Quick Reads

कोरोनाव्हायरस आपल्या 'नॉर्मल' जीवनशैलीला पुन्हा तपासून घ्यायला सांगतोय

आपल्यातील असमानता हे जग दोन विभागात विभाजित करत आहेत.

Credit : The New Yorker

सर्वमान्य अवकाशांमध्ये लिहिणं, बोलणं, पाहणं, चर्चा करणं, वाद घालणं हे जगातील सगळ्यांच लोकांना वैचारिकरित्या तर नाहीच, भौतिकरित्या सुध्दा शक्य नसतं. आपण हे वाचत आहात, मी लिहीत आहे, म्हणजेच तुम्हाला-मला हे शक्य आहे आणि का शक्य आहे तर आपल्या मूलभूत गरजा जवळपास पुर्ण झाल्या आहेत, म्हणून शक्य आहे.

आज जे अरिष्ट आपण अनुभवत आहोत, ते नक्कीच वेगळं आहे, पण अरिष्ट आणि त्यानंतरचे परीणाम आपणाला नवीन नाहीत. एवढी अरिष्ट भोगून झाल्यावर आणि आता हे विशिष्ठ अरिष्ट अनुभवत असतांना आपणाला एक सरळ सोपी बाब लक्षात आली आहे आणि ती म्हणजे, अरिष्टाचा परिणाम कोणत्याही समाजातील लोकांवर समसमान होत नाही. तुमच्या माझ्यासारख्या लोकांवर या परिणामाच स्वरूप खूपच कमी असत आणि इथली जी बहुसंख्य जनता आहे जी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक भौगोलिक, धार्मिक संरचनेमुळे आयुष्यभरासाठी गांजलेली आहे त्या जनतेला या अरिष्टाचे परिणाम अति वाईट प्रमाणात भोगावे लागत आहेत.

विशेष म्हणजे अशा काळात आपण माणुसकी न सोडता या जनतेला सर्वोतोपरी मदत करत असतो आणि आजवर केलीही आहे. माझा प्रश्न हा आहे की, आपण अरिष्ट पहिल्यांदा बघत नाही आहोत, प्रत्येक वेळी अरिष्टानंतर मदत केलीच आहे आपण. पण प्रत्येक अरिष्टानंतर हा जो असमान परिणाम आपणाला पाहायला मिळत आहे त्या बद्दल आपण विचार करणार आहोत की नाही?

 

 

आज ना उद्या या अरिष्टामधून आपण बाहेर पडूच, पण त्यानंतर ही आपण जा लोकांना मदत केली आहे त्या लोकांच्या आयुष्यातील प्रश्न बदलणार नाहीत ते तसेच राहणार आहेत. देशातील शहरातून जे असंख्य लोक त्यांच्या गावाकडे चालत गेले आहेत ते परत याच शहरात मरण्यासाठी येणार आहेत. फरक इतकाच की त्या मरणाला संरचनात्मक मान्यता आज आणि त्याबद्दल आपण फारसं लक्ष ही देत नाही कारण ते 'नॉर्मल'असत!

प्रश्न हा आहे, की प्रत्येक अरिष्टानंतर त्याचा भयंकर परिणाम सोसाव्या लागणाऱ्या लोकांना फक्त आपण नेहमीप्रमाणे मदतच करणार आहोत, की आता ती व्यवस्थाच बदलायची वेळ आलीय जी या असमानता निर्माण करते?

या अरिष्टाने एक शिकवलं आहे की स्वतःच्या जीव हा इतर कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या निरोगी असण्यावर अवलंबून आहे. स्वतः व्यतिरिक्त इतर कुणीही निरोगी नसेल तर इथं जगणं आता शक्य नाही आणि तसं जगायचं असेलच तर स्वतःला जगापासून असं सक्तीने दूर करावं लागेल. आज आपल्या सगळ्यांजवळ थोडाफार पैसा आहे, पगार आहे म्हणून जे सक्तीने वेगळं राहणं परवडत आहे. पण उद्या ते नसेल तर बाहेर पडाव लागेलच ना?

म्हणून पुन्हा पूर्वपरिस्थितीत यायचं असेल तर, नॉर्मल जगायचं असेल तर, आपणाला आपल्या व्यवस्थेला आणि सरकारला ठणकावून सांगाव लागेल की तुम्हाला या समाजातीलच नव्हे, तर जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. स्वतःच आरोग्य आणि निरोगी शरीर हा फक्त मूठभर लोकांचा प्रिव्हिलेज नाही तर जगातील प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार ठरवावा लागेल. या अनुषंगाने आरोग्य सुविधेचं पहिल्यांदा राष्ट्रीयकरणं करावं लागेल. सर्वांना काम, सर्वांना शिक्षण, त्याच सोबत सर्वांना निरोगी आरोग्य हा मूलभूत अधिकार जाहीर करावा लागेल आणि नुसतं जाहीर करून प्रश्न मिटणार नाही तर तो प्रत्यक्ष अंमलात आणावा लागेल.

या अरिष्टाने शिकवलेली दुसरी गोष्ट म्हणजे, जर जग अचानक ठप्प होणार असेल तर अशा ठप्प पडलेल्या जगात जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हा अधिकार फक्त मूठभराचा नाही. आणि म्हणूनच सरकारनं / व्यवस्थेनं UBI म्हणजे सार्वत्रिक किमान वेतन ही संकल्पना प्रत्यक्ष व्यवस्थेत आणनं ही काळाची गरज आहे. तुम्ही जर UBI आणणार नाही तर फक्त आनंद विहारच्या बस स्टॉपवरच नाही तर देशातील प्रत्येक हायवेवर तुम्हाला निर्वासितांचे जत्थेच दिसतील.

 

 

हा विषाणू आपल्या पासपोर्टवरचं नाव बघत नाही किंवा आपल्या त्वचेचा रंग बघत नाही, या विषाणूला आपली जात कळत नाही आणि धर्मही माहीत नाही, ना या विषाणूला आपल्या बँक बॅलन्स आणि संपत्तीच देणं घेणं आहे.

या विषाणूने आपणाला माणूस म्हणून एकाच नजरेन बघायला भाग पाडलं असलं, तरीही आपल्यातील असमानता मात्र हे जग दोन विभागात विभाजित करत आहेत. आपल्यापैकी मूठभर लोक या सक्तीच्या विश्रांतीत काय़ करायचं याचा पर्याय म्हणून स्व-काळजी आणि स्व-सर्जनशीलतेसाठीचं जे काही करणं शक्य आहे ते करत आहेत. जसे की योग, व्यायाम, संगीत, फिल्म्स, वाचन, असं 'वैचारिक' लिहिणं आणि बरंच काही. पण आपल्या व्यतिरिक्त देखील उर्वरित जग आहे जे अस्तित्वाच्या प्रश्नांशी झगडत आहे, त्यांच्या पुढे रोजच्या भाकरीचा प्रश्न आहे, निर्वासित कामगारांवर पुन्हा काम मिळेल की नाही याचा प्रश्न आहे, जे आपल्यासाठी आरोग्य सेवेत झटत आहेत किंवा मूलभूत सेवा पुरवण्यासाठी कार्यरत आहेत त्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे, घर भाडं, कर्जाचा हफ्ता, जेवण इतकंच काय तर मूलभूत जगण्याचा प्रश्न आहे.  

जगभरात अजून एक महत्त्वाची गोष्ट घडत आहे, जवळपास सर्वच शहरातील प्रदूषणाच प्रमाण कमी होताना दिसत आहे, पर्यावरणाच्या अरिष्टात बदल होताना दिसत आहे. हा बदल नक्कीच चांगला आहे पण हा बदल घडण्यासाठीची किंमत मात्र खूपच प्रचंड आहे हे देखील खरं. आपण पुन्हा जग सुरू करू तेंव्हा आपणाला नॉर्मल म्हणजे नेमकं काय? याचा विचार करतांना पर्यावरणाचा देखील विचार करावा लागेल. 

 

 

दोन आठवड्यापूर्वी UN सिझ फायर जाहीर केले आहे, मध्यपूर्वेतील काही अपवाद वगळता उर्वरित जगात सर्वत्र हा सिझ फायर पाळला जातोय. जगात किमान या क्षणाला युध्द आणि गृह युद्ध बंद आहेत पण आपण पुन्हा नव्याने हे जग सुरु करू तेंव्हा या युद्धाचा देखील विचार करावा लागेल. जग नव्यानं सुरू करताना सीमेवरील भिंती व फेंसिंग महत्त्वाच्या आहेत की, भूमध्य समुद्रात निर्वासितांच्या बोटी हुसकावून लावणं गरजेचं आहे की, न्यूक्लिअर बॉम्ब गरजेचे आहेत याबाबत ही विचार करावा लागेल.

जगातील प्रत्येक व्यक्ती प्रति प्रेम, आस्था, काळजी, एकता, समभाव, आपुलकी इत्यादी शाश्वतीच्या भावनाच आपणाला येणाऱ्या जगात वाचवू शकतात.