धीजीवींनी उचलायला हवी."

इस्लामविषयीच्या पाश्चात्य अपप्रचाराविषयी मुकादम सांगतात, "आता कोणी जिहादचं नाव घेऊन कसंही वागत असेल तर त्यासाठी संपूर्ण इस्लाम धर्माला वेठीस धरणं हे कुराण आणि इस्लामचं मूळ वाचन न करता आलेल्या अज्ञानाचं द्योतक आहे. १४ व्या शतकापर्यंत तर जिहादचा अर्थ शोषण आणि अन्यायाचा प्रतिकार करणं आणि दुर्बल घटकांना संरक्षण देणं, इतका उदात्त होता. १४ व्या शतकात वहाबी पंथ उदयाला आला आणि इस्लाममध्ये हिंसेचा शिरकाव तिथून खऱ्या अर्थानं सुरु झाला. इस्लाम बद्दल कुराणातील ठराविक पंक्तींचा पूर्वग्रहदूषित सोयीस्कर अर्थच आपल्यापर्यंत पोहचवून इस्लामची बदनामी करण्यात नेमकं कोणाचं हित दडलेलं आहे, याचा शोध घेतला असता बऱ्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकेल."

"षडरिपूंवर मात करणं, ही हिंदू धर्म परंपरेतील अतिशय महत्त्वाची आणि चांगली शिकवण आहे. हिंदू धर्मातलं हेच तत्व उचलून पैगंबरांनं ते कुराणमध्ये सांगितलंय. याशिवाय जगभरातील वेगवेगळ्या भाषा तत्त्वज्ञान अरबी मध्ये भाषांतरित करून ज्ञानाचा प्रसार करण्यात इस्लामचा मोठा वाटा आहे. पण इस्लामच्या या पैलूंबाबत आपल्याला कुठे सांगितलंच जात नाही. तर पैगंबरानं मांडलेल्या जिहादाचा साधा अर्थ असा की मोह, माया, मत्सर, द्वेष, लोभ, राग या अनावश्यक मानवी भावनांवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणं. पण आपल्या धर्माविरुद्ध कोणीतरी काहीतरी बोललं म्हणून त्याचा उघड शिरच्छेद करणं हाच जर जिहादचा अर्थ आपल्याला सांगितला जात असेल, तर हा अर्थ आपल्याला सांगणारा मग कुठलं कुराण वाचून आलेला आहे, हा प्रतिप्रश्न उपस्थित करायला हवा. कुराणही न वाचलेले आणि इस्लामची किमान समजही असणारे हे तज्ञ लोक जेव्हा मुसलमानांनाच धर्मनिरपेक्षतेचं महत्त्व पटवून देत असतात, तेव्हा साहजिकंच आधीच अस्तित्वात असलेल्या मुस्लिमद्वेषी सामाजिक वातावरणात इस्लामची बदनामी करत जाणं आणखी सोप्पं होऊन जातं. इस्लाम आणि ख्रिश्चनिटीमधला असलेला जुना वाद आणि या वादाचं आकलन करणारी एकांगी युरोपीयन पार्श्वभूमी लक्षात घेतली तर जगाला सगळ्यात मोठा धोका हा इस्लामिक मूलतत्त्ववादाचापासूनच आहे, या पाश्चात्त्य समजुतीमागील राजकारण लक्षात येतं," मुकादम पुढे म्हणाले.

फ्रान्स सरकार विरोधात जगभरातील मुस्लिम समुदायाकडून होणाऱ्या निषेधाबाबत बोलताना सरफराज अहमद म्हणाले, "मॅक्रोन सरकारचा निषेध करणं म्हणजे झालेल्या हत्येचं समर्थन करणं नव्हे. दहशतवादाला विरोध म्हणून होणाऱ्या कारवाईच्या नावाखाली फ्रान्समधील किंवा जगभरातील मुसलमानांची गळचेपी करण्याचा जो अजेंडा सेट केला जात आहे त्याचं प्रतीक म्हणून मॅक्रॉन यांच्याकडे पाहिलं जातंय. मॅक्रोन यांच्या आधीसुद्धा ९/११ चा जो हल्ला अमेरिकेत झाला त्याच्यानंतर दहशतवादाचा बिमोड करण्याच्या नावानं मुस्लिम आणि इस्लाम विरोधात नरेटिव्ह सेट करण्याचे जोरदार प्रयत्न त्यावेळेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याकडून झाले. अर्थात त्यामागे त्यांचं पुन्हा निवडून येण्यासाठीचं राजकीय गणितसुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. आज फ्रान्स मध्ये जे मॅक्रोन करत आहेत, तेच त्यावेळी जॉर्ज बुश यांनी केलेलं होतं. अमेरिकेनं गाजावाजा करत दहशतवादाविरोधात पुकारलेल्या या युद्धाचं नंतर काय झालं आणि जगभरातील मुसलमानांना आणि मुस्लिम राष्ट्रांना त्याचे काय परिणाम भोगावे लागले, हे आपल्या सगळ्यांसमोर आहे. फ्रान्समधील कालच्या हल्ल्याच्या निमित्तानं जगभरातील मुसलमानांना वेठीस धरण्याच्या या अजेंड्याची पुनरावृत्ती होईल की काय, या धास्तीतूनंच मॅक्रॉन यांचा आज निषेध केला जातोय."

मुस्लिम मूलतत्त्ववादाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यावेळी अब्दुल कादर मुकादम यांनी मांडला. "ज्याप्रमाणं जगात ख्रिश्चन, हिंदू व इतर धर्मियांना स्वतःचं सामाजिक अस्तित्व आणि अभिव्यक्ती दाखवण्याची स्पेस उपलब्ध आहे तितकी स्पेस मुस्लिम समाजाला कधीच उपलब्ध नव्हती. उदाहरणार्थ अगदी काहीही चूक नसताना अमेरिकेनं इराकवर युद्ध लादलं आणि अख्खा देश दहशतवादाच्या विरोधातील मोहीम म्हणून बेचिराख करून टाकला. आखाती देशांवरती साम्राज्यवाद लादून त्यांच्या तेलाची आणि इतर नैसर्गिक साधनसंपत्तीची वर्षानुवर्ष लूट केली. अमेरिकेच्या या उघड मुजोरीविरोधात बोलण्यासाठी कुठलीही राजकीय स्पेस आणि सामाजिक अवकाशच उपलब्ध नसल्याकारणानं दहशतवादी हल्ल्याच्या रूपानं का होईना अधून मधून ही खदखद आणि राग व्यक्त होतो. आपल्या विरुद्धच्या या व्यवस्थात्मक शोषणाला आणि अन्यायाला वाचा फोडणारा आज कोणी उरला नाहीये, या हतबल जाणिवेतूनच मग मुसलमानांमधील काही घटक याच अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनला हीरो ठरवतात. आणि मग आधीच इस्लामोफोबिक असलेलं जागतिक राजकारण अजून वरचेवर इस्लामोफोबिक होत जातं. अर्थात आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून असे दहशतवादी हल्ले करणं हे भ्याडपणाचंच लक्षण आहे, आणि त्याचा कुठलाही कुराण वाचलेला मुसलमान निषेधच करेल. पण युरोपियन अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या व्याख्येनुसार जर एखाद्या धर्माची किंवा धर्मगुरूंची खिल्ली उडवणं यात काही चूक नसेल, तर हे असलं एखाद्या धर्माला डिवचणारं सोयीस्कर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही म्हणत त्याचा अहिंसक मार्गानं शांततापूर्ण निषेध नोंदवणं, यातही काही चूक नाही."

अशा एखाद-दुसऱ्या हल्ल्यानंतर इस्लाम विरुद्ध लोकशाही अशा बायनरीत अडकलेल्या चर्चा आता सवयीच्या झाल्या आहेत. या बायनरीमध्ये न अडकता आणि या हल्ल्यानंतर सरसकट जगभरातील मुसलमानांची कॉलर न पकडता, अशा दुर्दैवी घटनांमागची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊन अशा घटना का घडत आहेत याचा संवेदनशील होऊन विचार करणं हेच यावरचं उत्तर आहे. फ्रान्समधील हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी फ्रान्सच्या राष्ट्रीय एकतेला इस्लामी विभाजनवादाचा धोका असल्याचं वक्तव्य केलं होतं. 

आपण वेगळे पडलो असल्याच्या भावनेतून मुसलमानांमध्ये वाढत असलेल्या विभाजनवादाचा दोषही मुस्लीम समाजावरंच ढकलण्याच्या मॅक्रॉन यांच्या वाक्चातुर्यावर बोलताना कलिम अजीम म्हणाले, "आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता या मूल्याचा फ्रान्समधील लोकांना फार अभिमान आहे. पण फ्रान्स जर खरंच इतका कट्टर धर्मनिरपेक्ष राष्ट्र असतं तर या देशाच्या पॉप्युलर कल्चरमध्ये आणि राष्ट्रीय नीतीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ख्रिश्चन धर्माचं पडत असलेल्या प्रतिबिंबाचं काय करायचं? उदाहरणादाखल, आजही फ्रान्समध्ये बरेच नॅशनल हॉलिडे ख्रिश्चन सणांनुसार साजरे केले जातात. फ्रान्समधीलच स्थलांतरित मुस्लीम समुदायावर विभाजनवादाचा आरोप ठेवण्याआधी, आपल्या देशातील पॉप्युलर कल्चरमध्ये आणि फ्रेंच आयडेंटीटीमध्ये मुस्लिमांचं प्रतिनिधित्व का नाही? याचा विचारही मॅक्रॉन यांनी करायला हवा होता. तो जर त्यांनी केला असता तर फ्रान्समधील मुसलमानांमध्ये वेगळेपणाची भावना घेऊन त्यांच्यात विभाजनवाद वाढत का चालला आहे, याचं उत्तरही त्यांचं त्यांना मिळालं असतं."