Opinion
‘अजित’ घड्याळ काळाच्या पडद्याआड
मीडिया लाईन सदर
महाराष्ट्राच्या राजकारणास एक धक्कादायक वळण लागले आहे. गेली ३५ वषे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे खेळाडू असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे राज्यातील राजकारण आरपार बदलण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या काट्यांची दिशा बदलेल का, हेही पाहावे लागेल. २०२९ पर्यंत आम्हाला कोणत्याही कुबड्या नकोत. शतप्रतिशत भाजप हे आमचे धोरण आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मुंबई महानगरपालिकच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या किमान दहा जागा भाजपने पाडल्या, अशा शिंदे गटाचाच आरोप आहे. शिंदे यांच्या पक्षाचे नामोनिशाण आम्ही खतम करू शकतो, अशी गर्जना वनमंत्री गणेश नाईक यंनी केली आहे. तर दुसरीकडे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणुकांत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अनेक आरोप केले. त्याला उत्तर देताना त्यांनी शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना झालेल्या सिंचन घोटाळ्याबद्दल सनसनाटी गौप्यस्फोट केला होता. त्यामुळे आज ना उद्या अजितदादाच महायुती सरकारमधून बाहेर पडतील आणि तसे घडल्यास, दादांचे महायुतीत स्वागतच आहे, असे काँग्रेस नेते सतेज पाटील दोन दिवसांपूर्वीच म्हणाले होते. मात्र दादांच्या अकस्मात अपघाती मृत्यूमुळे सर्वच चित्र बदलले आहे.
एरवी कधीही भावविवश न होणारे शरद पवारदेखील दादांच्या जाण्यामुळे गहिवरले आणि त्यांच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. महायुती सरकारमध्ये गेल्यानंतरही अजितदादानी आपली शिव-शाहू-फुले-आंबेडकर ही विचारसरणी सोडली नव्हती. एकेकाळी पुण्यातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यापासून ते महापुरुषांचा अपमान मी सहन करणार नाही, अशा भूमिकांपर्यंत अजितदादांनी नेहमीच ठामपणा दाखवला होता.
विशाळगडावर जेव्हा मुसलमानांच्या घरावर हल्ला झाला, तेव्हा तेथे धावून जाणारे दादाच होते. मुस्लिमांचे प्रश्न सोडवून त्यांना वेळोवेळी मदत करण्याची भूमिका त्यांनी आता महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असतानाही घेतली होती. भारतीय जनता पक्ष नवाब मलिक यांना जेव्हा घेरू पाहत होता, तेव्हादेखील दादा मलिकांच्या मागे उभे राहिले. पुढे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व मलिकच करतील हेही त्यांनी स्पष्ट केले होते. निवडणूक प्रचाराचे राष्ट्रवादीचे नेतृत्व मलिक करणार असतील, तर आम्ही तुमच्याशी युती करून या निवडणुका लढवणार नाही, असे भाजपने स्पष्ट केल्यानंतर दादांनी स्वतंत्रपणे या निवडणुका लढवल्या.

पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून भाजप आपल्याला टार्गेट करत आहे, हे दादांना उमगले होते. या प्रकरणाच्या फाइल्स सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांपर्यंत कशा पोहोचल्या, असा प्रश्नही विचारण्यात आला होता. सिंचन घोटाळ्यारून लक्ष्य करण्यात आल्यानंतरही, 'माझ्यावर जे आरोप करत होते, त्यांच्याबरोबर मी सरकारात आहे की नाही?' असा सवाल करून, दादा भाजपच्या ढोंगीपणावर बोट ठेवत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा काय असावी, यावरून अजितदादा आणि शरद पवार यांच्यात मतभेद निर्माण झाले. पक्षाचे दोन तुकडे झाले. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे. पवार यांची राज्यसभेची टर्म संपत आली आहे. त्यानंतर पवार सक्रिय राजकारणातून कदाचित निवृत्ती घेतील किंवा मार्गदर्शकाची भूमिका पत्करतील. अजितदादा यांच्या पक्षातील सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे हे नेते स्वार्थी आणि संधिसाधू आहेत. त्यांनीच अजितदादांना भाजपबरोबर जाण्यास भाग पाडले, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अनेकांना वाटते. भविष्यकाळात काय भूमिका घ्यायची ते सुप्रिया सुळे व त्यांचे सहकारी ठरवतील, असे शरद पवार म्हणाले होते. तर दादांच्या नेतृत्वाची पोकळ भरून काढण्याचे आव्हान स्वीकारून, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून, भाजपविरोधात राजकारण करायचे असल्यास सुप्रियाताईंना धडाडी दाखवावी लागेल. संसदेबाहेरदेखील राज्यभर फिरून जनाधार वाढवावा लागेल. मात्र मुळात दादांच्या राष्ट्रवादी काँग्रसेचे नेतृत्व सुनेत्रा पवार की पार्थ अथवा जय पवार करतील, हे सध्या स्पष्ट नाही. दादांच्या राष्ट्रवादीमधील कोणालाही महायुतीबाहेर पडून सत्तेच्या विरोधातील राजकारण करण्याची इच्छाही नाही. परंतु दादांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकलांग होणार, हे मात्र नक्की.

फोटो: फ्रान्सिस मास्कारेन्हास/रॉयटर्स
दादांच्या अकाली एक्झिटमुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर हळहळ व्यक्त होमे साहजिकच आहे. अजितदादा हे कमालीचे लोकप्रिय आणि जनाधार असलेले नेते होते. यामुळेच त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच, असंख्य सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार नीलेश लंके, आमदार अमोल मिटकरी यांच्यासारख्या कित्येक नेत्यांपर्यंत अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले. केवळ ही बातमी ऐकून बरेचजण सुन्न झाले आणि अनेकांना हुंदकेही आवरता आले नाहीत.
भारतात आजवर विमान अपघातात बऱ्याच नेत्यांचा मृत्यू झाला आहे. २३ जून १९८० रोजी नवी दिल्लीतील सफदरजंग धावपट्टीवर झालेल्या छोट्या विमानाच्या अपघातात काँग्रेस नेते संजय गांधी यांचा मृत्यू झाला होता. हा काँग्रेसला बसलेला मोठाच हादरा होता. काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांचा २००१ मध्ये उत्तर प्रदेशातील मैनपुरीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला होता. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी हे २००९ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मरण पावले. अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खांडू, लोकसभेचे सभापती जीएमसी बालयोगी त्याचप्रमाणे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला होता.
महाराष्ट्राच्या राजकारणात आज नागरी प्रश्नांना अधिक महत्त्व आले असले, तरीदेखील अजितदादांच्या राजकारणाचा पाया हा ग्रामीण आहे. १९८२ च्या आसपास दादांनी राजकारणात प्रवेश केला आणि सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातदेखील ते काम करू लागले. १९९१ मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्षही झाले. या पदावर ते १६ वर्षे होते. माळेगाव सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, अशा अनेक संस्थांमध्ये काम करून अजितदादांनी ग्रामीण परिवर्तनात मोलाचा वाटा उचलला. १९९१ साली राजीव गांधी यांनी मला लोकसभेचे तिकीट दिले, असा अजितदादा आवर्जून उल्लेख करत. परंतु राष्ट्रीय राजकारणात त्यांचे मन रमले नाही. त्यानंतर ते विधानसभेवर निवडून आले आणि सत्तेत असताना त्यांनी अनेक पदे भूषवली. पाटबंधारे, फलोत्पादन, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, अर्थ, अशी वेगवेगळी खाती त्यांनी मंत्री म्हणून हाताळली आणि प्रत्येक खात्यात आपली छाप उमटवली.

एक प्रगतिशील शेतकरी, लघुउद्योजक, संचालक, चेअरमन, उपमंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्री असा प्रवास दादांनी टप्प्याटप्प्याने केला आणि प्रत्येक पदाची जबाबदारी सांभाळताना दादांनी आपली योग्यता आणि गुणवत्ता सिद्ध केली. काका शरद पवार यांचा वारसा असल्यामुळे पहिल्यापासून पहाटे उठून कामाला लागणे, शिस्त, वक्तशीरपणा हे गुण अजितदादांच्या अंगी बाणले. शरद पवार लोकसभेत गेल्यापासून बारामतीची सर्व जबाबदारी अजितदादा सांभाळत होते. बारामतीतील अनेक संस्थांना दादांनीच आकार दिला. बारामतीचा विमानतळ, एस. टी. स्टँड, रस्ते, प्रेक्षागृह, मैदाने या सर्व गोष्टींकडे दादांचे बारकाईने लक्ष असे. केवळ बारामतीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील तालुका अथवा जिल्हाधिकाऱ्यांची कचेरी, पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा बँकेचे कार्यालय, ते अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे असावे, याकडे दादांचे लक्ष असे. दादा हे स्वतः आर्किटेक्ट वा इंजिनियर नसूनही सरकारी इमारतींच्या बांधकामाबाबत अत्यंत उत्तम अशा सूचना ते देत असत. सरकारी कार्यालयाच्या आवारात साधा कागदाचा कपटा पडलेला असला, तरीदेखील त्यांना ते चालत नसे, ते स्वतः तो उचलून कचऱ्याच्या टोपीलत टाकत.
महाराष्ट्राच्या अर्थखात्याची धुरा सांभाळताना, अजितदादांनी वित्तीय शिस्तीवर सातत्याने भर दिला. राजकीय गरजेपोटी काहीवेळा शिस्तीला मुरड घालावी लागली, हेदेखील ते मनमोकळेपणे मान्य करत. विविध मुख्यमंत्र्यांबरोबर काम करतानाही, त्यांच्याशी जुळवून घेण्याचा अजितदादांचा स्वभाव होता. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या सर्वांशी त्यांचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता असतानादेखील त्यांनी सत्ताधाऱ्यांबद्दल कधीही अभद्र शब्द काढले नाहीत. महाविकास आघाडी सरकार असतानाही तत्कालीन विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याशी दादांचे व्यक्तिगत संबंध चांगलेच राहिले. सिंचन घोटाळ्यात आरोप झाल्यामुळे अजितदादांना राजकारणात काहीवेळा बचावात्मक पवित्र्यात जावे लागले. परंतु त्यातूनही ते सहीसलामतपणे बाहेर पडले.

फोटो: वसंत प्रभू/इंडियन एक्सप्रेस
‘धरणात पाणी नसले तर...’या संदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर, कराडच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाणांच्या समाधीपाशी जाऊन प्रायश्चित्त घेण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारसभेत दादांनी काकांवर त्यांना दुखावणारी टीकाही दादांनी केली. परंतु त्यानंतरच्या काळात चुकीचे परिमार्जन करताना, आपल्यामागे काकांची पुण्याई असल्याचेही अजितदादा आवर्जून सांगत राहिले. अनेक वर्षांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिचंवड महानगरपालिकांत आपल्या पक्षाची सत्ता आणण्याची कर्तबगारीही अजितदादांनी दाखवली आणि या दोन्ही शहरांत त्यांनी खूप चांगल्या सुधारणा राबवल्या.
पक्षात फूट पडल्यानंतरही पवार कुटुंबातील एकोपा टिकावा, यासाठी दादा नेहमीच प्रयत्नशील राहिले. एक घाव, दोन तुकडे, असा त्यांचा स्वभाव होता. काम होणार असेल तर ‘हो’ आणि होणार नसेल तर थेट ‘नाही’ म्हणण्याची त्यांची शैली होती. आपल्यावर कोणी टीका केली, तरीदेखील लोकशाहीत प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे, असे ते म्हणत असत. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक उमदा, मनमोकळा आणि दिलदार नेता गमावला आहे. प्रचारात शरद पवारांवर टीका केल्यानंतर आपण अशा पद्धतीने बोलायला को होते, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकांनंतर ते सतत काकांची पुण्याई कामी आली, असा उल्लेख करत असत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महापालिका निवडणुका त्यांनी काकांच्या पक्षासोबत लढवल्या. शरद पवार गटातील आमदार-खासदारांची कामेदेखील ते करत असत. एवढेच कशाला, विरोधी पक्षातील लोकांची कामेही ते करत.
अगोदरच्या सरकारने घेतलेला निर्णय उगाचच बदलण्याची सूडबुद्धी त्यांच्यात नव्हती. भाजपच्या संगतीत राहूनही कपटनीती, खुनशीपणा, द्वेष या भाजपच्या अवगुणांपासून दादा दूर राहिले होते. अजितदादांनी आपल्या कामातून लोकांच्या काळजात कशी जागा मिळवली होती, हे त्याच्या मृत्यूनंतर संपूर्ण जगाला कळाले. आता मात्र त्यांचे घड्याळ कायमचे बंद पडले आहे. त्याची टिकटिक मात्र ऐकू येत राहील...
