Opinion
दाभोलकरांच्या विचारांचा खून करणारा समाज...
मीडिया लाईन सदर
२०१४ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर पार पडला, त्यावेळी अनेक संतमहंत हजर होते. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तो दिवस होता ५ डिसेंबर २०२४. यावेळीदेखील तीनशे संतमहंतांना आमंत्रण देण्यात आले होते. हा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला. तुम्ही ५ वाजून ५७ मिनिटानंतर शपथ ग्रहण करावी, तसेच ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत हा योग आहे, त्या वेळात हा सर्व विधी व्हावा, असे धर्मशास्त्रीय रचना सांगते, अशी माहिती तेव्हा नाशिकचे महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली होती. हे सुधीर दास टेलिव्हिजन चॅनेलवरून फडणवीस, भाजप आणि संघाची वकिली करताना नेहमीच दिसतात. अशा या फडणवीसांनी नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सर्व पाळेमुळे सरकार खणून काढणार आहे.
या प्रकरणात कोणी कितीही मोठा असला, तरी त्याला सोडले जाणार नाही, असे आश्वासन विधिमंडळात दिले आहे. ‘माणसाने श्रद्धा ठेवावी, पण अंधश्रद्धा असता कामा नये. आपले सरकार महाराष्ट्रधर्म वाढला पाहिजे, या विचाराचे जरूर आहे. पण इथे भोंदूगिरीस जराही स्थान नाही’, असेही उद्गार त्यांनी काढले आहेत. मात्र त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे भोंदूबाबा खरातकडे जात असत. मुख्यमंत्रिपदाची आस असलेले राधाकृष्ण विखे पाटील हेही खरातकडे जायचे. फडणवीस सरकारमधील अनेक मंत्री खरातच्या घराची पायधूळ झाडत होते. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तंत्रमंत्रावर विश्वास असल्याचे सांगितले जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ते खरातकडे जात-येत होते का, हे कळायला मार्ग नाही. माजी मंत्री आणि शिंदे यांना खुश करण्यासाठी सतत उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणारे दीपक केसरकर हेदेखील विकृत खरातकडे चकरा मारत होते.
महाराष्ट्रातील बहुतेक सर्व राजकीय पक्षांमधील अनेक नेते हे अंधश्रद्धाळू असून, तरीदेखील ते उठताबसता शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा गजर करत असतात...
खरातच्या सिन्नर तालुक्यातील श्री शिवनिका संस्थानला महाविकास आघाडी नाशिक मधील दारणा धरणातून महाविकास आघाडी सरकारने ३९ लाख लिटर पाणी मंजूर केले, अशी माहिती प्रसिद्ध झाली आहे. खरातवर याप्रकारे मेहरनजर करणे चुकीचेच म्हणावे लागेल. फडणवीस सरकारनेदेखील मार्च २०१८ मध्ये आर्थिक वर्ष संपुष्टात येण्याच्या अखेरच्या दिवशी, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत खरातच्या श्री ईशानेश्वर देवस्थानच्या एक कोटी पाच लाख रुपयांच्या कामांना मान्यता दिली होती. याचा अर्थ, खरातच्या धनशक्तीला सर्वच राजकारणी शरण गेले होते. खरातवर तर आम्हीच कारवाई सुरू केली, असे श्रेय येणाऱ्या फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचीही त्याच्यावर मर्जी होती. मात्र महाराष्ट्रातील बहुतेक सर्व राजकीय पक्षांमधील अनेक नेते हे अंधश्रद्धाळू असून, तरीदेखील ते उठताबसता शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा गजर करत असतात...
मानवजात जन्माला आल्यापासून धर्म हा कायम या ना त्या स्वरूपात त्याच्या बरोबर आहे. धर्म अथवा धर्मग्रंथातून जीवनाबद्दल मार्गदर्शन केले जाते. मात्र एखादी गोष्ट धर्मग्रंथांत सांगितली आहे, फार मोठा शास्त्री, पंडित ती सांगतो आहे, मात्र ती तुमच्या विचारशक्तीला पटत नसेल तर ठामपणे ती नाकारा, अशी स्पष्टोक्ती स्वामी विवेकानंद यांनी केली होती. विचारशक्ती ही परमेश्वराने माणसाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. तिचा वापर करून तुम्ही काही नाकारलेत, तर परमेश्वराला आनंदच होईल. मात्र विचार न करता तुम्ही ती गोष्ट स्वीकारलीत, तर तुम्ही पशूच्या पातळीला पोहोचलात म्हणून परमेश्वराला वाईटच वाटेल, असेही विवेकानंद म्हणाले होते. पण थोर व्यक्तींनी सांगितलेले विचार समाज आत्मसात करत नाही. म्हणूनच भोंदूबाबांचे फावत असते.
भोंदूगिरी करणारा नाशिकचा स्वयंघोषित कॅप्टन ज्योतिषी अशोककुमार खरात याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि अनेक महिलांचे शोषण केले होते. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून, मंत्रतंत्राच्या नावाखाली संमोहन करत, पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. एका पेन ड्राइव्हमध्ये असलेले खरात याच्या संदर्भातील ५८ व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या खरातकडे राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी येणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील बडे नेते, मंत्री यांच्याप्रमाणेच इतर राज्यांतील उच्चपदस्थांचाही समावेश होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार श्रीमती चाकणकर यांची महिला आयोगावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
लोकांना मार्गदर्शन करणारे हे नेते स्वतःची विचारशक्ती खुंटीला बांधून खरातसारख्या बाबाच्या नादी लागतात, हे संतापजनक आहे. खरात याने सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरासह स्थापन केलेला शिवनिका संस्थान ट्रस्टही चर्चेत आला आहे. या मंदिराला अनेक नेत्यांनी भेटी देण्याबरोबरच, ट्रस्टवर बड्या मातब्बरांची वर्णीही लावण्यात आली आहे. ट्रस्टवर मोठमोठे नेते असल्यामुळे खरात अधिक चर्चेत आला. ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केल्यानंतर शिर्डीला येणारे भाविक सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या कडेला मिरगाव शिवारात असलेल्या मंदिरात दर्शनासाठी येऊ लागले.
या संस्थानावर महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर या विश्वस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक कार्यक्रम, महाशिवरात्र, श्रावणात होणारे उत्सव व गुरुपौर्णिमेला श्रीमती चाकणकर या उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार श्रीमती चाकणकर यांची महिला आयोगावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची विविध छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे महायुती सरकारची पुरती नाचक्की झाल्यानंतर, मुख्यमंत्र्यांना हे कठोर पाऊल उचलावे लागले. खरातची पाद्यपूजा करतानाची, त्याच्या डोक्यावर छत्री धरतानाची त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे श्रीमती चाकणकर या तंत्रमंत्र करत असून, त्यांनी या ढोंगी बाबाच्या सांगण्यावरून आपली अनामिका कापून घेतल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. श्रीमती चाकणकर यांनी आपल्यावरील आरोप नाकारले असले, तरीदेखील राजीनामा देताना त्यांनी जो युक्तिवाद केलेला आहे, तो अजिबात पटणारा नाही. आपण एखाद्या व्याक्तीला भेटल्यानंतर ती व्यक्ती नंतरच्या काळात काय करेल याची आपल्याला कल्पना नसते, अशी सारवासारव श्रीमती चाकणकर यांनी केली आहे.
सुधारणावादी महाराष्ट्रातही गावोगावी अधूनमधून अशा भोंदू बाबांचे प्रताप उघडकीस येत असतात.
आपल्या अडचणी निवारण्यासाठी किमती खड्यांची विक्री, धार्मिक विधी, कर्मकांडे ही या खरातची कार्यप्रणाली राहिली आहे. महाराष्ट्रात जादूटोणा प्रतिबंधक कायदा करण्यात आला असून, त्याचे पालन होत असल्याचे दिसत नाही. उलट लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडणे, स्त्रियांचे लैंगिक शोषण करणे हे धंदे जोरात सुरू आहेत. महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत कित्येक वर्षे समाजजागृतीचे काम सुरू ठेवले आहे. परंतु अंधश्रद्धा संपल्या तर आपला धंदा बुडेल, अशा भीतीने ग्रासलेल्या प्रवृत्तींनीच डॉ. दाभोलकरांचा बळ घेतला असल्याचा संशय आहे. खरातसारख्या ठगांना राजाश्रय मिळतो. त्यामुळेच लोक अशांच्या मागे धावतात. खरातने दोनशे कोटी रुपयांची मालमत्ता जमवली आहे म्हणे. सत्ताधाऱ्यांचे राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी वेगाने काम करणाऱ्या तपास यंत्रणा या खरातसारख्या व्यक्ती अचाट संपत्ती जमवत असताना झोपलेल्या असतात का? याप्रकारचे वास्तव देशात ठिकठिकाणी पाहायला मिळते.
हरियाणात तक्रार केल्यापासून १५ वर्षे बाबा रामरहीम हा मोकाट राहतो. त्याने ३०० महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप होता. निवडणुका आल्या, की अटकेत असलेला हा बाबा पॅरोलवर बाहेर येतो. त्याबद्दल कोणालाही काही आक्षेपार्हही वाटत नाही. उत्तर भारतात असे अनेक बाबा-बुवा आहेत. सुधारणावादी महाराष्ट्रातही गावोगावी अधूनमधून अशा भोंदू बाबांचे प्रताप उघडकीस येत असतात. एकीकडे भौतिक प्रगती होत असताना, लोकांची बौद्धिक हतबलता वाढत असेल, तर ते दुर्दैवी म्हणावे लागेल. कालबाह्य रूढी पोसण्यात या बाबा-बुवांचा महत्त्वाचा वाटा असतो. दैवी शक्ती नावाची अनामिक भीती या भोंदू बाबा-बुवांना मोठे करण्यासाठी उपयुक्त ठरते. सामान्य माणूस परिस्थितीमुळे गांजलेला असतो. त्याच्या हतबलतेचा फायदा काही बुवा घेतात. त्यांच्या भोवती चमत्कारिक शक्तीच्या भाकडकथा पेरल्या जातात. आजच्या आधुनिक आणि विज्ञानवादी काळात अंधश्रद्धेचा बाजार मांडला जात आहे, हे वाईट आहे. अंधभक्तांच्या मतपेटीचा फायदा घेण्यासाठी या बाबा-बुवांना राजकीय नेते जवळ करतात आणि राजकीय सत्तेचा वापर आपल्या फायद्यासाठी हे बाबा-बुवा करून घेत असतात. यामध्ये सामान्य माणसे मात्र भरडून निघत असतात.
ज्या पुण्यात राष्ट्रीयता जागवण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला, तेथील गणेशोत्सवात अग्नीत एक लाख उत्तम मोदकांची आहुती दिली जाते.
‘ज्योतिषांच्या भाकिताच्या जाळ्यात सापडून कृतिशून्य, प्रयत्नशून्य बसण्यापेक्षा जिद्दीने प्रयत्नांची कसोशी करीत राहण्यात पुरुषार्थाची सिद्धी असते’, असे उद्गार प्रबोधनकार ठाकरे यांनी कढले होते. आपल्याकडे चार्वाक, बुद्ध, फुले, आंबेडकर, आगरकर यांची परंपरा आहे. हिंदुत्ववाद्यांना विज्ञानवादी सावरकर कितपत हवेसे वाटतात, हा प्रश्नच आहे. परंतु इतकी समृद्ध परंपरा असूनही दिवसेंदिवस समाज अंधश्रद्धावादी होत आहे. महाराष्ट्रात आजही दरवर्षी देवाचा नवस फेडण्यासाठी जत्रांमध्ये लक्षावधी प्राण्यांचा बळी भक्तिभावाने दिला जातो. मानवी जीवनात श्रद्धेला स्थान जरूर असते. परंतु श्रद्धादेखील तपासाव्या लागतात. स्त्रीने शिक्षण घेऊ नये, मासिक पाळीत ती अपवित्र बनते, पतिनिधनानंतर केशवपन करावे, विधवाविवाह करू नये ही सारी बंधने धर्माश्रद्धेचाच भाग नव्हती काय? म्हणूनच श्रद्धेचीही चिकित्सा करावी लागते.
‘अंधश्रद्धा ही कठीणीकरण झालेले अज्ञान असते. त्याला व्यकतीच्या भावभावनांचे व पंरपरेचे सामर्थ्य असते. त्याबद्दल बोललेलेही चालत नाही’, असे नरेंद्र दाभोलकर यांनी म्हटले होते. ज्या पुण्यात राष्ट्रीयता जागवण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला, तेथील गणेशोत्सवात अग्नीत एक लाख उत्तम मोदकांची आहुती दिली जाते व तिचे समर्थन केले जाते. शहरातले भुकेलेले असंख्य बांधव यावेळी डोळ्यंसमोर येत नाहीतच. नव्हे, त्यांची आठवण दिलेलीही रुचत नाही, अशी टिप्पणी दाभोलकर यांनी केली होती. अशोक खरात हा तर अत्यंत भ्रष्ट, लबाड आणि विकृत वासनांध माणूस आहे. परंतु अशा भोंदू बाबांना बळी पडणारा समाज हा या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात हुद्धी गहाण ठेवणारा समाज बनला आहे. दाभोलकर यांच्या विचारांचा खून आपण पुन्हा पुन्हा करत आहोत...
