Europe

आर्मेनियावर अझरबैजानकडून हल्ला, दोन्ही देशात युद्ध पेटलं

नागोर्नो-काराबाख या सीमाभागाच्या मालकीहक्कावरून जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे.

Credit : Wikimedia

नागोर्नो-काराबाख या सीमाभागाच्या मालकीहक्कावरून आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांमधील जुना वाद पुन्हा उफाळून आला असून या दोन देशांनी आता एकमेकांविरोधात युद्ध पुकारत असल्याची घोषणा केली आहे. सीमाभागावरील तणावातून आता या दोन देशांनी एकमेकांवर बॉम्बहल्ले  सुरू केले असून यात आत्तापर्यंत किमान २५ जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. तोफा, रणगाडे आणि लष्करी हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं दोन्ही देशांनी या विवादास्पद भूभागावर हल्ला सुरू केला असून प्रचंड प्रमाणात सैन्याला सीमारेषेवर तैनात करण्यात आलं आहे. यामुळे इतक्या वर्षांपासूनच्या या तणावानं आता उग्र रूप धारण केलं असून दोन्ही देशांच्या नेत्यांनी तात्काळ द्विपक्षीय शांतता कराराला फाटा देत युद्ध पुकारत असल्याची घोषणा केली.

काय आहे प्रकरण

आर्मेनिया आणि अझरबैजान हे कॉकस प्रदेशातील एकमेकांशेजारील देश असून सोव्हियत रशियाचं विघटन होण्याआधी ते याच सोव्हियत रशियाचा भाग होते. या दोन देशांमधील दशकांपासून चालत आलेल्या वादाचं मूळ सीमाभागावरील नागोर्नो - काराबाख प्रदेशात असून हा प्रदेश अझरबैजानचा अधिकृत भाग असला तरी इथल्या मूळ आर्मेनियन वंशांच्या लोकांना ते मान्य नाही. यावरूनच १९८० आणि १९९० च्या दशकात अनेक वेळा दोन देशांमध्ये झालेल्या तुंबळ युद्धांमध्ये हजारो लोकांना प्राण गमवावे लागले होते. सोव्हियत रशियाच्या विघटनानंतर अमेरिका, रशिया आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीने या दोन देशांमध्ये शस्त्रसंधीचा करार झालेला असला तरी अजूनही दोन्ही देशांना मान्य होईल असा समाधानकारक तोडगा काढण्यात कोणालाही यश आलेलं नाही. त्यामुळे अधून मधून सीमेवरील तणावाच्या निमित्ताने हा वाद उफाळून दोन्ही देश शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन करत आलेले आहेत.

 

 

नागोर्नो - काराबाख प्रदेशाचं भूराजकीय महत्व आणि वांशिक वादाची किनार

१९२२ ते १९९१ दरम्यान अझरबैजान आणि आर्मेनिया हे दोन्ही देश कम्युनिस्ट राजवट असलेल्या सोव्हियत रशियाचा भाग होते. सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या दक्षिण पूर्व युरोपातील कॉकस प्रदेशात नागोर - काराबाख या वादग्रस्त भूभागाचं अस्तित्व आहे. या प्रदेशाच्या पश्चिमेला तुर्कीची सीमा लागून आहे तर दक्षिणेला इराणची सीमारेषा आहे. उत्तरेला जॉर्जिया देशाची सीमा लागूनच असून उत्तर पूर्वेला अझरबैजानला रशियानं वेढलेलं आहे. तेलसंपन्न असलेल्या या प्रदेशातून रशियासह इतर अनेक युरोपियन देशांना इंधन पुरवणाऱ्या तेलवाहिन्या (पाईपलाईन्स) जातात. यामुळेच या प्रदेशातील उफळलेल्या युद्धजन्य परिस्थितीला जागतिक तेल व्यापाराच्या दृष्टीनंही विशेष महत्त्व प्राप्त होतं.

आर्मेनिया हा ख्रिश्चन बहुसंख्यांक देश असून तेल संपन्न असलेल्या अझरबैजानमध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक आहे‌. सोव्हियत रशिया अस्तित्वात असताना या दोन देशांच्या सीमेवरील नागोरी-काराबाख प्रदेशात आर्मेनियन वंशीयांची संख्या सर्वाधिक होती मात्र राजकीय सत्ता अझरबैजानकडेच एकवटलेली राहिली. ८० च्या दशकात सोव्हिएत युनियनच्या पाडवाची सुरूवात झाल्यानंतर नागोर्नो - काराबाघच्या जनतेनं आर्मेनियासोबत जाण्याचा कौल दिला. यामुळे मग या प्रदेशातील वांशिक वाद पुन्हा उफाळून आला. रशियापासून वेगळं झाल्यानंतर आर्मेनिया आणि अझरबैजानने एकमेकांविरोधात युद्ध पुकारलं. या वांशिक आणि धार्मिक हिंसेंला हजारो लोकं बळी पडले तर लाखांच्या संख्येंनी लोकांना विस्थापन करावं लागलं.  रशियाच्या मदतीनं १९९४ ला सरतेशेवटी या दोन देशांमध्ये शस्त्रसंधीचा करार झाला. या करारानुसार नागोर्नो - काराबाख या प्रदेशाचा मालकीहक्क अझरबैजानकडे आला. मात्र, आर्मेनिया सरकारच्या पाठिंब्यावर तिथल्या मुळवंशीय आर्मेनियन लोकांचीच सत्ता या प्रदेशात कायम राहिली. 

या दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी ( आणि इथल्या तेलसंसाधनांमध्ये आपले हितसंबंध कायम राहावेत) यासाठी फ्रान्स, रशिया आणि अमेरिकानेही वेळोवेळी मध्यस्थी करून पाठपुरावा केलेला आहे. मात्र तरीही मागच्या तीन दशकांपासून परिस्थिती जैसे ती च असून २०१६ पासून तर हा वाद वरचेवर अजून चिघळत चालला आहे. या वादाला नागोर्नो - काराबाघच्या प्रदशेला असलेलं भूराजकीय महत्वसुद्धा तितकंच कारणीभूत आहे. अझरबैजानला तुर्की चा पाठिंबा असून दुसऱ्या बाजूला आर्मेनियाला रशियाचा आधीपासूनच भक्कम साथ मिळालेली आहे. त्यामुळेच स्वतःचं लष्कर देखील नसलेल्या आर्मेनियाच्या राजकीय नेतृत्वानं रशियाच्या याच पाठबळावर अझरबैजान आणि तुर्कीच्या मग्रुरीला जशास तसे उत्तर देण्याची रणनीती कायम ठेवली आहे. 

रशिया आणि तुर्कीमधील राजकीय नेतृत्व या भूराजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या प्रदेशावर आपला प्रभाव कायम राहावा यासाठी आर्मेनिया आणि अझरबैजानचा प्यादा म्हणून वापर करत आलेले आहेत. नागोर्नो - काराबाख या प्रदेशावर संपूर्ण ताबा मिळवण्याच्या अझरबैजानच्या महत्वकांक्षेला तुर्कीच्या राजकीय नेतृत्वानं वेळोवेळी उघड पाठिंबा दर्शवला असून दुसऱ्या बाजूला तुर्कीच्या ऑटोमन साम्राज्याने पहिल्या महायुद्धादरम्यान आर्मेनियन वंशाच्या १५ लाख लोकांची केलेली हत्या हेच आर्मेनिया आणि तुर्कीमधील शत्रुत्वभावाचं मूळ आहे. या निघृण हत्याकांडाची खदखद अजूनही आर्मेनियन वंशाच्या लोकांच्या मनात खदखदत आहे. मात्र जुना रक्तरंजित इतिहास आणि वांशिक मतभेदाच्या पडद्याआडून खरंतर दोन्ही देशांच्या सीमेला लागून असलेल्या नागोर्नो - काराबाख प्रदेशातील कॅस्पियन हायड्रोकार्बन या नैसर्गिक संसाधनाची प्रचंड प्रमाणातील उपलब्धता आणि या इंधनामध्ये तुर्की, रशिया, अमेरिका आणि इतर युरोपीयन देशांचे गुंतलेलं हिंतसंबंधच कारणीभूत आहेत. 

यामुळेच प्रचंड जागतिक तेलवाहतूक होत असलेल्या या प्रदेशात शांतता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी फक्त आर्मेनिया आणि अझरबैजानचीच भूमिका महत्वाची नसून या प्रदेशातील नैसर्गिक संशोधनांमध्ये हितसंबंध गुंतलेले हे मोठे देश किती लवकर या समस्येवर तोडगा काढून हे युद्धाचे सावट दूर ढकलण्यात यशस्वी होतात, हे पाहणं रंजक असणार आहे. या वादाची आणि इतकी मुबलक संसाधनं असलेल्या या प्रदेशात इतर ताकदवान राष्ट्राच्या गुंतलेल्या आर्थिक- राजकीय हितसंबंधांची मोठी किंमत मात्र इथले मूळवंशीय लोक चुकवत आहेत.