Opinion

मोदी सरकारची लिमिटेड माणुसकी!

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

केंद्रात काँग्रेसची वा काँग्रेसप्रणीत आघाडीची सत्ता असताना, भारतीय जनता पक्षातर्फे नेहमी लालबहादूर शास्त्री यांचा हवाला दिला जात असे. रेल्वे अपघातानंतर त्यांनी रेल्वेमंत्रिपदाचा कसा राजीनामा दिला, याचा दाखला दिला जात असे. परंतु अलीकडील काळात रेल्वेचे कितीही अपघात झाले, तरी रेल्वंमंत्री अश्विनी वैष्णव राजीनामा द्यायला तयार नाहीत ते आणि पंतप्रधानांचे लाडके शिष्य असल्यामुळे त्यांची हकालपट्टीही केली जात नाही. बुलेट ट्रेन, वंदे भारत, तेजस या पंचतारंकित रेल्वेसुविधा हा या सरकारचा अग्रक्रम आहे. गरीब माणसे अपघातात मेली, तरी यांना त्याची फिकीर नाही. गुजरात वा दिल्लीच्या दंगलीत निरपराध लोक मेले, तरी त्याची यांना काहीच फरक पडला नाही.

कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत ३० जणांचा बळी गेला आणि दिल्ली स्टेशनमध्ये महाकुंभाला जाणारे १८ लोक चिरडून मरण पावले. हे दोन्ही आकडे खरे नाहीत, त्यापेक्षा बळींचा आकडा मोठा आहे, असे अनेकजण सांगत आहेत. याबाबत खरी माहिती दिली जात नव्हती. करोडो रुपये खर्चून जाहिरातबाजी करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल वरवरची सहानुभूती व्यक्त करून मोकळे झाले. मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई दिली, की आपली जबाबदारी संपली, असे ही धर्मवादी मंडळी मानतात. याबद्दल कोणीही प्रश्न विचारले की, ते राजकारण करतात, यांची हिंदू धर्मावर श्रद्धाच नाही, हे सगळे लोक हिंदुविरोधी आणि पाकिस्तानवादी आहेत, अशी क्षेपणास्त्रे डागली जातात... राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) दिवट्या शास्त्रज्ञांनी गंगेच्या पाण्यात स्वतःला स्वच्छ ठेवण्याचा गुणधर्म असल्याचा दावा केला. परंतु प्रयागराजमध्ये वाहणाऱ्या गंगा व यमुना या नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात एफसी, म्हणजेच विष्ठेत असणारे जिवाणू आढळल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेच दिली आहे.

गंगा आणि यमुनेला भाजपवाले अजूनही शुद्ध करू शकलेले नाहीत. रेल्वेच्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. समृद्धी महामार्गावर सुरुवातीलाच बरेच अपघात झाले. मुंबईच्या कोस्टल रोडला तडे गेले. मोदी सरकारने केलेल्या अनेक कामांमध्ये लगेचच दोष दिसून आले. संसदेच्या नवीन इमारतीला गळती लागली. गुजरातेत अख्खाच्या अख्खा पूल माणसांसह कोसळला. विमानतळावरील छत खाली आले. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेत नऊ लाख अपात्र बहिणी निघाल्या. यांचा गव्हर्नन्स हा असा आहे. कुंभमेळ्यात तीन लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली असली, तरी लोकांच्या जिवाची काही किंमत आहे की नाही?

 

युनेस्कोने कुंभमेळा हा ‘जागतिक सांस्कृतिक वारसा’ म्हणून घोषित केला आहे.

 

भारत हा प्रचंड लोकसंख्येचा विशाल असा देश आहे. बहुसंख्य भारतीय हे धार्मिक असून, ते तीर्थाटन करण्यासाठी जात असतात. वैष्णोदेवी, चारधाम, काशी, रामेश्वर अशा ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. दर तीन वर्षानंतर एकदा अशा पद्धतीने प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री ‘पूर्ण’ कुंभमेळे भरत असतात, दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे ‘अर्ध’ कुंभमेळा भरतो. बारा ‘पूर्ण’ कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षानी प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो. भारतभरातून कोट्यवधी हिंदू भाविक कुंभमेळ्यास हजेरी लावतात आणि पवित्र गंगा नदीत स्नान करतात. इसवी सन २००१ साली पार पडलेल्या महा कुंभमेळ्यात सहा-सात कोटी भाविकांनी भाग घेतला होता. कुंभमेळ्यात शाही स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची पूजा करणे यास हिंदू धर्मात विलक्षण महत्त्व आहे. कुंभमेळ्यातील शाही स्नानांत विविध आखाडे आणि त्यांचे साधू यांना अग्रक्रम दिला जाऊन त्यांची विशेष शोभायात्रा निघते. त्यांचे स्नान झाल्यानंतर अन्य भाविक नदीस्नान करतात. युनेस्कोने कुंभमेळा हा ‘जागतिक सांस्कृतिक वारसा’ म्हणून घोषित केला आहे. यंदाचा हा कुंभमेळा प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू होऊन, तो आता २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ‘दुर्मीळ ग्रहस्थिती’मुळे या कुंभमेळ्याला आगळे मोल प्राप्त झाले असून, त्यामुळे तेथे हजर राहण्यासाठी भाविक अत्यंत उत्साहित झालेले असतात.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत कुंभमेळ्यास निघालेल्या १८ भाविकांचा मृत्यू झाला, त्याबद्दल साहजिकच हळहळ व संताप व्यक्त करण्यात आला. या मृतांमध्ये ११ महिला आणि पाच मुलांचा समावेश असून, त्यांचा मृत्यू गर्दीत अक्षरशः चिरडून झाला. हे कमालीचे वेदनादायी आहे. यापूर्वी २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी होऊन, किमान ३० जणांचा बळी गेला होता. दर तासाला पंधराशे तिकिटांची विक्री झाल्यामुळे गर्दी अचानक वाढल्याचे सांगितले जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकात माणसे येणार, हे लक्षात घेऊन अगोदर नियोजन करण्याची आवश्यकता होती. त्या दिवशी नवी दिल्लीहून प्रयागराजला चार रेल्वे गाड्या जाणार होत्या. त्यापैकी तीन गाड्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे आधीच स्थानकात प्रचंड संख्येत लोक होते. त्यात फलाट क्रमांक १४ वर प्रयागराज एक्सप्रेस उभी असताना फलाट क्रमांक १६ वर प्रयागराज विशेष या गाडीची उद्घोषणा झाली. त्यामुळे नेमकी यापैकी आपली गाडी कोणती, यावरून प्रवाशांचा गोंधळ उडणे स्वाभाविक होते. खरे तर अशा प्रकारच्या घोषणा अचानक झाल्यामुळे काय परिणाम होणार होतील, हे पूर्वानुभवावरून बिनडोक प्रशासनास लक्षात यायला हवे होते. शिवाय दोन फलाटांना जोडणारा जिना अरुंद होता. प्रवाशांनी एकाचवेळी जिन्याकडे धाव घेतल्यामुळे ढकलाढकली सुरू झाली. गर्दीचा मोठा रेटा झाल्याने काहींचा तोल गेला आणि ते आणखी काही लोकांना घेऊन खाली कोसळले.

 

चेंगराचेंगरी होत असताना पोलिसांची संख्या कमी होती, लोकच एकमेकांना मदत करत होते.

 

ज्यावेळी रेल्वे स्थानकात महाप्रचंड गर्दी होते, तेव्हा गर्दीचे नियोजन करणे आवश्यक असते. मुळात रेल्वे स्थानकातच इतक्या प्रमाणात लोकांना आत जाऊ द्यायला नको होते किंवा शिस्तीत, रांगेने सोडायला हवे होते. विशेष गाडीची व्यवस्था आधीच केली असती आणि लोकांना त्याची सूचना अगोदर मिळाली असती, तर हा प्रकार टाळता आला असता. मुंबईत लोकल गाडयांच्या वेळापत्रकात बदल झाल्यास अशाप्रकारची धावपळ अनेकदा होते. २०१७ साली मुंबईच्या प्रभादेवी स्थानकातील पुलावर अशीच भयंकर दुर्घटना घडली होती. मनमोहन सिंग सरकार तेव्हा असते, तर देवेंद्र फडणवीस यांनी शोले स्टाइल पाण्याच्या टाकीवर चढून बोंबा मारल्या असत्या! असो. पुणे रेल्वे स्थानकातही रेल्वेच्या पुलावर गर्दीमुळे ढकलाढकली झाल्याचे प्रसंग घडले आहेत. वांद्रे टर्मिनसला अलीकडेच छठ पूजेच्या वेळी स्थानकात गर्दी उसळून असाच प्रकार घडला होता. दिल्ली स्थानकात कोणत्याही प्रकारची काळजी न घेतली गेल्यामुळे लोक केवळ जिवाच्या आकांताने धावत होते. या घटनेनंतर घटनास्थळी चपला-बूट, बांगड्या, दप्तरे अशा विखुरलेल्या सामानाचे दृश्य पाहायला मिळाले आणि त्यामुळे घटनेच्या भीषणतेची कल्पना येत होती. ही घटना घडल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीही कुंभमेळ्याला जाण्यासाठी दिल्ली स्थानकात अशीच गर्दी झाल्याचे दृश्य दिसले. परंतु निदान गाडीलगत संपूर्ण ठिकाणी दोरी बांधण्यात आली होती. त्यामुळे तेवढ्या प्रमाणात रेटारेटी झाली नाही. परंतु हिंदी चित्रपटात ज्याप्रमाणे घटना घडून गेल्यानंतर पोलीस येतात, त्याचप्रमाणे दिल्ली स्थानकावर रेल्वे पोलीस दिसू लागले... चेंगराचेंगरी होत असताना मात्र पोलिसांची संख्या कमी होती, त्यामुळे लोकच एकमेकांना मदत करत होते. शिवाय रुग्णवाहिकांची व्यवस्था नव्हती.

यावेळी दिल्ली स्थानकाप्रमाणे प्रयागराजलाही चेंगराचेंगरी झाली, त्याचप्रमाणे आगीची घटनाही घडली. महाकुंभमेळ्याला एकूण ४५ ते ५० कोटी भक्त भेट देतील, असा उत्तर प्रदेश सरकारचा दावा होता. वाट्टेल ते आकडे फेकण्यात हे लोक माहीर आहेत. महाकुंभमेळा ४५ दिवसांचा असून, प्रतिदिनी किमान एक कोटी भक्त कुंभमेळ्यास असतील, असा याचा अर्थ आहे. एवढ्या प्रचंड संख्येने लोक जमतात, तेव्हा त्यांचा काळजी घेणे, ही राज्य सरकारची जबाबदारी असते. परंतु प्रयागराजसारख्या छोट्या शहरात एकाचवेळी इतके लोक आल्यास, एखादा दुर्धर प्रसंग उद्भवू शकतो. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी मर्यादेपेक्षा अधिक गर्दीला निमंत्रण देणे, हेच मुळात चुकीचे आहे. दिल्ली स्थानकातील दुर्घटनेस रेल्वे प्रशासनाची अकार्यक्षमता कारणीभूत होती. आता या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन झाली असून, तिने आपले कामही सुरू केले आहे. परंतु आजवर अशा बहुतेक समित्यांच्या अहवालांची अंमलबजावणीच झालेली नाही!

 

मतदार हे यांच्या दृष्टीने केवळ ग्राहक आहेत. आणि भारतात ग्राहकांना कोणतेही संरक्षण नसतेच!

 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गर्दीच्या व्यवस्थापनाबद्दल आचारसंहिता जाहीर केली आहे. परंतु तिचे पालनच केले जात नाही. ड्रोन्सच्या वापराद्वारे लक्ष ठेवून, जेथे गर्दी होण्याची शक्यता आहे, तेथे अगोदरच सावधगिरीचे उपाय योजता येऊ शकतात. धार्मिक क्षेत्रे, मंदिरे, रेल्वे व एसटी स्थानके अशा गर्दीच्या ठिकाणच्या व्यवस्थेवर देखरेख करणारी एखादी मध्यवर्ती यंत्रणा असणे आवश्यक आहे. तसेच अशा महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची जास्त संख्येत उपस्थिती असणे आवश्यक आहे. अनेकदा रेल्वे उद्घोषणा वेळेवर होत नाहीत. प्रत्येक स्थानकात तातडीच्या उपचारांचीही व्यवस्था असणे आवश्यक आहे. परंतु यासाठी भाषणजीवी पंतप्रधानांना प्रत्यक्ष कामात आणि तपशीलवार नियोजन व देखरेख यात लक्ष घालावे लागेल. एकूण, सर्वसामान्यांच्या जिवाची कोणाला किंमतच नाही, याचा प्रत्यय वारंवार येत आहे. हे सर्व बेजबाबदार व्यवस्थेचे बळी आहेत.

मोदींची राजवट ही अत्यंत असहिष्णू आणि निर्दयी आहे. पैसे फेकून मते विकत घ्यायची, एवढेच यांना ठाऊक आहे. हे लोक अश्रू ढाळण्याचेही नाटक करतात. पण या मंडळींना संवेदनाच नाहीत. एखादी बहुराष्ट्रीय कंपनी ज्याप्रमाणे प्रचंड जाहिरातबाजी व इव्हेंटबाजी करते आणि आपला माल लोकांच्या गळ्यात मारते, तोच यांचा फॉर्म्युला आहे. मतदार हे यांच्या दृष्टीने केवळ ग्राहक आहेत. आणि भारतात ग्राहकांना कोणतेही संरक्षण नसतेच!