Opinion
महाराष्ट्रातील गावगुंड!
मीडिया लाईन सदर

एकेकाळी प्रसिद्ध कादंबरीकार ग. ल. ठोकळ यांची 'गावगुंड' ही कादंबरी अतिशय लोकप्रिय ठरली होती. त्या कादंबरीची पार्श्वभूमी काहीशी वेगळी होती. परंतु आज या शीर्षकाच्या कादंबरीचे कित्येक भाग लिहून काढावेत, असे सध्याच्या वर्तमान कादंबरीकारांना वाटू शकेल! उशिरा का होईना, अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांना पदावरून हद्दपार करण्यात आले. परंतु दोन महिन्यंपूर्वीच त्यांना बाहेर काढण्याची गरज होती. मुळात त्यांच्यासारख्या भ्रष्ट नेत्याला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होते. परंतु महाराष्ट्रात आज सर्वत्रच गुन्हेगारी धुमाकूळ सुरू आहे. पुण्यासारख्या शहरात कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरू आहे. नाशिकमध्ये केवळ दहशत माजवण्यासाठी मोटरसायकल्स आणि कार्स यांची मोडतोड केली जाते. तर सातारा जिल्ह्यात म्हसवड परिसरात ग्रामीण विकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एका सरदार घराण्यातील महिलेने थेट राज्यपालांकडे पत्र पाठवून तक्रार दाखल करत, गोरे यांनी आपली स्वतःची विवस्त्र छायाचित्रे धाडली, असा आरोप केला आहे. दुसरे एक मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन ढापल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खोटी प्रतिज्ञापत्रे भरून चार-चार फ्लॅट लाटण्याचा गुन्हा दाखल होऊन, त्यांना दोन वर्षांची शिक्षाही झाली आहे. सध्या शिक्षेस स्थगिती द्यावी म्हणून प्रकरण न्यायालयात सुरू आहे. परंतु कोणतीही लाज नसलेली माणसे खुर्चीला चिकटून राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतातच...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील ६२% मंत्री हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, त्यामधील काही मंत्र्यांवर तर ते खुनाचा प्रयत्न वगैरेंसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ४२ पैकी २६ मंत्र्यांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ आणि ‘महाराष्ट्र इलेक्शन वॉच’ या संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली आहे. शिवाय महायुतीच्या या सरकारमधील प्रत्येक मंत्री हा करोडपती आहे. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे ४४७ कोटी रुपयांची संपत्ती आहे आणि सर्वात कमी श्रीमंत असलेले शिवसेनेचे मंत्री प्रकाश आबिटकर यांची संपत्ती एक कोटी ६० लाख रुपये इतकी आहे. आता त्यांच्याकडे आरोग्य खाते असून, त्यामुळे कुणाचे आरोग्य सुधारते, ते बघायचे. ४२ पैकी १३ मंत्र्यांनी आपले शिक्षण आठवी ते बारावीपर्यंतच झाल्याचे नमूद केले आहे. असो. हे सरकार सर्वसामान्यांचे असून गरिबांचा उद्धार करण्यासाठी त्याने अवतार घेतला आहे, असे आपण समजून चालू या.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे बीड जिल्हा देशातील चर्चाविषय बनला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे बीड जिल्हा हा केवळ राज्यातच नव्हे, तर देशातील चर्चाविषय बनला आहे. बीडचा बिहार झाल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनीदेखील व्यक्त केली होती. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने त्यांचा पंटर वाल्मीक कराडने तेथे दहशत माजवण्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. वाल्मीक आणि त्याच्या टोळक्याचे अनेक कारनामे त्यांनी समोर आणले. परंतु बीडमधील शिरूर गावी एका गरीब व्यक्तीला कपडे काढून जनावराप्रमाणे मारण्यात आले आणि हा सतीश भोसले नावाचा तरुण भाजपचा पदाधिकारी असून, तो धस यांचा निकटवर्ती आहे. त्याचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, त्यात तो कोऱ्या करकरीत नोटांची बंडले काढून कारच्या डॅशबोर्ड वर टाकताना दिसत आहे. एका व्हिडिओत तर हा भोसले थेट हेलिकॉप्टरमधून उतरत असून, एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे बाहेर चालत येत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओत एका हिंदी गाण्यावर तो आणि त्याचे साथीदार ठेका धरताना दिसत आहेत.
हा भोसले मागच्या पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून, भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीत तो म्हणे पदाधिकारी आहे. तो पारधी समाजाचा असून, ऊसतोड कामगारांचा मुकादम आहे. मुकादमांकडे प्रचंड पैसा असतो. पण आपला हा कार्यकर्ता काय उद्योग करत आहे, हे धस यांना माहीतच नाही असे कसे समजावे? रोजच्या रोज जे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत होते, त्यांनी आपल्या आसपास स्वतःचे ‘वाल्मीक कराड’ पाळले होते का, असाही प्रश्न विचारावा लागेल. मी या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करा, असे सांगितल्याचा धस यांचा दावा आहे. परंतु या कार्यकर्त्याच्या निर्दयतेबद्दल ते काहीच बोलले नाहीत. या भोसलेची पाठ सोलून काढा, असे त्यांनी म्हटले पाहिजे होते. जिनके घर शीशे के होते हैं वो दुसरो के घर उपर पत्थर नहीं मारते, हा डायलॉग धसना माहीत नसावा. त्यांना फक्त ‘दीवार’मधील डायलॉग पाठ असून, तेवढेच ते आपल्या भाषणात पेरत असतात... असो.
राहुल गांधी यांच्यावर बोगस आरोप लावून त्यांना दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली आणि ताबडतोब त्यांचे लोकसभा सदस्यत्व बाद करून, त्यांना त्यांच्या सरकारी निवासस्थानातून हाकलून देण्यात आले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक विकृत आनंद मिळाला असावा. सुदैवाने न्यायालयानेच राहुल यांना न्याय मिळवून दिला आणि या मंडळींची जिरवली. सुनील केदार यांना शिक्षा होताच ताबडतोब त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली. परंतु कोकाटे यांना मात्र वेगळा न्याय आहे... धनंजय मुंडे यांच्यावर दोन-अडीच महिने आरोप सुरू होते, परंतु त्याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच घेतील. कारण मुंडे हे त्यांच्या पक्षाचे आहेत, असा युक्तिवाद फडणवीस करत होते. परंतु शेवटी मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याचा निर्णय त्यांनीच घेतला. मग हा निर्णय मी नव्हे तर दादाच घेऊ शकतात, असे ते अगोदर का म्हणत होते?
मणिपूर जळत होते, त्यावरून शहा यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावासा वाटला नाही.
भाजपइतकी लफंगेगिरी आणि ढोंगबाजी काँग्रेसने कधी केली नाही. ए राजा हे द्रमुकचे असूनदेखील पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी टूजी प्रकरणामुळे त्यांना मंत्रिपदावरून बडतर्फ केले होते. ‘आदर्श’मध्ये अशोक चव्हाण यांचे नाव होतेच, परंतु त्यांना शिक्षा झालेली नव्हती. तरीही त्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. भाजपमध्ये ते गेल्यानंतर मोदी व फडणवीस यांनी ‘आदर्श’मधला ‘आ’देखील उच्चारला नाही. १९८५-८६ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर होते. रोजगार हमी योजनेतील ऊसतोड मजुरांना मजुरीशिवाय अर्धा किलो ज्वारी देण्याची एक चांगली योजना त्यांनी राबवली. शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजात सूट आणि एमआयडीसीच्या वसाहती तालुक्याच्या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय, अशी अनेक कामे त्यांनी केली. परंतु वैद्यकीय परीक्षेत स्वतःच्या मुलीचे गुण वाढवण्यात त्यांनी हस्तक्षेप केला, असा त्यांच्यावर आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. अर्थात शिवाजीरावांचा त्यात हात होता, हे सिद्ध झाले नव्हते. परंतु त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. आपल्या हातून निलंगेकरांवर अन्याय झाला आहे, त्यामुळे भविष्यात त्यांना पाच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे, अशी इच्छा राजीव गांधींनी बोलून दाखवली होती.
विलासराव देशमुख हे मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा ताजमहाल हॉटेलमध्ये पाहणी करण्यासाठी जाताना चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्माला घेऊन गेले होते. म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. २६/११च्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील आणि राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही राजीनामा द्यावा लागला. ‘बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते हैं’, हे उद्गार आबांना नडले. मुंबईतील या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील हे सार्वजनिक समारंभातून एका दिवशी तीन-तीन वेळा कपडे बदलत होते, अशी टीका झाली. परंतु केवळ त्यावरून त्यांना पदाला मुकावे लागले. या उलट मध्यप्रदेशात ‘व्यापम’ घोटाळा घडूनही शिवराज सिंह चौहान यांना संरक्षण देण्यात आले. मणिपूर जळत होते, त्यावरून शहा यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावासा वाटला नाही. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनादेखील दीर्घकाळ जीवदान देण्यात आले. वारंवार रेल्वे अपघात होऊनही पंतप्रधानांचे लाडके अश्विनी वैष्णव त्याच जागी आहेत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती संपूर्णपणे बिघडली असूनही फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही. तरीदेखील ‘मीच शहाणा’ असा त्यांचा अविर्भाव असतो.
सुरेश धस यांच्याबरोबर जो सतीश भोसले नावाचा कार्यकर्ता आहे (त्याला खोक्या म्हणतात) त्याच्या अद्याप मुक्या आवळण्यात आलेल्या नाहीत. अधिकृतपणे ‘खोके गट’ म्हणजे मिंधे गट! त्यांच्या पक्षात प्रवेश देण्यासाठी मिळण्यासाठी भ्रष्टाचाराचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले असावे, अशी अट असावी... ‘सिंचन गटा’ची तर भ्रष्टाचारात पीएचडीच आहे. गेल्या काही वर्षंत गावोगावी गुंडगिरी करून रील्स बनवणारी एक महामग्रूर जमात उदयास आली आहे. या गावगुंडांना राजकीय संरक्षण आहे. गुंडगिरीयुक्त महाराष्ट्र आता थांबणार नाही, असे दिसते...