Quick Reads

महाराष्ट्राच्या पार्ट टाइम राज्यपालांची फुल टाइम कार्यकर्तागिरी

राज्यपालांना प्रत्युत्तरादाखल लिहलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता कंगना राणावतवर सुद्धा निशाणा साधला.

Credit : File

कोण खरा हिंदू? यावरून राज्यपाल कोश्यारी यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे़ंना डिवचलं आहे. मंदीरं उघडण्यासाठी राज्य सरकार पुरेसं उत्सुक नसल्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना तक्रारवजा पत्र लिहीलं होतं. या राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी 'मला हिंदुत्व तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही ' म्हणत उत्तर दिलं. या पत्रव्यवहारामुळे आता 'कोण खरा कट्टर हिंदू?' हा शिवसेना आणि भाजपमधील जुना वाद नव्यानं चव्हाट्यावर आला आहे.

राज्यातील रेस्टॉरंट, बार, दुकानं सुरू करण्यात आली आहेत तर मंदीरंही उघडा, अशी मागणी राज्यातील भाजप नेते करत आलेले आहेत. याचाच आधार घेऊन महाराष्ट्राचे पार्ट टाईम राज्यपाल व भाजपचे फुल टाईम कार्यकर्ते भगत सिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना 'खरे हिंदू असाल तर मंदीरं उघडून दाखवा', अशी आर्त हाक दिली. या हाकेला मग मुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या कट्टर हिंदूला कोणाकडून हिंदुत्ववाचं सर्टीफिकेट घेण्याची गरज नसल्याचं म्हणत परतावून लावलं.

'राज्यपालांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रात ज्या गोष्टी येतात तिकडेच लक्ष द्यावं. लॉकडाऊन कधी उठवावं हा राज्य सरकारचा विषय असून राज्यपालांनी याची काळजी करू नये', अशी कोपरखळी त्यांनी मारली. मंदीरं बंद ठेवण्यावरून 'हिंदुत्ववादाचा वारसा सांगणारे ठाकरे आता धर्मनिरपेक्ष झाले का?', असा कुजका सवाल राज्यपालांनी केल्यानंतर याला उत्तर देताना 'तुम्हीसुद्धा धर्मनिरपेक्ष राज्यघटनेची शपथ घेऊनच राज्यपाल झाला आहात', अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. 

राज्यपालांना प्रत्युत्तरादाखल लिहलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता कंगना राणावतवर सुद्धा निशाणा साधला. 'मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या लोकांसोबत मी हसतखेळत फोटो देत नाही', म्हणत त्यांनी कंगणा राणावतची भेट घेण्यावरून राज्यपालांनाही चिमटा काढला. या वादात नंतर संजय राऊतांनीही उडी घेत आपल्या नेहमीच्या शैलीत राज्यपालांना शालजोडीतून टोले लगावले. इतके दिवस भाजपच्या वतीनं शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका करणारे आपल्या राज्याचे 'निष्पक्ष' राज्यपाल कोश्यारी यांनी आज हे निष्पक्षतेचं ओझं सरतेशेवटी बाजूला फेकून थेट मुख्यमंत्र्यांशीच पंगा घेतला. 

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना ठाकरे शैलीत प्रत्युत्तर दिल्यानं आता या वादात पुढे काय वाढून ठेवलंय याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे त्या राज्यातील राज्यपाल आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन तिथल्या मुख्यमंत्र्यांविरोधात बोलत असल्याचा नवा पॅटर्न देशात रुजू होऊ पाहतोय. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीश धनगड हे सुद्धा वेळोवेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत असतात. या पॅटर्नची सुरूवात करण्याचं क्रेडीट मात्र निर्विवाद आपल्या लाडक्या राज्यपालांकडे जातं, हे नक्की.