India

दिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेचा कहर; थेट ग्रेटा थ्युनबर्गवरंच केला गुन्हा दाखल

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केल्याबद्दल दिल्ली पोलीसांनी आज थेट स्वीडनमधील १८ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थ्युनबर्गवरंच कायदेशीर कारवाईचा बडगा उगारलाय.

Credit : AFP

दिल्लीसह देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरील आपल्या कारवाईत पुढचं पाऊल उचलंत दिल्ली पोलिसांनी आज कार्यक्षमतेचा अद्भूत नमुना पेश केला. शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केल्याबद्दल दिल्ली पोलीसांनी आज थेट स्वीडनमधील १८ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थ्युनबर्गवरंच कायदेशीर कारवाईचा बडगा उगारलाय.

शेतकरी आंदोलनाच्या नावानं प्रत्यक्षात भारतातील खलिस्तानी विभाजनवादाला ग्रेटानं बळ दिल्याचं म्हणत आयपीसीतील कलम १५३ अ (धार्मिक द्वेष पसरवणं) आणि १०२ ब (देशविघातक कट रचणं) अंतर्गत तिच्यावर दिल्ली पोलीसांकडून रीतसर गुन्हा नोंदवण्यात आलाय. गेल्या वर्षभरात नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलन, जामिया-जेएनयू प्रकरण, दिल्ली दंगल आणि आता शेतकरी आंदोलन दडपण्यात अभूतपूर्व कर्तबगारी दाखवलेल्या दिल्ली पोलिसांच्या शिरपेचात आता या ताज्या कारवाईनंतर आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. थेट स्वीडनमधील ग्रेटा थ्युनबर्गवरंच एफआयआर दाखल करून दिल्ली पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचा परीघ फक्त देशापुरताच मर्यादीत नसून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचला असल्याचं आज सिद्ध केलं‌.

 

 

भारतातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासोबतंच जगभरातील लोकांना या आंदोलनात सहकार्य करायचं अपील करण्यासाठी ग्रेटानं आपल्या ट्वीटर खात्यावरून टूलकिटही प्रसारीत केलं होतं. या टूलकिटमधून तिनं शेतकरी आंदोलनाविषयी माहिती देण्यासोबतंच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबतची आपली एकजूट दाखवण्यासाठी विविध हॅशटॅग वापरण्यासाठीही अपील केलं होतं. असामान्य दूरदृष्टी लाभलेल्या दिल्ली पोलिसांनी मग या ट्विटमध्ये दडलेला छुपा खलिस्तानी अजेंडा ओळखत भारताविरोधातील या आंतरराष्ट्रीय कटाचा पडदाफाश केला असून ग्रेटाविरोधात रीतसर कारवाई सुरू करत आज आपल्या असमान्य कार्यक्षमतेचा आणखी एक पुरावा दिला.

 

 

अमेरिकन पॉपस्टार रिहानानं पहिल्यांदा भारतातील शेतकरी आंदोलनासंबंधी ट्वीट केल्यानंतर ग्रेटा थ्युनबर्गसह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटिंनी भारत सरकार या शेतकरी आंदोलनकर्त्यांवर करत असलेल्या दडपशाहीविरोधात आवाज उठवायला सुरूवात केली. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायच्या नावानं हे आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी प्रत्यक्षात खलिस्तानवादाला बळकटी देत असल्याचा धूर्त डाव वेळीच ओळखून भाजप सरकारमधील सर्व मंत्र्यांसह अनेक देशभक्त भारतीय सेलिब्रिटींनीही रिहानानं सुरू केलेला हा 'आंतरराष्ट्रीय कटाचा' प्रपोगांडा उघडा पाडत #IndiaAgainstPropoganda, #Indiatogether असे राष्ट्रवादी ट्रेंड चालवले. आज दिल्ली पोलिसांनी याही पुढे जात थेट ग्रेटा थ्युनबर्गवरच कारवाईचा बडगा उगारून भारताविरोधात कट रचणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचे धाबे दणाणून सोडले.