Quick Reads

फ्रँको बेरार्डी: कोरोनाच्या संकटाने आपल्याला नव्या सामाजिक इच्छा अंगिकारण्याची संधी देऊ केली आहे

फलसफी सदर

Credit : फ्रँको बेरार्डी

आजच्या परिस्थितीत COVID-19 विषाणूच्या प्रादुर्भावानंतर जागतिक अर्थ व समाजव्यवस्था ठप्प पडली असताना हा विषाणू नेमका काय आहे आणि त्याचे मानवी जीवनावर काय परिणाम होत आहेत, होणार आहेत या बाबत सर्वच विज्ञान व समाजविज्ञानं विश्लेषण करत आहेत. या विषाणूला व त्यानंतर उद्भवलेल्या परिणामांना समजून घेण्यात तत्वज्ञान सुध्दा मागे नाही. याच अनुषंगाने काही युरोपीय तत्ववेत्यांनी त्यांच्या स्थानिक परिस्थितीची विश्लेषण करत या अरिष्टाबाबत भाष्य करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

या विविध विश्लेषणांमध्ये जर काही एक साम्य असेल तर जवळपास सर्वच डाव्या तत्ववेत्त्यांच्या मते COVID-19 नंतर कम्युनिझम (याचा अर्थ फक्त सोव्हियत संघापुरता घेऊ नये, या संकल्पनेला तत्त्वज्ञानात मोठा इतिहास आहे.) हा विचार हा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. त्याचसोबत या सर्वच तत्त्ववेत्त्यांच्या मते कोरोनाव्हायरस नंतर जग हे पुर्णतः बदललेलं असेल. या नव्या जगाच्या धारणा देखील नव्या असतील.  पण हा कम्युनिझम नक्कीच २०व्या शकतातील कम्युनिझमपेक्षा वेगळा आहे, याबाबत कुणाचंच दुमत नाही. या धारणेचा मुख्य पाया आजघडीला सार्वत्रिक वैद्यकीय सुविधा, सार्वत्रिक मुलभूत उत्पन्न आणि मानवी आस्था, काळजी व प्रेम या गोष्टी आहेत. फलसफीच्या पुढच्या काही लेखांमध्ये मी काही इटालियन, फ्रेंच, अमेरिकन व स्लॉविक मार्क्सवादी व डाव्या तत्ववेत्त्यांच्या भूमिका इथे मांडणार आहे. 

आज मी फ्रॅंको "बिफो" बेरार्डी या इटालियन मार्क्सवादी तत्ववेत्याचं कोरोनाच्या संकटाबद्दल मत प्रस्तुत करत आहे. 

COVID-19 आणि सामाजिक व्यवस्थेचा पाडाव

व्हायरस अथवा विषाणू हा शब्द जगाचा केंद्रबिंदू ठरला आहे. विषाणू या गोष्टीमुळे आणि शब्दामुळे सगळं जग आज ठप्प आहे. बेरार्डी या विषाणूचे दोन विभाग करतात: पहिला विषाणू म्हणजे COVID-19 जो जैविक/भौतिक स्वरूपाचा आहे आणि दुसरा विषाणू म्हणजे या जैव-विषाणूचा मानवी मेंदुवर झालेला परिणाम, अर्थात भीती याला भाषिक विषाणू असं म्हटलं आहे. 

या विषाणू बाबत सध्या आपणाला फारशी कल्पना नाही, जगभरातील वैज्ञानिक त्याबाबत संशोधन करत आहेतच आणि म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की एका अज्ञात गोष्टीने जगाला गुडघे टेकायला भाग पाडले आहे. अर्थात जगाच्या या ठप्प होण्याला दोन करणं आहेत; मूळ विषाणू मानवी शरीरात प्रवेशित झाल्यामुळे हे जग बंद पडलं आहे पण त्याच सोबत या विषाणूचं माहितिच्या विषाणू मध्ये रूपांतरण झाल्यामुळे प्रादुर्भावाच्या भीतीपोटी हे जग ठप्प पडलेलं आहे.

 

>

 

बेरार्डी यांचं COVID-19 बद्दलचं विश्लेषण हे भांडवली व्यवस्थेच्या अनुषंगाने आहे, तिच्या विरोधातील चळवळीच्या अनुषंगाने आहे. या संदर्भात बेरार्डी म्हणतात की २०१९ च्या संपूर्ण वर्षभरात जवळ-जवळ सर्वच जगभरात विविध उठाव आणि निदर्शने आपणाला पाहायला मिळाली आहेत, या विरोधाचं व निदर्शनाचं सत्र अगदी फेब्रुवारी पर्यंत चालू होतं. यामध्ये निदर्शनं होत आहेत ही सकारात्मक बाब असली, तरी त्यामुळे भांडवली व्यवस्था कधी ठप्प पडलेली नव्हती आणि अचानक मार्च च्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात COVID-19 च्या युरोप व अमेरिकेतील वाढत्या प्रभावामुळे जग अचानक ठप्प झालं. या अनपेक्षित घटनेमुळे जग फक्त थांबलच नाहीं तर ते आकुंचन पावलं आणि याचा परिणाम फक्त माणसापुरता मर्यादित न राहता भांडवली अर्थव्यवस्थेवर देखील पडला. अर्थव्यस्थता ठप्प झाल्यामुळे आर्थिक मंदी येणार आहे, याबाबत काही दुमत नाही. मात्र ती भयावह असेल, कदाचीत ही मंदी आपलं अस्तित्व देखील संपवेल नाही तर ही मंदी मानवी समुहात संहार आणि संघर्ष देखील निर्माण करेल किंवा या मंदी नंतर टोकाच्या वंशवादाचा व युद्धाचा देखील सामना करावा लागेल. या वाईट परिस्थितील दुसरं दुर्दैव म्हणजे यानंतर येणारी कुंठित अवस्था ही दीर्घकालीन असणार आहे आणि यासाठीदेखील आपण तयार नाही आहोत, येणाऱ्या काळातील निष्फळ खर्चाच्या काटकसरी बद्दल व सामाईक जगण्या बद्दल आपण अजून ही तयार नाही आहोत, त्याचसोबत उपभोगातून सुख वगळण्यासाठी सुध्दा आपण तयार नाही आहोत.

जगभरात भांडवलशाहीला पर्याय शोधण्याचा प्रयत्न गेले तीस चाळीस वर्षे अखंडितपणे चालू आहे पण हा प्रयत्नांना फारसे यश आले असे कुठं दिसत नाही.  पण त्याचसोबत स्वतःमधील कुंठितता नष्ट करण्यासाठी व फायद्याची पुनर्निर्मिती करण्यासाठी भांडवल आपणा सर्वांनाच कमी पगार देत स्पर्धेच्या जाळ्यात सततच ढकलत आहे. पण अचानकपणे उदयास आलेल्या या विषाणूने भांडवली प्रवेगातील हवाच काढून घेतली आहे. भांडवलशाही व मनुष्यजात या दोघांचा हा सार्वत्रिक अज्ञात शत्रू एक नवीन आशा घेऊन आला आहे. कदाचित या सार्वत्रिक सामूहिक शत्रू विरोधात आपण आपले सामूहिक एकत्व पुन्हा नव्याने प्रस्थापित करू शकतो.

हा विषाणू विषयहिन क्रांतीचा नवीन मार्ग निर्माण करत आहे. या क्रांतीची अंतस्फोटक धारणा पुर्णतः क्रियाशुन्यता व समर्पण या दोन तत्वांवर आधारित आहे. समर्पण हा शब्दच आपलं इथून पुढचं जीवन निर्धारित करणारा ठरणार आहे. याचसोबत आपल्या चांगल्या आयुष्याला त्रासदायक असणाऱ्या विनाकारणं उत्तेजित होण्याला, उगीचच्या चिंतेला आपण टाळणं देखील गरजेचं झालं आहे. इथून पुढे शब्दशः आपण काहीच करू शकत नाही म्हणून आपण काहीच करू नये.

हे अरिष्ट २००८ च्या अरिष्टापेक्षा फारच वेगळं आहे त्याचसोबत जगभरातील बँक व वित्तीय संस्थाना हा प्रश्न भेडसावत आहे की २००८ प्रमाणे या वेळी व्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी जगाकडे काही एक साधन उपलब्ध नाहीत. हे अरिष्ट आर्थिक कारणांनी निर्माण झालेलं नसून ते मूलतः व्यवस्थेमधील माणसाच्या अभावामुळे निर्माण झालेल अरिष्ट आहे. सार्वत्रिक विसर्जिकरणं व त्याच सोबत शरण जाणे किंवा समर्पण करणे या दोन गोष्टी या अरिष्टाच कारणही आहेत आणि परिणाम ही आहेत.

याचाच एक परिणाम म्हणून आपला जैविक अवकाश निष्क्रिय व्हायला लागला आहे आणि आपल्या निष्क्रिय होण्याचा सुप्त ईच्छेशी अथवा आपल्या राजकीय प्रकल्पकांशी त्याचा काही एक संबंध नाही. २००८ चं अरिष्ट भांडवलशाहीने सहज पचवलं कारण त्या अरिष्टाची कारणं ही व्यवस्थेत दडलेली होती. पण आज निर्माण झालेलं अरिष्ट हे व्यवस्थेबाहेरील कारणांमुळे निर्माण झालेल अरिष्ट आहे आणि म्हणून भांडवलशाही हे अरिष्ट पचवू शकत नाही. 

आज जगात जी युध्द परिस्थिती निर्माण झाली आहे, ते युद्ध जैविक विषाणू विरुद्ध भाषिक-माहितीरुपी विषाणू यांच्यामधील युद्ध आहे आणि या युद्धात माणूस कुठेच नाही.

या जैव विषाणूचा परिणाम दोन पद्धतीने जगात पसरत आहे, एक म्हणजे माणसाच्या कमकुवत शरीराद्वारे हा विषाणू पसरत आहे व त्याचसोबत भाषिक व माहिती स्वरूपात हाच विषाणू संज्ञापण व्यवस्थेद्वारे  भाषिक नेट चा वापर करत भीतीच्या स्वरूपात मानवी मेंदू जाऊन भिडत आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाचं तिसरं कारण म्हणजे, जगभरातील राज्यसंस्थानी सामूहिक आरोग्य व्यस्थेतील गुंतवणूक कमी करणं, या अल्प गुंतवणूकीमुळे सार्वजनिक आरोग्य ववस्था कोलमडून पडली आहे.

AIDS च्या प्रसारानंतर आपण शरीरसंबंधाच्या बाबत काळजी घेत शारीरिकरीत्या दूर राहायला शिकलो आहोत. मात्र COVID-19 नंतर आपण बहुदा संपूर्ण विलगिकरण स्वीकारु, आपल्या नंतर येणारी पिढी ही दुसऱ्या व्यक्तीच्या शरीराबाबत भीती आत्मसाथ करूनच जन्माला येईल.

 

 

या अरिष्टानंतर आपल्या समोर दोन अंतरद्वंद्व उभे राहिले आहेत: काल पर्यंत ज्या कल्पना अकल्पित होत्या त्या संकल्पनांचा पुन्हा नव्याने विचार केला तर आपण अरिष्टातुन कदाचित बाहेर पडू शकतो. यामधून आपणास बाहेर पडायचं असेल तर काटकसर, श्रमासाठीची वेळ कमी करणे, समानता, अमर्याद वृद्धीच्या धारणेचा त्याग, संशोधन, शिक्षण, आरोग्य व सुख इत्यादी गोष्टींमध्ये सामाजिक संसाधनांची गुंतवणून इत्यादी संकल्पननांचा पुन्हा नव्याने विचार केला तर कदाचित आपण या अरिष्टामधून बाहेर पडू शकतो. भांडवलशाहीच्या तीन स्वभावांमुळे, म्हणजेच, आर्थिक शोषण, पर्यावरणीय अरिष्ट आणि खाजगीकरण इत्यादीमुळे हे अरिष्ट जगभर वाढत आहे आणि याच कारणांमुळे आपण या अरिष्टातून कसे बाहेर पडणार आहोत हे सांगणे कठीण आहे.

कदाचित या अवस्थेमधून बाहेर पडत असतांना आपण टोकाचा एकटेपणा आणि आक्रमकता अंगिकारली असेल. किंवा आत्मीयता, काळजी, प्रेम व आळस याबाबतच्या नव्या इच्छा अंगीकारत आपण या मधून बाहेर पडू शकतो. जी मानसिक झेप राजकीय विचारांणमुळे घेणं शक्य झालं नाही, ती झेप घेण्याची क्षमता आपल्याला हा विषाणू देऊन जात आहे. समानता पुन्हा जगाचा केंद्रस्थानी आलेली आहे. आपण अशी कल्पना करूयात की ही वेळ नव्या काळाची सुरवात आहे.