India
ॲपल फॅक्टरी कामगारांच्या लढ्याला यश; कंपनीकडून अखेर माघार
कामगारांचे सर्व आक्षेप मान्य करत कंपनीनं माफी मागितली आहे.
बंगळुरूजवळील ॲपलचे स्मार्टफोन्स बनवणाऱ्या फॅक्टरीतील कामगारांच्या लढ्याला यश आलं असून कामगारांचे सर्व आक्षेप मान्य करत कंपनीनं सदरील प्रकरणात माफी मागितली आहे. ज्यादा तास काम करूनही वेळेवर पगार होत नसल्याच्या विरोधात कामगारांनी पुकारलेल्या विरोध प्रदर्शनाला हिंसक वळण लागून फॅक्टरी परिसरात मोडतोड झाल्यानं या घटनेची राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाली होती. यासंबंधी कंपनीच्या मालमत्तेचं नुकसान केल्याबद्दल अनेक कामगारांवर पोलीस कारवाई करत त्यांना तुरुंगातही टाकण्यात आलं होतं.
नुकत्याच पूर्ण झालेल्या तपासातून सदरील फॅक्टरीतील कामगारांवर अन्याय करत कंपनीकडून कामगार कायद्यांचं उल्लंघन झालं असल्याचं मान्य करत या प्रकरणाबद्दल कंपनीकडून कामगारांची आता रितसर माफी मागण्यात आलेली आहे. ज्या कामगारांवर अन्याय झालेला आहे त्यांना उचित ती भरपाई देऊन, "यापुढे कामगार कायद्यांचं उल्लघन होणार नाही, याची काळजी घेऊ," असं आश्वासन विस्ट्रॉन कॉर्पोरेशन कडून देण्यात आलंय. विस्ट्रॉन कॉर्पोरेशनचे भारतातील प्रमुख अधिकारी विन्सेंट ली यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं.
दुसऱ्या बाजूला ॲपलनेही या प्रकरणाची स्वतंत्र्य तपासणी केली असता त्यांनाही या फोन बनवणाऱ्या विस्ट्रॉन कोर्पोरेशच्या नागरपुरा प्रकल्पात कामगार कायद्याचं उल्लंघन केलं गेलं असून सदरील घटनेतील कामगारांचा झालेला उद्रेक न्याय्य असल्याचं आढळून आलं. "विस्ट्रॉन कोर्पोरेशननं कामगारांना दिली जाणारी ही अन्यायी, जाचक वागणूक थांबवून कामाचे तास आणि योग्य पगाराची आपली व्यवस्था नीट करेपर्यंत स्मार्टफोन्स बनवण्याचं त्यांना देण्यात आलेलं कंत्राट आम्ही रद्द करत आहोत," अशी अधिकृत भूमिका ॲपल कंपनीनं पत्रक काढून जाहीर केली आहे.
'विस्ट्रॉन कॉर्पोरेशन' ही मूळची तैवानमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी असून ॲपलसह इतर अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रांमधील सुट्या भागांचं उत्पादन ही कंपनी करते. मागच्या काही महिन्यांपासून कंपनीकडून दिल्या जात असणाऱ्या वागणुकीवर इथले कामगार नाराज होते. आधी, ८ तासांची एक, अशा पद्धतीनं एकूण ३ शिफ्टमध्ये कंपनीचं कामकाज चालत असे. मात्र, यात बदल करून १२ तासांच्या दोन शिफ्ट व्यवस्थापनाकडून लागू करण्यात आल्या होत्या. त्यासोबतंच या वाढलेल्या ४ तासांच्या कामाचा मोबदला न देता उलट पगारकपातही करण्यात आली होती. त्यात अजून यातल्या बऱ्याच कामगारांचा मागच्या ४ महिन्यांपासून पगारही न झाल्यामुळे या कामगारांमध्ये प्रचंड असंतोष होता. याच असंतोषाचा उद्रेक होऊन शनिवारी कामगारांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यात झालेल्या जाळपोळ आणि तोडफोडीत कंपनीच्या मालमत्तेचं मोठं नुकसानही झालं होतं.
आंदोलन करणारे हे कामगार अचानक हिंसक का झाले? असा प्रश्न सरकार आणि मीडियामधून उपस्थित केला जात होता. आंदोलकांवर हिंसक कारवाई करून पोलीसांकडूनही १६० पेक्षा जास्त कामगारांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. ॲपलसारख्या प्रचंड नफा कमावणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कामगारांना अशी वागणूक दिली जाते आणि सरकारही कंपनीविरोधात कसलीच कारवाई करत नाही याबद्दल अनेक सवाल उभे केले जात होते. सरतेशेवटी ॲपलचे फोन बनवल्या जाणाऱ्या या फॅक्टरीत कामगार कायद्यांचं उल्लंघन झाल्याचं मान्य करत कंपनीला माघार घ्यायला लावून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात हे कामगार यशस्वी ठरले आहेत.