Opinion

पाकिस्तान धडा कधी शिकणार?

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

स्काल्प क्रूझ क्षेपणास्त्र, हॅमर बाँब आणि आत्मघातकी ड्रोनचा वापर करून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. राफेल विमाने आणि सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानांनी अचूक लक्ष्यभेद केला. शत्रूला चकवा देऊन मारा करण्यासाठी स्काल्प हे क्षेपणास्त्र ओळखले जाते. टेहळणी, लक्ष्यनिश्चिती आणि लक्ष्यभेद करण्याचे काम ड्रोन करते. लक्ष्याच्या भोवती ड्रोन्स फिरतात आणि नंतर रिमोट कंट्रोलने लक्ष्यभेद केला जातो. भारताने केलेली ही कारवाई, त्यासाठी केलेले नियोजन आणि नंतर आंतरराष्ट्रीय समुदायास तसेच प्रसारमाध्यमांना विश्वासात घेऊन याबद्दल दिलेली माहिती याचे कौतुकच करावे लागेल. याबद्दल केवळ सैन्यदलाचे कौतुक करायचे, पण केंद्र सरकारचे वा नेतृत्वाचे नाही, हा कद्रूपणा होईल. बांगलादेश युद्धात भारताने केलेल्या पराक्रमाचे श्रेय फिल्डमार्शल माणेकशा यांच्या नेतृत्वाखालील सैन्याला दिले गेले. त्याचप्रमाणे पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचीही प्रशंसा करण्यात आली. त्यावेळी हे श्रेय केवळ सैन्यदलाचे, असे म्हटले गेले नव्हते. प्रत्येक प्रश्नावर संकुचित राजकारण करताना, किमान त्याचे टोक गाठले जाऊ नये, हे तरी पाहण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे दिलदारपणे अभिनंदन केले पाहिजे. भारत-पाकिस्तान संबंधांचा पूर्वेतिहास पहिल्यास काय लक्षात येते?

पठाणी व आफ्रीदी टोळ्यांच्या माध्यमातून १९४८ सालीच पाकिस्तानने काश्मीरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले. तरी तेथील असंतोषाचा फायदा उठवण्यासाठी पाकने काही स्थानिक संघटनांना आपल्या पंखाखाली घेतले. काश्मिरात सार्वमत घेण्याच्या पाठपुरावा सुरू ठेवला. १९५६ मध्ये पाकिस्तान प्रजासत्ताकाची राज्यघटना अस्तित्वात आली. पण दोन वर्षांतच पाकिस्तानचे अध्यक्ष इस्किलार मिर्झा यांनी ती राज्यघटना मोडीत काढून, जनरल अयूब खान यांची ‘चीफ मार्शल लॉ अॅडमिनिस्ट्रेटर’ म्हणून नेमणूक केली. अल्पावधीतच अयूब खान यांनी मिर्झा यांना गचांडी देऊन, अध्यक्षपदाची सूत्रे स्वतःकडे घेतली व लष्करी सत्ता बळकट केली. अयूब हे हुकूमशहा असल्यामुळे सर्वाधिकार त्यांच्या हाती आले. लष्करी बळावर त्यांनी काश्मीरचा ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू केले.

 

१९६४ साली नेहरूंचा मृत्यू झाल्यावर भारतीय राजकारणात पोकळी निर्माण झाली.

 

१९६४ साली नेहरूंचा मृत्यू झाल्यावर भारतीय राजकारणात पोकळी निर्माण झाली. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्यासमोर अन्नधान्यापासून आर्थिक चणचणीपर्यंत अनेक समस्यांचे आव्हान होते. १९६५ मध्ये काश्मीरचे नेते शेख अब्दुल्ला हज यात्रेला गेले असताना, प्रवासादरम्यान त्यांनी चीनचे पंतप्रधान चाऊ एन लाय यांची गुप्त भेट घेतली. याबद्दलची माहिती भारत सरकारला मिळताच, शेख अब्दुल्लांना अटक करण्यात आली. त्यामुळे काश्मिरात पुन्हा असंतोष वाढला होता. काश्मीरवर ताबा मिळवण्याची ही सुसंधी असल्याचे अयूब खान यांना वाटले. १९६५ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पण त्यावेळी चीनने उघडपणे पाकिस्तानची बाजू घेतली आणि ब्रिटन, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या देशांनी युद्धबंदीचे प्रयत्न सुरू केले. २० ऑक्टोबर १९६५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष ऊ थांट यांनी उभय देशांच्या नेत्यांशी चर्चा करून युद्धबंदीला मान्यता मिळवली. त्यानंतर १९७१ आणि १९९९ अशा दोन्ही युद्धांत भारतामुळे पाकिस्तानवर नामुष्की ओढवली. परंतु १९९० च्या दशकापासून पाकिस्तानचा भारताविरुद्धचा दहशतवाद वाढतच गेला असून, त्याचा अंत केव्हा होणार, हे कोणालाच ठाऊक नाही. असो.

ज्यांनी निष्पाप लोकांची हत्या केली, त्यांच्यावरच आम्ही हल्ला केला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ मागील नैतिक कारण अधोरेखित केले, असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काढले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याच्या सूत्रधारांना धडा शिकवण्यात आल्याबद्दल संपूर्ण देशात अत्यंत समाधानाची भावना आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अतिशय अचूकतेने, सतर्कतेने आणि संवेदनशीलतेने पार पाडले. हनुमानाने अशोक वाटिकेला आग लावताना जे केले, तेच आम्हीही केले. म्हणजे निरपराध लोकांना त्रास होऊ नये याची दक्षता घेतली, असे सार्थ प्रतिपादन राजनाथ सिंग यांनी केले आहे.

 

पाच वर्षांपूर्वी कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीम कराचीत असल्याची कबुली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती.

 

कोणत्याही देशाला आपल्या भूमीवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार असतोच. दहशतवाद्याचे मनोधैर्य नष्ट करण्याच्या उद्देशानेच त्यांच्या छावण्या व पायाभूत सुविधांवर कारवाई करण्यात आली. मात्र यामुळे पाकिस्तानचे डोके लगेच ठिकाणावर येईल, अशी अजिबात अपेक्षा नाही. शेजाऱ्याला छळणे, हा त्याचा स्वभावधर्म आहे. त्यामुळे बुधवारी जम्मू व काश्मीरमधील नियंत्रणरेषेवरील गावांना लक्ष्य करून, पाकिस्तानी सैन्याने तोफगोळ्यांचा मारा केला. त्यात चार मुले आणि एका सैनिकासह किमान १३ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ५७ जण जखमी झाले. गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात घरे, वाहने आणि गुरुद्वारासह अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्यामुळे शेकडो नागरिकांना भूमिगत बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. हल्ला करताना भारताने जी काळजी घेतली, ती पाकिस्तानने अजिबात घेतली नाही. सामान्य माणसांच्या जिवांची पर्वाही त्याने केली नाही. अर्थात पाकिस्तानच्या या कुरघोडीला भारतीय सैन्याने चोख उत्तर दिले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी, भारताने हवाई हल्ला केल्यास शत्रूची विमाने उडवून टाकून समुद्रात फेकून देऊ, असे फुत्कार सोडले आहेत. त्याचवेळी त्यांचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ मात्र, दोन्ही देशांतील तणाव कमी केला पाहिजे, असे म्हणत आहेत!

वास्तविक भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान भयभीत झाला आहे. भारताने आमच्या धरणांना लक्ष्य केल्याचा, तसेच निष्पापांचा बळी घेतल्याचा कांगावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. भारताच्या हल्ल्यात २६ पाक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला असून, त्याचा कोणताही पुरावा दिलेला नाही. त्याचप्रमाणे पहलगाम प्रकरणाची चौकशी एखाद्या स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्याचा प्रस्ताव आम्ही दिला, पंरतु भारताने त्यास प्रतिसाद दिला नाही, असे शरीफ वारंवार सांगत आहेत. पाकिस्तानच्या या पोकळ व बोगस प्रस्तावांना भारत कशासाठी प्रतिसाद देईल?

मुळात पहलगामकांडाशी आपला काहीही संबध नाही, असा खोटा दावा पाक करत आहे. मग तेथे आलेले अतिरेकी आकाशातून टपकले का? यापूवीच्या कोणत्याही अतिरेकी हल्ल्यांची जबाबदारी पाकिस्तानने स्वीकारलेली नाही. पाच वर्षांपूर्वी कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीम कराचीत असल्याची कबुली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. परंतु त्यानंतर अवघ्या २४ तासांत पाकने या वक्तव्यावरून घूमजावही केले होते. खरे तर, पाकच्या परराष्ट्र खात्याने वेगवेगळ्या नावांनी बनवलेले दाऊदचे अनेक पासपोर्ट आणि नॅशनल आयडेंटिटी नंबरही जाहीर केला होता. मुंबईवरील हल्ल्यात असलेला कसाब जेव्हा भारताच्या तावडीत सापडला, तेव्हा तो आमच्या देशाचा नागरिकच नाही, असे पाकिस्तानने जाहीर केले. परंतु पाकिस्तानच्या ‘जिओ टीव्ही’ने कसाब हा पाकमधील फरीदकोटचा असल्याचे उघड केले. त्यानंतर पाकिस्तान सरकारनेही कसाब पाकिस्तानी असल्याचे मान्य केले.

 

मंगळवारी मध्यरात्रीनंतर भारताने अतिशय आधुनिक विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून, ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते केले.

 

मुंबईवरील हल्ल्यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि भारत सरकारचे चार अधिकारी पाकिस्तानला गेले होते. या हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईदविरोधात खटला सुरू करा, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर, आमच्याकडे पुरावे नाहीत, भारताने पुरावे द्यावेत, असा पवित्रा पाकने घेतला. तेव्हा कट पाकच्या भूमीत रचला गेला असल्यामुळे पुरावे तुम्ही शोधा, असे भारताने सुनावल्यावर, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी मौन धारण केले होते. मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रदार डेव्हिड हेडलीने दिलेल्या साक्षीत लष्करे तोयबा, पाकिस्तानी लष्कर व आयएसआय यांच्यात कसे जवळचे संबंध आहेत, याची माहिती त्याने दिली होती.परंतु कितीही पुरावे दिले, तरीदेखील दहशतवादाबाबत पाकिस्तान कानावर हात ठेवत आला आहे. त्यामुळे पकिस्तानकडून शहाणपणा व समजूतदारपणाची अपेक्षा करण्यात अर्थ नाही.

या पार्श्वभूमीवर, मंगळवारी मध्यरात्रीनंतर भारताने अतिशय आधुनिक विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून, ‘ऑपरेशन सिंदूर’ फत्ते केले. पाकिस्तानी हवाई दलाच्या रडारवर उमटण्याआधीच या क्षेपणास्त्राने अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले. २०१६ साली ऊरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये पाकव्याप्त काश्मीर किंवा पीओकेमध्ये तीन किलोमीटर आत घुसून कारवाई करण्यात आली होती. पुलवामानंतर बालाकोटमध्ये जो हवाई हल्ला भारताने केला, त्यावेळी नियंत्रणरेषेच्या पलीकडे ६० किलोमीटर शिरून लक्ष्यभेद करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये तर सीमेपलीकडे १५० किलोमीटरवर असलेल्या बहावलपूरपर्यंत घुसून आपण कारवाई केली. खास करून, मुरिदके, बहावलपूर आणि कोटली येथील अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त करण्यास विशेष महत्त्व आहे. कारण कारगिल युद्धाच्या काळात काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यापासून ते मुंबई हल्ल्यापर्यंतच्या सर्व अतिरेकी कृत्यांची तेथून आखणी करण्यात आली होती. २०० एकरांत वसलेले मुरिदके हे हाफिझ सईदच्या जमात उद दावाचे मुख्यालय आहे. तर बहावलपूरमध्ये जैशे मोहम्मदचे मुख्य केंद्र असून, मसूद अझरने तेथूनच सर्व कारवाया केलेल्या आहेत. तर पाकव्याप्त काश्मीरमधील कोटली हे हिजबुल मुजाहिदीनचे मुख्य केंद्र आहे. हिजबुलचा प्रमुख सय्यद सलाउद्दीनने १९९०च्या दशकात तेथूनच काश्मिरी तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देऊन, हिंसक कृत्ये करण्यासाठी परत भारतात पाठवले.

 

पाकमधील जे आतंकवादी मृत्युमुखी पडले, त्यांचा अंत्यविधी लष्करी जवानांच्या उपस्थितीत व लष्करी इतमामात पार पडला.

 

सीमेपलीकडून होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे अनेक ठोस दस्तावेज देऊनही, पाकने कधीच कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे भारताच्या या मोहिमेला जगातील प्रमुख देशांनी विरोध न करता, केवळ संयमाचे आवाहन केले आहे! ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या निर्णायक कारवाईचे काँग्रेससह देशातली सर्व विरोधी पक्षांनीही कौतुक केले आहे. या कारवाईची माहितीदेखील पारदर्शकपणे सर्वपक्षीय बैठकीत गुरुवारी केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली. पाकिस्तानच्या विरोधात ‘हम सब एक हैं’, अशीच सर्वपक्षीय भूमिका असल्यामुळे, पाकिस्तानलाच आता नमते घ्यावे लागणार आहे. अन्यथा त्याला पुन्हा एक दणका द्यावा लागेल!

पाकमधील जे आतंकवादी मृत्युमुखी पडले, त्यांचा अंत्यविधी लष्करी जवानांच्या उपस्थितीत व लष्करी इतमामात पार पडला. यावरून पाक लष्कर आणि दहशतवाद्यांचे संबंध किती घनिष्ट आहेत, याचे सार्वजनिक दर्शन झाले. संपूर्ण देशाचीच अधिकृत भूमिका दहशतवादाची असल्यामुळे, आता अंतर्गत दहशतवादामुळे हा देश पोखरला जात आहे. गुरुवारी पाकिस्तानात लष्कराच्या महत्त्वाच्या केंद्रांवर ठिकठिकाणी साखळी बाँबस्फोट झाले. भारताला आग लावायला निघालेला पाकिस्तान स्वतःच भस्मसात होऊ लागला आहे...

 

प्रस्तुत लेखातील मतांशी इंडी जर्नल सहमत असेलच असं नाही.