Opinion
स्वाभिमानी शेट्टींचे पुनश्च हरी ओम्!
मीडिया लाईन सदर

लोकसभा असो अथवा विधानसभा, जसे चांगले उमेदवार निवडून आलेत, त्याचप्रमाणे काही गणंगही निवडून आले आहेत. अनेक गंभीर गुन्हे नावावर असलेले भ्रष्ट लोकप्रतिनिधी हे सार्वजनिक नीतिमत्ता, विकास आदी विषयांवर प्रवचने झोडत असल्याचे आपण पाहत असतो. अशावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचा लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आपल्या सर्वांच्या जिव्हारी लागणारा आहे.
वास्तविक शेट्टी यांना समर्थन देण्यास काँग्रेसची तयारी होती. उद्धव ठाकरे यांनीदेखील त्यांना तयारीला लागण्यास सांगितले होते. परंतु नंतर पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीने शेट्टींविरोधात डाव टाकला. शेट्टी यांनी शिवसेनेच्या ‘मशाल’ या निशाणीवर निवडणूक लढवावी, अशी अट अचानकपणे घालण्यात आली. ही अट घालावी, अशी सूचना सांगली जिल्ह्यातूनच एका बड्या पाटलाने केली होती, असे सांगण्यात येते. मात्र स्वतःची कष्टपूर्वक बांधलेली संघटना आणि पक्ष असताना, शेट्टी मशाल चिन्हावर निवडणुका कसे काय लढवतील, हा प्रश्नच होता. ते स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना बिलकुल आवडले नसते. शेट्टी यांची खासदार व आमदार म्हणून देशात आणि महाराष्ट्रात चांगली प्रतिमा आणि लौकिकदेखील आहे. अशावेळी ते ही सूचना अव्हेरतील आणि आपला डाव यशस्वी होईल, असा या बड्या नेत्याचा कुटिल हेतू होताच आणि त्याप्रमाणेच घडले. शेट्टी यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली.
ही निवडणूक लढण्यापूर्वी त्यांनी ३७ साखर कारखान्यांच्या ऊसदरांच्या संदर्भातील धोरणाच्या विरोधात ५२२ किलोमीटरची २२ दिवसांची यात्रा काढली होती. तिला तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यावेळी लोकसभेला आपले काही खरे नाही, असे धैर्यशील माने या शिंदेसेनेच्या खासदारालाही वाटत होते. मला राज्यसभा द्या, मी लोकसभा लढतच नाही, असे त्यांनी शिंदे यांना सांगितले होते, असे म्हणतात. मात्र शेट्टी यांच्या पदयात्रेला जबर प्रतिसाद मिळूनही, लोकसभा निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, याचा अनेकांना धक्का बसला. त्याचप्रमाणे बऱ्याच शंकाही उत्पन्न झाल्या. ज्या बूथवर शेट्टींच्या कार्यकर्त्यांची हमखास मते होती, तीही त्यांना पडली नाहीत. यामुळे शंकेला आधार होताच. परंतु तो मुद्दा बाजूला ठेवला, तरीदेखील समोरच्या बाजूने शिंदेसेनेने प्रचंड पैसे वाटून मतांचे पीक काढले, असा आरोप झाला.
शाहू-फुले-आंबेडकर शेतकऱ्यांचे हित जपणारे होते. त्यांचे हे तत्त्वज्ञान मात्र सोईस्करपणे विसरले जात आहे.
त्यावेळी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील पंचतारांकित हॉटेलात तळ ठोकला होता. तिथून काय काय व्यवहार झाले, याची सर्वत्र चर्चा झाली होती. राजू शेट्टी यांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून ऊस शेतकऱ्यांना पुन्हा एकदा १ हजार कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला. मात्र याचे श्रेय शेट्टी यांना मिळू नये, यासाठी हा निर्णय घेणे जाणीवपूर्वक लांबवण्यात आले.
पराभवानंतर अनेक नेते खचून जातात. काही नेते निष्क्रिय होतात. परंतु राजू शेट्टी यांनी ‘पुनश्च हरी ओम्’ म्हणत कामास सुरुवात केली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात त्यांनी शक्तिपीठ मार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन उभे केले. रास्ता रोको केला. त्यानंतर शक्तिपीठाचा मार्ग बदलण्याची भूमिका स्वीकारणे सरकारला भाग पडले आहे, असे आत्ता तरी दिसते. यंदा एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळावा, यासाठी शेट्टी यांचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या फेब्रुवारीला ‘स्वाभिमानी’ तर्फे दुसरे ‘नांगरट साहित्य संमेलन’ भरवण्यात येणार आहे. आजपर्यंत शेतकऱ्यांचे व त्यांच्या समस्यांचे चुकीच्या पद्धतीचे चित्रण मराठी साहित्यात करण्यात आले आहे. कधी त्यांची टवाळी करण्यात आली, तर कधी त्यांना अडाणी दाखवण्यात आले. शेतकऱ्यांच्या भाषेवरून व पेहरावावरून कुचेष्टा झाली. शेट्टी यांना हे सर्व खटकते आहे. म्हणूनच शेती, ग्रामीण भाग आणि साहित्य याचा समग्रतेने आणि वास्तववादी विचार व्हावा, या आग्रहापोटी ते दरवर्षी हे संमेलन भरवणार आहेत.
एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना साखरेच्या निर्यातीसाठी आग्रह धरत असते. त्यामुळे कारखानदारांचे व परिणामी शेतकऱ्यांचे भले होईल, अशी अपेक्षा असते. शेट्टी खासदार होते, तेव्हादेखील साखर कारखानदारांच्या रास्त मागण्या ते केंद्रीय पातळीवर मांडत असत. इथेनॉल व बगॅस यासंबंधीच्या मागण्या लावून धरून, त्यांनी साखर कारखानदारांचे हित कसे होईल, हेही पाहिले. परंतु साखर सम्राटांना आज त्याचा विसर पडला आहे. शेट्टटींसारखा नेता पुन्हा खासदार होणे, म्हणजे खास करून ऊस शेतकऱ्यांची ताकद वाढणे होय आणि तेच त्यांना नको आहे. एकीकडे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे शेतकरीविरोधी वर्तन करायचे, हे या साखर सम्राटांचे धोरण आहे. शाहू-फुले-आंबेडकर हे शेतकऱ्यांचे हित जपणारे होते. परंतु त्यांचे हे तत्त्वज्ञान मात्र सोईस्करपणे विसरले जात आहे.
राजू शेट्टी यांच्याकडे कोणतीही संपत्ती नाही. कार्यकर्त्यांचे प्रेम हीच त्यांची संपत्ती.
ते काहीही असले, तरी राजू शेट्टी व त्यांची संघटना आज सक्रिय आहे. आगामी काळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, बेळगाव या पाच जिल्ह्यांतील लोकांची पर्यावरण परिषद ते घेणार आहेत. हवामानबदल, पर्यावरण आणि शेती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि याबद्दलची मांडणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणतज्ज्ञ या परिषदेतून करणार आहेत. राजू शेट्टी यांनी आपली पहिली निवडणूक यशस्वीपणे लढवली, ती लोकांकडून एक एक रुपयाची वर्गणी जमवून. शिरोळ येथील त्यांच्या घरी जाऊन मध्यंतरी मी त्यांच्याशी सविस्तर गप्पा मारल्या. तेव्हादेखील त्यांचा मूड अत्यंत सकारात्मक होता. त्यांचे शेताला लागून असलेले साधे आणि सुंदर घर हे कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या मदतीच्या बळावरच उभे राहिले आहे. आपल्या नेत्याला लोकांनी उत्स्फूर्तपणे हे घर बांधून दिले आहे. आजही त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा ओघ सुरू असतो.
राजू शेट्टी यांच्याकडे कोणतीही संपत्ती नाही. कार्यकर्त्यांचे प्रेम हीच त्यांची संपत्ती. त्यांच्याकडे फक्त शेतकरीहिताचा विचार आहे. एवढे असूनही, हातकणंगल्याच्या मतदारांनी राजू शेट्टी यांना विजयी होण्याइतपत मते न देण्याची चूक कशी केली, हाच प्रश्न आहे. निदान पुढच्या वेळी मतदार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार नाहीत, अशी आशा आहे. आज सचिन शिंदे (स्वाभिमानी युवा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष), राष्ट्रसेवा दलाचे रावसाहेब अलासे यांच्यासारखे असंख्य नेक आणि समर्पित सहकारी शेट्टी यांना लाभले आहेत. ‘तुम्ही आमच्या ‘बीआरएस’ या पक्षात सामील व्हा, तुम्हाला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करतो आणि १ हजार कोटी रुपयांचे पॅकेज देतो,’ अशी ऑफर तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राजू शेट्टी यांना दिली होती. अर्थातच शेट्टी यांनी ती नाकारली! त्यांना विकत घेणारा अजून जन्मायचा आहे...