Opinion

शिंदेंचा रक्तदाब का वाढला?

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

मराठी भाषेसाठी पक्ष भेद विसरून मराठी माणसाने एकजूट दाखवली. मराठी माणसासाठी आमची एकजूट महत्वाची आहे. एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी, असं काहीजण म्हणताहेत. यांचा‘ म’ मराठीचा नाही, तर महापालिकेचा आहे. पण हा ‘म’ महापालिकेपुरता नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रसुद्धा काबीज करू, असे म्हणत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी सर्व निवडणुका ठाकरे यांची शिवसेना व मनसे युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुंबईतील ज्या वरळी भागात वरळी डोममध्ये जी ऐतिहासिक सभा झाली, त्याच परिसरात एकेकाळी आचार्य अत्रे ‘मराठा’मधून संयुक्त महाराष्ट्राचा आवाज बुलंद करत होते. आजही तेथे आचार्य अत्रे यांचा पुतळा उभा आहे आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र या, असेच जणू तो पुतळा आवाहन करत आहे. पन्नास वर्षांपूर्वी वरळीत शिवसेना आणि दलित पॅंथर यांच्यात राडा झाला होता.

१९७४ साली, म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी काँग्रेसचे खासदार आर. डी. भंडारे यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाल्यामुळे गिरणगाव पट्ट्यात लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्या काळात कापड गिरण्यांचा संप सुरू होता आणि कामगार सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात गेले होते. गिरणगावात, खास करून वरळी परिसरात बीडीडी चाळ वगैरे परिसरात दलितांची वस्ती मोठ्या प्रमाणात होती. नुकतीच ‘दलित पॅंथर’ची स्थापना झाली होती आणि दलितांमध्ये आग होती. दलितांमधील अंगार प्रज्वलंत झाला होता. काँग्रेसतर्फे रामराव अधिक उभे होते आणि त्यांच्या विरोधात जनसंघाने वसंतराव पंडितांना उभे केले होते. शिवाय रोझा देशपांडे यादेखील उभ्या होत्या.

रामराव आदिक हे शिवसेनेच्या स्थापनेपासून, एवढेच नव्हे, तर ‘मार्मिक’च्या काळापासून बाळासाहेब ठाकरे यांचे मित्र होते. त्यामुळे बाळासाहेबांनी आदिकांना समर्थन दिले होते. परंतु बीडीडी चाळीमधील आदिकांची एक सभा अचानकपणे उधळली गेल्यामुळे वातावरण पेटले. त्यावेळी रिपब्लिकन पक्षदेखील आदिकांच्या मागे उभा होता. दलित पँथरचे आक्रमक नेते राजा ढाले यांनी ‘मी कम्युनिस्ट आहे’, अशी घोषणा केली. तेव्हा रिपब्लिकन पक्ष व दलित पॅंथर यांच्यात मतभेद निर्माण झाले. दलितांनी मतदानावर बहिष्कार घातल्यामुळे रोझा देशपांडे ११ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी शिवसेना आणि कम्युनिस्ट एकमेकांच्या विरोधात होते. परंतु पाच जुलैच्या वरळी डोममधील सभेत कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, शेकापचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे डॉ. भालचंद्र मुणगेकर व्यासपीठावर हजर होते.

 

"हिंदी सक्ती ही मुंबई स्वतंत्र करण्याची चाचपणी आहे."

 

१९७४ मध्ये दलित पँथरच्या एका सभेत वक्त्यांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. दलित पॅंथरचे भागवत जाधव यांचा दगडफेकीत मृत्यू झाला. आज मात्र दलित समाज मोठ्या प्रमाणावर उदारमतवादी अशा उद्धव ठाकरे यांच्यामागे उभा राहिला आहे. भीमशक्ती आणि शिवशक्ती यांच्या एकजुटीचा प्रयोग उद्धवजींच्याच धोरणातूनच झाला होता. वरळी डोममधील सभेत उद्धवजींनी राज ठाकरे यांचे कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिले आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला. तर हिंदी सक्ती ही मुंबई स्वतंत्र करण्याची चाचपणी आहे. म्हणून उद्धव आणि मला एकत्र आणण्याबाबत जे बाळासाहेबांना जे जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमले. आता मराठीसाठीची ही एकजूट कायम राहावी आणि महाराष्ट्रात बाळासाहेबांचे स्वप्न साकार व्हावे, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली. याचा अर्थ, राज यांनीदेखील अप्रत्यक्षपणे का होईना, उद्धवजींच्या टाळीला प्रतिसाद दिला आहे.

वरळीतील मेळाव्यात केवळ उद्धव आणि राज हेच एकत्र दिसले नाहीत, तर अनिल परब, अनिल देसाई, संजय राऊत हे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे या मनसेच्या नेत्यांबरोबर वावरताना दिसले. या सभेच्या तयारीसाठी दोन्ही पक्षांच्या या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी समरसून आणि एकत्रपणे काम केले. या मेळाव्यास मी स्वतः पहिल्या रांगेत बसलो होतो आणि त्यामुळे मला सर्व गोष्टींचे जवळून दर्शन घडले. किशोरीताई पेडणेकर, ज्योती ठाकरे या शिवसेनेच्या नेत्या त्याचप्रमाणे शालिनी ठाकरे व यशवंत किल्लेदार हे आनंदाने फुगड्या खेळताना दिसले.

 

राज यांनी शिवसेनेबरोबर युती करून करण्याबाबत अद्याप स्पष्ट विधान केलेले नाही.

 

वरळीत दोन्ही भाऊ अठरा वर्षांनी एकत्र आले आणि त्यानंतर मिरा-भाईंदर येथील परप्रांतीयांच्या दादागिरी विरोधात आणि मुख्यतः भाजपाचे तेथील आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात ठाकरे सेना आणि मनसे यांनी जोरदार आंदोलन केले. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानात गिरणी कामगारांना पाठिंबा देण्यासाठीदेखील उद्धव ठाकरेंबरोबरच राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी बाळा नांदगावकर हजर होते. या सर्व लढाईत कमालीची ऊर्जा आणि जोरकसपणा असताना, मराठीचा विजय आहे की ही नवी रुदाली आहे, अशी अत्यंत संतापजनक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दोन भाऊ एकत्र आले, हे न पाहवल्यामुळे फडणवीस, आशीष शेलार, राम कदम, प्रसाद लाड वगैरे सर्व भाजप नेत्यांनी आपली मळमळ व्यक्त केली. नारायण राणे आणि त्यांची चिल्लर गॅंग तर सतत ठाकरेविरोधी उलट्या करतच असते. परंतु या सर्वांनी उद्धवजींना टार्गेट केले आणि राज ठाकरे त्यांच्या मराठीप्रेमाच्या अनुषंगाने कौतुक केले. हाच प्रकार एकनाथ शिंदे यांनीदेखील केला. अनेकदा प्रवासात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून, चोऱ्यामाऱ्या केल्या जातात, तशातलाच हा प्रकार. राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंपासून तोडायचे, फितवायचे हे प्रकार गेली काही वर्षे महायुतीकडून सुरूच आहेत आणि ‘भ्रष्टनाथ’ म्हणून विख्यात झालेले एकनाथ शिंदे यांचे, त्यांच्यापेक्षाही लबाड असलेले सहकारी आणि उद्योगी मंत्री उदय सामंत हे राज यांच्याकडे अधून मधून खिचडी व पोहे खायला जात असतात. खुद्द शिंदे यांनीही राज यांच्याकडे जाऊन आमरस पुरीवर ताव मारला होता.

विधानसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर आणि अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे सेनेची वाट धरल्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशावेळी मनसे बरोबर आल्यास, मराठी मतांची बेरीज होणार आहे. राज यांनी शिवसेनेबरोबर युती करून करण्याबाबत अद्याप स्पष्ट विधान केलेले नाही. मात्र दोघांमध्ये असलेला अंतरपाट दूर होऊन आता आम्ही एकत्र आलो आहोत, या उद्धव ठाकरेंच्या वाक्यावर हजारो कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला याचा अर्थ सामान्य शिवसैनिक आणि मनसैनिक तसेच मराठी माणसाला हे दोघेही भाऊ एकत्र आलेले बघायला आवडेल, असाच आहे. ठाकरे सेना आणि मनसे यांच्या जवळिकीमुळे उद्धव सेनेतील गळती थांबणार आहे किंवा कमी होणार आहे.

 

ठाकरे बंधू एकत्र आल्यास भाजपाचा फायदा होईल, असे भाजपच्याच नेत्यांना वाटते.

 

तिकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगार हे पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ-मराठवाड्यामधील आहेत. त्यांचे वास्तव्य नवी मुंबईत आहे. शिवाय स्थानिक भूमिपुत्रांची संख्या ही लक्षणीय आहे. उबाठा व मनसे एकत्र आल्यास, दोन्ही पक्षांना नवी मुंबई महानगरपालिकेत फायदा होऊ शकेल. २०२४ या विधानसभा निवडणुकीत बेलापूर विधानसभा मतदारसंघात मनसेला साडेसात टक्के मते मिळाली होती, तर ऐरोली मतदारसंघात उद्धवसेनेला १४% आणि मनसेला अडीच टक्के मते मिळाली होती. डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला आहे तर कल्याणमध्ये शिंदेसेनेचे प्राबल्य आहे. परंतु शिंदेसेनेत असंतुष्ट असलेल्या काही मंडळींना पुन्हा उद्धवसेनेत यावेसे वाटू शकते. तसेच कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेची काही एक ताकद आहे. उद्धवसेनेकडे केडीएमसी महापालिकेत सध्या आठ ते दहा नगरसेवकच आहेत. परंतु २०१० च्या निवडणुकीत तेथे मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले होते आणि त्यावेळी भाजपचे फक्त नऊ नगरसेवक विजयी झाले होते. २०१५ मध्ये मनसेच्या नऊ, एकसंध शिवसेना ५२ आणि भाजपच्या ४२ जागा निवडून आल्या होत्या.

ठाकरे बंधू एकत्र आल्यास, त्याचा तडाखा शिंदेसेनेला बसेल आणि त्यात भाजपाचा फायदा होईल, असे भाजपच्याच नेत्यांना वाटते. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ६७ नगरसेवक ठाण्यातून निवडून आले होते आणि ते बहुतेक सर्व शिंदेंबरोबरच आहेत. ठाण्यात भाजप दुय्यम भूमिकेत आहे. परंतु संघ-भाजपचे नेते ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल सतत आवाज उठवत असतात. उद्धव आणि राज यांनी हस्तांदोलन केल्यास मराठी मतांमध्ये घट आल्यास, ती भरून काढण्यासाठी भाजप सोबत असलेल्या गुजराती मतांवर शिंदेंचा डोळा आहे. म्हणूनच त्यांनी ‘जय गुजरात’ची घोषणा जाणीवपूर्वक दिली.

दोन ठाकरे एकत्रपणे निवडणूक लढले, तर मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांचे नुकसान होणार हे नक्की. याचे कारण बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा ते मग सांगू शकणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यंच्या मुंबईत दहा जागा आल्या होत्या. नुंबईतील माझगाव, भायखळा, परळ, शिवडी वगैरे गिरणगावात उद्धव ठाकरेंचे वर्चस्व आहे. तर भांडुप, मुलुंड, अंधेरी, गोरेगाव, दहिसरमध्ये मनसेचे संघटन चांगले आहे. शिंदे यांची ताकद कमी करण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. उबाठा आणि मनसे यांनी संयुक्तपणे निवडणूक लढवल्यास, त्यांना लक्षणीय  जागा मिळू शकतील. तसे झाल्यास, भाजपालाही मुंबई पालिकेवर सत्ता मिळवता येणार नाही. काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्यास, सत्ता स्थापनेसाठी त्यांचीही साथ मिळू शकेल. ठाकरेंच्या संभाव्य ऐक्यामुळे महाशक्ती आणि खास करून, एकनाथ शिंदे यांचा रक्तदाब वाढला आहे, हे मात्र नक्की. म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत.