Opinion

शिंदेंच्या विचारांचे सोने आणि धास्तावलेले लोक...

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या चकमक प्रकरणी अनेक सवाल उपस्थित करून, उच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे सरकारचे पुरते वस्त्रहरण केले आहे. प्रकरणाचा तपास पारदर्शक आणि निष्पक्षपणे झाला नसल्याचे आढळून आले, तर आम्हाला आवश्यक ते आदेश द्यावे लागतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, असे सरकारी वकीलांनी सांगितले. पण हा दावा अविश्वसनीय असून, ही घटना दिसते तशी सरळ नाही, असे न्यायालयाने सुनावले आहे. म्हणजेच आत्मसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला, यावरच संशय व्यक्त करण्यात आला आहे. हे एन्काउंटर नव्हे, अशी टिप्पणी जेव्हा उच्च न्यायालय करते, तेव्हा मग हा अक्षयचा खून आहे का, असा सवाल उद्भवतो.

या देशात ज्यांना संविधान गुंडाळून ठेवायचे आहे, तेच अशाप्रकारचा शॉर्टकट घेऊन, सवंग लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करतात. मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, तेव्हाही शिल्पकार जयदीप आपटे अनेक दिवस गायब होता. आजही बदलापूर प्रकरणातील संबंधित शाळेचे संस्थाचालक आपटे आणि कोतवाल हे बेपत्ता आहेत. मालवणमधील पुतळ्याचे काम जयदीपला देण्यात आले, त्यामागे मुख्यमंत्र्यांच्या कुलदीपकाचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. तर बदलापूरची ही शाळा संघ-भाजपाच्या लोकांशी संबंधित आहे, असे सांगण्यात येते. मात्र या निमित्ताने शिंदे यांचे उजवे हात आणि नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के हे जे काही तारे तोडत आहेत, ते पाहून त्यांची कीव करावीशी वाटते.

खुद्द मुख्यमंत्रीच म्हणत आहेत की, विरोधी पक्ष हा अक्षय शिंदेची तळी उचलत आहे. तर म्हस्के हे म्हणत आहेत की, विरोधी पक्ष अक्षयला हुतात्मा ठरवत आहेत. उद्या ते त्याची कलशयात्रादेखील काढतील. विरोधकांनी अक्षयची बाजू घेतली, असे शंभर टक्के निर्बुद्ध असलेला माणूस म्हणू शकेल. परंतु शिंदे किंवा म्हस्के हे लबाड असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणे विरोधी पक्षांवरच खोटेनाटे आरोप करून, फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात वाकबगार आहेत. खरे तर, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला पाहिजे. कारण अहोरात्र असत्यकथन करण्याची टेस्ट ते केव्हाच पास झाले आहेत! त्यामुळे त्यांना भाजपमध्ये ॲडमिट करून घेतल्यास ते योग्य होईल.

 

कसाबप्रमाणेच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अक्षयला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, हीच विरोधी पक्षांच्या नेत्यांची भूमिका होती.

 

कसाबप्रमाणेच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अक्षयला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, हीच विरोधी पक्षांच्या नेत्यांची भूमिका होती. बदलापूरमध्ये आंदोलन झाले, तेव्हा ते सामान्य लोकांनी केले होते आणि ते ‘फाशी द्या, फाशी द्या’ अशी मागणी करत होते. तो भावनिक उद्रेक होता. ‘मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे’, असे म्हणून सर्वसामान्यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण करणे, हे घटनात्मक पदावर बसलेल्या माणसाला शोभा देत नाही. उद्या लोकांनी मागणी केली, म्हणून आम्ही अमक्या तमक्याचा निकाल लावला, असे मुख्यमंत्री पदावर बसलेला माणूस म्हणू लागला, तर ते महाराष्ट्राचे दुर्भाग्यच असेल. उद्या मंत्रालयात धडक देऊन कोणीही चार-पाच मंत्र्यांना सुळावर चढवा, असे म्हणाला, तर ती मागणी मान्य होईल का? किंवा ती मागणी मान्य करणे योग्य ठरेल का? शिवाय ‘फाशी द्या’, असे जेव्हा लोक व विरोधक म्हणत होते, तेव्हा नीट तपास करून, लवकर खटला चालवून, कायदेशीर प्रक्रियेने त्याला फाशीची शिक्षा व्हावी, अशी दक्षता घ्या, ही मागणी होती. गोळ्या घालून ठार करा, अशी मागणी नव्हती!

ज्या पोलीस अधिकाऱ्याने अक्षयला गोळ्या घातल्या, त्या संजय शिंदेवर अनेक गंभीर आरोप होते व आहेत. पण याचा विचार न करता, त्याला भेटायला जाणे, त्याचा सत्कार करणे, त्याला बक्षीस जाहीर करणे हे सर्व शिंदेसेना आणि मुख्यमंत्र्यांचे जानी दोस्त राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी केले आहे. एन्काउंटरचे उदात्तीकरण करणारे नेते आज आपल्यावर राज्य करत आहेत. आता अक्षय शिंदे चकमक प्रकरणात शिंदे आणि फडणवीस यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. फडणवीस यांचे सिंघम स्टाईल फोटो रिलीज झाले आहेत. तर एकनाथ शिंदेंचा उदो उदो करणारे बॅनरही लागले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत.

दुसरीकडे, काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे अनुसूचित जातीचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा पडताळणी समितीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवला आहे. बर्वे यांना तातडीने जातवैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहे. पडताळणी समितीने ऐनवेळी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे, त्यांना लोकसभा निवडणूक लढता आली नाही. ज्या प्रकारे जात पडताळणी समिती राजकारण केले गेले आणि श्रीमती बर्वे यांना निवडणूक लढवण्यामध्ये अडथळा आणला गेला, त्यावरून ही संविधान व लोकशाही विरोधी कृती आहे, असे स्पष्ट होते. हे सगळे रेशीमबागी मनोवृत्तीतूनच एक ‘नाना’ घडवून आणत आहे.

 

'कोण मोदी? आम्हाला सातारचे पेढेवाले मोदी फक्त माहिती आहेत' असे म्हणणारे उदयनराजे

 

नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वात स्वामी विवेकानंद यांची झलक दिसते, असे उद्गार काढून देवेंद्र फडणवीस यांनी विश्वगुरूंबद्दलचा आदरभावच व्यक्त केला आहे. स्वामीजींचा वेदांत तसेच केवळ हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाचाच नव्हे, तर सर्व धर्मांचा अभ्यास होता. धर्माधर्मांत सामंजस्य असावे, देवाण-घेवाण असावी, असे त्यांचे मत होते. महात्मा गांधी, रवींद्रनाथ ठाकूर, जगदीशचंद्र बोस, नेहरू,ॲनी बेझंट, जगविख्यात नाटककार आणि कादंबरीकार रोमा रोलाँ आदी अनेकांवर स्वामीजींच्या विचारांचा ठसा उमटलेला होता. परधर्मीयांचा द्वेष करावा, धर्माधर्मांत भांडणे लावून द्यावीत, थापा माराव्यात, दिशाभूल करावी या प्रकारांशी स्वामी विवेकानंद यांचा काहीही संबंध नव्हता. ते जगाला वंदनीय वाटावे, असेच व्यक्तिमत्त्व. दोन-दोन बड्या उद्योगपतींबरोबर ते पाच तीन दोनचा डाव मांडत नव्हते! तरीही गुजरातमधील एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत दोन नरेंद्रांची तुलना करण्यात आली होती. देवेंद्रभैया यांनाही नरेंद्र मोदींमध्ये  ते 'नरेंद्र' दिसत आहेत. मोदींप्रमाणेच देवेंद्रजी हे नितेश राणेंसारख्या धर्मांधतावाद्यांना प्रोत्साहन देत आहेत. मोदींप्रमाणेच आपली सिंघमची प्रतिमा तयार करू पाहत आहेत.

'कोण मोदी? आम्हाला सातारचे पेढेवाले मोदी फक्त माहिती आहेत' असे म्हणणारे उदयनराजे... यथावकाश त्यांनाही मोदींची ओळख पटली! गोदातीरी राजे व प्रधानसेवक यांची उराउरी भेट झाली होती. हा राष्ट्रवादी उदय पाहून प्रजा धन्य धन्य झाली... राजेंची कॉलर ताठ नव्हती. राजेंना आपल्या कळपात ओढण्यात यशस्वी झाल्यामुळे कॉलर ताठ झाली होती ती नरेंद्रजी व देवेंद्रजींची. त्यांनी आपली कॉलर नाही उडवली, एवढेच!

महायुतीतीलच एक नेते आणि एकनाथ शिंद्यांचे गुरू रामदास कदम यांनीही पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात पातळी सोडून भाषा वापरली. टीका करताना अर्वाच्यपणा किती करायचा याला काही मर्यादा! हा माणूस महाराष्ट्राचा मंत्री होता आणि पन्नास वर्षे शिवसेनेत होता. आपल्या अगोदरच्या नेत्याबद्दल इतके हीन स्वरूपाचे उद्गार ते कसे काय काढू शकतात! महायुतीत असे एकापेक्षा एक नग आहेत. उदाहरणार्थ, मंत्री तानाजी सावंत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशेजारी बसताना त्यांना उलट्या होतात. मग राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मात्र त्याच्या सुगंधी सहवासाचा आनंद होतो का?

२०२१ च्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी, कोविडचे नियम पाळून शिवसैनिक येतील आणि पुढील वर्षी, म्हणजे २०२२ च्या मेळाव्यास उद्धवजींच्या विचारांचे सोने लुटण्यास लोकांची गर्दी उसळेल, कारण तेव्हा कोरोना नसेल, असे उद्गार गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत काढले होते. कोविड नियंत्रणात आणण्यास उद्धवजींना कसे यश आले होते, हेही त्यांनी त्या मुलाखतीत सांगितले होते. उद्धवजी काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबरच आघाडीत होते... तेव्हा स्वत: विचारांचे सोने लुटण्यास तयार असलेले एकनाथजी, २०२२ मध्येही हे सोने सर्व शिवसैनिक अधिक मोकळेपणाने लुटू शकतील, असे म्हणत होते! नंतर मात्र शिवतीर्थावर ठाकरे यांची सभा होऊ नये, यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत होते... एका वर्षात हा फरक कशामुळे आला? एकनाथजींनी भाजपच्या विचारांचे सोने लुटल्यामुळे? आता यंदा एकनाथजींच्या विचारांचे सोने लुटावे लागणार, या धास्तीमुळे असंख्य लोक म्हणे मुंबई सोडून सहलीला निघून जाणार आहेत...