Opinion
मुंबई विकणे आहे!
मीडिया लाईन सदर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी ‘जय गुजरात’ची घोषणा दिली होती. ही घोषणा देण्यापूर्वीदेखील ते ‘जय मोदी, जय शहा’ असे मनातल्या मनात म्हणतच होते. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातही उद्योगपती गौतम अदानी आणि मंगलप्रसाद लोढा यांच्या फायली क्लियर होतच होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर मोदी यांचे लाडके आहेत. त्यामुळे लाडक्याकडून लाडक्या उद्योगपतीचे लाड होणे स्वाभाविकच. ‘वनतारा’ अनंत अंबानी यांचेही हितसंबंध गुजरात आणि महाराष्ट्र दोघेही सांभाळत आहेत.
२०१५ साली भाजप नेते राज पुरोहित यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मोदी, शहा यांच्या इच्छेनुसार पक्ष चालतो. त्यांच्यापुढे अन्य कोणाचे काही चालत नाही. फडणवीस यांना त्यांचे ऐकावे लागते. ते हतबल आहेत. मंगलप्रसाद लोढा यांच्याकडूनही अनेक गोष्टींबाबत दबाव आणला जातो, असे आरोप त्यांनी या व्हिडिओत केले होते. भाजप आमदार पराग शहा यांनी काही दिवसांपूर्वीच एका परप्रांतीय रिक्षावाल्याला कानफाटात मारली होती. मात्र हेच राज ठाकरे यांच्या एखाद्या कार्यकर्त्याने केले असते, तर देशभर ही बातमी टीव्हीवाल्यांनी सतत चालवून, मुंबईत नाक्यानाक्यावर मनसेचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांना झोडपत आहेत, असे खोटे चित्र निर्माण केले असते!
आज गुजरातचे उद्योगपती महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत प्रचंड गुंतवणूक करत आहेत.
विधानसभा निवडणुकांच्या वेळी ठाकरेंना फिनिश करू, अशी गर्जना अमित शहा यांनी केली होती. त्यापूर्वी शिवसेनेला 'पटक देंगे' असेही ते म्हणाले होते. शरद पवार यांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा केला होता. महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांचा अपमान शहा यांनी केला आहे आणि मोदी यांनीदेखील. एकप्रकारे हा मराठी जनतेचा अपमान होता. राज ठाकरे यांनी पूर्वी शरद पवारांवर टीका केली असेल, परंतु कधीही अपमानजनक वक्तव्य केले नव्हते आणि शरद पवार यांच्या महाराष्ट्रप्रेमाबद्दल त्यांनी शंकाही व्यक्त केली नव्हती.
आज गुजरातचे उद्योगपती महाराष्ट्रात आणि खास करून मुंबईत प्रचंड गुंतवणूक करत आहेत. केवळ मुंबईतच नव्हे, तर एमएमआर रिजनमध्ये. नवी मुंबईत अदानी आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच १५ हॉटेल्स उभारत आहे. २५००० आसनक्षमतेचे कनव्हेंशन सेंटर उभारणार आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या इव्हेंट्ससाठी पायाभूत सुविधा विकसित करणार आहे. अदानी रियालिटीने अहमदाबादमध्ये 'शांतीग्राम' हा ६०० एकरची गृहनिर्माण प्रकल्प राबवला आहे. त्याच धर्तीवर एक हजार एकरात नवी मुंबईमध्ये दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून टाऊनशिप उभारली जाणार आहे. एमएमआर रीजनमधील गृहनिर्माण क्षेत्रात अदानींचेच वर्चस्व राहणार आहे. सध्या ‘अदानी रिॲलिटी’ वीस कोटी चौरस फूट क्षेत्र विकसित करत असून, १३ कोटी चौरस फुटांवर नवे गृहनिर्माण प्रकल्प उभारले जाणार आहेत. यावरून अदानी समूहाची एकूण ताकद लक्षात यावी कोणत्याही सरकारवर प्रभाव टाकण्याची त्यांची शक्ती आहे! त्यामुळे मुंबईबरोबर नवी मुंबई हे अदानींच्या मालकीचे होणार आहे. मुंबईतील धारावीप्रमाणेच मिठागरांच्या जमिनी, रेल्वेच्या जमिनी अदानींना मिळणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत मोतीलालनगरसारख्या अनेक वसाहतींच्या पुनर्विकासाची कंत्राटे अदाणींना मिळाली आहेत. केवळ इथल्या विमानतळांमध्येच अदानींची एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. गुजरातबाहेर महाराष्ट्राशिवाय अन्य कोणत्याही राज्यात अदानींनी महाराष्ट्रात केली आहे, तेवढी गुंतवणूक केली नसेल! याचे कारण काय असावे?
अदानींखेरीज, मंगलप्रसाद लोढा, पराग शहा यांच्यासारखी श्रीमंत व्यापारी मंडळी भाजपकडे आहेतच.
लाडक्या उद्योगपतीचे मुंबई व एमएमआर रिजनवरील प्रेम इतके ऊतू का जात आहे? मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून अधिकृतपणे घोषित न करता, तेथे अदानींची मालकी प्रस्थापित करणे आणि त्याद्वारे मुंबईवर नियंत्रण ठेवणे, हे मोदी-शहांचे स्वप्न आहे. म्हणजे मुख्यमंत्री कोणीही असला, तरी मुंबईचे राजे हे गुजरातमधील दोन टगे आणि त्यांचा लाडका उद्योगपती हेच असतील, हा प्लॅन आहे. मुंबईतील कोणताही प्रोजेक्ट मोदी-शहांच्या संमतीविना मान्य होऊ शकणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे मुंबईचा गुजरात होऊ घातलेलाच आहे!
अदानींखेरीज, मंगलप्रसाद लोढा, पराग शहा यांच्यासारखी श्रीमंत व्यापारी मंडळी भाजपकडे आहेतच. मोहित कंबोज हा दलालदेखील आहे. मुंबईतील स्टॉक मार्केट व कमॉडिटी मार्केटमधील ब्रोकर्सची मानसिकतादेखील वेगळी आहे. मराठी माणसाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोण हा तुच्छतेचा आहे. माणसापेक्षा काही समाजघटकांना कबुतरे अधिक महत्त्वाची वाटतात... मुंबईतील अनेक सोसायटीमध्ये मांस, मच्छी खाण्यास बंदी आहे. मांसाहारी कुटुंबांना सोसायटीत घर दिले जात नाही. गेल्यावेळी ठाकरे सेनेच्या काही कार्यकर्त्यांना गुजराती सोसायटीत प्रवेशबंदी करण्यात आली होती. उद्या हा अनुभव अन्य राजकीय पक्षाच्या मराठी कार्यकर्त्यांनाही येऊ शकेल... मुंबईतील मुख्य भागांतील टॉवर्समध्ये आज केवळ धनिकवणिक, शेठजीच राहू शकतात. सामान्य कामगार हा मुंबईबाहेर फेकला गेला आहे. वरळीतील हिट अँड रन केसमध्ये कावेरी नाखवा या कोळी महिलेचा मृत्यू झाला होता. शिंदेसेनेचे उपनेते राजेश शहा यांच्या मुलाच्याच कारने कावेरी यांना निर्दयपणे फरफटत नेले आणि त्यानंतर तो पळून गेला.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनची झाली, तरीदेखील त्यातून फायदा विशिष्ट उद्योगपती आणि बिल्डर्सचाच होणार आहे.
बेस्ट आणि एसटीची वाट लावून, त्यांचेही खासगीकरण करण्याचा डाव आहे. तेथील मराठी कामगारांचे भविष्य अंधकारमय आहे. मराठी शाळा बंद केल्या जात आहेत. सार्वजनिक इस्पितळांचे खासगीकरण केले जात आहे. बेस्टचे बसभाडे दुप्पट, तिप्पट झाले आहे. शिवाय या बसगाड्यांचे वेळापत्रक पाळले जात नाहीत. बसगाड्यांची संख्याही कमी झाली आहे. उद्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनची झाली, तरीदेखील त्यातून फायदा विशिष्ट उद्योगपती आणि बिल्डर्सचाच होणार आहे.
मुंबई ही सोन्याची कोंबडी आहे, असे उद्गार छगन भुजबळ यांनी मागे एकदा काढल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छाती बडवून घेतली होती. हा मुंबईचा घोर अपमान आहे, असे ते म्हणाले होते. तेव्हा भुजबळ महाविकास आघाडीत होते आणि भुजबळ जे म्हणाले, त्यात काही नवीन वा चुकीचे नव्हते. इतर अनेकांनी पूर्वी तेच म्हटले होते! परंतु मुंबईला सोन्याची कोंबडी समजून ती खाऊ पाहणार्या अदानींना रोखावे, असे काही फडणवीस यांना वाटत नाही... मुंबई हे देशातील एक गलिच्छ शहर आहे, असे उद्गार पर्यावरणमंत्री असताना जयराम रमेश यांनी काढले होते. त्यात काहीही चूक नव्हते. पण त्यावर 'रमेश यांनी जणू मुंबईचाच अपमान केला आहे', अशी टीका फडणवीस यांनी केली. वास्तविक उद्या मुंबई हे स्वच्छ शहर झाले, तर त्याचा गौरव केवळ जयराम रमेशच नाही, तर अख्खे जग करेल. परंतु मुंबईबद्दलचे उसने प्रेम दाखवणे, ही भाजपच्या फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांची रीतच आहे!
प्रत्यक्षात मात्र भाजपप्रणीत महायुतीने मुंबई विकायलाच काढली आहे!...
