Opinion
वह कौन था?
मीडिया लाईन सदर

राजकारण आणि सिनेमा यांची युती ‘प्राचीन’ आहे. हॉलीवुडमधील अनेक नट-नट्या, निर्माते, दिग्दर्शक हे स्पष्ट राजकीय-सामाजिक भूमिका घेत आले आहेत. क्लिंट ईस्टवूडने थेट राजकारणात प्रवेश करून कॅलिफोर्नियाच्या महापौरपदाची निवडणूक जिंकून, दोन वर्षे कारभारदेखील केला होता. पाच वर्षांपूर्वी ड्वेन जॉन्सनच्या मनात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा विचार होता. त्याने इलेक्शन कमिशनकडे अर्जदेखील केला होता. परंतु नंतर त्याने प्रत्यक्ष निवडणूक लढवलीच नाही. ‘सेक्स अँड द सिटी’ची अभिनेत्री सिंथिया निक्सन हिने सहा-सात वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या गव्हर्नरपदाची निवडणूक लढवली. परंतु तिचा पराभव झाला. नट म्हणून दुय्यम दर्जाचे असलेले रोनाल्ड रेगन हे अमेरिकेचे अध्यक्ष झाले होते आणि तेदेखील रिपब्लिकन पक्षाचे. बॉडी बिल्डर आणि ॲक्शन मुव्ही सुपरस्टार अरनॉल्ड श्वार्झनेगर हादेखील कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर बनला होता. काही कलावंतांनी निःशस्त्रीकरणाच्या, तर काही जणांनी पर्यावरणविषयक आंदोलनात भाग घेतला होता. अनेकांनी युद्धविरोधी भूमिका घेतली होती. असो.
भारत १९४७ साली स्वतंत्र झाला आणि चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, वासुदेव बळवंत वगैरे क्रांतिकारकांच्या गौरवशाली कथा रुपेरी पडद्यावर येऊ लागल्या. जयंत देसाईंचा ‘चंद्रगुप्त’, ‘महाराणा प्रताप’, के. बी. लाल यांचा ‘अशोक’ १९४७ सालीच आले. परंतु या चित्रपटांतून त्या त्या ऐतिहासिक-क्रांतिकारक पात्रांना यथोचित न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही. मोहन सिन्हा यांचा ‘१८५७’ हा त्या अर्थाने निष्प्रभ ठरला. स्वातंत्र्योत्तर काळात दिलीप कुमार, राज कपूर आणि देव आनंद या त्रयीचा वरचष्मा होता. पृथ्वीराज कपूर यांचा नाटक व चित्रपट क्षेत्रांत दबदबा होता. इप्टाच्या या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. त्यांची स्वतःची ‘पृथ्वी थिएटर्स’ ही नाट्यसंस्था होती. त्याचप्रमाणे आलमआरा, विद्यापती, सिकंदर, मुघल ए आझम अशा चित्रपटांमुळे ते प्रसिद्ध असले, तरीदेखील सहिष्णुता, धार्मिक एकात्मता ही मूल्ये ते आपल्या नाटकांतून रुजवत होते, हे महत्त्वाचे. त्यामुळे त्यांना काँग्रेसने राज्यसभा सदस्यत्वही दिले होते. राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्यावर नेहरूंच्या विचारांचा पगडा होता.
दिवंगत झालेल्या मनोज कुमारच्या अभिनयामध्ये दिलीप कुमारची छाया दिसे. राजेंद्र कुमारदेखील दिलीप कुमारची नक्कलच करत असे. मनोज कुमारची प्रतिमा ‘मिस्टर इंडिया’ किंवा ‘भारत कुमार’ अशी होती. परंतु त्याचे सिनेमातील राजकारण कशा प्रकारचे होते ते समजून घेतले पाहिजे.
मनोज कुमार अनेक वर्षे सटरफटर हिंदी चित्रपटांत कामे करत होता. परंतु त्याला खरा चेहरा प्राप्त झाला, तो त्याच्या ‘शहीद’ या चित्रपटामुळे. त्यापूर्वीही शहीद भगतसिंग याच्यावरील दोन चित्रपट येऊन गेले होते. एकात प्रेम अदीब या त्याकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्याने भगतसिंगाचे काम केले होते. १९५४ सालच्या या ‘शहीद-ए-आझम भगत सिंह’ चित्रपटाचे दिग्दर्शक होते जगदीश गौतम. प्रेम अदीब रामाच्या भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध होता. दुसरा चित्रपट १९६३ साली निघाला होता आणि त्यात शम्मी कपूरने भगतसिंगचे काम केले होते. या चित्रपटातील गीते रामप्रसाद बिस्मिल या स्वातंत्र्यसैनिकाने लिहिली होती. तर दिग्दर्शन के. एन. बन्सल यांचे. हे दोन्ही चित्रपट फारसे कोणालाच माहीत नाहीत. मात्र तरीही मनोजकुमारने त्यानंतर दोन वर्षांनी भगतसिंगावर ‘शहीद’ हा चित्रपट काढण्याचे धाडस केले. त्यासाठी आपला मित्र केवल कश्यप याला निर्माता बनवले. दिग्दर्शन एस. राम शर्मा यांच्याकडे सोपवले. त्यांचे नावही कोणाला माहिती नव्हते. मात्र त्याआधी दोन वर्षांपूर्वी निघालेल्या ‘शहीद’चे संगीत प्रेम धवनचे होते, त्यांनाच पुन्हा मनोजने संगीतकार म्हणून संधी दिली. हा चित्रपट १ जानेवारी १९६५ रोजी प्रदर्शित झाला आणि बक्कळ चालला. हा चित्रपट मी पुण्यात माझ्या भावंडांबरोबर पाहिला व तेव्हा खूप भारावून गेलो होतो. चित्रपटाचे लेखन बटुकेश्वर दत्त यांचे होते आणि म्हणून त्यात अस्सलपणा होता.
बटुकेश्वर हे प्रसिद्ध समाजवादी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक. ८ एप्रिल १९२९ रोजी नवी दिल्लीच्या मध्यवर्ती लेजिस्लेटिव्ह असेंब्लीत भगतसिंग यांच्याबरोबर बाँब टाकणाऱ्यांमध्ये स्वतः सामील होते. अटक होऊन जन्मठेप झाल्यानंतर भगतसिंगबरोबर बटुकेश्वर यांनीदेखील उपोषण केले होते. राजकीय कैद्यांना गैरवर्तणूक दिली जात असल्याच्या निषेधार्थ ते आंदोलन करत होते. बटुकेश्वर हे ‘हिंदुस्तान सोशलिस्ट पब्लिकन असोसिएशन’चेही सदस्य होते. त्यांना चित्रपटात लिखाणाची साथ मिळाली ती दीनदयाल शर्मा यांची. चित्रपटातील प्रसंग अत्यंत अस्सल होते. त्याचे कारण बटुकेश्वर यांनी स्वतः सगळे भोगले होते. अर्थात या लिखाणावर हात फिरवला, तो लेखक दीनदयाल शर्मा आणि मनोजकुमार यांनी. त्यावर्षीचा तो हिंदीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कारविजेता ठरला. हा चित्रपट लुधियाना व अन्य ठिकाणी प्रत्यक्ष लोकेशन्सवर चित्रित करण्यात आला होता. त्यामुळे त्यातील तुरुंगाच्या बराकी, कैद्यांच्या कोठड्या आणि वधस्तंभ हे प्रत्यक्ष ठिकाणावरचेच होते. या चित्रपटात मनोजकुमारने भगतसिंगचे, प्रेम चोप्राने सुखदेवचे आणि अनंत मराठे यांनी राजगुरूचे काम केले होते. मनमोहन हा चंद्रशेखर आझाद बनला, तर कामिनी कौशलने भगतसिंगची आई विद्यावती कौर संधू ही भूमिका साकारली. डाकू केहारसिंगच्या भूमिकेत प्राण होता. त्याला हा रोल इतका आवडला, की त्याने फक्त १ हजार रुपयांचे मानधन स्वीकारले.
त्याकाळात प्राण हा टॉपचा स्टार होता. मात्र भगतसिंगबद्दल त्याच्या मनात खूप आदर होता. प्राणची एक बहीण लुधियानात राहत असे आणि तिने शूटिंगच्या वेळी सर्व युनिटच्या खाण्यापिण्याची सोय स्वखर्चाने केली होती. या चित्रपटाच्या प्रिमियरला पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दहा मिनिटांसाठी येण्याचे कबूल केले. पण चित्रपट बघता बघता ते त्यात एवढे बुडून गेले, की ते चित्रपट संपेपर्यंत थांबले. या चित्रपटाचा घोस्ट डायरेक्टर हा खुद्द मनोज कुमारच होता. तेव्हा शास्त्रीजींनी ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा दिली होती आणि त्यांच्या सूचनेवरूनच मनोजकुमारने शेतकऱ्यांच्या जीवनावरील ‘उपकार’ हा चित्रपट काढला. ‘शहीद’च्या प्रिमियरवरून दिल्लीहून मुंबईला जात असतानाच मनोजकुमारने ‘उपकार’चे स्क्रिप्ट लिहिले. माझ्या मते, मनोज कुमार हा बेताचा अभिनेता असला, तरी तो लेखक म्हणून चांगला होता. ‘उपकार’मधील ‘मलंगचाचा’ ही प्राणची व्यक्तिरेखा खूप वेगळी होती.
साधारणपणे १९६० नंतर भारतातून ब्रिटन वा अमेरिकेत शिक्षण वा नोकरीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली. अनेकजण तेथे स्थायिकही होऊ लागले. अशा स्थलांतरितांच्या पहिल्या पिढीची मानसिक कोंडी चित्रित करणारा ‘पूरब और पश्चिम’ हा चित्रपट होता. पाश्चात्त्य संस्कृतीस मनोज कुमारचा विरोध नव्हता, तर आपण आपली मुळे विसरता कामा नये, ही त्याची भूमिका होती. याच विषयावर २००७ मध्ये अक्षय कुमार व कतरिना कैफ यांचा ‘नमस्ते लंडन’ हा चित्रपट आला होता. ‘रोटी, कपडा और मकान’ हा चित्रपट आला, तेव्हा देशातली परिस्थिती अराजकसदृश होती. सातत्याने पडणारा दुष्काळ आणि बेरोजगारी व महागाई यामुळे जनता बेजार होती. १९६७च्या सार्वत्रिक निव़णुकीत इंदिरा गांधी यांनी आपल्या भाषणातून ‘रोटी, कपडा और मकान’ हे शब्द वारंवार उच्चारले होते. या चित्रपटातील नायक भारतला तो कॉलेज पदवीधर असूनही साजेशी नोकरी मिळत नाही. त्यामुळे तो अत्यंत कमी पैशात गायक म्हणून काम करू लागतो. तर त्याचा एक भाऊ (विजय-अमिताभ बच्चन) नाइलाजाने गुन्हेगारीकडे वळतो. मनोज कुमारने ‘क्रांति’ हा चित्रपट बनवला. त्या चित्रपटात १८२५ ते १८७५ या काळातील ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढयाचे चित्रण करण्यात आले होते.
मनोज कुमार आपल्या ‘भारत’ या प्रतिमेतून बाहेर पडू शकला नाही, हे खरे आहे. मात्र मनोज कुमारकडून माझ्यात देशभक्तीची भावना रुजली, असे अक्षय कुमारने म्हटले आहे. तर अक्षय कुमार हा माझा वारसदार आहे, असे मनोजकुमार म्हणत असे. परंतु अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाटगिरी करणारी मुलाखत घेतली होती. त्याचप्रमाणे ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘पॅडमॅन’ ‘मिशन मंगल’ यासारख्या भाजपचा अजेंडा सेट करणाऱ्या चित्रपटांतून जाणीवपूर्वक अभिनय केला. अक्षय कुमारने अनेक वर्षे दुहेरी नागरिकत्व ठेवले होते. देशापेक्षा तो पैशावर अधिक प्रेम करतो.
मनोज कुमार हा कुठल्याही अर्थाने महान चित्रपट निर्माता वा अभिनेता नव्हता. तो जणू हिंदुत्ववादी आणि भाजपच्या राष्ट्रवादाच्या साच्यातला होता, अशी प्रतिमा निर्माण करणे मात्र चूक आहे. याचे कारण, मनोज कुमारने फाळणीच्या जखमा भोगलेल्या होत्या. दंगलीत त्याचे सख्खे काका मारले गेले होते. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला जिथे मारले, त्या अबोटाबाद परिसरातच मनोज कुमारचे बालपण गेले. तेथून नंतर नवी दिल्लीत पोहोचला. दिल्लीत तो निर्वासित छावणीत राहिला. तेथे विदारक अनुभव त्याने घेतले. याचा त्याला लेखनात उपयोग झाला. एवढेच नव्हे, तर महात्मा गांधी, दंगलग्रस्तांचे अश्रू कसे पुसत, हेही लहान मनोजला पाहायला मिळाले. स्वातंत्र्यदिनी पंडित नेहरूंचे भाषण ऐकायला त्याला वडील लाल किल्ल्यात घेऊन गेले होते. त्याच्या चित्रपटांतून मुस्लिम वा पठाणाच्या व्यक्तिरेखाही दिसल्या आहेत. आणीबाणीच्या समर्थनार्थ चित्रपट बनवावा, असे मनोज कुमारला १९७५ साली सुचवण्यात आले होते. त्याबाबत त्याची इंदिरा गांधी आणि संजय गांधींशी चर्चाही झाली होती. चित्रपटाचे नाव ‘नया भारत’ असे असणार होते. त्यांनी स्क्रिप्ट मंजूर केले आणि चित्रपटात इंदिरा गांधींचे दर्शन घडणार होते. परंतु काही महिन्यांनी, मी केवळ माझा आवाज देईन, असे इंदिराजींनी सांगितले. तसेच पटकथेत त्यांनी काही बदल सुचवले. तेव्हा मनोजने हा चित्रपटच रद्द करून टाकला!
मनोज कुमारने २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला होता. परंतु राजकारणात तो तसा रमला नाही. मात्र मनोजने कधीही भाजपचा प्रचार केल्याचे ऐकिवात नाही. अथवा हिंदुत्ववादाच्या लाटेत तो सामील झाला नाही. महात्मा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी यांच्याबद्दलचा आदर त्याच्या मनात सदैव होता. त्याचप्रमाणे त्याच्या व्यक्तिमत्त्वात कुठलाही धार्मिक विद्वेष नव्हता. दंगलींचा फटका मनोजकुमारच्या गोस्वामी कुटुंबाला बसूनही, कोणत्याही धर्माबद्दल द्वेष बाळगू नकोस, असे त्याला वडिलांनी शिकवले होते. क्रांतिकारकांबद्दल त्याच्या मनात खरोखरच आदर होता. व्यावसायिक चित्रपटांच्या परिघात राहूनही, मनोज कुमारसारख्या कलावंतांनी प्रेक्षकांमधील सामाजिकता वाढवण्याचे काम केले, हे नाकारता येणार नाही. आज इतिहासपुरुषांवरील चित्रपट काढताना, त्यामधून सोयीस्कर असे राजकीय मेसेजिंग केले जाते. ‘नया भारत’चा अपवाद वगळता, मनोज कुमारने कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार कधी केला नाही. हा चित्रपटही त्याने रद्दच केला. त्याच्या ‘कलयुग की रामायण’ चित्रपटावरूनही (हा चित्रपट तद्दन बोगस होता) काही लोकांनी आमच्या भावना दुखावल्या, वगैरे टीका करण्यास सुरुवात केली होती. मात्र कलियुगात काय काय प्रकार चालतात, याचे उपरोधिक चित्रण करण्याचा क्षीण प्रयत्न मनोजकुमारने त्यात केला होता.
आज अनेक राजकीय शक्ती वा संघटना अशा प्रकारची सेन्सॉरशिप लादत असतात. मनोज कुमारला हे मान्य नव्हते. स्वातंत्र्यपूर्वकालीन पिढीतील काही कलावंतांमध्ये एक राजकीय-सामाजिक भान होते. मनोज कुमारमधला ‘भारत’ हा सामान्य माणसाचा प्रतिनिधी होता. मनोज कुमार कुठल्याही प्रश्नाला पटकन उत्तर द्यायचा नाही, तोंडावर हात ठेवत, विचार करून उत्तरे द्यायचा. त्याच्या मनात सतत एक ‘शोर’ असावा, असे वाटायचे. आता हा ‘शोर’ कायमचाच शांत झाला आहे...