India

'गुपकर युती देशद्रोही', गृहमंत्र्यांच्या ट्विटवरून मुफ्ती-शहा यांच्यात शाब्दिक चकमक

या 'राष्ट्रदोही युती'ला साथ दिल्याबद्दल काँग्रेसलाही शहांनी जाब विचारलाय.

Credit : शुभम पाटील

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी 'गुपकर युती'ची स्थापना करून देशद्रोह केल्याचं म्हणत विरोधकांवर निशाणा साधलाय. मंगळवारी गृहमंत्र्यांनी ट्विटरवरून केलेल्या या आरोपांना जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही ट्विटरवरून तात्काळ उत्तर देत हा वाद एकतर्फी होणार नाही याची खात्री दर्शवली आहे.

"जम्मू काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपविरोधात आपापसातील मतभेद विसरून एकत्र आलेल्या नॅशनल कॉन्फेरन्स, पीडीपी आणि पीपल्स कॉन्फेरंस या पक्षांची 'गुपकर गॅंग' ३७० कलम हटवण्यासाठी देशविरोधी कारवाया करत आहे,'' असं म्हणत अमित शहा यांनी, 'भारताविरोधातील या कारवायांमध्ये परकीय शक्तींची मदत घेणाऱ्या या राष्ट्रदोही युती'ला साथ दिल्याबद्दल काँग्रेसलाही जाब विचारलाय. 

 

 

जम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवत राज्याचा दर्जा काढून जम्मू काश्मीर आणि लडाख या २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याचं विघटन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं मागच्या वर्षी घेतला होता. भाजपच्या या निर्णयाविरोधात नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहमूबा मुफ्ती व पीपल्स कॉन्फेरन्सचे सज्जाद लोन या राज्यातील ३ प्रमुख नेत्यांनी एकत्र येत ठराव पास केला. भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला विरोध करणं, काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देणं आणि ३७० कलाम पुन्हा परत आणणं या तीन प्रमुख मागण्यांवर एकवाक्यता होऊन या नेत्यांनी पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लरेशनची स्थापना केली होती. या युतीमध्ये एकूण ७ पक्षांचा समावेश आहे. 

मागच्या वर्षी ५ ऑगस्टला ३७० कलम हटवण्याचा निर्णय केंद्रानं घेतल्यानंतर याविरोधात काश्मीरमधल्या मुख्य राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक फारुख अब्दुल्ला यांच्या श्रीनगरमधील गुपकर मार्गावर असलेल्या घरी झाली होती. याच बैठकीत भाजपविरोधात ही आघाडी उघडण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यामुळे या आघाडीला 'पीपल्स अलायन्स फॉर गुपकर डिक्लरेशन' असं नाव देण्यात आलं. 

नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला या युतीचे प्रमुख आहेत तर पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यां च उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचा या आघाडीत प्रत्यक्ष सहभाग नसला तरी या आघाडीला काँग्रेसनं बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. जम्मू काश्मीरमध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपविरोधात उतरण्याचा निर्णय या आघाडीनं घेतल्यानंतर आता आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी दोन्ही बाजूनं सुरु झाल्या आहेत. 

गृहमंत्री अमित शाह यांनी आज या गुपकर आघाडीविरोधात मोहीम उघडत अनेक ट्विट्स केले. ''ही गुपकर गॅंग भारताविरोधातील आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे. देशाविरोधात काम करणाऱ्या या गँगला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसचाही खरा चेहरा यानिमित्तानं समोर आलाय. ३७० कलम परत आणून काशमीरला पुन्हा दहशतवादाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न केला जातोय." असं ट्विट त्यांनी केलंय. 

 

 

याला उत्तर देताना अब्दुल्ला यांनी 'भाजपला विरोध म्हणजे भारताला विरोध' असा अर्थ काढणाऱ्यांवर निशाणा साधत गुपकर आघाडी देशासाठीच काम करणार असल्याचं ठामपणे सांगितलं. मेहबूबा मुफ्ती यांनी देखील शहांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपविरोधात आम्ही सर्वजण एकत्र आल्यानंतर शहांना आलेलं हे नैराश्य असून त्यामुळेच ते अशी बडबड करत असल्याचं म्हटलंय. 

 

 

काश्मीरसाठी स्वतंत्र ध्वज आणि पाकिस्तानसोबत शांततापूर्ण चर्चेसाठी आग्रही असणाऱ्या अब्दुल्ला आणि मुफ्ती यांना देशद्रोही अशी उपमा भाजप नेत्यांकडून सातत्यानं दिली जाते. एकेकाळी मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी सोबतच युती केलेल्या भाजपच्या दुट्टपीपणावर बोट ठेवत मुफ्ती यांनी, "लोकशाही मार्गानं निवडणूका लढवण या देशात कधीपासून देशद्रोह झाला?" असा सवाल केला. 

"सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाणाऱ्या भाजपनं आम्हाला देशप्रेम शिकवू नये. लव्ह जिहाद, तुकडे तुकडे आणि आता गुपकर गॅंग अशा टुकार राजकीय मुद्द्यांचं भांडवल करणं सोडून वाढत्या बेरोजगारी व महागाईसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष द्यावं," असा सल्लाही मुफ्ती यांनी यावेळी दिला.