Opinion
काश्मीर ‘फाईल्स’
मीडिया लाईन सदर

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला, त्यावेळी आम्ही यूपीए सरकारच्या मागे उभे आहोत, अशी प्रतिक्रिया त्याच दिवशी भाजपने दिली. परंतु २४ तास उलटले नाहीत, तोच तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईला येऊन ट्रायडेंट हॉटेलबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना, तत्कालीन केंद्र तसेच राज्य सरकारवर तुफान टीका केली. तसेच २९ आणि ४ डिसेंबर २००८ रोजी नवी दिल्ली आणि राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत हे लक्षात घेऊन, भाजपने सर्व राष्ट्रीय वृत्तपत्रांत जाहिराती दिल्या. त्यामध्ये ‘ब्रूटल टेरर स्ट्राइक्स अॅट वीक गव्हर्नमेंट. अनविलिंग अँड इन्कपेबल. फाइट टेरर. व्होट बीजेपी.’ अशा जाहिराती दिल्या.
वास्तविक वाजपेयी सरकारच्या काळात काश्मीरमधील दोडा हत्याकांड घडले होते. तसेच संसद परिसरात घुसून दहशतवाद्यांनी धिंगाणा घातला होता. गुजरातमध्ये २००२ साली अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला होता. २००७ साली कुलगाम येथे अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्यात आठजण ठार झाले होते. उरी आणि पठाणकोटकांड मोदी सरकारच्या काळात घडले. तसेच पुलवामामध्ये अतिरेक्यांनी आरडीएक्स घेऊन धमाका केला होता. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे आत्मघातकी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान मरण पावले. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोटवर बाँबफेक केली. मरण पावलेल्या सीआरपीएफ जवानांचा आणि आपण केलेल्या हवाई हल्ल्यांचा उल्लेख करून, लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये भाजपने हा विषयदेखील मतांसाठी वापरला. गोदी मीडियाने लष्करी जवानाच्या वेषात मोदींना दाखवले आणि भाजपने तशाच पद्धतीने बॅनरबाजी केली. भारतीय लष्करी जवानांचे श्रेय मोदी व भाजप उपटत असल्याची टीकाही झाली होती. बालाकोट हल्ल्याबाबत काही प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षांवर टीका करत, मोदी यांनी एकप्रकारे विरोधक पाकिस्तानचे हस्तक बनल्याचे चित्र निर्माण केले. ‘या विरोधकांच्या वक्तव्यांचा उल्लेख पाकिस्तानी संसदेत केला जात आहे, तेव्हा विरोधकांनो, तुम्ही भारतीय लष्करास पाठिंबा देत आहात की त्यांच्याबद्दल शंका घेत आहात?’ असा सवाल करून, मोदींनी प्रतिपक्षाला खिंडीत पकडण्याचा उद्योग केला. हेच मोदी, मुंबई हल्ल्याचा पोलीस प्रतिकार करत असतानाच यूपीए सरकारवर तोफ डागत होते.
प. बंगाल आणि बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप पहलगामच्या मुद्द्याचा वापर शंभर टक्के करणार.
२७ नोव्हेंबर २००८ रोजी मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहून, सर्व मुख्यमंत्र्यांची सुरक्षेबद्दल एक परिषद बोलवावी, अशी सूचना केली होती. या पत्राची लगेच प्रसारमाध्यमांमार्फत प्रसिद्धी करण्यात आली. परंतु २००९ चे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी मात्र या कठीण प्रसंगात धार्मिक ऐक्य टिकवणे व एकजूट दखवणे हे महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते. परंतु त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपने दहशतवादाचा सामना करू शकेल, असे सरकार निवडण्याचे लोकांना आवाहन केले.
मुंबई हल्ल्यानंतर मनमोहन सिंग यांनी देशाला उद्देशून केलेले भाषण निराशाजनक होते, अशी टीका मोदी यांनी पत्रकारांपाशी केली. पाकिस्तान गुजराती मच्छिमारांना अटक करून त्यांच्या बोटी जप्त करत आहे. या बोटींचा गैरवापर होण्याची शक्यता आहे, असा पूर्वइशारा मी केंद्र सरकारला दिला होता, परंतु सरकार बेसावध राहिले, अशी टीकाही मोदी यांनी केली होती. मात्र पुलवामानंतर हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे, याकडे विरोधकांनी लक्ष वेधताच, भाजपचे समाजमाध्यमवीर, प्रवक्ते, नेते आणि गोदी मीडिया शंकेखोरांच्या देशभक्तीबद्दलच प्रश्न उपस्थित करत होता.
'मुंबई हल्ल्यानंतर आपण बरोबर मुंबईच्या घटनास्थळास भेट देऊ आणि देशास संबोधित करू. म्हणजे या संकटकाळात आपण सर्वजण एकत्र आहोत, हा संदेश जाईल', असे डॉ. सिंग यांनी अडवाणींना सुचवले होते. परंतु अडवाणींनी जाण्याची तारीख ऐनवेळी बदलल्याचे सांगून टाळाटाळ केली होती. उलट या संधीचा फायदा घेऊन मोदींसारख्यांना तिथे पाठवण्याचा निर्णय अडवाणींनीच घेतला होता. त्यामुळे भाजप कसा पाकिस्तानविरोधी आणि हिंदुत्ववादी आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवले जाईल, असा विचार करण्यात आला. महाराष्ट्रातील भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनीच मोदींशी याबाबत संपर्क साधला आणि मोदी मुंबईला आले. कारगिलच्या वेळीही भाजपने निवडणुकीसाठी या गोष्टीचा राजकीय फायदा करून घेतला. यावेळीही पश्चिम बंगालमधील भाजप नेते शुभेंदु अधिकारी हे बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटून, अतिरेक्यांनी धर्म विचारून कसे मारेल, हे ओरडून ओरडून जमावाला सांगत होते. प. बंगाल आणि बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप पहलगामच्या मुद्द्याचा वापर शंभर टक्के करणार.
पाकिस्तानी हैवानांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांच्या हत्येनंतर संपूर्ण देशभर संतापाची लाट निर्माण झाली आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी या सर्व देशांनी या संकटकाळात भारताच्या पाठीशी उभे राहण्याची भावना व्यक्त केली आहे. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. तेव्हा दहशतवादविरोधी मोहिमेसाठी भारताला सर्वतोपरि मदत करण्याची तयारी सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी दर्शवली. या हल्ल्यात बळी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी यांनी आपल्या पतीच्या अंतिम दर्शनाच्या वेळी मान उंचावत ‘जयहिंद’ अशी घोषणा दिली, तेव्हा संपूर्ण देशवासीयांची मने हेलावून गेली... देशात ठिकठिकाणी हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी ‘पाकिस्तान जला दो’ अशा शब्दांत या हल्ल्याचा धिक्कार करण्यात आला. देशात सर्वत्र निषेध मोर्चे काढून वा सभा घेऊन या घटनेबद्दलच्या क्षोभाचे प्रदर्शन घडवले जात आहे. पाकिस्तानमध्ये शिरून पहलगामचा वचपा काढावा, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. निरपराध नागरिकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले आणि याचे कडक प्रत्युत्तर दिले जाईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे.
पंजाब प्रांताची पाण्याची गरज भागवणाऱ्या ‘सिंधू जल करारा’ला भारताने प्रथमच स्थगिती दिली आहे.
आता पाकिस्तान सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवत नाही, तोपर्यंत तेथील पंजाब प्रांताची पाण्याची गरज भागवणाऱ्या ‘सिंधू जल करारा’ला भारताने प्रथमच स्थगिती दिली आहे. सिंधू नदी व तिच्या झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या उपनद्यांचे पाकिस्तानात जाणारे पाणी यामुळे अडवले जाईल. १९६० सालचा हा ‘सिंधू जल करार’ असून, याअगोदरच्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धप्रसंगीदेखील भारताने कधीही या कराराला धक्का लावला नव्हता. भारताच्या या कठोर पावलामुळे पाकिस्तानवर कंठशोष करण्याची पाळी येणार आहे. तसेच अटारी भागात सीमा बंद करण्यात आली असून, सार्क व्हिसावर भारतात आलेल्या पाक नागरिकांचा व्हिसा रद्द केला जाणार आहे. त्यांना ४८ तासांत हा देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षणविषयक सल्लागारांनाही आठवड्याभरात चालते होण्याचा आदेश देण्यात आला आहे. एकूण, भारताने पाकच्या नाड्या आवळण्याचे ठरवले आहे. हे ठीकच आहे.
१९९०च्या दशकात पाकधार्जिण्या हिज्बउल मुजाहिदीन, लष्करे तोयबा व इतर जिहादी संघटनांनी काश्मिरात असंख्य नागरिकांचे बळी घेतले. तेथील सांस्कृतिक एकात्मतेवर आघात करून, हिंदू व मुस्लिम समुदायांमध्ये वैमनस्य निर्माण करणे आणि त्याद्वारे राज्यात अस्थिरता आणणे, हे धोरण राबवले. हिंदू-मुस्लिम ऐक्याबद्दल प्रसिदध असलेल्या दोडा या काश्मीर खोऱ्यातील जिल्ह्याला १९९३ पासून हिंसेचे ग्रहण लागले. त्यानंतरच्या सात वर्षांत या जिल्ह्यातील हल्ल्यांमध्ये ७०० निरपराध जिवांचे बळी गेले. जून १९९८ मध्ये लग्नाच्या वऱ्हाडावर झालेल्या हल्ला सगळ्यात भीषण ठरला. शिखांचे शिरकाण करून, त्या समुदायातही दहशत माजवण्याचा प्रयत्न अतिरेक्यांनी केला. १ ऑगस्ट २००० रोजी पहलगाम शहराजवळ ३० यात्रेकरूंना ठार मारण्यात आले. तर १४ मे २००२ रोजी पाक अतिरेक्यांनी हिमाचल प्रदेशातून काश्मीरकडे येत असलेल्या दहा प्रवाशांची कालूचकच्या जवळ हत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकून, घटनास्थळापासून जवळच तैनात असलेल्या भारतीय जवानांनी तीन अतिरेक्यांचा खातमा केला. परंतु या घटनेत तीन जवानांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांसह २८ नागरिकांचे बळी गेले. त्यामुळे भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढून, उभय देश पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर आले होते. केंद्रात वाजपेयी सरकार असतानाच वंधामा या गावात दहशतवाद्यांनी २४ काश्मिरी पंडितांना सामुदायिकरीत्या ठार मारले. काश्मीरचा इतिहास असा रक्तरंजित आहे.
दीड वर्षापूर्वी ‘हमास’ने इस्रायलमध्ये घुसून तेथे संगीताचा मनमुराद आनंद घेणाऱ्या समुदायावर भीषण हल्ला केला आणि अनेकांचे अपहरण केले होते. तशीच घटना पहलगाममध्ये घडली आहे. हमासने त्यापैकी काहीजणांची हत्याही केली आणि बाकीच्यांना ओलीस ठेवले. तेव्हा इस्रयालने हमासचा सर्वनाश करण्यासाठी गाझापट्टीत तुफान हल्ले केले. हमासच्या असंख्य अतिरेक्यांना ठार मारले. भारताने याचप्रकारची कारवाई करावी, अशी मागणी केवळ आम जनेतेची नाही, तर अनेक निवृत्त सेनाधिकाऱ्यांचीदेखील आहे. मात्र आपण जेव्हा हल्ले करतो, तेव्हा पलीकडून प्रतिहल्ले होतात आणि अशावेळी सामान्य जिवांची काळजी घ्यावी लागते, हे लक्षात ठेवावे लागेल.
पाक लष्करप्रमुख जनरल मुनीर यांचे घराणे हे सनातनी ‘हाफिझ’ घराणे आहे.
पाक लष्करप्रमुख जनरल मुनीर यांचे घराणे हे सनातनी ‘हाफिझ’ घराणे आहे. पाकिस्तानमधील तरुणांनी समाजमाध्यमे आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या मागे लागू नये, हा त्यांचा आग्रह असून, ते कट्टर भारतविरोधी आहेत. मुनीर हे पाकिस्तानच्या आयएसआयचे बॉस असून, तेथील अतिरेकी संघटनांना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याचे काम आयएसआयतर्फे केले जाते. पहलगाममध्ये आलेले लोक हे पर्यटक नसून हिंदू आहेत, हे अतिरेक्यांनी जाणीवपूर्वक अधोरेखित केले. म्हणजेच जम्मू-काश्मीमधील मुसलमान हे आमचेच आहेत आणि हिंदू मात्र आमचे शत्रू आहेत, हे सांगण्याचा पाकचा कुटिल डाव आहे. परंतु जम्मू-काश्मीमधील आजपर्यंतच्या दहशतवादात ८९ टक्के मुसलमानच मारले गेले आहेत. हे विसरता कामा नये. तसेच पहलगामच्या घटनेनंतर तेथील बळी व जखमींच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी स्थानिक मुस्लिम लोकच पुढे आले होते. स्थानिकांनी मेणबत्ती मोर्चा काढून पाकिस्तानविरोधात घोषणाही दिल्या, अतिरेक्यांच्या हातून एके ४७ रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न सैयद हुसैन शाह या जिगरबाज मुस्लिम घोडेस्वाराने केला, त्यालाही अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केले.
भारत-पाकिस्तान यांच्यात २०२१ च्या आसपास शस्त्रसंधी करार झाल्यामुळे पाकिस्तानने त्याचा फायदा उठवला आणि आपल्या फौजा अफगाणिस्तानच्या सीमेपाशी वळवल्या. या काळात अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाकला अवधीही मिळाला. संपूर्ण जगाच्या दृष्टीने पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे आणि त्याच्या या मूळ वृत्तीत सुधारणा होण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे अशा प्रत्येक अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशास तसे उतर हे द्यावेच लागेल. मात्र त्याचबरोबर आपल्या सीमा अधिक सुरक्षित करणे आवश्यक आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिकरीत्या अतिरेकी प्रवृत्ती बळावणार नाहीत, याकडे बारकाईने लक्ष देणेही गरजेचे आहे. जम्मू-काश्मीरला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अधिक जोमाने व्हायला हवे. तेथील पर्यटकांचा ओघ थांबता कामा नये. या लढाईत ‘हम एक हैं’ हे चित्र दिसले, तर त्यातच पाकिस्तानचा पराभव असेल! 'काश्मीर फाइल्स'ची पाने उलटल्यास, अनेक गोष्टी उलगडतात...