Opinion

राहुल असे, तर फडणवीस कसे...

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि आता राहुल गांधी यांचा द्वेष करणाऱ्या पुण्यातच ‘छात्रों की गूँज’ हा कार्यक्रम प्रचंड गर्दीत पार पडला. राहुल पुण्यात येणार, असल्यामुळे शनिवारवाडा संस्कृतीतील गोडसेवादी अगोदरच खवळलेले होते. त्यात राहुलने ‘पुणे म्हणजे प्रेम’ अशी भाषा करून तमाम विद्यार्थिनींची मने जिंकली. हा कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टाळकुट्यांची पोटदुखी वाढलेली होती. कार्यक्रमावर वाट्टेल ते आरोप करून, त्यास कुठून पैसा मिळत आहे याची चौकशी करा, अशी मागणी भाजपच्या ‘शेलार’मामांनी केली. वास्तविक सरकार त्यांचेच असल्यामुळे त्यांनी ती जरूर करावी. कारण चौकश्या करण्याशिवाय हे सरकार दुसरे कोणतेही काम करत नाही. अतुलनीय ‘खळखळकर’देखील राहुलजींवर कुजकटपणे बरसले.

या कार्यक्रमाचे वृत्तांकन करताना, वसतिगृहातील तरुणींच्या व्यथा मांडण्याचे काम ‘एबीपी माझा’चे उत्तम वार्ताहर मंदार गोंजारी यांनी केले. तर त्याच्या विरोधातच गुन्हा नोंदवण्यात  आला. याचा अर्थ, सरकारविरोधी कोणतीही तक्रार वा बातम्या दाखवायच्याच नाहीत, असा फडणवीस सरकारचा आग्रह दिसतो. प्रसारमाध्यमांत लष्करे देवेंद्र सेवेला हजर आहेच... यापेक्षा त्यांनी राज्यात आणीबाणीच लागू करावी, हे बरे! राहुल गांधी यांनी परदेशात गुप्त बैठका घेतल्या. राहुलजींना जॉर्ज सोरोसकडून पैसे येतात. राहुल गांधी देशद्रोही आहेत. असे अनेक आरोप भारतीय जनता पक्षातर्फे होत असतात. यापूर्वी त्यांचे खासदारपद रद्द करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना अधिकृत निवासाबाहेर काढण्याचाही उपद्व्याप करून झाला. राहुल यांच्या विरोधात ठिकठिकाणी गुन्हे नोंदवून त्याना हैराण करण्यात आले. परंतु ते काही बधायला तयार नाहीत. उलट पावसाळी अधिवेशनात ५६ इंची छातीच्या दोन-दोन नेत्यांना, म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राहुल यांनी सळो की पळो करून सोडले...

 

‘भारत जोडो’नंतरचे राहुल गांधी हे अधिक स्नेहशील आणि कम्युनिकेटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.

 

राहुल गांधींनी परदेशात जाऊन मोदी यांच्यावर टीका केली, की ते देशाची बदनामी करतात, ते राष्ट्रद्रोही आहेत, असा आरोप संबित पात्रा यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वजण करू लागतात. दिल्ली दंगल असो अथवा एनजीओजचे फॉरिन फंडिंग, त्यात मोदीजींना परकीय हातच दिसतो. तेव्हा नॅरेटिव्ह सेट झाले आहेच. मोदींच्या डोक्यात फक्त धर्मवाद आहे. राहुल यांच्यामुळेच दिवसेंदिवस मोदींची अस्वस्थता वाढू लागली आहे. राहुल आम्हाला का छळतो? या राहुलचे करायचे काय? हे प्रश्न आज भाजपला सतावू लागले आहेत.

मणिपूरच्या निमित्ताने मागे संसदेत विरोधी पक्षांनी अविश्वासाचा ठराव आणला. त्यावेळी राहुल यांनी मर्मभेदी प्रश्न विचारून सत्ताधारी पक्षास घायाळ केले. राहुल हे काही मास्टर पॉलिटिशियन नाहीत किंवा महान वक्तेदेखील नाहीत. परंतु त्यांनी मोदी सरकारच्या बेदरकारीवर पूर्ण ताकदीने आणि अचूकतेने हल्ले चढवले. त्यामुळे तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, उद्धव ठाकरे यांची शिवसेना अशा अन्य पक्षांचे नेतेही प्रभावित झाले. ज्या माणसाला जोकर, बफून किंवा पप्पू असे संबोधले जात होते, त्या नेत्याबद्दल भाजपलाही गंभीरपणे विचार करावा लागत आहे.

आपल्या कारकिर्दीच्या आरंभकाळात राहुल हे आक्रमक होतेच. परंतु नको त्यापेक्षा जास्त हट्टी होते. ते सतत रागावलेले किंवा क्रुद्ध भासत. ‘भारत जोडो’नंतरचे राहुल गांधी हे अधिक स्नेहशील आणि कम्युनिकेटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. २०१९ मध्ये काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर त्याची जबाबदारी स्वीकारण्याची नैतिकता त्यांनी दाखवली व अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष बनल्या. परंतु प्रत्येक निर्णय राहुलजींना विचारूनच घेतला जात होता. त्यामुळे काँग्रेस ही फॅमिली पार्टी आहे, अशी टीका करण्याची संधी भाजपला मिळाली. परंतु मल्लिकार्जुन खरगे यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, खरगे यांनी आपला स्वतंत्र बाणा सिद्ध केला. राहुलजीही त्यांचा आदर करतात आणि कोणत्याही धोरणाबाबत विचारले असता, पक्षाध्यक्षच योग्य काय तो निर्णय घेतील, असे उत्तर राहुल देतात.

 

सत्ता हे विष आहे, अशा आशयाचे वक्तव्य राहुल यांनी अनेक वर्षांपूर्वी केले होते.

 

राहुल हे सहजपणे भेटत नाहीत, अशी त्यांच्यावर होणारी टीकाही थांबली आहे. सामान्य कार्यकर्त्यांशी त्यांचा सतत संवाद होत असतो. संघटनेचे ओझे खांद्यावरून गेल्यामुळे राहुल हे आता अधिक मोकळे झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावर आजकाल सदैव प्रसन्नता आणि हास्य विलसत असते. गोदी मीडियाने बदनामीची मोहीम हाती घेऊनही ते विचलित होत नाहीत. उलट पत्रकार परिषदेत भाजपच्या वतीने प्रश्न विचारल्यासारखे वाटले, तर संबंधित पत्रकाराची फिरकीही ते घेतात. देशाच्या समस्यांबद्दलचे त्यांचे आकलनही वाढले आहे. मन की बात ऐकवण्यापेक्षा जन की बात ऐकणे, हे त्यांना महत्त्वाचे वाटते. हे पुण्यातही दिसून आले. सामान्यांबरोबर हजारो मैल चालणारे राहुल हे श्रीमंतीत वाढलेले सुखासीन बाळ आहे, ही प्रतिमा त्यांनी पुसून टाकली आहे.

राहुल हे अत्यंत सुमार वा फालतू नेते असतील, तर भाजप त्यांना सातत्याने टार्गेट का करतो? राहुल पंतप्रधान होणार की नाहीत, हा प्रश्नच नाही. सत्ता हे विष आहे, अशा आशयाचे वक्तव्य राहुल यांनी अनेक वर्षांपूर्वी जयपूर येथील काँग्रेसच्या चिंतन शिबिराते केले होते. सहज शक्य असूनही त्यांनी २००४ नंतर यूपीए सरकारमध्ये मंत्रिपद घेतले नाही आणि मला पंतप्रधान बनायचे आहे, असे ते कधीही म्हणालेले नाहीत. एक प्रकारे ते विरोधकांचा नैतिक सूर बनले आहेत. संपूर्ण देशात राहुल यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे. या माणसाने शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, हमाल, लोहार, चर्मकार, ट्रक ड्रायव्हर, कुरियर कर्मचारी अशा सर्व वर्गांतल्या आणि जातिधर्मांतल्या माणसांशी आपले एक नाते प्रस्थापित केले आहे. कलावती या आदिवासी स्त्रीच्या कुटुंबाच्या कल्याणाची जबाबदारी त्यांनी शिरावर घेगेतली आणि त्याची जाहिरातही केली नाही. अनामिक राहून असंख्य गोरगरिबांना त्यांनी मदत केली आहे, माता-भगिनींशी एक वत्सल नाते प्रस्थापित केले आहे. शेतात राबून, शेतमजूर असणे म्हणजे काय, याचा अनुभव घेतला आहे. भट्टापरसोल असो अथवा नियमगिरी असो, शेतकऱ्यांसाठी ते रस्त्यावरही उतरले आहेत. पोलिसांची धक्काबुक्कीही त्यांनी सहन केली आहे. अशी व्यक्ती देशातील एक नैतिक शक्ती बनण्याच्या प्रक्रियेत आहे, असे मला निश्चितपणे वाटते आणि या विधानाची टिंगल होईल, हेही मला माहीत आहे. परंतु राहुल गांधी हे अपवादात्मक असे प्रामाणिक नेते आहेत, असे माझे ठाम मत आहे.

 

विरोधी पक्षांचे काही नेते केंद्र सरकारशी जुळवून घेत असताना, राहुल यांनी मात्र आपली भूमिका अजिबात बदललेली नाही.

 

२०१४ पासून विविध राज्यांत ज्या विधानसभा निवडणुका झाल्या, त्यापैकी बहुसंख्य निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. राहुल गांधी यांनाच या पराभवासाठी जबाबदार धरण्यात आले आणि त्यांना ‘पप्पू’ही ठरवण्यात आले. समाजमाध्यमांतून ट्रोलर्सनी राहुल यांची सतत हुर्यो उडवली. पण कोणत्याही क्षेत्रात, मग ते क्रीडा, चित्रपट किंवा राजकारणाचे क्षेत्र असो, हार न मानता चिकाटी व जिद्द दाखवली, तर माणसाला कधी ना कधी यश मिळतेच. उदाहरणार्थ, भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीमुळे एक वर्ष खेळापासून दूर होता. परंतु नंतर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले. अमिताभ बच्चनचे पहिले सहाही चित्रपट आपटले होते, परंतु नंतर मात्र तो हिमतीने सुपरस्टारपदापर्यंत पोहोचला. त्याचप्रमाणे राहुल गांधींची पप्पू व अयशस्वी, कामात सातत्य न ठेवणाऱ्या नेत्याची प्रतिमा आता पुसली गेली आहे. यापूर्वी राहुल यांना ‘शहजादा’. असे संबोधले जात होते. घराणेशाहीचा त्यांना लाभ मिळतो, अशी टीका केली जात असे.

‘राहुल गांधींविषयी अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष भेटीत ते अत्यंत दिलखुलास, नम्र आणि समंजस नेते असल्याचे लक्षात आले. बैठकीत कोणत्याही अन्य पक्षाच्या नेत्यांनी कोणत्याही सूचना केल्यास, त्या समजून घेऊन त्यांचा पाठपुरावा राहुल यांनी केला’, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही म्हटले आहे. आपल्या राजकीय भूमिकांबाबत राहुल हे आग्रही असतात आणि त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी काँग्रेसची वैचारिक लढाई आहे आणि ती न घाबरता लढणे आवश्यक आहे, अशी त्यांची भूमिका असून, म्हणूनच ‘डरो मत’ असा नारा त्यांनी दिला आहे. काही वर्षांपूर्वी ‘सूटबूट की सरकार’ अशी टीका त्यांनी भाजपप्रणीत रालोआ सरकारवर केली होती आणि त्याचा अवश्य परिणाम झाला. त्यानंतर केंद्र सरकारने कल्याणकारी योजनांवर भर देऊन, 'गरिबी हटाव'वर लक्ष्य केंद्रित केले. आजदेखील राहुल यांनी उद्योगपती गौतम अदानींबद्दलचा मुद्दा सोडलेला नाही. ज्या प्रकरणावरून त्यांना न्यायालयात खेचण्यात आले आहे, तेथेही ‘मी माफी मागणार नाही’, अशी ठाम भूमिका राहुल यांनी घेतली आहे. विरोधी पक्षांचे काही नेते केंद्र सरकारशी जुळवून घेत असताना, राहुल यांनी मात्र आपली भूमिका अजिबात बदललेली नाही. देशातील द्वेषपूर्ण वातावरण बदलण्यासाठी ‘मोहब्बत की दुकान’ सुरू करण्याची भाषा त्यांनी केली आहे. या दुकानास हळूहळू वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे. शेजारील द्वेषाचा मॉल केव्हा बंद होणार, याचीच प्रतीक्षा आहे...