Opinion

यशवंतरावांचा महाराष्ट्र बिघडवू नका!

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला २८, तर महाविकास आघाडीला २० जागा मिळतील, असा निष्कर्ष ‘एबीपी माझा – सी व्होटर’ यांच्या जनमत चाचणीतून काढण्यात आला आहे. महायुतीत भाजपला २२, तर एकनाथ शिंदे-अजितदादा पवार यांच्या पक्षांना मिळून सहा जागा मिळतील. तर काँग्रेसला चार आणि ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षांना मिळून १६ जागा मिळतील, असा अंदाज आहे. याचा अर्थ, ४५ पेक्षा अधिक जागा मिळवण्याचे भाजपे स्वप्न भंग पावेल, असे दिसते.

भाजप व शिवसेना यांची २०१९ मध्ये युती होती आणि दोघांना मिळून ४२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत आणि शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीला फोडण्यातही भाजप यशस्वी झाला आहे. एवढे करूनदेखील भाजपला यावेळी २०१९ पेक्षा (२३) एक जागा कमी मिळताना दिसत आहे. उलट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटांना ‘शिल्लक सेना’ व ‘कफल्लक गट’ म्हणून भाजप हिणवत आला आहे. तरीदेखील शिंदे व अजितदादा गटांपेक्षा ठाकरे व शरद पवार गटांना लोकसभेला अधिक जागा जिंकता येतील, असा आडाखा पाहणीत मांडण्यात आला आहे. याचे कारण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रतिमा अत्यंत कलंकित झालेली आहे. ते महाभ्रष्टाचारी आहेत, असे बहुसंख्य लोकांना वाटत असावे. शिवाय त्यांची गद्दारी, भाजपची ते करत असलेली लाचारी, त्यांच्या पक्षांतील टगेगिरी आणि एकूणच त्यांची राजकीय अनैतिकता लोकांना रुचलेली नाही. तर निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपने तुफान लाचबाजी आणि खंडणीखोरी केली आहे. २०१९ पूर्वीचा महाराष्ट्र इतका वाईट नव्हता. असो. थोडा ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार केला, तर काय दिसते? गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात बरेच काही घडले-बिघडले. महाराष्ट्र कुठून कुठे आला, ते बघा...

संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाल्यानंतर, पंडित नेहरूंच्या साक्षीने मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते - ‘महाराष्ट्राचे हे जे राज्य निर्माण झाले आहे, ते मराठी जनतेच्या कल्याणाचे काम करीलच; परंतु मराठी भाषिकांच्या जवळ जे देण्यासारखे आहे, त्यांच्या जीवनामध्ये जे चांगले आहे, त्याचा त्याग जर करावयाचाच असेल, तर तो आम्ही भारतासाठी प्रथम करू. कारण भारत राहिला, तर महाराष्ट्र राहील. भारत मोठा झाला, तर महाराष्ट्र मोठा होईल.’ यशवंतरावांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ व सुसंस्कृत राजकारणी अशीच होती.

 

मराठीच्या होलसेल ठेकेदारांनी लघुदृष्टीतून केलेल्या अराजकी राजकारणामुळे महाराष्ट्राच्या नावाला बट्टा लागला.

 

मराठीच्या होलसेल ठेकेदारांनी लघुदृष्टीतून केलेल्या अराजकी राजकारणामुळे महाराष्ट्राच्या नावाला कसा बट्टा लागला, ते मागे शाहरुख खान प्रकरणात व काही वर्षांपूर्वीच्या नीतीशकुमार याच्या मुंबई भेटीच्या निमित्ताने स्पष्ट झाले. महाराष्ट्राचे नागरिक हे प्रथम भारताचे नागरिक आहेत व नंतर ते महाराष्ट्रीय आहेत. नवा महाराष्ट्रीय हा केवळ मराठी भाषा बोलणारा नव्हे, तर जो महाराष्ट्रात राहतो व आपल्या शक्तीनुसार त्याचे जीवन समृद्ध करतो, असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय होय, हा यशवंतरावकालीन विचार मागे पडू लागला आहे. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न जरी सुटला असला, तरी भारतनिष्ठेची जी आमची मूलभूत भावना आहे, ती कायम ठेवली पाहिजे, असे यशवंतराव म्हणत.

महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम बंगालमध्ये बंगाल अस्मिता तीव्र आहे. ती तिथल्या सर्वच राजकीय विचारांच्या नेत्यांत व कलावंतांमध्ये आढळते. ममता बॅनर्जींना तर राज्यापलीकडचे काहीच दिसत नाही. रवीन्द्रनाथ ठाकूर हे त्यांच्या अस्मितेचे प्रतीक असते. पण शिवाजी महाराजांच्या जीवनाचा संदेश बंगाली भाषेत पोचवण्याचे काम रवीन्द्रनाथांनी केले. तुकारामाच्या अभंगांचेही त्यांनी बंगालीत भाषान्तर केले. मात्र रवीन्द्रनाथांच्या जीवनाचा व काव्याचा संदेश मराठीत जेवढा यायला हवा होता, तेवढा आलेला नाही. स्वतः रवीन्द्रनाथ हे भाषिक वा प्रांतीय काय, देशाच्या सीमाही मानत नव्हते. माणसाने विश्वाचा नागरिक व्हावे अशी विश्वमानवाची संकल्पना त्यांनी मांडली होती.

शिवाजी महाराजांवर मोनॉपॉली सांगणाऱ्या लोकांना महाराज हे कुठल्याही एका धर्माचे, जातीजमातीचे वा भाषेचे प्रतिनिधी नव्हते, ते सर्व भारताचे होते, याची जाणीव नाही. मराठीवरील प्रेम व्यक्त करणारे हिंदीबद्दल तिरस्कार व्यक्त करतात. त्यांना हे माहीत नाही की यशवंतरावांनी हिंदी भाषेच्या अध्ययनास व अध्यापनास उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले होते. महाराष्ट्र शासनाच्या नोकरवर्गाला हिंदीचा उत्तम परिचय व्हावा म्हणून हिंदीच्या काही परीक्षा उत्तीर्ण होणे त्यांच्या बाबतीत आवश्यक करण्यात आले होते.

 

‘मराठी’, ‘मराठी’ असा गजर करून मते मिळवणाऱ्यांना मातृभाषेची योग्य जाण नसते.

 

‘मराठी’, ‘मराठी’ असा गजर करून मते मिळवणाऱ्यांना मातृभाषेची योग्य जाण नसते आणि प्रेमचंदांपासून उदय प्रकाशांपर्यंतच्या लेखकांच्या समृद्ध परंपरेची गंधवार्ताही नसते. त्यांना कुणातरी हे सांगायला हवे की, लोकमान्य टिळकांना सुरुवातीला हिंदी येत नव्हते, पण आपली देशभक्ती व स्वाभिमानामुळे त्यांनी हिंदीचे ज्ञान करून घेतले. तसेच पूर्ण विचारांती, हिंदी हीच सबंध देशाची  भाषा होऊ शकेल या निर्णयाप्रत ते आले. त्यानंतर त्यांनी हिंदीच्या प्रचारकार्यात लक्ष घालण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय संघटन व ऐक्य साधण्यासाठी सगळ्या ठिकाणी समजली जाईल अशा भाषेची गरज असून, हिंदी हीच अशा प्रकारची भाषा आहे, असे त्यांचे मत होते.

आचार्य विनोबा भावे यांना २६ भाषा येत होत्या आणि भाषाप्रसारातील त्यांचे काम मोठे आहे. बाबुराव विष्णु पराडकर, माधवराव सप्रे, लक्ष्मण नारायण गर्दे, काका कालेलकर या मराठी विद्वानांनी हिंदी भाषेची अपरिमित सेवा केली आहे. एका विशिष्ट परिस्थितीत हिंदीला या देशात महत्त्व आले आणि ते एका अर्थी स्वाभाविकही होते. मराठी व हिंदीची लिपी जवळ जवळ सारखीच असल्याचाही हिंदी इथे रुजण्यात व उचलली जाण्यास हातभार लागला.

भाजपने पावन करून घेतलेले, कलंकित प्रतिमेचे कृपाशंकर सिंह यांची जरूर निर्भर्त्सना केलीच पाहिजे. मुंबई व इतरत्र येणारे जे उत्तर भारतीय गुन्हेगारी, भेसळ, गलिच्छपणा व बकाली वाढवत आहेत, त्यांना सुतासारखे सरळ केलेच पाहिजे. अबू आझमीसारख्या राजकीय पुंडांना थारा देता कामा नये. परंतु हे करताना महाराष्ट्र व अन्य राज्ये, मराठी भाषा व इतर भाषा यांच्यात कुंपणे घालण्याचेही कारण नाही. आज राजकीय वाद घालताना वेगवेगळे नेते व्यक्तिगत चिखलफेक करताना दिसतात आणि हे दुर्दैवी आहे.

अर्थात ही मंडळी म्हणजे टिळक-आगरकर नव्हेत. पण इथे एक आठवण सांगितली पाहिजे. एकदा ‘केसरी’मध्ये, ‘सार्वजनिक विषयावर वादविवाद करण्याच्या निमित्ताने खासगी द्वेषाचे उट्टे काढण्याची संधी क्वचितच मिळते’, असे वाक्य प्रसिद्ध झाले होते. आगरकरांनी ‘सुधारका’त, ‘महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र’ असा अग्रलेख लिहिला. त्यात ते म्हणतात : ‘खासगी द्वेष! आणि तो कशासाठी? टिळक आगरकरांचे किंवा आगरकर टिळकांचे काही एक लागत नाहीत. म्हणूनच एकाला दुसऱ्याला ‘खासगी द्वेष’ करण्याचे कारण नाही. आजपर्यंत या देशात कलह माजावा तितका कधीच न माजल्यामुळे आणि बहुधा आमचे लोक गतानुगतिकच असल्यामुळे हे भरतखंड इतकी शतके अनेक प्रकारच्या विपत्तीत खितपत पडले आहे! फक्त हा विचारकलह दुष्ट विकोपास जाऊ न देण्याविषयी खबरदारी घेतली पाहिजे’. हे ‘वैर’ असेल ते असो; मात्र ‘जेव्हा आगरकरांच्या डोळ्यांस पाणी येण्यासारखी काही अनिष्ट गोष्ट घडेल, तेव्हा इतरांपेक्षा टिळकांस व जेव्हा टिळकांचे घरी तसे घडेल, तेव्हा आगरकरांस विशेष वाईट वाटून डोळ्यांस पाणी येईल व एक दुसऱ्याला मदत करण्यास सहज प्रवृत्त होईल’, असेही आगरकरांनी म्हटले होते.

आयुष्यात कधीच नोकरी न करता, इतरांना शिकवणाऱ्यांपेक्षा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार अधिक मोलाचे ठरतात. त्यांनी आयुष्यात अनेक क्षेत्रांत नोकऱ्या केल्या व स्वाभिमानाला किंचितसाही डंख बसताच त्या ताडकन सोडल्या. बेकारीची क्षिती त्यांना कधीच वाटली नाही. अंगात हुन्नर असेल तर रिकामे राहावे लागत नाही. त्यामुळे नोकरी जाताच फोटोग्राफी, फोटो एन्लार्जिंग व पोर्ट्रेट पेंटिंगचे व्यवसाय त्यांनी सुरू केले. शिवाय चार महिन्यात इंग्रजी लिहिणे-बोलणे, फोनोग्राफी शिकवणे, टायपिंग करणे असे उद्योग त्यांनी यशस्वीपणे केले.

 

आयटीत मराठी तरुण पुढे आहे; पण कनिष्ठ स्तरावरची नोकरी वा व्यापाराची कामे करायला आम्हाला लाज वाटते.

 

आज मराठी माणूस सातासमुद्रापार गेला आहे. विक्रम राजाध्यक्षांच्या डीएलझेड कॉर्पोरेशन या अमेरिकन कंपनीची ९० दशलक्ष डॉलरची उलाढाल आहे. सुनील देशमुख, कैलास व संजय काटकर, अरुंधती जोशी, दिनेश केसकर, हेमंत नेरूरकर, विक्रम पंडित अशा किती कर्तृत्ववानांची नावे घ्यायची? दलित उद्योजकतेत मिलिंद कांबळेंनी वेगळीच वाट चोखाळली आहे. पण त्याचवेळी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद व इतरत्र कष्टकरी मराठी व्यक्तींची संख्या मात्र रोडावत आहे.

अलीकडे मी कोकणात गेलो असताना तेथे झाडावरून नारळ काढण्यासाठी मजूर मिळायची मारामार होती. मुंबईत गिरणगावातील चाळींमध्ये कोळिणी वरच्या मजल्यावर टोपली घेऊन जाण्याचे अनेकदा टाळतात. उलट भय्या मासे, आंबे, भाज्या घेऊन वर जातो. नुकताच दादरच्या प्लाझा मंडईत गेलो, तेव्हा बहुतेक व्यापारी परप्रांतीयच होते. आयटीत मराठी तरुण पुढे आहे; पण कनिष्ठ स्तरावरची नोकरी वा व्यापाराची कामे करायला आम्हाला लाज वाटते. आम्ही भाजी पिकवतो, पण ती विकण्यासाठी कष्ट करणाऱ्यांची संख्या घटल्यामुळे त्यांची जागा भय्या घेतो.

एकदा मुरुडला बीच रिसॉर्टवर गेलो असताना त्याचा मालक म्हणाला की, इथे मराठी शेफ मिळत नाही. ग्राहकांना चायनीज, पंजाबी चमचमीत पदार्थ आवडतात. ही कला शिकून घ्यायची आपल्या लोकांची तयारी नाही. यूपीवाले, मल्याळी न कंटाळता शिकून घेतात, म्हणून आम्ही त्यांना कामावर घेतो.

आज मराठी टायपिस्ट, प्रुफरीडर्स, कार ड्रायव्हर्स मिळत नाहीत. कॉल सेंटर्ससाठी लागणारी पात्र मराठी माणसे मिळत नाहीत. विविध वस्तूंच्या मार्केटिंगसाठी उत्साही व कामसू मराठी व्यक्तींचे दुर्भिक्ष्य आहे. रिअल इस्टेट, रिटेल, मल्टिप्लेक्स, टेक्सटाईल, टूरिझम क्षेत्रांत भरपूर संधी असल्या, तरी रोजगारक्षम टॅलेंटची वानवा आहे. मराठी माणसाने सुरू केलेल्या एका प्रसिद्ध कुरियर कंपीची सध्या दैना झाली आहे, ती त्याने आपल्या कर्मचाऱ्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे.

 

मराठी भाषा जगायला हवीच, पण आधी मराठी माणूस तर जगला पाहिजे ना!

 

थोडक्यात, दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी प्रथम आपले स्वतःचे दोष दूर केले पाहिजेत. मराठी तरुणांची कौशल्ये वाढवणे, कोणत्याही श्रमास प्रतिष्ठा देणे, उद्येजकतेचा प्रसार करणे ही कामे हाती घेतली पाहिजेत. शेती व शेती आधारित व्यवसायांत तरुणांना नव्या संधी प्राप्त होतील अशी धोरणे आखावी लागतील. मराठी मुलामुलींना ट्रेडिंगकडे (होलसेल-रिटेल, कमॉडिटी, शेअर्स, म्युच्युअल फंड, बाँड्स, इंपोर्ट-एक्स्पोर्ट) वळवावे लागेल. मराठी भाषा जगायला हवीच, पण आधी मराठी माणूस तर जगला पाहिजे ना!

डॉ. आंबेडकरांच्या मते, प्रत्येक प्रांतात एक-दोन जातींचे संख्याप्राबल्य असते आणि बाकीच्या जाती अल्पसंख्य असतात. जमीनदारी, सरकारी नोकऱ्या, व्यापारउद्योगात रेड्डी, कम्मा, कप्पू स्वामित्व गाजवतात व अस्पृश्यांना तेथे दुय्यम स्थान आहे. ते म्हणतात ‘महाराष्ट्राच्या खेडोपाडी मराठ्यांची अफाट वस्ती आहे. ब्राह्मण, गुजर, अस्पृश्य आणि कोळी हे दुय्यम स्थान धरून आहेत. गांधीजींच्या खुनानंतर ब्राह्मण-बनिया लोक मराठ्यांच्या प्रकोपाला भिऊन खेड्यापाड्यातून जीव घेऊन पळाले. त्यांनी शहराचा आसरा केला. दुर्दैवी अस्पृश्य, कोळी, माळी हे मराठ्यांची मग्रुरी व जुलूम सहन करत जीवन कंठत आहेत. भाषावार प्रांतरचनेत अल्पसंख्याक जातींना काय आधार आहे? त्यांना आर्थिक प्रगतीची अपेक्षा धरता येईल काय’, असा रोकडा सवाल बाबासाहेबांनी केला होता.

बाबासाहेब असोत की यशवंतराव; त्यांचे मन विशाल होते. त्यांच्या राजकारणात माणुसकीचा गहिवर होता. सर्व भाषक, जाती, धर्मातल्या वंचितांचा विचार हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. महाराष्ट्रातील नेतृत्वाकडून आज अशा दृष्टीची अपेक्षा आहे. नाहीतर महाराष्ट्र मातीत जाईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील भाजपने राजकारणाचा चिखल केला आहे. १ मार्च २०१४ रोजी यशवंतरवांचा १११वा जन्मदिन साजरा झाला आणि यावर्षी २५ नोव्हेंबरला त्यांची चाळिसावी पुण्यतिथी असेल. यशवंतरावांनी घडवलेला महाराष्ट्र निदान बिघडवू तरी नका.