India

धर्माच्या अफूचे झिंग झिंग झिंगाट...

‘धर्म ही अफूची गोळी आहे,’ हे आता पुरते पटले आहे.

Credit : Indie Journal

 

भाजपच्या विरोधात देशात आणि राज्यातही एकजूट कायम ठेवण्याची आवश्यकता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. आणीबाणीनंतर जनता पक्षात जशी पुढे फाटाफूट झाली, तशी ती होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले. मुख्य म्हणजे, पुन्हा भाजपसोबत जाण्याची शक्यता उद्धवजींनी फेटाळून लावली असून, यामधून त्यांचा लढाऊ बाणा दिसून येतो. काहीजण ईडीच्या भीतमुळे वाकून भाजपचा भोंगा वाजवत असले, तरी उद्धवजींनी हिंमत कायम ठेवली आहे, हे विशेष. दुसरीकडे, हिंदुत्वविरोधकांचा अंत जवळ आला आहे, अशी दर्पोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत जाऊन केली.

राममंदिराचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत, अशा शब्दांत शिंदे यांनी मोदीजींची भाटगिरी करण्याचे व्रत सुरूच ठेवले आहे. नाव बाळासाहेबांचे घ्यायचे आणि अजेंडा मोदींचा राबवायचा, ही शिंदे यांची कपटनीती आहे. अवकाळी पावसाने बेहाल झालेल्या शेतकऱ्यांपेक्षा देवदर्शन आणि धार्मिक पर्यटन या मंडळींना महत्त्वाचे असून, ‘शिवसेना’ हे नाव जरी मिळाले असले, तरी आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यात शिंदे पूर्णतः अयशस्वी ठरेल आहेत. ही शिंदेसेना नसून, भाजपने पदरी बाळगलेली सेना आहे, असेच चित्र दिसत असून, या मंडळींचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. ते कोणत्याही मार्गाने सत्तेच्या सावलीत राहू इच्छितात. शिवाय हिंदुधर्म आणि हिंदुत्व या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हिंदुत्वाच्या विद्वेषी अजेंड्यास विरोध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सर्वसमावेशक विकास हे सरकारचे ध्येय असले पाहिजे. हिंदुत्वाच्या संकुचित अजेंड्यासाठी लोकांनी निव़डून दिलेले नाही, याचे भान सत्तेमुळे बेभान बनलेल्यांना राहिलेले नाही. 

 

भाजपने १९८४च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेशी युती केली होती. 

 

भाजपने १९८४च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेशी युती केली होती. इंदिरा गांधींची हत्या झाल्यामुळे त्यांच्याबद्दल म्हणजेच काँग्रेसबद्दल सहानुभूतीची लाट होती. त्यावेळी भाजपने आधी जनता पक्षाशी वाटाघाटी सुरू केल्या होत्या, परंतु त्या एकदम थांबवून शिवसेनेशी समझोता करण्यात आला. मुंबईतील चार जागा भाजपने आणि दोन जागा सेनेने लढवायच्या, असे ठरले. बदल्यात उर्वरित महाराष्ट्रात सेना भाजपला पाठिंबा देणार होती. परंतु ही आघाडी अयशस्वी ठरली आणि १९८५ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपने सेनेला टांग मारली आणि शरद पवारांनी स्थापन केलेल्या पुलोदमध्ये भाजप सामील झाला. ही भाजपने सेनेशी केलेली दगाबाजी नव्हती का?

शिवसेनेशी युती केल्यामुळेच १९८४ मध्ये लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला, असे मत भाजपचे उमेदवार व नेते राम जेठमलानींनी पक्षबैठकीत मांडले होते. ‘शिवसेना हा महाराष्ट्रात वाईट प्रतिमा असलेला पक्ष आहे, तेव्हा त्यांच्याबरोबर जाऊ नये’, असे जेठमलानींनी भाजपच्या बैठकीत प्रतिपादन केले. १९८५ मधील  विधानसभा निवडणुकीत सेनेच्या फक्त छगन भुजबळ यांचा विजय झाला. विहिंपने जरी १९८०च्या दशकात राम मंदिर व हिंदुत्व यावर बोलायला सुरुवात केली असली, तरी भाजपने हिंदुत्वाचा प्रचार करण्याअगोदर बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विषय हाती घेतला होता. त्यावेळी रामजन्मभूमीच्या आंदोलन हे आमचे नव्हे, तर विहिंपचे आहे असे भाजपवाले सांगायचे. म्हणजे काही चुकीची घटना घडली, तर हात वर करून मोकळे! भाजप हा दहा तोंडाचा रावण आहे, अशी टीकाही काही जणांनी केली होती १९८९ च्या जूनमध्ये हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विहिंपच्या रामजन्मभूमी आंदोलनास भाजपने जाहीरपणे समर्थन दिले आणि महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेतला. पण त्यापूर्वी बाळासाहेबांनी केलेल्या मराठवाड्याच्या दौऱ्यात बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भगवी शाल खांद्यावर पांघरली होती. त्यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हटले जाऊ लागले होते. परंतु १९८९ च्या मराठवाडा दौर्‍यात अझरुद्दीन, किरमाणी, मोहम्मद रफी यांचा बाळासाहेब नेहमी गौरवाने उल्लेख करत. म्हणजे सरसकटपणे आपण मुस्लिमांच्या विरोधी नाही, तर फक्त राष्ट्राची बेईमानी करणाऱ्यांच्या विरोधात आहोत, असे ते आवर्जून सांगत असत.

१७ डिसेंबर १९९२ रोजी राव सरकारवर अविश्वासदर्शक ठराव मांडताना वाजपेयींनी लोकसभेत भाषण केले. त्यात ते म्हणाले की,' तो गट, म्हणजेच ढाचा तोडणारा तो गट कोणता होता? तो कोठून आला होता? तो कोणी संघटित केला होता? ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. मी पुन्हा सांगतो की, ज्या कारसेवकांनी तो सांगाडा तोडण्यात भाग घेतला, त्यांनी समोर यावे. त्यांचा त्यात किती सहभाग होता हे सांगावे. शिक्षा झाली तर शिक्षा भोगावी. त्याग केल्याशिवाय राम मंदिर उभे राहणार नाही. किमान अशा पद्धतीने फसवणुकीने तरी मंदिर होणार नाही..' थोडक्यात कारसेवकांनी निर्भयपणे पुढे येऊन आम्ही ढाच्या तोडला हे सांगावे, असे आवाहन करण्याची पाळी वाजपेयींवर आली होती. उलट बाळासाहेबांनी थेटपणे  ढाचा तोडल्याची जबाबदारी घेतली होती.

संघाचे ब.ना. जोग यांनी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, पालनपूरच्या बैठकीत भाजपने श्रीराम मंदिराचा ठराव केला आणि विहिंपने आकाराला आणलेली मंदिराची चळवळ देशव्यापी केली. 

१९९८ साली वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा भाजपकडे १८२ खासदार होते. समता पक्ष, अण्णाद्रमुक, अकाली दल शिवसेना आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांचा पाठिंबा लाभून, या सर्वांच्या एकत्रित शक्तीमुळेच आघाडीचे संसदेचे संख्याबळ २५४ पर्यंत पोहोचू शकले. आसाम गण परिषद, लोकतांत्रिक जनता दल, हरियाणा लोकदल, नॅशनल कॉन्फरन्स आदी अनेक छोट्या प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा आघाडीला मिळाला होता. त्यांचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता. तेलुगू देशमने आघाडीला बाहेरून पाठिंबा दिला होता. राम मंदिर, समान नागरी कायदा आणि ३७० कलम रद्द करणे हे तीन कार्यक्रम भाजपने बाजूला ठेवल्यामुळेच हे घडू शकले.

 

१९९९ साली वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हादेखील भाजपला १८२ जागांवरच यश लाभले होते.

 

१९९९ साली वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हादेखील भाजपला १८२ जागांवरच यश लाभले होते. त्यावर्षी आघाडीतील महत्त्वाच्या घटक पक्षांची स्थिती सुधारली होती. फर्नांडिसांचा समता पक्ष हा संयुक्त जनता दल या पक्षात विलीन होऊन काहीशा प्रबळ झालेल्या जेडीयूला २१ जागा मिळाल्या. शिवसेना आणि द्रमुक पक्षाचेही बळ काहीसे वाढले होते. हिंदुत्ववादी भूमिकेमुळे भाजपपासून दूर राहणारे काही प्रादेशिक पक्ष, वाजपेयी यांच्या उदारमतवादी प्रतिमेमुळे भाजपशी आघाडी करण्यास तयार झाले होते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. किमान समान कार्यक्रमाच्या आधारेच हे पक्ष आघाडीत सामील झाले. कलाम यांची राष्ट्रपतीपदी निवड करण्यात भाजपने पुढाकार घेतला होता. यातून पक्षाला धर्मनिरपेक्ष प्रतिमा निर्माण करण्यासाठी उपयोग होईल, असे मानले जात होते. मात्र गुजरातमधील दंगलीमुळे भाजप अल्पसंख्यांकांचा विश्वास मिळवू शकला नाही. संरक्षण खात्यातील दलाली ‘तहलका’ने उघडकीस आणली. बंगारू लक्ष्मण लाच घेताना पकडले गेले. संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सरचिटणीस जया जेटली यांच्या उपस्थितीत त्यांचा सहाय्यक पैसे स्वीकारताना टिपण्यात आला. शवपेट्यांच्या खरेदी व्यवहारातही भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण गाजले. म्हणजे भाजप भ्रष्टाचारमुक्त होता हे खोटेच असल्याचे सिद्ध झाले. कंदहार, अक्षरधाम या प्रकरणांमुळे दहशतवादाचा मुकाबला करण्यात आम्ही यशस्वी ठर. हा भाजपचा दावा फोल ठरला. संसदेवर देखील हल्ला झाला.असो.

१९८४ साली  विहिंपने हिंदूंच्या जागरणाचे अभियान सुरू केलं. ऑक्टोबर १९८४ मध्ये विहिंपने अयोध्येत एक मिरवणूक नेऊन सभा भरवली आणि बाबरी मशीद मुक्त करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. महंत अवैद्यनाथ आणि परमहंस रामचंद्रदास यांनी या टप्प्यावर रामजन्मभूमीच्या मुद्द्याला आक्रमक वळण दिले. मात्र १९८४च्या निवडणुकीत तेव्हा रामजन्मभूमीच्या आंदोलनात अग्रेसर असलेल्या परमहंस रामचंद्रदास यांनी राजीव गांधींना पाठिंबा दिला होता, हे विसरून चालणार नाही. १९८६ मध्ये पुन्हा काही रामभक्तांनी त्या परिसरात पूजा करण्याची परवानगी मागितली, तेव्हा जिल्हा प्रशासनाने अशी ग्वाही दिली की, सदर परिसर खुला केल्याने कोणताही गंभीर प्रश्न निर्माण होणार नाही. एक फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबादच्या जिल्हा न्यायालयाने या संदर्भात आदेश दिल्यावर पंतप्रधान राजीव गांधींनी त्याची तातडीने दखल घेऊन मशीद परिसराच्या दरवाजांवरील कुलूप उघडण्यास परवानगी दिली. विहिंपला हा आपला मोठा विजय वाटला.

त्या विरोधात बाबरी मशीद ॲक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली आणि ती मुस्लिम समुदायाने केली. राजीव यांच्या या निर्णयानंतर या प्रश्नाच्या राजकीयीकरणास सुरुवात झाली. मग रामजन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनाने वेग घेतला आणि विहिंप त्यात पुढे होती. भाजपच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा या आंदोलनास पाठिंबा राहिला, पण पुढाकार विहिंपचा होता. राम मंदिराच्या मुद्द्यावर जनमत संघटित करून,  व्ही. पी. सिंग सरकारवर दडपण आणण्यासाठी अडवाणी यांनी २५ सप्टेंबर १९९० पासून सोमनाथ येथून रथयात्रा  काढली. हिंदुत्ववादी राजकारणाचा हा इतिहास जाणून घेतला पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे, उद्धवजींबद्दल ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी सतत असूया बाळगली, तशी असूया अडवाणींना वाजपेयींबद्दल कधीही वाटली नाही. वाजपेयींची जेष्ठता आणि गुण यांची आपल्याला जाणीव होती, अशा भावना अडवाणींनी व्यक्त केल्या होत्या. तसेच पंतप्रधानपदासाठी वाजपेयी आपल्यापेक्षा अधिक सर्वमान्य उमेदवार होतील आणि घटक पक्षांचाही त्यांना पाठिंबा मिळेल, असे अडवाणींचे मत होते आणि जाहीरपणे त्यांनी ते मांडले आहे. उद्धवजींप्रमाणे एकनाथ शिंदे यांना काँग्रेस व राष्ट्रवादीचा बिलकुल पाठिंबा मिळाला नसता. आणि शिवसेनेतील इतर नेत्यांनाही त्यांचे नेतृत्व अजिबात आवडले नसते!

 

हेच का संस्कारी पक्षाचे संस्कार?

 

अलीकडे ज्यांच्या होलिकोत्सवास देवेंद्रजींनी आवर्जून हजेरी लावली, त्या मोहित कंबेजने सुषमा अंधारेंबद्दल अत्यंत वाह्यात व आक्षेपार्ह उद्गार काढले आहेत. हेच का संस्कारी पक्षाचे संस्कार? एकनाथजी, गिरीश महाजन, संदिपान भुमरे, संतोष बांगर, मोहित कंबोज, अशा या अनेक  रामभक्तांची रामभक्ती पाहून आज असंख्य लोक दिङ्मूढ झाले आहेत. आता अवकाळी पाऊस, कोरोना, महागाई आणि बेकारी ही संकटे लवकरच दूर होणार, यात शंका नाही. 

नीतिमान मंत्री संजय राठोड, निर्मळ विचारांचे खासदार राहुल शेवाळे, ईडीमुक्त आनंद अडसूळ, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर आणि असेच इतर अनेक अमर्याद पुरुषोत्तम.. शिवाय महाराष्ट्रासाठी आपले सारसर्वस्व वाहणारे समृद्ध विचारांचे मुख्यमंत्री एकनाथजी यांच्या उपस्थितीत शरयू किनारी महाआरती झाली, तेव्हा हजारो उपस्थित लोक आणि टेलिव्हिजनवरून हा अभूतपूर्व सोहळा पाहणारे करोडो प्रेक्षक उन्मनी अवस्थेत गेले...‘धर्म ही अफूची गोळी आहे,’ हे आता पुरते पटले आहे.