Opinion
कुठे कामरा आणि कुठे पुलं!
मीडिया लाईन सदर

प्रख्यात विडंबनकार कुणाल कामरा याच्या विरोधात हिंसक आंदोलन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्टंटबाज शिवसैनिकांनी देशव्यापी कीर्ती मिळवली! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र, मराठी भाषा, अस्मिता, मराठी तरुणांना नोकऱ्या यासंबंधी अनेक विचार मांडले. परंतु केवळ सत्तेत ‘नोकरी’ मिळवण्याची इच्छा असणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचे सोयीस्कर विचार तेवढे घेतले आहेत. कामराने शिंदेशाहीची मुळात काय लायकी आहे, याचे राष्ट्रीय दर्शन घडवले.
कामरावर टीका करण्यात महाराष्ट्राबाहेर सर्वाधिक पुढे होते, ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. मात्र आपल्यावर टीका करणाऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरवणाऱ्यांमध्ये योगींचा नंबर देशात पहिला आहे. मुळात २०१४ ते २०२० या काळात भारतात दरवर्षी २८ टक्के इतक्या वेगाने राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यांची नोंद वाढत गेली पुलवामा प्रकरणातील २७ पैकी २६ राष्ट्रद्रोहाचे गुन्हे विविध राज्यांतील भाजप व मित्र पक्षांच्या सरकारांमुळे देशासमोर आले होते. आता राष्ट्रद्रोह वा राजद्रोहाची तरतूदच कायद्यातून काढून टाकण्यात आल्यामुळे सत्ताधारी बदनामी, हक्कभंग आणणे ही हत्यारे दबावासाठी परजू लागल्याचे दिसते.
काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी मुस्लिम अतिरेकी संघटना आणि हिंदुत्व यांची तुलना केली होती, ती चुकीचीच होती. परंतु त्याचा प्रतिवाद करण्याऐवजी त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. महापुरुषांच्या आड दडून काही पक्ष संकुचित राजकारण करत आहेत. शिवाय जात आणि धर्म याच्या पलीकडे ‘नागरिक’ म्हणून आपली काही ओळख आहे, हेच विसरले जात आहे. बहुसंख्याकवादाचे हिंस्र प्रदर्शन केले जात आहे. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असले, तर चर्चा, वाद, संवाद, कायदेशीर कारवाई, पोलीस तक्रार याऐवजी ‘धर की बडव’ हाच प्रकार प्रचलित झाला आहे. कोणत्याही विषयात ‘हिंदू हिंदू’ केले जात आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाचे हिंदुत्वीकरण केले जात आहे. जो हिंदू आहे, तो हिंदुत्ववादी असेलच असे नाही. पण त्याच्या डोक्यात हिंदुत्व घुसवले जात आहे. म्हणूनच बिगर हिंदूंकडून काही खरेदी करू नका, असे जाहीर आवाहन केले जात आहे. महाराष्ट्राचे एक बालिश मंत्री नितेश राणे यांनी ‘मल्हार विरुद्ध हलाल’ असा वाद केवळ मुस्लिमांना वेगळे पाडण्यासाठीच सुरू केला आहे.
ब्रिटनने २००९ साली राजद्रोहाचा खटला कायदा रद्द केला. परंतु भारतातून तो अलीकडेच रद्द झाला.
ब्रिटनने २००९ साली राजद्रोहाचा खटला कायदा रद्द केला. परंतु भारतातून तो अलीकडेच रद्द झाला. २००९ मध्ये हा कायदा रद्द करताना, अब्रूनुकसानी आणि अश्लीलता हे गुन्हेदेखील ब्रिटनने रद्द केले. शिवाय संपूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सरकारवर टीका करण्याचा नागरिकांचा अधिकार, हे लोकशाहीचे मूलाधार आहेत, असे वक्तव्य हे कायदे रद्द करताना, तेव्हाच्या ब्रिटिश कायदेमंत्री क्लेर वार्ड यांनी केले होते. असो.
‘रामभरोसे’ या एकांकिकेत रामायणाचा अपमान करण्यात आला आहे, अशी बातमी ‘सामना’च्या अंकात २९-३० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर पुण्यात राडा झाला होता. त्यांनी ‘चंद्र सावली कोरतो’ या एकांकिकेचा प्रयोग पाडला. त्यांचा सेट तोडून टाका, एवढेच नव्हे तर ‘रामभरोसे’चे लेखक श्रीरंग गोडबोले ऊर्फ रंगा गोडबोले आणि नाटकाचे दिग्दर्शक ऋषिकेश देशपांडे यांना काळे फासण्यात आले. त्यांच्याकडून सक्तीने माफी मागण्यात आळी आणि हिंदूंच्या देवांची टिंगल आम्ही सहन करणार नाही, अशी धमकी देण्यात आली. तसेच संबंधितांना रामनामाचा हजारवेळा जप करण्याची शिक्षा फरमावण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या सद्दीच्या काळात, म्हणजे जेव्हा युतीचे सरकार होते तेव्हा, काही संपादकांना धमक्या देण्यात आल्या. ‘महानगर’ वरील हल्ले तर सर्वज्ञात आहेत. यशवंतराव चव्हाण हे सुसंस्कृत होतेच पण त्यांनीदेखील आणीबाणीत पु. ल. देशपांडे यांची संभावना ‘विदूषक’ म्हणून केली होती.
डिसेंबर १९९६ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची सुरुवात केली आणि त्याचे पहिले मानकरी म्हणून पु. ल. देशपांडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मनोहर जोशी यांच्या हस्ते पुलंना हा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी पुलंचे भाषण त्यांच्या पत्नी सुनीताबाई देशपांडे यांनी वाचून दाखवले होते. ‘वयाच्या अखेरच्या टप्प्यात मला सर्वात अधिक अस्वस्थ करणारी कोणती गोष्ट असेल, तर ती म्हणजे योग्य मुद्द्यांनी सिद्ध करण्याची घटना गुद्द्यांनी दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीचा वाढता जोर, ही आहे. विचारस्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरावा करीत आलो आहे. अशावेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष हे राज्यावर आल्यावर जेव्हा लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो, वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील, ते कोणत्या शब्दात सांगू? निराशेचा गाव अंधन आम्हासी, ही संत तुकोबाची ओळख पुन्हा पुन्हा आठवायला लागते’, असे उद्गार जेव्हा पुलंनी काढले होते...
खरे तर, बाळासाहेब ठाकरे आणि पुलंचे संबंध स्नेहाचे होते.
‘अलीकडे राजकारण, राज्य शासन, राजकीय पक्ष वगैरे पक्ष शब्द भ्रष्टाचार, गुंडगिरी, खुनी, जाळपोळ यांना पर्यायी शब्द झाल्यासारखी अवस्था झाली आहे. उच्चार आणि आचार यांच्यात तफावत पडताना दिसली, की जीवनातल्या चांगलेपणावरचा विश्वासच उडत जातो. कलाक्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा तर आनंदाचा अनुभव देणारी निर्मिती करण्यातला उत्साहच नाहीसा होतो. आपल्या मताला अनुसरून लिहिण्याचे, बोलण्याचे स्वातंत्र्य हे मला फार महत्त्वाचे वाटते. लोकांच्या हितासाठी मांडलेला विचार सत्ताधीशांना मानवला नाही, तरी सत्य लोकांपुढे आणलेच पाहिजे, असा आग्रह धरणारे विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत. आपल्याला न पटलेला विचार सत्ताबळाने दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगतिक करतात’, असे सुस्पष्ट उद्गार पुलंनी काढले होते.
खरे तर, बाळासाहेब ठाकरे आणि पुलंचे संबंध स्नेहाचे होते. कारण बाळासाहेबांचे शिक्षण ज्या ओरिएंट हायस्कूलमध्ये झाले होते, त्या शाळेत पुलं हे शिक्षक म्हणून नोकरीला होते. परंतु पुलंनी जाहीरपणे कान टोचणे बाळासाहेबांना रुचले नाही. झक मारली आणि पुलंना पुरस्कार दिला. आम्ही ठोकशाहीवाले आहोत, तर आमचा पुरस्कार कशाला स्वीकारता? असे संतप्त उद्गार बाळासाहेबांनी काढले आणि पु. ल. म्हणजे मोडका पूल, असेही म्हणून टाकले. मात्र पुलं हे लोकांचे अत्यंत लाडके लेखक असल्यामुळे, बाळासाहेबांची ही टीका लोकांना आवडली नाही. त्यानंतर बाळासाहेबांना कदाचित आपली चूक उमगली असावी. त्यांनी थेट पुण्यात जाऊन पुलंची भेट घेतली आणि नतमस्तक होऊन त्यांची माफी मागितली. बाळासाहेबांकडे हा दिलदारपणादेखील होता. ‘बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आले आहेत’, असा बोगस दावा करणारे शिंदे आणि त्यांची गॅंग यांचा साहित्य, संस्कृती वा विचार यांच्याशी काहीही संबंध नाही.
उद्धव ठाकरे हे स्वतः कलावंत आणि उत्तम छायाचित्रकार आहेत. तर आदित्य ठाकरे हे इंग्रजीत कविता लिहितात. आदित्यचे वाचन उत्तम आहे. व्यंगचित्रकारांचे घराणे असल्यामुळे त्यांना विनोदाची समजही आहे. शिवाय उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांचे विचार घेतले. परंतु कालमानानुसार त्यांनी शिवसेना मवाळ केली. तरीदेखील ते मुख्यमंत्री असताना शिवसेनेकडून काही चुकीच्या गोष्टी घडल्या, हे नाकारता येणार नाही. मात्र आता जे पक्ष सोडून जातील, त्यांना तुडवून काढू वगैरे भाषा उद्धवजींनी कधीही केलेली नाही. उलट ज्यांना पक्ष सोडून जायचे असेल, त्यांनी खुशाल जावे, माझ्याकडे कोणाला काही देण्यासारखे राहिलेले नाही, असेच ते म्हणत असतात.
युती सरकार असताना नाना पाटेकरच्या अध्यक्षतेखाली नाट्यसंमेलन झाले. तेव्हा नानाने बाळासाहेबांवर सूचक टीका केली. ‘मच्छर को शेर बनने का भ्रम हुआ है’ अशी तोफ उद्धव ठाकरे यांनी नानावर डागली होती. सुदैवाने त्या काळात नानावर कोणी हात चालवला नाही! आणखी एक गंमत म्हणजे, नाटक-चित्रपट बंद पाडणे, लेखकांवर हल्ला करणे याबद्दल त्या काळात कुप्रसिद्ध असणाऱ्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालील युतीला मतदान करा, असे आवाहन करणाऱ्या पत्रावर दुर्गा भागवत यांनी स्वाक्षरी केली होती... त्या काळात शिवसेनेने गझल गायक गुलाम अली, ख्यातनाम चित्रकार एम. एफ. हुसेन, यांनाही आपले लक्ष्य बनवले होते.
‘नथुराम’ची पाठराखण करणारी लोक ‘घाशीराम’ला हिंदुत्ववादी विरोध करत असताना मात्र गप्प बसले होते, हेही वास्तवच.
मात्र केवळ शिवसेनेनेच ही सगळी कृत्ये केली आणि बाकी सगळे पुण्यवान लोक होते, असे बिलकुल नाही. ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’ या नाटकांनाही झुंडीचे बळी बनवले गेले. ‘मी नथुराम बोलतो आहे’ या नाटकावर बंदी घालण्यात आली होती, तेव्हा मराठी नाट्यनिर्माते रस्त्यावर उतरले होते. ‘नथुराम...’ विरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनही केले होते. वास्तविक नथुरामचे उदात्तीकरण करणारे नाटक असले, तरीदेखील त्यावर बंदी घालणे चुकीचे होते किंवा ते नाटक बंद पडणे हेही गैरच म्हणावे लागेल. परंतु ‘नथुराम’ची पाठराखण करणारी लोक ‘घाशीराम’ला हिंदुत्ववादी विरोध करत असताना मात्र गप्प बसले होते, हेही वास्तवच.
आजकाल लोकांच्या भावना जरा काही खुट्ट झाले, तरी दुखावतात. म्हणजे राजकीय नेतेच आपापल्या भावना सोयीच्या वेळी दुखावून घेतात आणि मग चॅनेलवाल्यांना बोलवून, एका जागी उभे राहून तथाकथित ‘आंदोलन’ करतात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा काही कारणामुळे हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, तेव्हा त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर ‘गर्व से कहो हम हिंदुजा में है’ असे लिहायला हरकत नाही, असे पुल म्हणाले होते. आता यामुळे बाळासाहेबांचा अपमान झाला, म्हणून त्यावेळी कोणी तोडफोड केली नाही, हे सुदैव... एकदा एका भोजन समारंभात पुलंच्या एका बाजूला ना. ग. गोजे आणि दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ शासकीय अधिकारी भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु. ल. म्हणाले, ‘आफतच आहे. एकीकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग’. त्यानंतरदेखील नानासाहेब गोरे समर्थकांनी पुलंच्या घरी जाऊन तोडफोड केली नाही...
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तेव्हाचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी इंदिरा गांधींच्या २० कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेची तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचे सांगून पुल म्हणाले होते की, ‘मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीला संजय उवाच असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला...त्यानंतरदेखील पुलंचे घर ‘उखाड देंगे’, असे कोणी म्हणाले नव्हते. आणीबाणीनंतरच्या झालेल्या निवडणुकांत जनता पक्षाच्या प्रचारसभांतून पुलंची भाषणे सुरू असताना, ‘यांना आता कंठ फुटला आहे’, अशी टीका यशवंतरावांनी केली होती. त्याचा समाचार घेताना पु. ल. म्हणाले, ‘गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही आणि आता म्हणतात कंठ फुटला. ते असो. पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही’... अर्थात कुठे कामरा आणि कुठे पु. ल.!... तसेच कुठे यशवंतराव आणि कुठे एकनाथ शिंदे!...