Asia

शेख हसिनांची ईस्त्राईलशी उघड शत्रुत्व आणि छुपी मैत्री

विरोधकांना दडपण्यासाठी शेख हसींनांनी शत्रू राष्ट्राचीच मदत घेतल्याचं शोध पत्रकारितेतून उघड.

Credit : New Age

राजकीय विरोधकांसह सामान्य जनतेच्या मोबाईलवरील संभाषणांचा अवैधरित्या मागोवा घेण्यासाठी बांग्लादेशी सरकारनं ईस्त्राईलची मदत घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल जझीरा या वृत्तवाहिनीनं All the Prime Minister's Men या नावाखाली शोधपत्रकारितेची मालिकाच प्रसिद्ध केली असून बांग्लादेशच्या लोकनियुक्त सरकारचा कारभार प्रत्यक्षात लष्करंच कसा चालवतंय, याचा उलगडा यातून करण्यात आलाय‌. पॅलेस्टाईनमधील मुस्लीमांवर ईस्त्राईली सरकार करत असलेल्या अत्याचाराला विरोध आणि पॅलिस्टाईन जनतेसोबत सहानुभूती म्हणून ईस्त्राईलवर अधिकृतरित्या बहिष्कार टाकलेल्या मुस्लीमबहुल बांग्लादेशातील सरकारनंच ईस्त्राईलच्या गुप्तहेर संस्थेसोबत छुपा करार केल्याचं आता उघड झाल्यानं देशभरात खळबळ माजली आहे. 

इस्त्राईली गुप्तचर संस्थेनं विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून बांग्लादेशी लष्करानं शेख हसीना सरकारच्या इशाऱ्यावर विरोधकांवर पाळत ठेवल्याचा दावा अल जझीरानं आज केला. यासंबंधी २०१८ पासून बांग्लादेशी लष्कराच्या गुप्तहेर संघटनेचे उच्चपदस्थ अधिकारी इस्त्राईल गुप्तचर संघटनेकडून प्रशिक्षण घेत असल्याचा खुलासाही या वृत्तवाहिनीनं केलाय. पॅलेस्टाईनमधील मुस्लीमांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या ईस्त्राईलसोबत असहकार पुकारणारं परराष्ट्र धोरण स्वीकारलेल्या शेख हसीना सरकारनं प्रत्यक्षात इस्त्राईलच्या लष्करासोबतच केलेल्या या करारामुळं तिथल्या लोकनियुक्त सरकारच्या विश्वासार्हतेवरंच प्रश्नचिन्ह उभे राहीले आहेत. शेख हसीना या लोकनियुक्त सरकारच्या प्रमुख असल्या तरी प्रत्यक्षात बांग्लादेशातील सत्ता मात्र अजूनही लष्कराच्याच ताब्यात असल्याचं या प्रकरणातून उघड झालंय.

पॅलेस्टाईनवर अवैधरित्या ताबा मिळवणाऱ्या ईस्त्राईलसोबत कुठल्याही प्रकारचे मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास बांग्लादेश नकार देत आलेला आहे. इतकंच नव्हे तर पॅलेस्टाईनवरील अवैधरित्या मिळवलेला ताबा सोडेपर्यंत ईस्त्राईलला सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यताही न देण्याची आपली कठोर भूमिका बांग्लादेशनं आंतरराष्ट्रीय स्तरावरही वेळोवेळी व्यक्त केलीये.  मात्र, बांग्लादेशी लष्कराचे प्रमुख एझाज अहमद आणि बांग्लादेशातील गुन्हेगारी जगतातील कुख्यात गुंड व एझाज अहमद यांचे बंधू हॅरिस अहमदचे प्रत्यक्षात ईस्त्राईली सरकारसोबत जवळचे संबंध असून शेख हसीनांच्याच सूचनेनुसार विरोधकांवर जरब बसवण्यासाठी अहमद बंधू इस्त्राईलच्या गुप्तहेर संस्थेसोबत छुप्या पद्धतीनं काम करत असल्याचं या तपासातून आता समोर आलंय. 

बांग्लादेशचे लष्करप्रमुख एजाज अहमद यांचे कुटुंबीयच गुन्हेगारी जगतात सहभागी असून एजाज यांचे बंधू हॅरिस यांचा युरोपसह जगभरात गुन्हेगारी जगतातील अवैध कारभार प्रसिद्ध आहे. बांग्लादेशी सरकारनं हॅरिस अहमद यांच्याविरोधात अटकेचं वॉरंटही काढलेलं आहे. मात्र, बांग्लादेशी गुप्तहेर संघटना आणि पिक सिक्स या इस्त्राईली गुप्तहेर संघटनेचंच अपत्य असलेल्या कंपनीदरम्यानचा हा करार आता उघडकीस आल्यानंतर अहमद कुटुंबीयांच्या या गुन्हेगारी नेटवर्कचा वापर पंतप्रधान शेख हसीनांनीच विरोधकांना दडपण्यासाठी केल्याचं स्पष्ट झालंय. मागच्या काही काळापासून येनकेनप्रकारे आपल्या राजकीय विरोधकांना गजाआड करण्याच्या शेख हसीना यांच्या आक्रमक धोरणांचा विरोध सर्व स्तरांमधून होत होता.

एका बाजूला मुस्लीमांवर अत्याचार करणाऱ्या इस्त्राईलवर बहिष्कार टाकण्याचा आव आणणाऱ्या शेख हसीना प्रत्यक्षात सत्तेत कायम राहण्यासाठी इस्त्राईलचीच मदत घेत असल्याचं उघडकीस आल्यानं हे प्रकरण आता बांग्लादेशातील सत्ताधारी पक्षासमोर मोठं आव्हान निर्माण करू शकेल. बांग्लादेश सरकारनं अल जझीराच्या या वृत्तांकनाला विरोधकांचा बेबनाव म्हणून तूर्तास मोडीत काढलं असलं तरी या शोधपत्रकारीतेतून समोर आलेल्या पुराव्यांना खोडून काढत विश्वासार्हता कायम राखणं हे सरकारसमोरील आता प्रमुख आव्हान असणार आहे.