India

एनडीएचे मुख्यमंत्री बनण्यास नितीश कुमार अजूनही साशंक?

भाजपसोबत युती करून अटीतटीच्या लढतीत विजय मिळाला असला तरी हे मुख्यमंत्रीपद भूषवण्यास नितीश कुमार फारसे उत्सुक नसल्याची चर्चा बिहारमधील राजकीय वर्तुळात जोर पकडतेय.

Credit : The Quint

भाजपसोबत युती करून अटीतटीच्या लढतीत विजय मिळाला असला तरी हे मुख्यमंत्रीपद भूषवण्यास नितीश कुमार फारसे उत्सुक नसल्याची चर्चा बिहारमधील राजकीय वर्तुळात जोर पकडतेय. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या सूत्रांनुसार आपल्या पक्षाच्या डळमळीत कामगिरीमुळे नितीशकुमार यांचा आत्मविश्वास ढासळला असून भाजप देऊ करत असलेलं हे मुख्यमंत्रीपद स्वीकारावं की नाही याबाबत ते द्विधा मनस्थितीत असल्याचा खुलासा भाजपच्याच राज्यातील एका नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर केलाय.

सत्तेसाठीचं आवश्यक बहुमत मिळाल्यानंतरही फक्त ४० जागा जिंकण्यात यश मिळवणारे मुख्यमंत्री नितीश कुमार निवडणूकपश्चात राजकीय डावपेचांमध्ये चारी बाजूंनी घेरले गेले असल्याचं स्पष्ट आहे. राष्ट्रीय जनता दलाचे बिहारमधील नेते मनोज झा यांनीही अशा विचित्र अडचणीत सापडलेल्या नितीश कुमारांवर निशाणा साधत, ''४० जागांच्या जोरावर मिळणारं मुख्यमंत्रीपद नितीश कुमार किती दिवस टिकवू शकतील?" असा सवाल उपस्थित करताना कुमार यांच्या याच हतबलतेवर बोट ठेवलंय. जिंकल्यानंतरही नितीशकुमार यांचा जनता दल पक्ष जागांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर घसरलाय. सत्ता आपल्याजवळ ठेवताना मित्र पक्षालाच कमजोर करत युतीत वरचढ ठरण्याचा भाजपचा नेहमीचा राजकीय डाव या निकालामुळे फळाला आलेला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजप आणि जदयु पक्षाच्या युतीला वर्षभरात पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेलं हे यश अगदीच केविलवाणं आहे. २०१५ च्या मागच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ५३ जागांवरून ७४ जागांपर्यंत मजल मारणारी भाजप जनता दलावर वरचढ ठरलीये. तर मागच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ७१ आमदार निवडून आणणाऱ्या नितीश कुमारांना यावेळी फक्त ४३ जागांवरच समाधान मानावं लागलं. भाजपनं धूर्तपणा करत चिराग पासवानच्या लोकजनशक्ती पक्षाला आपल्या विरोधात उतरवून जनता दलाचं किमान ३५ जागांवर नुकसान केल्यामुळे नाराज असलेले नितीश कुमार भाजपच्या कुबड्यांवर मिळालेलं हे मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तितके उत्सुक नाहीत.

सलग चौथ्यांदा म्हणजे तब्बल २० वर्षं एखाद्या राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवणं हा विक्रम असून नितीश कुमारांकडे निकालानंतर ही संधी चालून आलीये. मागची १५ वर्षं कधी काँग्रेससोबत तर कधी भाजपसोबत अशा कोलांट्या उड्या मारणारे नितीश कुमार हे कुठल्याही युतीमध्ये जनता दलाला आघाडीचं स्थान मिळवून देण्यात यशस्वी ठरले. मात्र या निवडणुकीत जनता दलाची तिसऱ्या स्थानावर झालेली घसरण म्हणजे यावेळी हाती येणारं हे मुख्यमंत्रीपद फक्त नावापुरतंच असणार असल्याची जाणीव नितीश कुमारांनाही आहेच. भाजपनं राजकीय दगाबाजी करत आपल्याला शह देण्यासाठी चिराग पासवान यांना पुढे करण्याची केलेली खेळी ओळखूनही कुमार त्यांचं होणारं हे नुकसान टाळू शकले नाही. त्यामुळं सत्तेत आल्यावर युतीतला छोटा भाऊ ही कमजोर भूमिका निभावण्यासाठी नितीश कुमार जर हयगय करत असतील, तर ही गोष्ट सहाजिकच म्हणावी लागेल.

मागची १५-२० वर्ष संभाव्य राजकीय गणितं ओळखून चाली रचत बिहारचं मुख्यमंत्रीपद आणि बिहारचा मुख्य राजकीय चेहरा आपणच राहू, अशी तजवीज करण्यात नितीश कुमार सातत्यानं यशस्वी ठरले. खरंतर २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत लालूंच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत युती करून राष्ट्रीय पातळीवरील मोदींच्या नेतृत्वाला किमान बिहारमध्ये शह देण्यात कुमार यशस्वी ठरले होते. २०१४ नंतर देशभरात आलेल्या मोदीप्रणित हिंदुत्ववादी लाटेचा सामना करण्यासाठी देशभरातील धर्मनिरपेक्ष प्रादेशिक पक्षांची मोट बांधून भाजपला आव्हान ठरू शकेल अशा राष्ट्रीय आघाडीचं नेतृत्वही नितीश कुमार करतील का काय? असं चित्र २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या घवघवीत यशानंतर निर्माण झालं होतं.

२०१७ साली राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबतच्या युतीतून काढता पाय घेत नितीश कुमारांनी भाजपसोबत जायचा निर्णय घेतला आणि भाजप विरोधी राष्ट्रीय आघाडीचं ते नेतृत्व करतील याची शक्यता स्वतःहून संपुष्टात आणली. स्थानिक राजकीय पक्षांना आपल्या सोबत घेऊन त्यांनाच कमजोर करत राहणं आणि त्या त्या राज्यात स्वत: वरचढ ठरण्याची मोदी-शहा यांची राजकीय खेळी नितेश कुमार यावेळी ओळखू शकले नाहीत. बिहार विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान युती करूनच भाजप आपल्याला शह देण्याचा प्रयत्न करतंय हे समजेपर्यंत त्यांना फार उशीर झाला होता. नितीश कुमारंच मुख्यमंत्री असतील हे आश्वासन दिल्यानंतरही भाजपनं बिहारमधील आपला प्रचार नरेंद्र मोदींभोवतीच केंद्रीत केला. इतका की निवडणुकीदरम्यान भाजपच्या प्रचारसभांमधील पोस्टर्सवरही नितीश कुमार यांना जागा देण्यात आली नव्हती.

इतकी वर्षं सोयीनुसार राष्ट्रीय पक्षांना सोबत घेऊन बिहारमधलं राजकारण आपल्याभोवतीच केंद्रीत राहील असा राजकीय डाव यशस्वीरित्या खेळणाऱ्या नितीशकुमारांवर यावेळेस भाजपनं हा डाव त्यांच्यावरच आता उलटा पाडलाय. बिहारच्या राजकारणातील आपलं हे स्थान अढळ ठेवण्यासाठी अधीर झालेले नितीश कुमार यावेळी त्यांच्या नेहमीच्या संयत राजकीय शैलीपासून फारकत घेतानाही दिसले. टाळेबंदी आणि बिहारमधील स्थलांतरित मजुरांना राज्य सरकार कडून दिल्या गेलेल्या अमानुष वागणूकीमुळे आधीच बिहारमधील जनता नितीश कुमार यांच्या विरोधात गेली होती. शिवाय या वेळेच्या प्रचार सभांमध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि लालूप्रसाद यादवांवर पातळी सोडून टीका केली. १५ वर्षांच्या सत्तेविरोधातील बिहारच्या जनतेची नाराजी आणि विरोधकांची वाढत जाणारी ताकद बघून 'ही निवडणूक माझी अखेरची निवडणूक असणार आहे' असं भावनिक अवाहनाचं कार्डही ते खेळताना दिसले. तेजस्वी यादव यांची वाढती लोकप्रियता बघून बिथरलेल्या नितीश कुमारांनी विरोधी पक्षांवर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक शेरेबाजी करणं, हे त्यांना आलेल्या हतबलतेचंच द्योतक होतं.

भाजपची कास धरल्यानंतर आपल्या धर्मनिरपेक्ष राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या नितीश कुमारांना भाजपच्या हिंदुत्ववादालाही अप्रत्यक्ष पाठिंबा द्यावा लागला. भाजपसोबत केंद्रात युती केलेल्या नितीश कुमारांवर कलम ३७०, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि केंद्र सरकारच्या इतरही हिंदुत्ववादी धोरणांना पाठिंबा देत आपल्या पारंपारिक अल्पसंख्यांक मतदारांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ आली. नितीशकुमारांच्या धर्मनिरपेक्षतेचा चेहरा वापरून आपली हिंदुत्ववादी धोरणं रेटण्यासाठी भाजपनं त्यांचा सोयीस्कर वापर करून घेतला आणि वेळ आल्यावर त्यांच्याच विरोधात लोक जन शक्ती पक्षाच्या चिराग पासवान यांना उभा करून जनता दलाची बिहार मधली ताकदही कमी केली. त्यामुळे चिराग पासवान यांच्या खांद्यावरून गोळी मारत भाजपनं या निवडणुकीत युतीतील वरचढ पक्ष होण्याची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण केलीये. त्यामुळे युतीतच दगाफटका करणाऱ्या भाजपनं देऊ केलेलं हे (डमी) मुख्यमंत्रीपद नितीश कुमार पुढची पाच वर्ष टिकवू शकतील का? आणि ते टिकवलं तरी असा कमजोर मुख्यमंत्री म्हणून भविष्यातील होणारी नाचक्की ते कितपत सहन करतील, हाही प्रश्नच असणार आहे.