Americas

अमेरिकेत ट्रम्प समर्थकांकडून लोकशाहीचा तमाशा; अखेर ट्रम्पची शरणागती

ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रेटिक पक्षासोबत रिपब्लिकन पक्षाचेही अनेक नेते सरसावले आहेत.

Credit : Reuters/Indie Journal

आपल्या समर्थकांनी अमेरिकन कॉंग्रेसवर केलेल्या हल्ल्यानंतर अखेर आज राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी पदाचा राजीनामा देत नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडे कारभार सुपूर्द करणार असल्याचं मान्य केलं. नोव्हेंबर महिन्यात निकाल लागल्यापासून या निवडणूक प्रक्रियेत गफलत झाल्याचा दावा करत झालेला पराभव स्वीकारण्यास ट्रम्प सातत्यानं नकार देत आलेले होते‌‌. मतमोजणीत आपली फसवणूक झाल्याचं सांगत ट्रम्प यांनीच आपल्या समर्थकांना उद्देशून संसदेवर चाल करून जाण्यासाठी चिथावणखोर भाषणं केलं होतं. याचाच परिणाम म्हणून जगातील सर्वात जुनी लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकन संसदेतच आज अभूतपूर्व राडा झाला. हजारोंच्या संख्येत जमत आक्रमक झालेल्या ट्रम्प समर्थकांनी कॉंग्रेस भवनात घुसून अभूतपूर्व गोंधळ घातला. सुरक्षारक्षक आणि ट्रम्प समर्थकांदरम्यान झालेल्या या संघर्षात आतापर्यंत किमान ४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

"हा निवडणूक निकाल मला मान्य नसला तरी २० जानेवारी रोजी अमेरिकेत शांततापूर्ण पद्धतीनं सत्तांतर होईल," अशी जाहीर घोषणा करत ट्रम्प यांनी या अमेरिकन लोकशाहीचा काळा अध्याय होऊ पाहणाऱ्या ऐतिहासिक वादावर आज पडदा टाकायचा प्रयत्न केला. या घोषणेनंतरही, "निवडणूक प्रक्रियेत गडबड केली गेली असल्याच्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझ्या राषट्राध्यक्षपदाखालची मागची चार वर्ष ही अमेरिकन इतिहासातील सर्वात यशस्वी अशी चार वर्ष होती. मी पद सोडणार असलो तरी अमेरिकेला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवण्याचा माझा लढा सुरूच राहणार आहे," असं सांगत ट्रम्प यांनी २०२० ची निवडणूक ही वादग्रस्तच राहील याची काळजी घेतली.

संसदेवर हल्लाबोल केल्यानंतरही आपल्या समर्थकांना शांततेचं आवाहन करण्याऐवजी अजून चिथावणी देणाऱ्या ट्रम्प यांचा उरलेला दोन आठवड्यांचा कार्यकाळातही पूर्ण होऊ न देता २५ व्या घटनादुरुस्तीनुसार त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई चालवण्यासाठी डेमोक्रेटिक पक्षासोबतंच रिपब्लिक पक्षाच्या संसद सदस्यांनीही आता पुढाकार घेतला आहे.

मतमोजनीचा शेवटचा टप्पा पार पाडून डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडान यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया राजधानी वॉशिंग्टन डीसीतील कॅपिटल हिलमध्ये सुरू होती. या आगामी सत्तांतरावर नाराज असलेल्या ट्रम्प समर्थकांनी आम्हाला हा निकालंच मान्य नसल्याची भूमिका घेत संसदेबाहेरंच आंदोलन सुरू केलं. हळूहळू आक्रमक झालेले हे समर्थक पोलिसांच्या विरोधाला झुगारून थेट संसदेत घुसले आणि तब्बल ३ तास ठाण मांडून बसले. आपल्या आक्रमक झालेल्या समर्थकांच्या मदतीनं संसदच हायजॅक करून अवैधरित्या सत्ता बळकावण्याचा ट्रम्प यांच्या आजच्या अतातायी कृत्याची तुलना अनेक राजकीय विश्लेषकांनी अमेरिकेनंच अनेक वेळा विरोधी विचारसरणीचं सरकार अस्तित्वात असलेल्या इतर देशांच्या निवडणूकीत केलेल्या हस्तक्षेपासोबत केली आहे. 

 

 

आत्तापर्यंत अवैधरित्या संसदेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५२ ट्रम्प समर्थकांना संसद परिसरात हिंसाचार आणि तोडफोड केल्याच्या आरोपाखाली पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे‌. पोलिसांनाही न जुमानता आक्रमक झालेल्या या झुंडींला घाबरून संसदेत हजर असलेल्या उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स आणि इतर संसद सदस्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. उपराष्ट्राध्यक्ष पेन्स हे डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, निवडणूकीची पुन्हा मतमोजणी करण्यासाठी ट्रम्प यांनी माईक पेन्सवर दबाव वाढवला होता. पुर्नमतमोजणीची ट्रम्प यांची मागणी अवाजवी असल्याची भूमिका त्यांनी घेतल्यानंतर ट्रम्पसोबतचे त्यांचे संबंधही बिघडले होते. दोन दिवसांपूर्वीच जॉर्जिया प्रांतातील पुर्नमतमोजणीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकताना ट्रम्प यांनी फोनवर धमकावल्याचा प्रकार वॉशिंग्टन पोस्टनं उघड केला होता.

निवडून येत असल्याचे सर्व मार्ग हळूहळू बंद होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ट्रम्प यांनी पराभव स्वीकारण्याऐवजी आपल्या समर्थकांनाच अमेरिकन व्यवस्थेविरोधात भडकवण्याचं काम सुरू केला. याचाच परिणाम म्हणून या समर्थकांनी आज थेट अमेरिकन लोकाशाहीचं प्रतिक असलेल्या संसदेवर हल्ला केला. त्यांचा हा हल्ला परतवून लावण्यासाठी पोलिसांना संसद परिसरात अश्रुधुराचा वापर करून पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी ४ तास लागले. मतमोजणीत अडथळा निर्माण करण्यासाठी चाल करून आलेल्या या झु़ंडीला न जुमानता कॉंग्रेसनं ही औपचारिक प्रकिया नंतर पाडत जो बायडनंच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होणार असल्यावर शिक्कामोर्तब केलं. दोन्ही संसदगृहात पार पडलेल्या चर्चेनंतर इलेक्टोरल कॉलेजच्या अंतिम फेरीत बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा ३०६ विरूद्ध २४२ अशा फरकानं पराभव केल्याचं जाहीर करण्यात आलं.

मतमोजणीत घोटाळा झाल्याचा दावा करत डॉनल्ड ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षातील त्यांच्या काही सहकाऱ्यांनी संसद, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, या तिन्ही ठिकाणी त्यांचा दावा धुडकावून लावत जो बायडनंच पुढचे राष्ट्रपती होणार असल्याचा निकाल देण्यात आला. त्यामुळे आपल्या समर्थकांनाच भडकवत संसदेवर चाल करून जाण्याचा शेवटचा डाव डोनाल्ड ट्रम्प यांनी आज खेळला. मात्र, त्यातही अपयश आल्यानंतर आज सरतेशेवटी त्यांनी पराभव मान्य करत जो बायडनंच अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होतील असं त्यांनी जाहीर केलं. यादरम्यान ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रेटिक पक्षासोबत रिपब्लिकन पक्षाचेही अनेक नेते सरसावले आहेत. संसदेवर हा हल्ला होत असतानादेखील शांतता पाळण्याऐवजी चिथावणीखोर सूचनाच आपल्या समर्थकांना देणाऱ्या ट्रम्प यांचं ट्वीटर आणि फेसबुक अकाऊंटही तात्पुरतं रद्द करण्यात आलंय. आजच्या या घटनेचा आणि ट्रम्प यांच्या अनागोंदीचा फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरातून निषेध करण्यात आला.  अशा प्रकारे आंदोलका़नी संसदंच ताब्यात घेतल्याचा अभूतपूर्व प्रकार याआधी अमेरिकेत १८१४ साली घडला होता. १८१२ च्या युद्धात त्यावेळी ब्रिटिशांनी अमेरिकेची संसद जाळली होती. या आंदोलकांवर वेळीच आवर घालण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या आजच्या भूमिकेवरही अनेकांनी प्रश्न उभे केले आहेत. ब्लॅक लाईव्ह मॅटर च्या वेळी आंदोलकांना संसद परिसराच्या जवळपासही फिरकू न देता आक्रमक झालेल्या पोलिसांनी ट्रम्प समर्थकांना थेट संसदेतच कसं घुसू दिलं, असा सवालंही उपस्थित होत आहे. त्यांनी आज सरतेशेवटी पराभव मान्य केल्यानंतर २०२० निवडणूकीच्या अध्याय तात्पुरता संपला असला तरी ट्रम्प आणि त्यांच्या पुढची राजकीय खेळी काय असणार आहे, याचा अंदाज बांधणं अवघड आहे.