Opinion
धारावीची लढाऊ कन्या
मीडिया लाईन सदर
कर्नाटक विधानसभेच्या निमित्ताने ऑनलाइन भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, की काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची गॅरेंटी होय. काँग्रेसची सत्ता असताना रॉबर्ट वढेरा आणि डीएलएफ यांच्यातील जमीन व्यवहार सनदी अधिकारी अशोक खेमका यांनी रद्द करण्याचे साहस दाखवले होते. भाजपने खेमका यांची बाजू लावून धरली, तेव्हा हरियाणात काँग्रेसचे सरकार होते आणि केंद्रातदेखील. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने खेमकांच्या कारवाईचा प्रचारात पद्धतशीर वापर करून घेतला. हरियाणात भाजपची सत्ता आली. पण भाजपने आपल्या पहिल्या पाच वर्षांतच खेमकांची सहा, सात वेळा बदली केली. गुरुग्राम-फरिदाबाद मार्गावरील अरवली पर्वत भागातील तीन हजार एकर जमिनीच्या विकासाचा व्यवहार खेमका यांनी रद्द केला होता. हा निर्णय लगेचच भाजप सरकारने फिरवला. बिल्डरांची धन होणार होती, म्हणून खेमकांनी तो रद्द केला होता. पण भाजपने बिल्डरांची धन करण्याचाच निर्धार करून खेमकांचा निर्णय बदलला! खेमकांचा निर्णय पर्यावरणाच्यादेखील हिताचा होता. म्हणजे हरियाणा येथील भाजप सरकारनेच 'भ्रष्टाचाराची गॅरेंटी' मिळवून दिली... तरीदेखील फक्त काँग्रेस तेवढा भ्रष्टाचारी आणि आम्ही मात्र सदाचारी, असा भाजप आणि मोदी यांचा दावा आहे!
तिकडे महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सर्वात मोठे बिल्डर मंगलप्रसाद लोढा हे भाजपचे पालकमंत्री आहेत आणि मुंबई शहर भाजपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. अशर नावाचे बिल्डर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकट वर्तुळातले आहेत आणि शिंदे यांनी त्यांना महाराष्ट्राच्या नीती आयोगावर नेमले आहे. राज्यातील जमिनी, इमारतींचे पुनर्वसन, नवे प्रकल्प याबदद्च्या अनेक निर्णयांवर अशर यांचा 'असर' पडलेला दिसतो, असे म्हणतात. आज मुंबई चहूबाजूंना विस्तारली असून, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि तिकडे दहिसरपासून पालघरपर्यंत हे क्षेत्र पसरले आहे. या पट्ट्यातील नगरपालिका-महानगरपालिकांवर शिंदेसेना तसेच भाजपचे प्रभुत्व आहे. तेथे विकासाच्या नावाखाली करोडो रुपयांच्या उलाढाली होत असतात. मुंबईतील धारावी प्रकल्पाचे कंत्राट भारतातील बडे उद्योगपती गौतम अदानी यांना देण्यात आले आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते सहकुटुंब, सहपरिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले, तेव्हा मोदींनी त्यांच्याकडे मुंबईकरांची वा मुंबईच्या प्रश्नांबाबत विचारपूस करण्याऐवजी, फक्त धारावी प्रकल्पाबाबत त्यांना प्रश्न विचारले. हे सूचक होते. मुंबईला भांडवलदारांच्या हातात सुपूर्द करून जमेल तितके ओरबाडून घ्यायचे, हीच भाजपची वृत्ती आहे.
कष्टकऱ्यांनी मोठा लढा देऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकारले.
मुंबई भांडवलदारांची की गरीब कष्टकऱ्यांची, असा सवाल संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अजेंड्यावर आला होता. कष्टकऱ्यांनी मोठा लढा देऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकारले. त्यानंतरही कॉ. डांगे, जॉर्ज फर्नांडिस, डॉ. जी. एल. रेड्डी यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी कामगार चळवळीला दिशा दिली. आज मुंबईत कापडगिरण्या नाहीत. शहरातले अनेक कारखाने केव्हाच बंद पडून तिथे टॉवर्स दिसू लागले आहेत आणि तरीदेखील मुंबईत धारावीसह झोपडपट्टीवाल्यांचे, कामगारांचे आणि चाळकऱ्यांचे प्रश्न कायम आहेत. धारावीकरांचे यथायोग्य पुनर्वसन झाले पाहिजे, म्हणून लढणाऱ्या आमदार वर्षा गायकवाड या सर्वांना ठाऊक आहेत. तीनवेळा काँग्रेसतर्फे लोकसभा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या.
वर्षाताईंनी ठाकरे सरकारमध्ये शालेय शिक्षणमंत्री म्हणून काम केले आणि त्यापूर्वीही लोकशाही आघाडी सरकारात २००९ मध्येही शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेटमंत्री म्हणून त्यांनी उत्तमरीत्या काम केले होते. लोकशाही आघाडी सरकारमध्येच महिला व बालविकास, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण आणि पर्यटन अशी खातीही त्यांनी कौशल्याने सांभाळली. मुळात एकनाथरावांचा चळवळीचा वारसा, तसेच प्राध्यापक म्हणून काम केले असल्यामुळे, भक्कम वैचारिक पाया असल्याने, विधानसभा असो वा जाहीर सभा, त्या नेहमीच ठोस भूमिका मांडतात. गणित घेऊन एम. एससी. झालेल्या असल्याने, त्यांची मांडणी तर्कशुद्ध आणि अचूक असते. धारावीचा पुनर्विकास अदानींच्या हातात सुपूर्द केल्यानंतर वर्षा यांनी विधानसभेत अत्यंत आक्रमकपणे भाषण करून, सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडलं होते. आता वर्षा गायकवाड या मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे उभ्या राहिल्या आहेत आणि त्यांच्या विरोधात महायुतीने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवले आहे. निकम यांना राजकीय अनुभव नाही. परंतु अतिरक्यांविरोधात खटले चालवले असल्यामुळे मध्यमवर्गात त्यांची एक प्रतिमा तयार झालेली आहे. मात्र ते किती चलाख आहेत, हे अनेकांना ठाऊक आहे. उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व व पश्चिम हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. वर्षाताई या अल्पसंख्याक समाज, झोपड्या व चाळींमध्ये लोकप्रिय आहेत. मतदारसंघातली काही भागात अल्पसंख्य समाजाची लोकसंख्या मोठी आहे. यापैकी काही ठिकाणी काँग्रेसचा, तर काही भागात शिवसेनेचा मतदार लक्षणीय प्रमाणात आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघात मागच्या दोनवेळेस पूनम महाजन, तर त्याआधी प्रिया दत्त या खासदार होत्या. वर्षा यांचा विजय झाला, तर पुन्हा एकदा उत्तर-मध्य मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी एका महिलेस मिळणार आहे.
At the time of UPA government, Congress had dominance in Delhi & Mumbai, its grip had loosened in the last few years.
— Harsh Tiwari (@harsht2024) May 17, 2024
This time JP Aggarwal, Varsha Gaikwad & Kanhaiya Kumar are contesting the elections strongly and can win.
Kanhaiya & Varsha could be the future of Congress in… pic.twitter.com/2FNvgq7V74
खरे तर, मुंबई दक्षिणमध्य या मतदारसंघातून आपल्याला तिकीट मिळावे, अशी वर्षाताईंची इच्छा होती आणि ती रास्तही होती. याचे कारण, या मतदारसंघात धारावीचा मोठा हिस्सा येतो. शिवाय वर्षाताईंचा विधानभा मतदारसंघ धारावीच आहे. तसेच धारावीकरांचे पाण्याचे, रस्त्यांचे, गटारांचे किंवा धारावीच्या फेरआखणीचे प्रश्न वर्षाताईनीच यापूर्वी सातत्याने मांडले आहेत. धारावीतील चर्मोद्योगापासून वेगवेगळ्या उद्योगांची पुनर्वसन प्रक्रियेत नीट व्यवस्था व्हावी, हा वर्षाताईंचा आग्रह राहिला आहे. अदानींच्या विरोधात धारावीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा मोर्चा निघाला, त्यांच्या नियोजनात वर्षाताईंचीही महत्त्वाची भूमिका होती. मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघामधून उद्धव यांच्या शिवसेनेचे अनिल देसाई हे उभे आहेत. या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेस व शिवसेना एकमेकांना साह्य करत आहेत. दोन्ही पक्ष महाविकास आघाडीत असून, त्यांचा एकमेकांशी उत्तम ताळमेळ आहे. लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना, वर्षाताईंनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, मागच्या साडेचार वर्षांत त्यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ झाली आहे. त्या व त्यांचे पती राजू गोडसे यांची मिळून एकूण मालमत्ता सुमारे ११ कोटी रुपये इतकी आहे. मात्र उभयंतांकडे स्वतःचे वाहन नाही. उलट त्यांच्या डोक्यावर एक कोटींवरचे कर्ज आहे.
वर्षाताईंच्या कार्यकाळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप झालेला नाही. सुरुवातीला वर्षा यांना तिकीट मिळेल की नाही, अशी शंका निर्माण झाली होती. मात्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा त्यांच्यावर विश्वास असल्यामुळेच त्यांना लोकसभेची संधी मिळाली. मात्र पक्षातील माजी मंत्री सुरेश शेट्टी, भाई जगताप, अमरजित मनहास यांचं त्यांना कितपत सहकार्य मिळते, हे बघावे लागेल. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते नसीम खान यांनीही, एकाही मुस्लिमाला काँग्रेसने तिकीट न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. प्रचार समितीचा राजीनामाही दिला होता. मुंबई उत्तरमध्य मतदारसंघामधून वर्षाताईंना उमेदवारी दिल्याने नसीम खान नाखूश होते. परंतु कशीबशी त्यांची समजूत काढली गेल्यानंतर, त्यांनी प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली. माजी खासदार प्रिया दत्त यांनी वर्षाताईंसाठी प्रचार करणार असल्याचे अगोदरच घोषित केले होते. प्रियाजी मला मोठ्या बहिणीसारख्या असून, त्यांचे मार्गदर्शन मला उपयोगी पडेल, असे वर्षाताईंनी म्हटले आहे. वर्षाताई आज मुंबई काँग्रेसच्याही अध्यक्ष असून, प्रशिक्षण शिबिरे, मोर्चे, निदर्शने, सभा यांचा धडाका लावून त्यांनी पक्षकार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण केले आहे. मुंबईसारख्या महानगरीत काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे समर्थपणे नेतृत्व करणाऱ्या वर्षा गायकवाडांबद्दल सर्वसामान्य महिलांना आदर व कौतुकच वाटते. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अदानीच्या विरोधात न डरता उभ्या राहणाऱ्या नेत्या म्हणून आणि मुंबईतील वर्गीय लढ्याचे एक प्रतीक म्हणून त्यांच्या उमेदवारीकडे बघावे लागेल. काँग्रेसमध्ये भांडवलदारांशी असा पंगा घेणाऱ्या नेत्यांची अधिकच गरज आहे.