Opinion
भाजपचे उसने मनमोहनप्रेम!
मीडिया लाईन सदर
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. परंतु त्यांच्या स्मारकावरून सुरुवातीला ताठर भूमिका घेतली. ज्या जागेवर डॉ. सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, तेथेच भारताच्या या महान सुपुत्राचे समृतिस्थळ व्हावे, अशी विनंती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती. जेथे अंत्यसंस्कर होतील, तेथे स्मारक उभे न करणे, हा देशाच्या पहिल्या शीख पंतप्रधानाचा अवमान आहे, असा आरोप काही काँग्रेस नेत्यांनी केला. एवढी टीका झाल्यानंतरच, ‘जागा दिली जाईल’, असे आस्वासन केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहे. प्रत्यक्षात योग्य ठिकाणी जागा दिली जाईल, याची खात्री नाही.
एकेकाळी डॉ. सिंग हे कमकुवत पंतप्रधान असल्याची टीका माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी केली होती. तर स्वतःला अडवाणींचे शिष्य म्हणवून घेणाऱ्या मोदी यांनी, ‘रेनकोट घालून आंघोळ करणारा’ अशा शब्दांत डॉ. सिंग यांची संभावना केली होती. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने देशाची वाट लावली, असेही मोदी म्हणाले होते. तर मनमोहन राजवट कशी वाईट होती, हे दाखवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच एक श्वेतपत्रिकाही प्रसिद्ध केली होती. आपल्या सरकारमधील भ्रष्टाचाराकडे सिंग यांनी डोळेझाक केली, अशी टीका ‘इंडिया फाउंडेशन’चे अध्यक्ष आणि भाजप नेते राम माधव यांनीही केली आहे.
वास्तविक ए. राजा, सुरेश कलमाडी, अशोक चव्हाण प्रभृती, ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप होते, त्या त्या सर्वांवर डॉ. सिंग यांनी कारवाई केली होती. शिवाय टूजीमधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही, कारण कोणताही घोटाळा झालेलाच नव्हता... बोगस व अतिरंजित आरोप करून आणि अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून, यूपीए सरकारला बदनाम करणे, एवढा एकच भाजपचा उद्देश होता. भाजपच्या अनेक नेत्यांनी डॉ. सिंग यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केल्यावरही ते अजिबात खचले वा डगमगले नाहीत. ‘काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधींसमोर डॉ. सिंग हे लोटांगण घालतात, ही भाजपवाल्यांची टीका तथ्यहीन होती. कारण अनेकदा डॉ. सिंग हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले होते. मात्र काँग्रेसचे राजकीय नेतृत्व आपल्याकडे नाही, या मर्यादेची जाण ठेवूनच त्यांनी व्यवहार केला. त्यावेळी ‘मौनमोहन’ असे त्यंना संबोधणाऱ्या मोदींनी स्वतः मात्र नोटाबंदीपासून ते अदानींपर्यंत अनेक बाबतीत मौनीबाबाची भूमिका घेतली आहे.
अर्थतज्ज्ञ असलेले ते देशाचे पहिले पंतप्रधान होते.
यूपीए सरकारमधील मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांना शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करायच्या होत्या, तेव्हा ‘कपिल, हे काम सोपे नाही’, असा पूर्वइशारा डॉ. सिंग यांनी देऊन ठेवला होता. तो किती योग्य होता, याचा अनुभव त्यांना लगेच आला. परदेशी विद्यापीठांबरोबर सहयोग करण्याबाबत सिब्बल यांनी विधेयक मांडले, तेव्हा भाजपने त्यास विरोध करून ते हाणून पाडले. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हितकारक अशा ‘आकाश टॅबलेट’चे उत्पादन करण्याच्या प्रयत्नांनाही भाजपकडून विरोध झाला.
डॉ. मनमोहन सिंग नेमके कसे होते, हे पाहण्यासारखे आहे. डॉ. सिंग यांच्यावरील माझे ‘मनमोहन पर्व’ हे पुस्तक लोकांना ठाऊक आहे. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ. सिंग यांची अचूक शब्दांत प्रशंसा केली आहे. डॉ. सिंग यांना ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना तसेच केंद्रीय अर्थमंत्री असताना, मी मुंबईत व दिल्लीत भेटलेलो आहे. त्यावेळी त्यांच्या स्वभावातील सौजन्यशीवता व सुसंस्कृततेचा मला प्रत्यय आला होता. असो.
भारतासारख्या विकसनशील देशात आर्थिक उदारीकरण आणतानाच, त्यास मानवी चेहरा देणारा नेता म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांची ओळख सहजासहजी पुसता येणार नाही. डॉ. सिंग यांचे व्यक्तिमत्त्व इतके सालस, नेमस्त आणि सुसंस्कृत होते की, विरोधी पक्षाची लोकही त्यांच्यावर टीका करण्याचे धाडस सहसा करत नसत आणि टीका केली तरी, त्यात कठोरपणा नसे. अर्थतज्ज्ञ असलेले ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. युरोपियन सेंट्रल बँकेचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केले, ते मारिओ द्रागी हे २०२१-२२ या दरम्यान इटलीचे पंतप्रधान होते. पण डॉ. सिंग हे त्यापूर्वी अनेक वर्षे अगोदर भारताचे पंतप्रधान झाले आणि दहा वर्षांची त्यांची कारकीर्द यशस्वी राहिली.
डॉ. सिंग यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास कार्यक्रमात भारताच्या वतीने सहभाग घेतला.
डॉ. सिंग हे आताच्या पाकिस्तानच्या पंजाबमधील गाह या गावचे. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील डॉ. सिंग हे कष्टाने शिकले. लहानपणीच त्यांची आई वारल्यामुळे आजीने त्यांना वाढवले. विशेष म्हणजे, डॉ. सिंग यांचे प्राथमिक शिक्षण उर्दूमध्ये झाले. अर्थशास्त्रात द्विपदवीधर होताना त्यांचा सतत प्रथम क्रमांक असे. केंब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्र शिकत असताना, जगद्विख्यात अर्थशास्त्रज्ञ जोन रॉबिन्सन आणि निकोलस कॅल्डॉर यांनी त्यांच्यावर खरे संस्कार केले. विख्यात अर्थशास्त्रज्ञ केन्स याचे सिद्धांत शिकवताना, अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक क्षेत्राची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे जोन रॉबिन्सन या समजावून सांगत. त्या डाव्या विचारांच्या होत्या, तर कॅल्डॉर हे भांडवलशाहीतूनदेखील सामाजिक हित कसे साधता येते, याचे विश्लेषण करत असत. त्यातही जोन या विद्यार्थ्यांची विवेकबुद्धी जागवत असत. मानवी जीवनात बदल घडवण्यात राजकारणाची देखील महत्त्वाची भूमिका असते, याचे आकलन केंब्रिजमधील अध्ययनाच्या वेळी डॉ. सिंग यांना झाले.
डॉ. सिंग यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे अध्यापन केले, त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास कार्यक्रमात भारताच्या वतीने सहभाग घेतला. जिनिव्हात आर्थिक धोरणाशी संबंधित आयोगात सरचिटणीस म्हणून काम केले. तसेच मुख्य आर्थिक सल्लागार, अर्थसचिव, नियोजन आयोगाचे सदस्य, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, अशा वेगवेगळ्या जबाबदारीच्या पदांवर त्यांनी आपला ठसा उमटवला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना, डॉ. सिंग यांनी रिझर्व्ह बँकेच्या कायद्यात बदल करून, नागरी सहकारी बँकांवरील देखरेखीसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना केली.
बँकांना लीझिंग व्यवसाय सुरू करता यावा, तसेच खातेदारांना नॉमिनेशनच्या सुविधा पुरवाव्यात, यासाठीही त्यांनी बँकिंग कायद्यात दुरुस्त्या केल्या. त्यांच्याच कारकिर्दीत वित्तीय बाजारपेठांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करण्यात आली. त्यामुळेच या बाजारपेठांचा पुढे जबरदस्त गतीने विकास होऊ शकला. पाकिस्तानी व्यावसायिक आगा हसन अबेदी यांनी प्रवर्तित केलेल्या बँक ऑफ क्रेडिट अँड कॉमर्स इंटरनॅशनल (बीसीसीआय) या बँकेला भारतात आपल्या शाखा उघडण्यास परवानगी देऊ नये, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना डॉ. सिंग यांनी नोंदवले होते. परंतु त्यांचा सल्ला तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी धुडकावून लावला. तेव्हा डॉ. सिंग यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडे पाठवून दिला, परंतु त्यांचे मन वळवण्यात आले.
अर्थमंत्री वा पंतप्रधान झाल्यावरही, डॉ. सिंग यांनी नफ्यातील नव्हे, तर आजारी सार्वजनिक उद्योगांच्याच विक्रीला प्राधान्य दिले.
१९८४ साली बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यात झालेल्या स्थापनादिन समारंभात बोलताना बँकिंग प्रणालीत मूलगामी सुधारणा करण्याची गरज डॉ. सिंग यांनी प्रतिपादन केली होती. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी व्याजदर ठरवण्याबाबतची बँकांवरील नियंत्रणे काढून टाकली. बँकांना आपल्या शाखा काढण्याबाबत स्वातंत्र्य देण्यात आली. चंद्रशेखर हे भारताचे पंतप्रधान असताना, देशाची आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक बनली होती की, सोने गहाण ठेवावे लागले होते. परंतु डॉ. सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून पोथीनिष्ठ पंडितांच्या विरोधाची तमा न बाळगता, आर्थिक सुधारणा धाडसाने राबवल्या. तुम्ही देश अमेरिकेला गहाण टाकत आहात आणि भांडवलदारांना मोकळे रान देत आहात, अशी टीका करण्यात कम्युनिस्ट मंडळी पुढे होती. परंतु डॉ. सिंग यांनी नेकीने सुधारणा राबवल्या आणि त्यांच्या अर्थमंत्रिपदाच्या काळात जीडीपीचा दर प्रथमच ७ टक्क्यांवर गेला.
मात्र अर्थमंत्री वा पंतप्रधान झाल्यावरही, डॉ. सिंग यांनी नफ्यातील नव्हे, तर आजारी सार्वजनिक उद्योगांच्याच विक्रीला प्राधान्य दिले. सार्वजनिक उपक्रमांच्या खासगीकरणावर भर न देता सरकारी मक्तेदारी संपुष्टात आणणे, हे त्यांचे धोरण होते. बँकिंग आणि विमा क्षेत्रात डॉ. सिंग यांनी सार्वजनिक मालकीच्या अर्थसंस्था मजबूत ठेवल्या. त्यामुळे २००८ मधील जागतिक वित्तीय संकटावर मात करणे भारतास शक्य झाले. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार चालवताना, आघाडीतील अनेक पक्षांना सांभाळून घेण्याची कसरत त्यांना करावी लागली. संपुआ सरकारला डाव्यांचा बाहेरून पाठिंबा होता. त्यामुळे शिक्षणाचा अधिकार, मनरेगा, माहितीचा अधिकार, अन्नसुरक्षा कायदा असे अनेक लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. त्यामुळे बळीराजाला मोठाच आधार मिळाला.
पंतप्रधान म्हणून २००८ मध्ये अमेरिकेशी झालेल्या नागरी अणुकरारास व्यक्तिगत प्रतिष्ठेचा विषय बनवताना, त्यांनी डाव्यांच्या विरोधास जुमानले नाही. त्यामुळे डाव्यांनी सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला. परंतु त्यानंतर झालेल्या निवडणुकांतही डॉ. सिंग यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा सत्ता मिळवून दिली. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या टर्ममध्ये देशाची प्रगती झपाट्याने झाली. सत्तेबाहेर गेल्यानंतरही अर्थव्यवस्था सुधारण्यासंबंधीच्या विधायक सूचना ते करत असत. पंतप्रधान वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज प्रभृतींनी डॉ. सिंग यांचे उत्तम संबंध होते. राजकारणात कोणीही शत्रू नाही, असे मानणारा हा अजातशत्रू नेता होता. त्यांना आदरांजली.