Opinion

डोनाल्ड ट्रम्प - जगाचे आका!

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

अमेरिकेत वंशद्वेष्ट्या, श्रेष्ठत्वाच्या भावनेने ग्रस्त, आक्रस्ताळ्या, अतिरेकी व  माजोरड्या अशा डोनाल्ड ट्रम्प यांची राजवट सुरू झाली आहे. आता ते जगाचे ‘आका’ बनले आहेत. 'मेक अमेरिका ग्रेट अगेन - मागा' अशी घोषणा त्यांनी दिली असून, त्यांना साथ द्यायला 'अमेरिकेचे गौतम अदाणी,' म्हणजेच टेस्ला व एक्सचे मालक एलॉन मस्क हे आहेत! युरोपातील निवडून आलेल्या मध्यममार्गी किंवा डाव्या विचारांच्या नेत्यांना व त्यांच्या सरकारांना हटवायचे आणि तेथील अतिउजव्या पक्षांना मदत करून, सामर्थ्यवान बनवायचे, ही या दोघांची व्यूहरचना आहे.

सत्तेवर येण्यापूर्वीच ट्रम्प यांनी डेन्मार्क, कॅनडा या 'नेटो' संघटनेतील आपल्या मित्रदेशांच्या भूभागावर आक्रमण करण्याची धमकी दिली होती! ब्रिटनमधील सत्ताधारी मजूर पक्षाचा 'मागा' तिरस्कार करतात. त्याचप्रमाणे 'अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी पार्टी' या जर्मनीतील कट्टर पक्षाला मस्क आपल्या मालकीच्या 'एक्स' या समाजमाध्यमावरून पाठिंबा देत आहेत. अर्थात पहिल्या टर्ममध्ये सत्तेवर असतानादेखील (२०१८-१९च्या सुमारास) ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह बॅनन यांनी  युरोपमधील अतिउजव्या पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले होते. परंतु या वेळेची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. जर्मनी आणि फ्रान्समधील सरकारे कोसळले असून, त्या देशांतील अतिराष्ट्रवादी पक्षांची लोकप्रियता वाढलेली आहे. युरोपीय देशांना आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे, याची कल्पनाच नाही, असे ट्रम्प प्रशासनातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

मस्क यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या विरोधात प्रचार केला. तसेच ट्रम्प यांची एक्सवरून प्रकट मुलाखतही घेतली. मस्ककडे मोठ्या प्रमाणात भांडवल असून, सरकारी खात्यांची पुनर्रचना करण्याची जबाबदारी ट्रम्प यांनी मस्कवर सोपवली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर हे मुख्य सरकारी वकील असतानाची एक भानगड मस्क यांनी जाणीवपूर्वक बाहेर काढली आहे.

 

जर्मनीत पुढील महिन्यात निवडणुका असून, 'एएफडी'ला मतदान करा, असा प्रचार मस्क करत आहेत.

 

ब्रिटनमधील अतिउजव्या रिफॉर्म पार्टीला मस्क दहा कोटी डॉलर्स देण्याच्या विचारात आहेत. या पक्षाचे नेते निगेल फरेज यांनी नुकतीच ट्रम्प यांची फ्लोरिडा येथे जाऊन भेट घेतली. 'मागा' ही चळवळ स्टार्मर यांचा तिरस्कार करते. कारण ते पडले डावे! उलट इटलीमधील उजव्या विचारांच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावर 'मागा' खूष आहे. कारण त्यांनी स्थलांतरितांना मोठ्या प्रमाणात हद्दपार केले आहे. जर्मनीत पुढील महिन्यात निवडणुका असून, 'एएफडी'ला मतदान करा, असा प्रचार मस्क करत आहेत. एएफडी या पक्षाचे जर्मनीतील नवनाझीवाद्यांशी संबंध आहेत. शीतयुद्धकाळात अमेरिकेने आपल्या विरोधातील अनेक डाव्या विचारांच्या राजवटी उलथवून टाकल्या. चिलीचे साल्व्हादोर आयेंदे यांच्यासारख्यांची हत्या केली, असा आरोप झाला होता. मात्र आजच्या काळात सुदैवाने सर्व नेते हे काही समाजमाध्यमांचा शहेनशहा मस्कच्या दबावाला बळी पडतीलच, असे नाही. उदाहरणार्थ, निगेल फरेज यांनी ब्रिटनमधील एका जहाल आंदोलकास तुरुंगातून सोडा, या मस्क यांच्या मागणीस पाठिंबा देण्यास नकार दिला. त्याबरोबर मस्क यांनी निगेल यांच्यावर टीकास्त्र सोडले!

'आता अमेरिकी जनतेला त्यांचा आत्मविश्वास, त्यांची संपत्ती, त्यांची लोकशाही आणि त्यांचे स्वातंत्र्य परत बहाल केले जाईल. या क्षणापासून अमेरिकेचे अधःपतन थांबले असून, अमेरिकेत सुवर्णयुग येईल', असे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत. अमेरिकेतील प्रत्येक अध्यक्षच आपण परिवर्तन करणार असल्याचे सांगत असतो! परंतु ट्रम्प यांची भाषा एखाद्या साहित्यिकाला मागे टाकेल अशीच असते...

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधी सोहळ्यास पूर्वाध्यक्ष तसेच मावळते अध्यक्ष हजर असतात. निवडणुका झाल्यावर प्रचारी भाषा करण्याची गरजच राहत नाही. परंतु मावळते अध्यक्ष जो बायडन यांच्या उपस्थितीतच, त्यांचे प्रशासन भ्रष्ट होते, त्यांच्या सरकारने धोकादायक गुन्हेगारांना अभय दिले, अमेरिकेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवले, काहीजणांनी मला संपवण्याचाच प्रयत्न केला, इत्यादी आरोप ट्रम्प यांनी केले. वास्तविक हे टाळून, सकारात्मक सुरुवात करण्याची आवश्यकता होती. आपली कारकीर्द संपत असताना, बायडन यांनी केलेल्या निरोपाच्या भाषणात देशातील अतिश्रीमंत लोक आणि ‘टेक्नो इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स’ यांच्यापासून अमेरिकेला धोका असल्याचा रास्त इशारा दिला होता. स्वतंत्र वृत्तपत्रे कोसळत आहेत, संपादक गायब होत आहेत आणि समाजमाध्यमे तथ्यतपासणीला फाटा देत आहेत, अशी तिखट टीकाही त्यांनी केली होती. भारतातही अशीच परिस्थिती आहे...

 

अमेरिका ही जगातील सर्वात मोठी महासत्ता असून, तेथील बड्या कंपन्या लोकशाही वेठीस धरत आहेत, हे खरेच आहे.

 

अमेरिका ही जगातील सर्वात मोठी महासत्ता असून, तेथील बड्या कंपन्या लोकशाही वेठीस धरत आहेत, हे खरेच आहे. ‘टेस्ला’ व ‘एक्स’चे मालक एलॉन मस्क यांची ट्रम्प यांनी ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी कमिशन’वर नेमणूक केली आहे. मस्क हे सतत ट्रम्प यांच्या अवतीभवती असतात. मस्क हे आपल्या स्वार्थासाठी सरकारी निर्णयांवर प्रभाव टाकू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांतच मस्क यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जो विभाग निर्माण केला आहे, त्याच्या पारदर्शकतेबद्दल शंका उपस्थित करत, तीन कायदेशीर खटले दाखल झाले आहेत.

तिकडे करचुकवेगिरी तसेच बंदुकीच्या प्रकरणात स्वतःच्या मुलावर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यामधून राष्ट्राध्यक्षाच्या अधिकारात बायडन यांनी पायउतार होण्यापूर्वी, त्याला माफी देऊन टाकली! २०२० मधील निवडणुकीत बायडेन यांच्याकडून पराभव झाल्यानंतर, ट्रम्प समर्थकांनी हैदोस घातला होता. यावेळी अध्यक्ष होताच या दंगलखोरांना ट्रम्प यांनी माफी देऊन टाकली आहे! राष्ट्राध्यक्षाने आपल्या कुटुंबाचा व समर्थकांचा विचार करून चालत नाही, परंतु अमेरिकेत नेमके तेच घडत आहे...

मुळात बायडेन यांना डेमॉक्रॅटिक पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी मागे घ्यायला लावल्यामुळे, ते आपल्याच पक्षाबद्दल नाराज होते. आपण शर्यतीत असतो, तर ट्रम्प यांचा पराभव केला असता, असे त्यांना वाटत होते. त्यांच्या कारकिर्दीत अमेरिकेत प्रचंड महागाई झाली. तसेच डेमॉक्रॅटिक पक्षाचा मुख्य पाठीराखा असलेल्या कामगारवर्गाकडे दुर्लक्ष झाले. अर्थात बायडेन राजवटीत उत्पादन व तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये अमेरिकेने आगेकूच केली. परंतु बायडन यांना अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घ्यावे लागले. तसेच युरोपमधील अमेरिकेचा प्रभाव कमी झाल्यामुळेच रशियाचे अध्यक्ष पुतिन युक्रेनवर आक्रमण करू शकले. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांची गझापट्टीताल बाँबफेक ते थांबवू शकले नाहीत. त्यांना यश मिळाले, ते आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या आठवड्यात. परंतु तोवर प्रचंड नरसंहार होऊन गेला होता. आता गझा ही पुन्हा संघर्षभूमी होणार नाही, याची दक्षता ट्रम्प यांना घ्यावी लागेल.

 

ट्रम्प राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणार आहेत.

 

अर्थात बायडेन यांनी भारताशी संबंध अधिक मजबूत केले. अमेरिका-मेक्सिको सीमेवर ट्रम्प हे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करून, तेथील "घुसखोरी" पूर्णपणे थांबवणार आहेत. आपल्या पहिल्या टर्ममध्ये त्यांना याबाबत यश आले नव्हते. दोन्ही देशांत भिंत बांधण्याची त्यांची घोषणा हवेतच विरली होती. बेकायदा गुन्हेगारी टोळ्यांना ते ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित  करणार आहेत. परंतु अतिरेकी व स्थलांतरित ठरवून, चुकीच्या लोकांची हकालपट्टी होणारच नाही, असे नाही. शिवाय अमेरिकेतील वंशवादी उजव्या अतिरेक्यांचाही ते बंदोबस्त करतील, अशी अपेक्षा आहे.

अमेरिकन सरकार तेल व वायूचे अधिकाधिक उत्खनन करणार असून, त्यासाठी ट्रम्प यांना संबंधित कंपन्यांना करसवलतीही द्याव्या लागतील. ट्रम्प हे राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणार आहेत. देशाचा अधिक विकास करून रोजगार देण्यासाठी ते वाढत्या कर्ब-उत्सर्जनाची कितपत फिकीर करतील, अशी सार्थ भीती व्यक्त केली जात आहे. बायडन प्रशासनाने पर्यावरणाचा ठोस कार्यक्रम राबवला होता. आपल्या नागरिकांना श्रीमंत करण्यासाठी आम्ही इतर देशांवर कर लादणार आहोत, असेही ट्रम्प यांनी घोषित केले आहे. मात्र सर्वच देशांनी असे धोरण आखल्यास, जागतिकीकरणाच्या घड्याळाचे काटे उलटे फिरण्याची प्रक्रिया सुरू होईल. पनामा कालवा परत घेणार असल्याच्या निर्धाराचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला आहे. पनामा कालव्याचे कामकाज चीनकडून चालवले जाते, तर अमेरिकी जहाजांवर प्रचंड शुल्क आकारले जाते. आम्ही हा कालवा चीनला नव्हे, तर पनामाला दिला होता. तो आम्ही तो परत घेत आहोत, असे ट्रम्प यांनी एकतर्फीपणे जाहीर केले आहे. यामधून चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अमेरिकन बाजारपेठेत येणाऱ्या परदेशी वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयातकर लावण्याचे ट्रम्प यांनी वांरंवार घोषित केले असून, त्याचा सर्वच देशांना फटका बसू शकतो. भारतीय लोक उच्च शिक्षण प्राप्त करून चिकाटीने अमेरिकेत येऊन, यशस्वीपणे नोकरी-व्यवसाय करत आहेत. सीमासुरक्षेबाबत कडक धोरण राबवणारे आणि अमेरिकेचा गतिमान विकास करू पाहणाऱ्या ट्रम्प यांनी भारतावर अन्याय करू नये. बायडन प्रशासनाने एच१बी व्हिसा धोरणात नुकतेच स्वागतार्ह बदल केले असून, त्याचा भारतीय नागरिकांना फायदाच होणार आहे. मात्र ब्रिक्स देशांवर (ज्यात भारताचाही समावेश आहे) व्यापार कर लादण्याची धमकी त्यांनी दिली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना व पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे जगभर अस्वस्थता निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्यापेक्षा मोदी परवडले, असे म्हणण्याची पाळी येऊ नये.